Login

जन्म बाईचा भाग २

कथा मालतीच्या जीवनाची
"मालू बाळा कुठे आहेस?" श्रीपंतरावांनी मालतीला आवाज दिला.
ती पीठ मळत होती. तसाच पिठाचा हात घेऊन ती आली.

त्यांच्या हातात बरंच सामान होतं.
त्यांनी पाहीले की, तिच्या हाताला पीठ आहे.

"मालू,जा तू कर काम." पायातील चप्पल सरकवत ते म्हणाले.

"मामांजी, मी हात धुवून येते." असं म्हणत ती लगबगीने स्वयंपकघरात गेली.

हात धुतले. श्रीपंतरावांच्या हातातील सामान घेतलं आणि त्यांना माठातील थंडगार पाणी आणून दिलं.

"मामांजी, चहा देऊ का?"

ती आधीच कामात आहे हे पाहून ते तिला नको म्हणाले.

त्यांनी घरभर नजर फिरवली.

"शर्मिला,सुमन आणि नयन कुठे आहेत?"

"शर्मिला ताईंच्या लग्नाची खरेदी करायला गेल्या आहेत."

"बरं ठीक आहे."

मालती पुन्हा स्वयंपाकघरात निघाली तसं त्यांनी पुन्हा तिला आवाज दिला.

"मालू."

ती थांबली.

"बाळा, त्या पिशवीमध्ये भेळ आहे. तुला अवडते ना म्हणून आणली आहे. आधी निवांतपणे ती खाऊन घे मग काय ती कामं कर. "

तिने होकारार्थी मान हलवली आणि निघून गेली.

पिशव्यांमध्ये जे ही सामान होतं ते काढलं. भेळ होती ती देखील काढली. एका ताटात सासऱ्यासाठी काढली.


"मामांजी." तिने श्रीपंतरावांना भेळ दिली.

"तुलाही घे बरं." तिच्या डोक्यावर अलगद मायेने हात फिरवत ते म्हणाले.

मालतीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.

ते पाहून श्रीपंतरावांनी ताट बाजूला ठेवलं आणि म्हणाले,

"बाळा, काय झालं?"

तिने डोळ्यातील पाणी अलगद टिपले.

"मालू, सांग बरं काय झालं?"

"बाबांची आठवण आली. ते देखील बाजारात गेले की, माझ्यासाठी भेळ आणायचे आणि जसं आज तुम्ही म्हणाला आधी खाऊन घे तसंच ते देखील म्हणायचे."

"मालू, तुझे बाबा फार लवकर देवाघरी गेले, फार वाईट झालं; पण पोरी काळजी करू नको मी आहे ना? तुला काहीही खावं प्यावसं वाटलं तर मला मोकळ्या मनाने सांग. मी तुझा बाबा जरी नसलो तरी बाबाप्रमाणेच आहे."

ते ऐकून तिला भरून आलं.

ती स्वयंपाकाच्या खोलीत गेली. बाबाप्रमाणे जीव लावणारे सासरे देवाने दिले ह्यासाठी आभार मानले.
कितीतरी वर्षाने भेळ तिला गोड लागत होती. बाबा गेले आणि त्या पाठोपाठ भेळ खाण्याची इच्छा देखील गेली होती.

सासऱ्याच्या रुपात तिला तिचे बाबाच दिसत होते.

संध्याकाळी जेव्हा सुमन, शर्मिला आणि नयन आल्या तेव्हा श्रीपंतरावांनी सुमनला खोलीत बोलावून घेतलं.

त्यांच्या आवाजात जरा राग होता, इतक्या वर्षाच्या संसारात तिला इतका अनुभव आलाच होता की, नवऱ्याच्या आवाजावरून त्याची मनस्थिती कशी आहे हे लगेच ओळखून जायची. जरा घाबरतच ती खोलीत गेली.

ते नक्कीच खोलवर विचार करत होते हे स्पष्ट दिसत होतं.

"काय चाललंय?" सुमनकडे नजर रोखत म्हणाले.

"काय झालं?" डोक्यावर पदर घेत म्हणाली.

"कुठे गेला होता?"

"शर्मिलाच्या लग्नाची खरेदी करायला. लग्न पंधरा दिवसांवर येऊन ठेपलं आहे; म्हणून साड्या घ्यायला गेलो होतो."

"बरं, मग मालतीला सोबत का नाही नेलं?"

"सगळ्याच जर बाहेर गेलो असतो तर स्वयंपाक राहिला असता."

"म्हणजे मालतीला स्वयंपाक करायला घरी ठेवलं?" त्यांच्या आवाजात राग स्पष्ट दिसत होता.


"नाही तसं नाही..."

ती पुढे काही बोलणार तोच श्रीपंतरावांनी तिला थांबवलं.

"सुमन, नयन जशी ह्या घरची सून आहे तशीच मालती देखील आहे. नयन आणि मालती ह्या दोघींना समान वागणूक मिळाली पाहिजे, हे लक्षात ठेव. नयन तुझी भाची आहे, तीच्याविषयी तुझ्या मनात प्रेम आहे; पण हे विसरू नको मालती देखील आता ह्या घरातील सदस्य आहे. तिला अंतर दिलेलं मला चालणार नाही आणि मी ते खपवून घेणार नाही. ह्या घरात सर्वांना नियम समान आहेत. समजलं?"

"होय."

श्रीपंतरावांसमोर एकही शब्द बोलायची हिंमत सुमनमध्ये नव्हती.

"बरं, काय खरेदी केली आहे?"

"हो दाखवते." असं म्हणत तिने बॅगमधून एक एक साड्या काढायला सुरवात केली.

शर्मिला नवरी म्हणून तिला लाल रंगांची सुबक नक्षीकाम असलेली सुंदर अशी साडी विकत घेतली होती.
सुमनने स्वतःला आणि नयनला पैठणी घेतली होती. मालतीसाठी काठ पदर असलेली दुसरीच साडी घेतली होती. तिने घाबरतच त्या साड्या दाखवल्या.


"दोन पैठणी?"

"हो एक मला आणि एक नयनला."

"मालतीसाठी पैठणी?"

"ती पैठणी नेसत नाही."

"तू तिला विचारलं का?"

"नाही. तिच्याकडे एकही पैठणी नाही."


"मालती." त्यांनी मालतीला आवाज दिला.

मालती आली.


"मालती, शर्मिलाच्या लग्नात पैठणी नेसायला आवडेल ना?"

तिने होकारार्थ मान हलवली.

तिला पैठणी आवडायची; पण आईकडे गरिबी होती, म्हणून तिने आईकडे तो हट्ट केला नव्हता. तिच्याकडे एकही पैठणी नव्हती. ती मनोमन खुश झाली.

"बरं ठीक आहे जा."

मालती निघून गेली.

"ऐकलस? ती देखील पैठणी नेसणार. उद्याच्या उद्या जाऊन साडी बदलून आण. जशी नयनला साडी घेतली आहे तशीच मालतीला घ्यायची. हो आणि उद्या जाताना मालतीला देखील घेऊन जा. नयन आणि मालती दोघींना मिळुन स्वयंपाक करायला लाव आणि निघा."

"बरं ठीक आहे."


सुमनला राग आला होता.

मनातल्या मनात धुसफूस चालली होती.

'इतका काय विचार करत आहेत तिचा काय माहित? तिला सवय आहे का पैठणी सारख्या महागड्या साड्या नेसायची. तिने गप्पपणे नेसली असती साडी. तिच्यासाठी कशाला उगाच खर्च करायचा? इतकी काय मोठी लागून गेली आहे.'

जी काय धुसफूस करू शकत होती ती मनातच, त्यांच्यापुढे ती काहीच बोलू शकत नव्हती.

दोन्ही सुनांना समान वागणूक द्यायची हा विचार श्रीपंतरावांचा होता. सुमनचा कल नयनकडे होता. मालतीला किंमत दिलेली तिला आवडत नव्हती.

क्रमशः
अश्विनी ओगले.
कथा कशी वाटतेय कंमेंटमध्ये जरूर सांगा. एक लाईक जरूर द्या.
सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा"


🎭 Series Post

View all