जन्म बाईचा भाग २३
लक्ष्मी आजीकडून मालती आली. ती तिच्या विचारात हरवली.
'आजीला किती दुःख. किती आणि काय काय सहन केलं. खरंय जवळचं माणूस गेलं की, त्रास होतो. बाबा गेल्यावर आयुष्य बदललं. आईने चांगलं स्थळ बघून लग्न लावून दिलं. आत्याबाईंनी कधी नीट वागणूक दिली नाही. मानसिकरित्या खचले. ईथे आल्यावर स्वतःला ओळखू लागले. आजी बरोबर बोलत आहेत जीवनसाथी सोबतीला असेल तर कसली चिंता. हे आहेतच माझ्यासोबत. मला कसलीच चिंता नाही. आत्याबाईंचे टोमणे, रागराग करणे ह्या सगळ्याचा खूप मानसिक त्रास झाला; पण आता सगळं डोक्यातून काढून टाकणार. जास्त विचार करणार नाही.'
तिचं मन तिची तिलाच दिशा देऊन गेलं.
मनाचा खेळ सारा. आता तिच्या मनाला हे सगळं नको होतं. ती तशीच वागू लागली.
तिला वाटलं देखील नव्हतं हा विचार तिच्या आयुष्यात काय बदल घडवून आणणार होता.
"मालती, तू जेवली नाही?" श्रीकांत म्हणाला.
"खरंच मला काही नको. ईच्छा नाही."
"बरं वाटत नाही का?"
"हो मला मळमळतयं."
"डॉक्टरांकडे जाऊया का?"
"नको, वाटेल बरं."
'का असं होतंय?'
तिची नजर केलेंडरवर गेली.
ती चमकली. तो विचार आला. मी प्रेग्नेंन्ट असेल का?
चार दिवस उलटून गेले होते.
"माझी पाळी अजून आली नाही." ती श्रीकांतला म्हणाली."
तो भलताच खुश झाला.
तिचा चेहरा उतरला.
"काय झालं मालती. मी किट आणतो. चेक करते का?"
"नको. मला भीती वाटतेय."
"घाबरायचं काय त्यात?"
"हे नेहमी असंच होतं. चेक केलं की निगेटिव्ह रिसल्ट येतो."
"ह्यावेळी पोसिटीव्ह येईल असं मला वाटतंय. तुला मळमळ होतेय ना?"
"काही खाण्यात आलं असेल." मालती.
"माझ्यासाठी एकदा चेक करशील?"
त्याचं मन राखण्यासाठी तिने चेक करायचं ठरवलं.
बाथरूममध्ये गेली.
टेस्ट केली.
नेहमीप्रमाणे नीगेटीव्ह येणार हाच विचार करत असताना दोन गुलाबी रेषा तिला दिसल्या.
ती रडायलाच लागली.
तिचा आवाज ऐकन श्रीकांत आला.
किट पाहून तो देखील आनंदाश्रू रोखू शकला नाही.
दोघेही कितीतरी वेळ एकमेकांना पकडून रडत होते.
"मला अजूनही डोळ्यावर विश्वास बसत नाहीये." मालती ती किट हातात घेत म्हणाली.
"विश्वास ठेव मालती. आपण आई बाबा होणार आहोत."
श्रीकांतने लगेच आई बाबा सर्वांना फोन करून ही गोड बातमी दिली.
श्रीपंतराव आनंदाने उड्या मारायला लागले.
सुमन देखील खुश झाली. आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
सुमन देखील खुश झाली. आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
"देवा तुझे खूप खूप आभार. माझी प्रार्थना ऐकली." श्रीपंतरावांनी देवासमोर हात जोडले.
मालतीने आईला खबर सांगितली.
ती देखील खुश झाली. कमल विमल देखील खूप खुश झाल्या. तिने देवापुढ साखर ठेवली.
"आई, चल ना आता तरी जाऊया. आमच्या परीक्षा देखील संपल्या. ताई आता आई होणार आहे. तिला भेटून तरी येवुया."
"हो चालेल उद्याच जाऊया."
कमलने श्रीकांतला फोन करून येणार असल्याचे सांगितले.
"ताईला सरप्राईज द्यायचे आहे. सांगू नका." कमल म्हणाली.
"हो चालेल." श्रीकांत.
बेल वाजली. मालतीला वाटलं लक्ष्मी आजी किंवा प्रिया असेल. दार उघडलं पाहते तर आई आणि बहिणी.
तिघींना पाहून खुश झाली.
"असं अचानक? आई, तुम्ही येणार असल्याचे मला सांगितलं नाही."
"ताई, तुला सरप्राईज द्यायचं होतं." कमल म्हणाली.
"मालती, त्यांना दारातच सगळं विचारणार का? घरात तरी येऊ दे." श्रीकांत.
कांताने मालतीसाठी भरपूर खायचं सामान आणलं होतं.
माया लेकीच्या गप्पा रंगल्या.
"मालती, आता जास्त धावपळ करू नको. सुरवातीचे तीन महिने जरा जास्त काळजी घ्यायची. देवाचे नामस्मरण कर." आई सांगत होती.
विमल आणि कमल आल्या.
"ताई, आम्ही काहीतरी आणलं आहे." कमल म्हणाली.
कमलने छान बाळकृष्णाचं चित्र आणलं होतं, तो कागद तिच्या हातात दिला.
"ताई, हे तुझ्या रुममध्ये लावशील. मग तुला असंच नटखट बाळ होईल."
"किती सुरेख आहे. नक्कीच लावते." मालती ते चित्र निरखुन पाहत होती.
"मालती, असंच खुश राहा. छान छान विचार कर. मनात कसलेही विचार आणू नको. सगळं छान होईल." कांता.
"हो आई."
"मालती, येऊ का गं?" लक्ष्मी आजी आल्या होत्या.
"या ना आजी."
लक्ष्मी आजीने कांताला पाहिले.
"आजी ही माझी आई आणि ह्या माझ्या बहिणी. आई ह्या लक्ष्मी आजी."
"ह्या आजीच तुला मोगरा आणून देतात ना ताई?" कमल.
"हो." मालती
"बरं झाला आलात तुम्ही. मालतीलाही बरं वाटेल." लक्ष्मी आजी म्हणाल्या.
"मालती, हे बघ शांताला आज थलिपीठ करायला लावलं होतं. दोन तुझ्यासाठीही केले. तुला द्यायला आली." लक्ष्मी आजीने मालतीला डबा दिला.
"मालती नेहमी तुमचं कौतुक करते. फोनवर देखील खूप काही सांगत असते." कांता म्हणाली.
"मालतीही खरंच गुणाची आहे. आमचीही काळजी घेते. विचारपूस करते. संस्कारी आहे मालती. मालतीचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे." त्या मालतीविषयी भरभरून बोलत होत्या.
मुलीचं कौतुक ऐकून कांताला बरं वाटलं.
"तुम्ही सगळे चहा प्यायला घरी या. बरं वाटेल मला."
"हो आजी मी सर्वांना संध्याकाळी घेऊन येते." मालती म्हणाली.
"निघते हं मी. तुझे आजोबा वाट बघत आहेत. मी गेल्याशिवाय काही खाणार नाही." लक्ष्मी आजी गेल्या.
"खरंच हं मालती, खूप जीव लावतात." कांता म्हणाली.
"हो आई. काहीही केलं खायला तर आधी मला आणून देतात."
"जुनी माणसं अशीच होती, घसातला घास काढून द्यायची सवय होती." कांता.
चार दिवस कसे निघून गेले समजलं नाही.
कांताने मालतीला एकाही कामाला हात लावू दिला नाही.
कमल आणि विमल देखील तिची खूप काळजी घेत होत्या.
निघायची वेळ झाली.
मालतीला खूप भरून आलं.
"मालती, आता असं रडायचं नाही. बाळाला त्रास होईल." कांताचाही पाय निघता निघत नव्हता; पण असं किती दिवस लेकीच्या सासरी राहणार.
भरलेल्या डोळ्यांनी निरोप दिला.
श्रीपंतराव तर रोज फोन करून मालतीच्या तब्येतीची विचारपूस करत रहायचे.
मालती ते सोनेरी क्षण अनुभवत होती.
श्रीकांत तिला खूप जपत होता.
नववा महिना सुरू झाला आणि कांता लेकीसाठी रहायला आली.
बघता बघता तो दिवस आला.
प्रसुतीकळा सुरू झाल्या. तिला ऍडमिट केलं.
श्रीकांतने श्रीपंतरावांना फोन केला.
दोन तासात सगळेच आले.
मालतीने मुलाला जन्म दिला.
नर्सने बाळ बाहेर आणलं आणि श्रीकांतच्या हातात दिलं.
"माझा श्रीकांतच आहे." श्रीपंतराव बाळाचा चेहरा बघत म्हणाले.
सुमन,नयन,निलेश सगळ्यांनी बाळाला हातात घेतलं.
कमल, विमल बहिणीच्या बाळाला बघून खुश झाल्या.
कांता देखील खूप खुश होती.
कांता देखील खूप खुश होती.
ती हाच विचार करत होती आज मालतीचे बाबा असते तर खूप खुश झाले होते. त्यांच्या नातवाला घेऊन आनंदाने उड्या मारल्या असत्या.
डॉक्टर येतांना दिसल्या.
"मालती, बरी आहे ना डॉक्टर?" श्रीकांत म्हणाला.
"हो बाळ आणि बाळाची आई व्यवस्थित आहे. काळजी करू नका. थोड्यावेळाने तुम्ही त्यांना बघायला जाऊ शकता." डॉक्टर म्हणाल्या.
शर्मिलाचाही फोन आला.
"अभिनंदन दादा." शर्मिला.
"धन्यवाद आत्याबाई. कधी येताय बाळाला बघायला."
"लवकरच." शर्मिला.
सगळे बाळाला बघण्यात गुंग होते, मात्र कांता लेकीला बघायला कधी बोलवतात हीच वाट बघत होती.
"तुम्ही बाळाच्या आईला बघू शकता." नर्सने येऊन सांगितले.
कांता लगेच गेली.
मालतीच्या डोक्यावरून हात फिरवू लागली.
श्रीपंतराव आणि श्रीकांत देखील आले.
श्रीपंतराव आणि श्रीकांत देखील आले.
"मालती, अभिनंदन." श्रीपंतराव म्हणाले.
"तुमचेही अभिनंदन मामाजी. तुम्हीही आजोबा झालात."
श्रीकांतने तिची विचारपूस केली.
नर्सने बाळाला मालतीजवळ बाळाचा पाळणा होता त्यात ठेवलं.
मालती भरलेल्या डोळ्यांनी त्याला बघत होती आणि श्रीपंतराव मालती,श्रीकांत आणि बाळाला बघत होते. हेच तर त्यांना पाहिजे होतं.
लेकासाठी आणि सुनेसाठी ते खुश होते.
क्रमशः
अश्विनी ओगले.
सदर कथेचे लिखाण सुरु आहे. कथेचे भाग पेजवर येत जातील, पेजला जरूर फॉलो करा.
कथेचा वापर यु ट्यूब किंवा इतर ठिकाणी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.
अष्टपैलु स्पर्धा २०२५
दीर्घकथा लेखन
दीर्घकथा लेखन