Login

जन्म बाईचा भाग १९

कथा मालतीच्या जीवनाची
जन्म बाईचा भाग १९
सकाळची वेळ होती. आजची सकाळ आनंदायी होती; कारण श्रीकांत आणि मालती घरी आले होते. प्रसन्न असे वातावरण होतं.

मालती सकाळी लवकरच उठली. अंघोळ, देवपूजा आटोपली. छान अशी मनासारखी रांगोळी काढली, हळदी कुंकू वाहिले. तुळशीला पाणी घातले. नमस्कार केला. ती वास्तू देखील मालतीच्या येण्याने जणू सुखावली होती.

सुमन किती जरी किचकीच करत राहायची तरी मालतीने घराला स्वतःचं मानलं होतं.

घराच्या भिंती, अगदी कानाकोपऱ्यात तिचं मन गुंतलं होतं. स्वयंपाकघर, भांडी, घरासमोरील अंगण, अंगणात दिमाखात उभं असलेली नारळाची दोन झाडं. तिला आवडतात म्हणून तिने फुलांची देखील झाडं लावली होती. मोगरा,गुलाब,जास्वंद जणू तिच्या येण्याची वाट बघत होते. सारं कुतूहलाने पाहत होती. तिचं मन भरून आलं होतं.

"सुमन." श्रीपंतराव सुमनला आवाज देत होते.


'कधी देणार चहा?' मनातल्या मनात पुटपुटत होते. पुन्हा वर्तमानपत्र वाचायला घेतलं.

"हे घ्या मामाजी." मालतीने चहाचा कप श्रीपंतरावांच्या पुढ्यात धरला.

"मालती, तू आणलास चहा." श्रीपंतराव तिच्या हातातून चहाचा कप घेत म्हणाले.

"होय मामाजी. मला माहित आहे तुमची सकाळ चहा प्यायल्याशिवाय होत नाही."

"तुझ्या लक्षात आहे?"

"असं कसं विसरेन बरं. सकाळी स्वयंपाकघरात गेले की, तुमच्यासाठी चहाची तयारी करायचे आणि मग बाकीची कामं."

"मालती, नेहमीप्रमाणे छान झाला आहे चहा." चहाचा घोट घेत ते म्हणाले.


तिला तशी बरीच कामं होती; पण इतक्या दिवसाने आली आहे तर सासऱ्यांशी बोलायची ईच्छा होत होती. हातात चहाचा ट्रे घेऊन ती तशीच उभी होती.

"सुमन पण देते चहा; पण तू गेल्यापासून तिलाही कामाचा बराच ताण आहे. निशा,नयनला अजिबात सोडत नाही, मग सुमनच सगळं करते."


"हो ते मी पाहिलं. निशाची लुडबुड चाललेली असते. नयन ताईंना काही सुचू देत नाही."


"श्रीकांत उठला का?"

"हो अंघोळीला गेले आहेत."

"तू चहा घेतला नसशीलच, आधी मलाच आणून दिला ना?"

"होय मामाजी."

"जा तू पण आधी चहा घे,मग काय कामं असतील ती कर."

"मालती." सुमनने आवाज दिला.


"आत्याबाई बोलवत आहेत. जाते मी."

ती गेली.


"इतका वेळ लागतो का चहा द्यायला? चल पटकन नाश्ता बनवून घे. सगळे जण एकत्रच नाश्ता करतील."


"हो आत्याबाई."


तिने पोहे बनवले.

सगळे एकत्र नाश्ता करायला बसले.

सर्वांना असं एकत्र बघून श्रीपंतरावांना खूप बरं वाटत होतं.

श्रीकांत देखील खूप खुश होता.

धावपळीच्या जगातून थोडे निवांत क्षण त्याला मिळाले होते.

आई,बाबा,भाऊ सर्वांच्या सानिध्यात खूप बरं वाटत होतं.

सुमन श्रीकांतच्या बाजूलाच बसली होती.

त्याच्या ताटातील पोहे संपले.


"अजून घे."

"नको आई."

"काय नको आई घे म्हणतेय ना? तिथे गेल्यापासून किती बारीक झाला आहेस."


"आई, अशीच तब्येत चांगली. एकदम फिट आहे."

"काय फिट? गाल बघ कसे आत गेले आहेत."


"तू पण ना आई."

"घे बरं पोहे." असं म्हणत तिने जबरदस्ती पोहे त्याला दिले.


श्रीकांतला आईचं प्रेम पाहून अगदी गलबलून आलं.

डोळ्यात पाणी तरळलं.

सुमनला अजूनच कसंतरी झालं.

"मी म्हणत होते नको जाऊ तिथे. बघ कशी अवस्था झाली?" तिचेही डोळे भरून आले.

"सुमन, व्यवस्थित आहे त्याची तब्येत. तुझं काय परत परत तेच चालू असतं. ठीक आहे तो. चार दिवसासाठी आला आहे तर उगाच रडगाणं करू नको."

निशा सुमनच्या मांडीवर बसून तीचे डोळे पुसू लागली.


"बघितलं तुझी नात देखील तेच म्हणतेय."
श्रीपंतराव म्हणाले.


सुमनने डोळे पुसले.


वातावरण हलकं झालं.


"श्रीकांत, शर्मिलाचा फोन आला होता का?" श्रीपंतराव म्हणाले.

"नाही बाबा. खूप दिवस झालं तिच्याशी बोलणं झालं नाही. बरं झालं आठवण करून दिली. तिला फोन करतो. तिला बोलावतो. तिचीही भेट होईल."


"फोन कर पण मला वाटत नाही की, ती येईन."


"का बाबा?"


"तिची धावपळ चालू आहे."


"कसली धावपळ?"


"जावईबापूंना बाहेरगावी चांगलं काम लागलं आहे. ती देखील कायमची तिथे राहायला जाणार आहे. तीच धावपळ चालू आहे."


"काय शर्मिला बाहेरगावी जाणार आहे? कधी?"


"पुढच्या आठवड्यात जाणार आहे."

लहान बहीण इतकी दूर जाणार ह्या विचाराने तो दुखावला.

शर्मिलावर देखील त्याचा खूप जीव होता.

मालतीला देखील ऐकून वाईट वाटलं.


"ठीक आहे ती येऊ शकत नाही, तर आपण जाऊच शकतो ना?"


"हो चालेल." श्रीपंतराव म्हणाले.


"आपण सगळे उद्या निघुया." श्रीकांत म्हणाला.

"मला आणि नयनला यायला जमणार नाही." निलेश म्हणाला.

"का दादा?"

"उद्या निशाला इंजेक्शन द्यायचं आहे,त्यामुळे जमणार नाही; पण तू आई बाबांना घेऊन जा. मी नंतर कधीतरी शर्मिलाला भेटायला जाईन."


"बरं ठीक आहे. उद्या शर्मिलाची भेट घेऊ. परवा मालतीच्या माहेरी देखील जायचं आहे."


सुमन काही बोलणार तितक्यात श्रीपंतराव म्हणाले.

"हो जा. तिलाही आईला आणि बहिणींना भेटायचे असेल."

सुमनचा चेहरा उतरला.

श्रीकांतने अजून राहावं ही तीची ईच्छा होती.


"आई पुढच्या महिन्यात पुन्हा येईल मी."


"असाच बोलतो. गेला की येत नाही. किती महिन्याने आला आहेस."

"नक्की येईल आई." तो तिला लाडीगोडी लावत म्हणाला.


दिवस कधी निघून गेला कळलंच नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळे निघाले.

शर्मिला सर्वांना बघून खुश झाली.

शुभमला पाहून मालती आणि श्रीकांत खुश झाले.


"दादा,वहिनी कसे आहात?" शर्मिला.

"आम्ही मजेत. काय हे शर्मिला एका शब्दानेही सांगितलं नाही तू जाणार आहेस ते?" श्रीकांत.

"दादा, हे सर्व घाईघाईत ठरलं. मी करणारच होते तुला फोन."

"विसरली ना दादाला?" तो तिला चिडवत म्हणाला.

"नाही दादा." डोळ्यात गंगा यमुनेचा संगम झाला.

"शर्मिला, रडायला काय झालं? मी गंमत केली ." श्रीकांत


"रडू नको बाळा. तो म्हणतोय ना गंमत केली. त्याचा स्वभाव माहीत आहे ना तुला?"
सुमन पदराने तिचे डोळे पुसत म्हणाली.

"आई, मला माहित आहे दादा मस्करी करतोय; पण मला तिथे जाऊ वाटत नाही. तुम्हा सर्वांपासून दूर जाणार. पुन्हा कधी यायला मिळेल माहीत नाही."

"शर्मिला, चांगल्या गोष्टींची सुरवात अशी रडत करू नये बाळा. इतकी चांगली संधी प्रत्येकाला मिळते का? सांग बरं? सकारात्मक विचार करून जा. सगळं व्यवस्थित होईल."

थोड्याफार गप्पा झाल्या आणि सगळे जेवायला बसले.

शुभम मालतीच्या मांडीवर बसला होता. मालती त्यालाही भरवत होती.

शुभमने देखील चपातीचा तुकडा तोडला आणि मालतीला भरवला.

मालतीने त्याला गोड पापा दिला. शुभमने देखील तोंडाचा चंबू करत तिच्या गालावर पप्पी दिली.

श्रीपंतराव सगळं कौतुकाने पाहत होते.

'देवा! माझ्या श्रीकांत आणि मालतीच्या घरी असं गोंडस बाळ लवकर येऊ दे.'


जेवण झालं आणि निघायची वेळ झाली.

कधी नव्हे ते शर्मिला खूप रडू लागली.
सुमन देखील रडू लागली.

त्या दोघींना रडताना पाहून मालतीचेही अश्रू अनावर झाले.

शर्मिलाला धीर देणारे तिचे बाबासुद्धा हळवे झाले.

श्रीकांतचीही तीच अवस्था होती.

जड पावलांनी सगळे निघाले.

मालतीने शुभमच्या हातात दोनशेची नोट ठेवली.

सगळे घरी आले.

श्रीकांत खोलीत एकटाच होता.

मालती खोलीत आली. त्याचा चेहरा पाहिला तर त्याच्या डोळ्यात पाणी होतं.

ती त्याच्या बाजूला बसली.


"शर्मिला ताई जाणार म्हणून रडताय?"


त्याने रुमालाने डोळ्यातील पाणी टिपले. रुमाल खिशात ठेवला.

"तुम्ही बघा त्यांचं खूप चांगलं होईल. तसं आताही परिस्थिती चांगलीच आहे; पण अजून प्रगती होईल. आपला शुभम देखील चांगलं शिक्षण घेईन."


"मालती, ते सगळं आहे; पण शर्मिला दूर जाणार. आता कधी भेट होणार? इथल्या इथे असेल तर आपण तिला भेटू तरी शकलो असतो; पण आता.."

तिलाही वाईट वाटत होतं.

इथे श्रीपंतराव आणि सुमन दोघेही शांतच होते.
शर्मिलाला रडताना पाहून दोघांचं मन लागत नव्हतं.


दिवस कधी निघून गेला कळलंच नाही.

"मालती, आईला फोन करून सांग येणार आहे." श्रीकांत.

मालतीने कांताला फोन करून येणार असल्याची खबर दिली.

मालती येणार म्हणून, कांता,कमल,विमल खूप खुश झाल्या.

मालती किती महिन्याने माहेरी येत होती.

मालतीसाठी काय करू आणि काय नाही असं झालं होतं.

दुसऱ्या दिवशी मालती आणि श्रीकांत निघाले.
सगळेच भावुक झाले.

निरोपाचा हळवा क्षण असाच असतो.


मालती खूप महिन्याने आईला आणि बहिणींना भेटणार होती. गेल्यागेल्या आईला आणि बहिणींना घट्ट मिठी मारणार, डोळे भरून बघणार हाच विचार करत होती.

जसजसं घर जवळ येत होतं मनातली हुरहूर वाढत होती.

क्रमशः
अश्विनी ओगले.
आजचा भाग कसा वाटला कंमेंटमध्ये जरूर सांगा. एक लाईक जरूर द्या.
सदर कथेचे लिखाण सुरु आहे. कथेचे भाग पेजवर येत जातील, पेजला जरूर फॉलो करा.
कथेचा वापर यु ट्यूब किंवा इतर ठिकाणी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.

अष्टपैलु स्पर्धा २०२५
दीर्घकथा लेखन