Login

जन्म बाईचा भाग ६

कथा मालतीच्या जीवनाची
शर्मिलाच्या लग्नात मालतीची आई कांता आणि तिच्या बहिणी आल्या होत्या. त्यांना पाहून मालती लगबगीने त्यांच्याकडे गेली.

"कशी आहेस मालू?" कांताने तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारले.

"मी बरी आहे आई. तू कशी आहेस?" मालती.

"बरी आहे मी."

कमल आणि विमल दोघीही मालतीला बघून खुश झाल्या.

दोघीही तिला घट्ट बिलगल्या.

सुमनने कांताची नावासाठी विचारपूस केली आणि निघून गेली.


श्रीपंतराव मात्र व्यवस्थित आदरातिथ्य करत होते.

श्रीकांतने देखील विचारपूस केली.

शर्मिलाचं धुमधडाक्यात लग्न झालं. पाठवणीची वेळ आली.

शर्मिला सर्वांच्याच गळ्यात पडून रडू लागली.
सगळेच हळवे झाले.

श्रीपंतरावांचा लेकीवरही तितकाच जीव होता.
ती गेल्यापासून ते उदास झाले होते. तिची फार आठवण यायची.


नयनला आई होण्याची चाहूल लागली. घरात आनंदी वातावरण होते.

मालती देखील तिच्यासाठी खुश होती.

त्या काळात मालतीने तिची खूप काळजी घेतली.

बघता बघता नऊ महिने सरले आणि तिने मुलीला जन्म दिला.

सगळेच खुश झाले.
मुलीचे नाव निशा ठेवले.
थोड्या दिवसाने शर्मिलाला देखील आई होण्याची चाहूल लगाली.

आता जो तो मालतीला आई कधी होणार हे विचारू लागला.

मालती आणि श्रीकांत प्रयत्न करत होते; पण तरी मूल रहात नव्हतं.


मालती निशाला घ्यायला गेली की, नयन काहीतरी बहाणा करून निशाला घेऊन जायची.

तिच्या ते लक्षात आलं होतं. तिला फार वाईट वाटत होतं.

तिलाही आता आई कधी होते असं झालं होतं.

शर्मिला बाळांतपणासाठी माहेरी आली होती.
मालती तिच्यासाठी देखील सगळं आवडीने करत होती. बघता बघता शर्मिलाचे नऊ महिने सरले आणि तिने बाळाला जन्म दिला. तिला मुलगा झाला होता. त्याचे नाव शुभम ठेवले.

नयन आणि शर्मिला दोघीही आईपण अनुभवत होत्या, मालती मात्र त्यासाठी खूप तरसत होती.


नयन निशाला मालतीच्या जवळ जाऊ देत नव्हती, मात्र शर्मिला स्वतःहुन शुभमला मालतीकडे द्यायची.


एक दिवस नयन आणि शर्मिलाचा संवाद तिने ऐकला.


"ताई, एक सांगू का?" नयन.

"बोला वहिनी."

"मी काय म्हणत होते तुम्ही शुभमला सारखं मालतीकडे नका देत जाऊ."

"का पण?"

"उगाच तिची सावली नको."

हे ऐकून मालतीला खूप वाईट वाटलं.


"वहिनी, असा काही विचार करू नका. मालती वहिनी तर किती जीव लावतात शुभमला. मी जितकी काळजी घेत नाही तितकं त्या घेतात आणि त्याही एक ना एक दिवस आईपण अनुभवतील. त्यांनाही बाळ होईलच." शर्मिला म्हणाली.


शर्मिला काही तिचं ऐकणार नव्हती. तीचं स्वतंत्र असं मत होतं.

'ह्यांना चांगलं सांगायला गेलं तर ऐकत नाहीये. जाऊ दे मला काय करायचं. त्यांचं ते बघून घेतील.'

मालतीला नयनचे विचार ऐकून खूप वाईट वाटलं होतं. ती निशाला किती जपत होती. हे ऐकल्यावर मालतीने निशाकडे जाणं कमी केलं होतं. गेली तरी ती निशाला घेत नव्हती.


'देवा, का ही परीक्षा? काय गुन्हा केला आहे मी? कधी अनुभवणार मी आईपण? नयन ताईंना माझी सावली देखील नको वाटते आहे.
मी इतकी वाईट आहे का?'


तो प्रसंग घडल्यापासून ती उदास राहू लागली.


"मालती, काय झालं? हल्ली काहीच बोलत नाही?" श्रीकांतने विचारले.

"काही नाही." मालती.

"काही नाही? मग इतकी शांत का असते?"


"आपण कधी आई बाबा होणार?" भरलेल्या डोळ्यांनी तिने हा प्रश्न विचारला.


"लवकरच." तो तिचा हात घट्ट पकडत म्हणाला.

"मलाही आई व्हायचं आहे. ते सुख अनुभवायचं आहे." तिच्या बोलण्यात आर्तता होती.


"मालती, योग्य वेळ आली की, ती गोड बातमी मिळेल."

"खरंच?" ती त्याच्या खांद्यावर विसावत म्हणाली.

"खरंच." तो तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला.

शर्मिला शुभमला घेऊन सासरी गेली.

मालतीला करमेना. ती उदास राहू लागली.
श्रीपंतरावांच्या लक्षात आलं.

त्यांनाही तिच्या मनातील खळबळ कळत होती.
निशाला बघितलं की, तिच्या डोळ्यात आई होण्याची तहान दिसायची.


'परमेश्वरा, मालतीलाही आई होण्याचं सुख दे. तिलाही आई व्हायचे आहे.' ते सतत देवाकडे प्रार्थना करत.

एक दिवस मालतीला स्वप्न पडलं की, ती आई झाली आहे. तिच्या बाजूला बाळ झोपलं आहे. गोंडस असं ते बाळ.

तिला जाग आली. सकाळीच चार वाजता ते स्वप्न पडलं होतं.

उठून बघितलं तर बाजूला श्रीकांत होता.

स्वप्नात का होईना तिने आई होण्याचं सुख अनुभवलं.

ती खुश झाली.

श्रीकांतला कधी जाग येतेय असं झालं होतं.

श्रीकांतला जाग आली.
मालती तिच्या विचारात होती.

"मालती, काय झालं? इतका काय विचार करतेय?"

"मी खुप खुश आहे."

"झालं काय?"

"मला सकाळीच स्वप्न पडलं की, मी आई झाले. माझ्या बाजूला बाळ होतं."

"असं आहे होय, म्हणून तू खुश आहेस?"

"हो, तुम्हाला मी कधी सांगितले नाही; पण मला जी स्वप्न पडतात ती खरी होतात."

"काय?"

"हो असं खूप वेळा झालं आहे. मी जे स्वप्नात पाहते ते खरं होतं."

"म्हणजे हे स्वप्न खरं होणार?"

"हो."

ते स्वप्न तिला आशा देऊन गेलं होतं. खरंच असं होणार होतं?

क्रमशः
अश्विनी ओगले.

आजचा भाग कसा वाटला कंमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला एक लाईक जरूर द्या.

सदर कथेचे लिखाण चालू आहे, रोज एक भाग पेजवर येईल. पेजला फॉलो करा.

कथेचा वापर यू ट्यूब किंवा इतर ठिकाणी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.