Login

जन्म बाईचा भाग ४

कथा मालतीच्या जीवनाची
बघता बघता शर्मिलाच्या लग्नाची तारीख जवळ आली. मालती तर कामात गुंतून गेली होती. शर्मिलाला तिच्या लग्नात दयायला तिने स्वतःच्या हाताने लोकरीच्या वस्तू बनवल्या होत्या. दाराचं तोरण, ताटावरचं रुमाल खूप मन लावून बनवलं होतं. लग्न घर म्हंटलं की, कामं काही कमी नव्हती; पण तरी तिने त्यातून वेळ काढून शर्मिलासाठी गोड आठवण म्हणून ते बनवलं होतं. खरंतर तिला लहानपणापासून खूप आवड होती, माहेरी देखील सतत ती कलाकुसर करतच राहायची. रांगोळी, मेहेंदीसुद्धा सुरेख काढायची. तिच्या लहान बहिणींना देखील तिने शिकवलं होतं. कितीतरी तास ती त्याच्यातच रमून जायची, मात्र लग्न झाल्यापासून जबाबदारी वाढली होती, त्यामुळे निवांत असा वेळ मिळतच नव्हता; पण ह्यावेळी तिने ठरवलं होतं शर्मिलासाठी वेळ काढून वस्तू बनवायच्या. घरातली सगळी कामं झाली की, ती तिच्या खोलीत बनवत बसायची.


माहेरी जेव्हा ती काही कलाकुसर करायची, तेव्हा तिच्या बहिणी कमल आणि विमल दोघीही तिच्या बाजूलाच बसायच्या. त्या दोघींसाठी मालती ताई फार प्रिय होती. त्या अवतीभोवती असल्या की, मालतीलाही खूप बरं वाटायचे. मालतीला घाम आला की, धाकटी कमल ईवल्याश्या हाताते तिच्या ताईचा घाम पुसायची. विमल हातपंख्याने तिला हवा देत. मालतीची आई कांता दुरूनच बहिणीचं प्रेम पाहून मनोमन खुश व्हायची, तिलाही तीच्या तिघी लेकींचं खूप कौतुक वाटायचं.
लेकीची कलाकुसर पाहून आई तिचं कौतुक करायची. घरात प्रसन्न असं वातावरण होतं. तिच्या बाबाला देखील सर्वगुणसंपन्न लेकीचं कौतुक होतं. त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसायचं. आठवड्याचा बाजार असला की, बाबा आठवणीने तिच्यासाठी भेळ आणायचे. मालती, बहिणीसोबत दारातच बाबांची वाट बघत बसायची. बाबा आले की, त्यांच्या हातातून पिशव्या घेऊन सगळ्याच बहिणी भेळवर ताव मारायच्या; पण त्याआधी मालती आई बाबांच्या वाटणीची भेळ आठवणीने बाजूला काढत. मालती अशीच होती फक्त स्वतःपुरता विचार करायला तिला कधी जमलंच नाही. स्वतः पुरता विचार करायला तिला तेव्हाही जमलं नव्हतं आणि आताही जमत नव्हतं.
कितीतरी दिवसाने ती त्या जुन्या आठवणीत रमली होती. आठवणीच तर होत्या ज्या तिच्यासाठी खूप मौल्यवान होत्या. आठवड्याच्या बाजारातून भेळ आणणारे बाबा,माया करणारे तिचे बाबा देवाने हिरावून नेले होते. त्यांची पोकळी कधीही न भरणारी होती.

खूप हळवी झाली होती. तिच्या लक्षात आलं श्रीपंतरावांनी आईला देखील लग्नात बोलावलं आहे. आई,कमल, विमल तिघीही येतीलच. त्यानिमित्ताने तिघींची भेट होईल. ह्या विचाराने ती सुखावली.


लग्नाच्या दोन दिवस आधीच जवळचे नातेवाईक आले होते. तिला श्वास घ्यायला फुरसत नव्हती. मालती पाहुण्यांची सरबराई करण्यात इतकी गुंतली होती की,
ती स्वतःकडे देखील लक्ष देत नव्हती.
नयन मात्र काही ना काही बहाणा देऊन निघून जायची. नयनचे आई वडील म्हणजेच सुमनचा भाऊ लक्ष्मण आणि वहिनी लीला आली होती. श्रीपंतरावांच्या लक्षात ती गोष्ट येत होती. सुमनला मात्र त्यात काही वावगं वाटत नव्हतं. नयन चतुर होती, ती चतुराई श्रीपंतरावांच्या लक्षात येत होती. एकदा शर्मिलाचं लग्न झालं की, तिच्याशी सविस्तर बोलायचं त्यांनी मनोमन ठरवलं होतं.
सुमन जाणूनबुजून दुर्लक्ष करत होती, श्रीपंतराव मात्र तसं करणार नव्हते.

मालती इतकं करत होती की, सगळे पाहुणे तीचं कौतुक करत होते.

सुमनची लहान बहीण शारदाही आली होती.
मालतीचा स्वभाव तिला खूप आवडला.
दोघी बहिणी गप्पा मारत होत्या.

"ताई, मालतीचं खरंच कौतुक वाटतं. इतकं लहान वय पण सारं काही व्यवस्थित सांभाळतेय. कामाच्या नादात जेवली देखील नाही. मीच तिला आठवण करून दिली तेव्हा कुठे ती जेवली. आल्यापासून बघतेय मी पोरगी राबराब राबतेय. ताई तू सुनेच्या बाबतीत नशीब काढलं गं."


"इतकं काय त्यात? नव्याचे नऊ दिवस. सहा महिनेच झाले आहेत लग्नाला. तिचा स्वभाव कळायला अजून अवकाश आहे."

सुमनला काही केल्या मालतीचा चांगुलपणा दिसतच नव्हता. तिच्याविषयी मनात आधीपासूनच नकारात्मक भावना होती. मालतीने कितीही केलं तरी सुमनला ते दिसायचं नाही. दुसऱ्याने तिचं कौतुक केलं की, तिला इतकं काही वाटायचं नाही.

लग्नाच्या दिवशी मालती शर्मिलाची तयारी करत होती. छान अशी केशरचना केली. मोगऱ्याचा गजरा माळला. हलकासा मेकअप केला. खूप गोड दिसत होती शर्मिला.

"वहिनी, खूप खूप धन्यवाद." शर्मिला आरशात स्वतःचं रूप पाहत म्हणाली.

सुमन आली पाहते तर काय मालतीची तयारी झाली नव्हती.

"मालती, काय हा अवतार? कधी तयार होणार आहेस?" सुमन ठसक्यात बोलली.

आजूबाजूला चार बायका होत्या. त्यांच्यासमोर सुमन अशी बोलली. मालतीला फार वाईट वाटलं.

"आई, वहिनी माझी तयारी करत होत्या, म्हणून त्यांना उशीर झाला." शर्मिला मालतीची बाजू सावरत म्हणाली.

"हिला कळायला नको का? जरा लवकर उठायला काय झालं होतं?" मालतीवर जळजळीत कटाक्ष टाकत ती म्हणाली.

मालतीच्या डोळ्यात काठोकाठ पाणी होतं.

त्या बायका आपापसात कुजबुजत होत्या.

"जा आणि लवकर तयार होऊन ये, तोंड काय बघत बसली आहेस." सुमन म्हणाली.

मालती निघून गेली.

'कमीत कमी त्या बायकासमोर तर आत्याबाईंनी बोलायचे नव्हते.' मालतीचं मन म्हणत होतं.

ती तशीच तिच्या खोलीत गेली. तिथे श्रीकांतची तयारी झाली होती.

तिचा अवतार पाहून तो देखील तिच्यावर रागावला.

"काय हे मालती ? कधी तयार होणार आहेस तू? नवऱ्या मुलाकडचे आता येतच असतील आणि असा तुझा अवतार. लवकर तयार हो नाहीतर आई ओरडेल." तो घड्याळाकडे पाहत म्हणाला.

ती स्वतःची बाजू मांडणार तोच श्रीकांतला कोणीतरी आवाज दिला.

"चल पटकन आवरून घे." असं बोलत तो खोलीमधून बाहेर पडला.

कसंबसं आवरलं आणि बाहेर आली. सुमन ज्या पद्धतीने बोलली होती त्यामुळे ती खूप दुखावली होती.

क्रमशः
अश्विनी ओगले.
कथेचा हा भाग कसा वाटला कंमेंटमध्ये जरूर सांगा, एक लाईक जरूर द्या. कथेचा रोज एक भाग पेजवर येईल. पेजला जरूर फॉलो करा.


🎭 Series Post

View all