Login

जन्म बाईचा भाग २६

कथा मालतीच्या जीवनाची

जन्म बाईचा भाग २६

मालतीने विषय काढला.

"तुम्ही किशोरवर रागावलात. आत्याबाई आणि त्याच्यात काय झालं ह्याची कल्पना आहे का?"
मालती म्हणाली.

"मालती, हे बघ तू त्याची बाजू अजिबात घेऊ नको. त्याला कळायला पाहिजे आई मोठी आहे, हेच आपण संस्कार दिले आहे का?"

"मी त्याची बाजू घेत नाही. किशोरने मला अंगठी घेतली हे त्यांनी काल पाहिले आणि नयन ताईंना म्हणाल्या की, तो पैसे वाया घालवतो.
हाच राग त्याला आला. जसं तुमच्यासाठी आई म्हणून आत्याबाई प्रिय आहे अगदी तसंच त्याच्यासाठी मी प्रिय आहे. मला दिलेली वागणूक मी अजूनही विसरले नाही आणि कदाचित विसरणार नाही, पण जर तेच पुन्हा घडत असेल तर ते मी सहनही करणार नाही." तिच्या आवाजाला वेगळीच धार होती.

"मालती..." श्रीकांत.

"बोलू द्या मला. मी चुकीचं काहीच बोलत नाही.
मी देवी नाही, तुमच्या सारखीच एक माणूस आहे. सून,पत्नी म्हणून कायम शांतच बसले; पण आई म्हणून मी शांत बसू शकत नाही. माझा किशोर कसा आहे हे मी चांगल्या पद्धतीने जाणते. त्याला संस्कार मी दिले आहे, त्यामुळे तो कधीच चुकीचं वागणार नाही हे देखील माहित आहे. तो जर चुकीचं काही वागला असता तर नक्कीच मी त्याला बोलले असते; पण तो चुकीचं वागला नाही किंवा बोलला नाही.

आत्याबाई कश्या वागल्या हे तुम्हाला चांगलं माहीत आहे; पण तुम्ही तरीही शांतच बसला. त्यांच्या चुकीच्या बोलण्यावर, वागण्यावर पांघरून घालत आला का तर मुलगा म्हणून प्रेम होतं. त्या प्रेमाने चूक आणि बरोबर ह्यातील अंतर जाणवू दिलं नाही. तुम्ही केलं ते बरोबर आणि आज किशोर बोलला तर तुम्हाला राग आला.


आत्याबाई माझ्याशी जश्या वागत होत्या ते पाहूनच मामाजीने आपल्याला इथे शिफ्ट व्हायला सांगितले होते, हे देखील मला माहित आहे. नयन ताईना वेगळी वागणूक आणि मला वेगळी. शेवटी ज्याचं जळतं त्यालाच कळतं. सगळं माझ्यासोबत घडत होतं. तुम्हाला कसल्याही गोष्टीची कमी नव्हती. तुमचं आयुष्य सरळ, सोप्प चाललं होतं, माझं तसं नव्हतं.

इतकं कसं कोण डोळ्यावर धरू शकतं? मी तर त्या म्हणतील तसं वागत होते, मग का असं वागावं? नातं जपण्यासाठी माझा आत्मसन्मान सतत पायदळी तुडवला, मी स्वतःचा विचार कधीच केला नाही. नेहमी दुसऱ्याचा विचार करत आले. हीच माझ्या आयुष्यातील मोठी चूक होती. त्याचा मला खूप पश्चाताप होतोय. मी स्वतःला गृहीत धरलं तर दुसरेही मला गृहीतच धरणार ही साधी गोष्ट माझ्या लक्षात आली नाही. मी मूर्ख होते, नातं निभावण्याचा प्रयत्न करता करता स्वतःची किंमत शून्य केली.
इथे आल्यावर मी माझं मन रमवलं.
तुमचं आणि माझं विश्व तयार झालं. मी कधीच रडगाणं गायलं नाही. किशोर झाला. खुश राहू लागले.
मी सर्वांना मान सन्मान दिला. मला तशी वागणूक दिली का? कधीच नाही. माझी आई नेहमी हेच सांगायची आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही; पण आता असं वाटतं आपण कितीही चांगलं वागलं तरी एखाद्या व्यक्तीने आपल्याशी वाईट वागायचे ठरवले, तर ती व्यक्ती तशीच वागणार. आपण कोणालाही बदलू शकत नाही हेच सत्य. खरं सांगू का? मला कळलं आहे माझ्याप्रति असलेला आत्याबाईंचा दृष्टिकोन काही केल्या बदलणार नाही. बदलायचा असता तर आधीच बदलला असतात, त्यामुळे मी आता अपेक्षा सोडली आहे.


मला आताही गृहीतच धरलं गेलं.
मी काय क्लास घेते,घरीच असते. म्हणून आईंना इथे पाठवलं. बरोबर ना?


नयन ताई, निशा कामावर जातात. मी घरीच असते.


जोपर्यंत आत्याबाई त्यांना मदत करत होत्या, उपयोगी येत होत्या, तोपर्यंत त्यांना काहीच प्रॉब्लम नव्हता. आता त्यांनाच आजार झाले आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. वेळेवर औषध,नाश्ता सगळं द्यावं लागतं. त्यांनी काढता पाय घेतला म्हणून आपणही तसंच वागणं नक्कीच चुकीचं आहे. असो मी आजही माझं कर्तव्य विसरले नाही, मी माझं कर्तव्य चोख निभावणार. त्यांना मी काहीच कमी पडू देणार नाही; पण ह्यापूढे मी आणि किशोर कसलाही आरोप सहन करणार नाही. घराचं वातावरण गढूळ झालेलं मी दुर्लक्ष करणार नाही. निलेश भाऊजींचा फोन आला आणि तुम्ही किशोरला बडबड केली.

मामाजीची ईच्छा होती आपण सुखाचा संसार करावा, मी नेहमीच शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या, अगदी चुकीचं झालं तरी शांत बसले. किशोर आणि तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात. हे जर असंच चालत राहिले तर किशोर आणि तुमच्यात अंतर निर्माण होईल, ते मला नको आहे. मनामध्ये अंतर निर्माण झाले की, नातं संपुष्टात यायला वेळ लागत नाही. मी फार स्पष्ट बोलले, कदाचित तुम्हाला वाईट वाटलं असेल; पण आज जर मी शांत बसले तर पुढे परिस्थिती फार किचकट होईल. हा संवाद खूप महत्त्वाचा होता. माझ्यासाठी माझं कुटूंब तेव्हाही महत्वाचं होतं आणि आताही महत्वाचं आहे. तुम्हाला दुखवण्याचा उद्देश नव्हता. वयाच्या ह्या टप्प्यावर कमीत कमी समजून घ्या आणि चुकीच्या गोष्टीवर पांघरून न घालता डोळसपणे वागा हीच माफक अपेक्षा आहे. शेवटी तुमच्याशिवाय मला आणि किशोरला आहे तरी कोण?" मालतीचे डोळे भरून आले होते आणि ती त्याला पोटतिडकीने सांगत होती.


"आई बाबा लवकर या." किशोरने आवाज दिला.

मालती, श्रीकांत पळतच बाहेर आले. समोरील दृश्य पाहून श्रीकांतचे हात पाय गळून गेले.
काय झालं होतं? पाहू पुढच्या भागात.

क्रमशः

अश्विनी ओगले.
सदर कथेचे लिखाण सुरु आहे. कथेचे भाग पेजवर येत जातील, पेजला जरूर फॉलो करा.
कथेचा वापर यु ट्यूब किंवा इतर ठिकाणी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.

अष्टपैलु स्पर्धा २०२५
दीर्घकथा लेखन