Login

जन्म बाईचा भाग २९

कथा मालतीच्या जीवनाची
जन्म बाईचा भाग २९

सुमनच्या वागण्याचा नयनला खूप राग आला होता.


"आजवर आत्या माझ्याशी अश्या कधीच वागल्या नव्हत्या. नेहमी नयन नयन चालू असायचे. आता कुठे तिथे राहायला गेल्या तर रंगच बदलले. कश्या बोलत होत्या? सरळ निघून गेल्या. आपल्याविषयी किती हा राग? मला तर वाटतंय मालतीनेच काही तरी केलं असणार, नाहीतर आत्या अश्या नव्हत्या. आपल्याला समजावत होती, काय तर म्हणे अत्याबाईंची तब्येत बरी नाही, त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका. बरीच हुशार झाली आहे." नयन चिडूनच म्हणाली. विनाकारण मालतीचे नाव घेतले.

"नयन, मालती तशी नाही. ती कशाला काही करणार आणि चूक आपली आहे आपण तेव्हाच जायला हवं होतं. आईला वाईट वाटणारच ना? आपल्याकडून अपेक्षा असणारच." निलेश.

"काय आपली चूक होती? फोनवर तर विचारपूस केलीच ना. इतकं काही झालं नव्हतं. काही नाही आता त्या तिथे जाऊन बदलल्या आहेत. आजारपणात जरा काळजी घेतली तर मालतीचे गोडवे गायला लागल्या. मी तुम्हाला सांगून ठेवतेय आजवर माझा इतका अपमान कोणी केला नाही, आता मी काही पुन्हा त्या घरात पाऊल ठेवणार नाही. असंही त्या म्हणाल्या आहेत ना त्यांचा मुलगा, सून,नातू आहे काळजी घ्यायला. घेतील ते लोकं काळजी. आपली काय गरज उरली नाही."


"हे असं टोकाचं बोलायची गरज नाही. चूक आपलीच आहे नयन. मान्य कर." निलेश.

तितक्यात निशा आली.

"आई, आजी तुला केव्हापासून फोन करतेय. तुझा फोन कुठे आहे?" तिच्या हातात फोन देत म्हणाली.

"आईचा फोन आहे? दे." नयन.

नयन तिच्या आईशी बोलू लागली.


"बोल आई."

"नयन, मला जरा बरं वाटत नाही." ती बारीक आवाजात म्हणाली. आईचा आवाज ऐकून नयनला वाईट वाटलं.

"काय झालं आई?" काळजीच्या सुरात म्हणाली.

"अगं ताप आला आहे. अंगात त्राणच नाही गं
"

"आई, मी लगेच येते. तू काळजी करू नको."

तिने फोन ठेवला.

"काय झालं नयन?" निलेश.

"आपल्याला आताच्या आता निघावं लागेल. आईला ताप आला आहे."

"तापच आहे ना? इतकं काय?" निलेश ही संधी सोडणार नव्हता.


"हे काय बोलताय आईचं वय झालं आहे. तिला ताप आला की, धड उभं रहायला देखील नाही येत आणि आता बाहेरचं खाणं जमणार नाही. आपल्याला जावं लागेल."

निलेश तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागला.

त्याला काय बोलायचे आहे हे नयन समजून गेली.

ती पुढे काही बोललीच नाही. तिला ओशाळल्यागत झालं.


"निशा, चल लवकर निघुया." नयन खांद्यावर बॅग अटकवत म्हणाली.

"आई, मी नाही येणार. मी तिथे कंटाळते. असंही तू आणि बाबा आहात. माझी काय गरज?"


"निशा." नयन.


नयन काय बोलतेय हे ऐकायला देखील निशा थांबली नाही. तिने मोबाईल घेतला आणि रुममध्ये निघून गेली.

'आई, खरंच मी चुकीचं वागलो. मी यायला पाहिजे होतं. मुलगा म्हणून मी कर्तव्य निभावण्यात कमी पडलो. माफ कर आई.' निलेश मनोमन सुमनची माफी मागत होता.

_________________________________


"मालती, आई कुठे आहे." श्रीकांत म्हणाला.

"किशोर आणि आत्या बाई एक तासापूर्वी बाहेर गेले आहेत."

"बरं." श्रीकांत.

मालती हाच विचार करत होती किशोर कुठेही जाताना सांगतो आणि आज सुमनसोबत जातांना काहीच बोलला नाही.

थोड्या वेळाने सुमन आणि किशोर आला.

"किशोर कुठे गेला होता?" मालतीने विचारले.

"माझ्या गोळ्या संपल्या होत्या त्याच आणायला गेलो होतो आणि थोडं फिरून आलो." सुमन म्हणाली.

किशोर मिश्किल हसला.

मालतीला शंका आली.

आजी नातवाचं काय चाललं होतं समजेना.


मालती विचारात हरवली होती.

"मालती, एक कप चहा प्लिज." श्रीकांत म्हणाला.


तिचं लक्षच नव्हतं.

"मालती, काय झालं? इतका काय विचार करतेय?" त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारले.


"तुम्ही बाहेर गेला होता ना? कधी आलात?" मालती.

"आताच आलो; पण तू काय इतका विचार करतेय?"


"किशोर आणि आत्याबाई बाहेर गेले होते. त्या म्हणाल्या गोळ्या संपल्या होत्या म्हणून गेलो होतो. किशोर बाहेर जातांना नेहमी सांगतो आज काही बोललाच नाही. मला वेगळंच वाटतंय."

"डिटेक्टिव मालती तुम्ही खूप विचार करत आहात असं वाटत नाही?"

"तसं नाही हो, आत्याबाई खोटं बोलल्या हे मला जाणवलं."

"तू म्हणत असशील तर मी आईला विचारतो." श्रीकांत.

"नको नको. काही गरज नाही. उगाच त्यांना वाईट वाटेल."

"हे असं असतं तुझं. बरं आता एक कप चहा देशील प्लिज."

"हो देते." ती हसत म्हणाली.


तिने त्याला चहा दिला आणि बेडरूममध्ये गेली, पाहते तर किशोर कपाटातून काहीतरी घेत होता.

मालतीला पाहिलं तसं त्याने लगेच कपाट बंद केलं.

"किशोर? काही हवं आहे का?"


"नाही आई."

"मग काय शोधतो आहे?"

"रुमाल हवा होता. तू नवीन रुमाल आणले आहेत ना?"

"हो थांब देते."

तिने कपाटातून त्याला दोन नवीन रूमला काढून दिले.


तितक्यात सुमन आली.

"मालती, मला भूक लागली आहे. काही खायला आहे का?"

"हो आत्याबाई. पोहे देऊ का?"

"हो चालेल." सुमन म्हणाली.

मालतीने कपाट बंद केलं. आरशात सुमनचा चेहरा दिसत होता.

ती किशोरला डोळ्याने खुणवत होती.

मालतीची शंका खरी ठरली.

'ह्या दोघांचं काय चाललंय? हे असं का वागत आहेत. नक्कीच काहीतरी चाललंय. पण काय?'


तिने पोहे केले आणि सुमनला दिले.

"तुला पण घे पोहे." सुमन.

"नको मला. मी आताच चहा प्यायले."

"बरं."

सुमनच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव होते.

'देवा! ह्या आत्याबाई अश्या का वागत आहेत? नक्कीच काहीतरी डोक्यात शिजत आहे. किशोरच्या बाबांना सांगू का? नको, ते डायरेक्ट आत्या बाईंना विचारतील. किशोरलाच विचारू का? काय करू काही समजेना?'

क्रमशः
अश्विनी ओगले.

वाचकांनो मालतीला काहीच समजत नाहीये. तुम्हाला काय वाटतं? सुमन आणि किशोर काय लपवत आहेत? किशोर तर मालतीचा गुणी मुलगा आहे. असं तो कधीच करत नाही. तुम्हाला काय वाटतं ते कंमेंटमध्ये जरूर सांगा. बघू कोणाचं उत्तर बरोबर येतंय.

सदर कथेचे लिखाण सुरु आहे. कथेचे भाग पेजवर येत जातील, पेजला जरूर फॉलो करा.
कथेचा वापर यु ट्यूब किंवा इतर ठिकाणी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.

अष्टपैलु स्पर्धा २०२५
दीर्घकथा लेखन