Login

जन्म बाईचा भाग ५

कथा मालतीच्या जीवनाची

सुमनने चार बायकांसमोर अपमान केला होता, त्यामुळे मालती खूप दुखावली होती. तिची मेहनत जणू सुमनला दिसतच नव्हती. मनामध्ये किती जरी प्रश्नाचं वादळ उठलं तरी त्याचं उत्तर तिला काही सापडत नव्हतं. का आणि कशासाठी ही वागणूक? अशी काय चूक होती तिची? सासरी सर्वांना ती आपलं मानत होती ही चूक होती का? स्वतःहून सर्व जबाबदारी घेतली होती ही चूक होती का?

"सासरच तुझं घर आणि आता तीच तुझी माणसं. त्यांना तू कायम जप." आईचं हे वाक्य मनात कोरलं होतं, तशीच तर ती वागत होती, मग तरीही असं का? पावलोपावली होणाऱ्या अपमानास्पद वागणुकीने मानसिकरित्या खचत चालली होती.

शर्मिलाच्या लग्नासाठी जो उत्साह होता तो सुमनच्या अश्या खोचक बोलण्याने मावळला होता. तिला कळून चुकलं होतं, काहीही केलं तरी सुमनचा तिच्याप्रति असलेला दृष्टिकोन आणि वागणं बदलणार नाही.

किती हौसेने घेतली होती पैठणी. तिलाही छान तयारी करायची होती. लग्न हेच तर निमित्त होतं. छान नटायचं होतं, नाहीतर घरच्या कामात इतकं गुंतली होती की, स्वतःला आरशात पाहायला देखील वेळ नव्हता. किती आणि काय काय विचार केला होता. तिची खूप निराशा झाली.

नवरदेव आणि त्याच्या घरची मंडळी आली.
सनई चौघडे, दारात सजवलेलं मंडप, आशीर्वाद देण्यासाठी जमलेले नातेवाईक, प्रसन्न असं वातावरण होतं, मात्र मालती आतूनच उदास झाली होती. डोळे भरून येत होते.


कोणी काही बोललं की, मालतीच्या डोक्यातून ते जाता जायचं नाही. आताही तसंच झालं होतं. तिला तेच सतत आठवून वाईट वाटत होतं.

"नयन, कुठे आहे?" डोक्यावर पदर घेत सुमनने निलेशला विचारलं.

"आई ती तयारी करतेय."

"बरं."

मालती तिथेच उभी होती. नवरदेव आला तरी नयनची तयारी चालू होती, तरीही सुमनने काही प्रतिक्रिया दिली नाही.


'किती हा दुजाभाव? माझाच रागाराग का करावा?' मालती स्वतःलाच प्रश्न विचारत होती.

"निलेश, तिला लवकर यायला सांग." श्रीपंतराव निलेशला म्हणाले.

निलेश नयनला बोलवायला गेला. ती अजूनही तयार झाली नव्हती.

"नयन, मुलाकडचे आले आहेत. लवकर चल."
निलेश.

"काय हो इतकी घाई करता? मला तयारी करायला वेळ लागतो माहीत आहे ना तुम्हाला? आणि घरातली मोठी सून व्यवस्थित तयार झाली पाहिजे की नाही?"

"हो बरोबर आहे; पण बाहेर सगळे तुझी वाट बघत आहेत."

"बघू द्या." काजळाची रेघ ओढत ती म्हणाली.

तिची तयारी अगदी कासवाच्या गतीने सावकाश चालली होती.

त्यालाही चांगलंच माहीत होतं, तीची तयारी झाल्याशिवाय ती काही बाहेर येणार नाही.

"आई,नयनची तयारी होत आली आहे, येईलच ती." निलेशने सुमनच्या कानात हळूच सांगितले.

सुमनने शर्मिलाच्या होणाऱ्या नवऱ्याला मंगेशला ओवाळलं. तिच्या बहिणीच्या म्हणजेच शारदाच्या हातात ताट दिलं. मालतीही तिथेच उभी होती. शारदाने मालतीला ताट दिलं. मालती ओवाळणार तोच सुमनला नयन येतांना दिसली, तिने लगेच मालतीच्या हातातील ताट घेतलं आणि नयनच्या हातात दिलं.

"ही आमची मोठी सून." म्हणत तिने शर्मिलाच्या सासरच्या माणसांना तिची ओळख करून दिली.

मालतीचा चेहरा उतरला.

श्रीपंतरावांनी ते पाहिले. सुमनला त्या दिवशी इतकं समजावलं, तरी ती ऐकत नव्हती हे तिच्या वागण्यावरून दिसून आलं. तिच्या अश्या वागण्याचा खूप राग आला, त्यावेळेस त्यांनी तो राग गिळला.

"ही आमची धाकटी सून मालती." श्रीपंतरावांनी मालतीची ओळख करून दिली.

त्यांनी ओळख करून दिली, मालतीला बरं वाटलं.

मालती मोठ्या माणसांच्या पाया पडली.

नयनला मालतीचा राग आला; कारण तिला कोणाच्याही पाया पडायला आवडायचं नाही. नाईलाजास्तव ती देखील पाया पडली.

'जरा जास्तच चांगुलपणा भरला आहे हिच्यात.'
नयन.

बायकांना हळदी कुंकू लावायचं होतं, तेव्हा देखील सुमनने नयनलाच आवाज दिला. मालतीला मात्र सामावून घेतच नव्हते, तीच्याशी बाहेरचीच असल्यासारखे वागत होते. ती त्या घरातला हिस्सा असून नसल्यासारखीच होती.


नयनला तर खूप बरं वाटत होतं, तिला मोठेपणा जो मिळत होता. तिने देखील पटकन ताट घेतलं. असंही तिला मालतीच्या भावनांची काहीच पडली नव्हती. सुमन तिलाच किंमत देते, मोठी सून म्हणून मिरवते हे केव्हाच तिच्या लक्षात आले होते. मालतीला मात्र प्रत्येकवेळी दुधातून माशी काढावी असंच बाजूला काढलं जात होतं. ती तरी का किंमत देणार तिला?

नयनची आई लीला ती देखील सुखावली. तिच्या लेकीला मोठी सून म्हणून मान सन्मान जो मिळत होता. तिलाही तेच हवं होतं. तिच्या मनासारखं झालं होतं. मालतीचं लग्न जेव्हा श्रीकांतसोबत ठरलं तेव्हाच लीलाने नयनला सांगून ठेवलं होतं,

"तू घरातली थोरली सून आहे, मालती धाकटी आहे, तिच्या पुढे पुढे अजिबात करायचं नाही. सुरवातीपासूनच तिच्याशी कडक राहा. तिला मोकळीक देऊ नको. मोठी म्हणून तिने तुला मान दिलाच पाहिजे. घरची मोठी सून आहे तर मोठी म्हणूनच राहा. ह्या घरात तुझा रुबाब राहिला पाहिजे हे कायम लक्षात ठेव."

नयनच्या डोक्यात ती गोष्ट पक्की बसली होती.
लीला, वहिनी म्हणून सुमनशी तुटकपणे वागायची. सुमनला ती गोष्ट जाणवायची; पण भावावर जीवापाड प्रेम म्हणून ती वहिनी कशीही वागली तरी दुर्लक्ष करायची.
सुमन श्रीमंत होती आणि निलेशला नयन आधीपासूनच आवडायची. निलेश हुशार होता, सरकारी ऑफिसर होता. प्रॉपर्टी देखील भरपूर होती, नयनचं लग्न निलेशसोबत झालं की, ती तिच्या आयुष्यात सुखी राहील हाच विचार लिलाने केला होता.


लीला देखील आई होती आणि कांता देखील आई होती. दोघींच्या वागण्यात बरंच अंतर होतं. कांताने लेकीला सासरी सर्वांना धरून राहायचा सल्ला दिला होता.
दुनिया कशीही वागली तरी आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही ही कांताची शिकवण होती. आपण आपले कर्म करत रहायचे, बाकी देवावर सोडून द्यायचे. आपण जे ही कर्म करतो ते देव बघत असतो. आपण आपले चांगले कर्म करत राहायचे, कोणालाही दुखवायचं नाही, कोणालाही त्रास होईल असं वागायचे नाही, अश्याच विचारात ती वाढली होती. अरे ला का रे करण्याची वृत्ती मालतीमध्ये नव्हती. सोशिक होती ती, म्हणूनच सुमनचं वागणं असं होतं.

ती सोशिक असली तरी तिचा सासरा तिच्यासाठी खंबीर होता.
घरची सून म्हणून तो तिला मान मिळवून देण्याचा प्रयत्न करत होता.

जिथे तिचा स्वीकारच केला जात नव्हता, त्या वातावरणात मालती स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवू शकेल? काय होईल पुढे. जाणून घेण्यासाठी वाचत रहा अश्विनी ओगले लिखित कथा "जन्म बाईचा."

क्रमशः
अश्विनी ओगले.

तुम्ही सर्व वाचक कथेला भरभरून प्रतिसाद देत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुमच्या कंमेंट वाचून लिखाणाचा उत्साह नक्कीच वाढतोय. आजचा भाग कसा वाटला कंमेंटमध्ये जरूर सांगा. एक लाईक जरूर द्या. तुमची प्रत्येक कंमेंट म्हणजे माझ्या लिखाणाला मिळालेलं प्रोत्साहन आहे.

कथेचा रोज एक भाग पेजवर येईल. पेजला जरूर फॉलो करा.
कथेचा वापर यु ट्यूब किंवा इतर ठिकाणी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.