Login

जन्म बाईचा भाग ३

कथा मालतीच्या जीवनाची
सुमनची अजिबात ईच्छा नव्हती; पण श्रीपंतराव म्हणाले म्हणून ती मालतीला तिच्यासोबत घेऊन जायला तयार झाली. तिचा नाईलाज झाला होता. नवऱ्यासमोर बोलायची हिम्मत कुठे होती?

शर्मिला रुममध्ये बसली होती. सुमनच्या तोंडाचा पट्टा चालू होता.

"तुझ्या बाबांना खूप पुळका येतो तिचा. काय तर म्हणे जशी नयन तशी मालती. माझी नयन कुठे आणि ती कुठे? आता तिच्यासाठी मला जावं लागणार."


"अगं आई काय झालं इतकं चिडायला?" शर्मिला.

"चिडायला नाही होणार का? काय वाईट साडी होती का मालतीची? त्यांना दाखवली तर म्हणतात जशी साडी नयनला घेतली आहे अगदी तशीच मालतीला घ्यायची. किंमतच नाही मला."

"मला काय वाटतं बाबा बरोबर बोलत आहेत गं. दोघींच्या साड्या सारख्या हव्या गं. मी तुला तेच म्हणत होते, तर तू म्हणाली तिला नको पैठणी."

"तू पण तुझ्या बाबांसारखं बोलतेय. जाऊ दे मला आता काहीच बोलायचं नाही." ती तोंड फुगवत म्हणाली.

"काय गं आई, माझं लग्न आहे आणि अशी तू चिडचीड करतेय."

लेक जाणार म्हणून ती भावनिक झाली.

"बरं तुला अजून काही खरेदी करायची असेल तर सांग. मी आणि मालती उद्या बाजारात जाणार आहोत."

"काही नको मला."
तिने सुमनला मिठी मारली.

सकाळीच सुमनने मालतीला बाजारात जायचं आहे हे सांगितले, ती देखील खुश झाली. घरातलं लग्न होतं. वेगळाच उत्साह होता. दुपारचं जेवण देखील तिने पटकन उरकलं. नयन नावासाठी स्वयंपाकघरात बसायची. तिला स्वयंपकाची जराही आवड नव्हती. ती लग्न करून आली तरी सुमनने अजूनही जबाबदारी तीच्यावर सोपवली नव्हती. नयनच्या लग्नाला वर्ष होऊन गेले होते, तरी तिला स्वयंपका कसा करतात हे माहीत नव्हतं, मात्र मालतीवर लग्न झाल्यावर दोन दिवसातच सगळ्या कामाची जबाबदारी सोपवली होती. मालतीसोबत वागणं नयन जवळून पाहत होती. तिला काहीच पडली नव्हती, उलट ती मजा बघायची आणि घरातली मोठी सून म्हणून मालतीला कामं सांगायची. मालती देखील मोठी जाऊ म्हणून तिला मान सन्मान द्यायची. नयन मालतीच्या चांगल्या स्वभावाचा पुरेपूर फायदा घ्यायची. नयनचा स्वभाव असाच होता. केवळ स्वतःचा विचार करणारी. मालती मात्र सर्वांना आपलं समजणारी आणि सर्वांचा विचार करणारी.


नयनने एकाही कामाला हात लावला नव्हता. उगाच भाजी निवड, लसूण सोलून दे इतकंच काय ते केलं. श्रीपंतरावांचं बोलणं तिनेही ऐकलं होतं. मालतीला एकटीला काम करतांना बघितलं तर ते तिला बोलतील ह्याची तिला कल्पना होती, म्हणून मनात नसतांना देखील ती मालतीला वरवर मदत करत होती.

"नयन, तू देखील येतेय ना बाजारात?" सुमन.

"आत्या, मी काम करून दमलेय. तुम्ही आणि मालती दोघी जाल का?"

"बरं तू आराम कर, सकाळपासून तू देखील राबतेय." सुमन.

'मी तर माझी साडी घेतली आहे, हिच्यासाठी मी कशाला जाऊ.' नयनला मालतीसाठी जायचं नव्हतं.

मालती आणि सुमन दोघीच गेल्या.


"तुला जी साडी आवडतेय ती पटकन घे. मला अजून बरीच कामं आहेत." सुमन तोंड वेडंवाकडं करतच म्हणाली.

मालतीला कळून चुकलं होतं की, सुमनला साडी घ्यायची ईच्छाच नव्हती.

"आत्याबाई, तुम्हाला जी आवडेल ती साडी घ्या चालेल मला."

"तुला चालेल पण तुझ्या सासरेबुवांना नाही चालणार." ती तोंडातच पुटपुटली.

दुकानदाराने छान रंगसंगतीच्या साड्या दाखवल्या. तिला मोरपंखी रंगाची साडी खूप आवडली. तिने तीच घेतली.

सासू सुनांनी किरकोळ खरेदी केली आणि घरी गेल्या.

श्रीपंतराव वर्तमानपत्र वाचत बसले होते.

मालतीला आणि सुमनला पाहिलं तसं वर्तमानपत्र बाजूला ठेवले.

"झाली का खरेदी?" चष्मा नीट करत त्यांनी विचारले.

"हो झाली खरेदी. मालतीला जी साडी आवडली तीच घेतली." सुमनने हसून उत्तर दिलं.

मालती तर सुमनचं रूप पहातच बसली.

दुकानात तर अगदी चिडून बोलत होती आणि इथे सासऱ्यासमोर गोडीगुलाबीने वागत होती.

तिच्या मनात हाच विचार येत होता.

'आत्याबाई इतकं कसं दुटप्पी वागू शकतात? दुकानात तर तोंड वेडवाकडं करून बोलत होत्या आणि इथे मात्र हसरा चेहरा ठेवून बोलत आहेत.'

"मालती, आवडली ना तुला साडी?" श्रीपंतराव.

"हो मामाजी."

तिला असं वाटत होतं ती साडी त्यांना दाखवावी.
तिच्या मनात तोच विचार घोळत होता.

तितक्यात श्रीपंतराव म्हणाले.

"कोणत्या रंगाची साडी घेतली आहे बघू?"

तीला खूप बरं वाटलं.

एखादी लहान मुलगी कशी आई बाबांना स्वतःच्या वस्तू दाखवते अगदी त्याच लगबगीने ती गेली आणि ती साडी सासरेबुवांना दाखवली.

"वा! खूप सुंदर आहे. सुरेख." त्यांनी कौतुक केलं. साडीचा पोत नयनला जी साडी आणली होती तसाच आहे की, नाही ह्याची खात्री केली. तशीच होती साडी फक्त रंग वेगळा. त्यांच्या मनासारखं झालं होतं त्यामुळे ते देखील खुश झाले.

सुमन हे सगळं तिथेच उभी राहून पाहत होती.

'इतकं काय हिचं कौतुक करत आहेत काय माहीत? काय ह्या पोरीने भुरळ पाडली आहे देव जाणे.'


सुमनला माहीत नव्हतं की, श्रीपंतराव माणसं ओळखण्यात पटाईत होते. उगाच नाही त्यांनी मालतीला घरची सून करून आणली होती.
मालती गरीब घरातली होती तरी ती संस्कारी होती. त्यांना विश्वास होता मालती त्यांच्या मुलासोबत चांगलाच संसार करणार.

क्रमशः
अश्विनी ओगले.
कथेचा हा भाग कसा वाटला कंमेंटमध्ये जरूर सांगा, एक लाईक जरूर द्या. कथेचा रोज एक भाग पेजवर येईल. पेजला जरूर फॉलो करा.