Login

जन्म बाईचा भाग २५

कथा मालतीच्या जीवनाची
जन्म बाईचा भाग २५

"श्रीकांत, आईची तब्येत जरा नरम गरम असते. आम्ही सगळे ऑफिसला जातो. आईला राहायला तुझ्याकडे पाठवू का? असंही मालती घरीच क्लास घेते. ती आईकडे लक्ष देऊ शकते." निलेशचा फोन आला.

"हो दादा चालेल. कधी येऊ घ्यायला?" श्रीकांत.


निलेश आणि श्रीकांत दोघांचं बोलणं मालती आणि किशोर ऐकत होते.


"बाबा, काय झालं?" किशोरने विचारले.

"दादाचा फोन होता. तो बोलत होता आईची तब्येत बरी नसते आणि सगळेच कामाला जातात. तिच्याकडे लक्ष द्यायला कोणी नसतं. आईला इथे पाठवणार आहे."

श्रीकांत आई राहायला येणार होता म्हणून खुश होता.


पुढे काय होणार हे मालतीच्या लक्षात आलं होतं.


सुमनला तिथेच राहायची सवय झाली होती; पण नयनने गोड बोलून तिला तयार केलं. आम्ही अधूनमधून भेटायला येत जाऊ.


श्रीकांत सुमनला घेऊन आला.


मालती स्वतःचं कर्तव्य निभावत होती.

मालती क्लासेस घेते हे तिला पटत नव्हतं.
श्रीकांत कमावतो तर कशाला.

"काय गरज आहे घरात क्लास घ्यायची." सुमन म्हणाली.

"आत्याबाई, माझी आवड आहे ती. मला आवडतं लहान मुलांना शिकवायला."


"करा काय करायचं ते. आता तुमचंच राज्य आहे." ती पुटपुटली.


किशोरने देखील ऐकलं.


आईसोबत वागणं त्याला पटलं नाही. तो काही बोलणार तितक्यात मालतीने डोळ्याने ईशारा करत त्याला शांत बसवलं.


असंच काही ना काही होत राहायचे.

खरंतर किशोर डिस्ट्रब झाला होता.


तो खोलीत निघून गेला.


त्या पाठोपाठ मालती गेली.


"आई, काय आहे हे? आजी प्रत्येकवेळी अशी का बोलते तुझ्याशी?"

"किशोर, वयोमानानुसार असं होतं माणूस. आपण समजून घ्यायचं."


"आई, तू म्हणतेय वयोमानानुसार त्रास होतो मग बाकीच्या लोकांशी बोलतांना आजी किती गोड बोलते. हे वय केवळ तुझ्याच आड येतं का?"


किशोर चुकीचं बोलत नव्हता. त्यालाही बरंच काही कळत होतं.

ती निरुत्तर झाली.

"किशोर, मी तुला हेच शिकवलं आहे का? मोठ्या माणसांमध्ये तू पडू नको."


मालतीला त्याची अवस्था कळत होती.

चूक आणि बरोबर ह्यातील फरक देखील कळत होता. तिला इतकं माहीत होतं सुमनला कितीही बोललं तरी तिच्याप्रति स्वभाव,वागणं काही केल्या बदलणार नाही. खरंतर सुमनविषयी प्रेम,माया,ओढ राहिली नव्हती आता फक्त कर्तव्य म्हणून ती सगळं करत होती. आलेला अनुभव तिला इतकंच सांगत होता तिच्या स्वभावात बदल होणार नाही.

तिने सारं लक्ष किशोरकडे दिलं होतं.
किशोरच तिच्या आयुष्यातील पुंजी होती.

तिला पुन्हा स्वतःला मानसिक त्रास करून घ्यायचा नव्हता.
ती सुमनला जमेल तितका कमी रिस्पॉन्स देत होती. तिला आता वाद नको होते.

किशोरचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्याला चांगल्या कंपनीतून कामाची ऑफर आली.

तो कामाला जाऊ लागला. किशोर स्वतःच्या पायावर उभा राहिला होता.

सगळेच जेवायला बाहेर गेले होते.
किशोरसाठी तो खूप खास दिवस होता; कारण त्याच्या आईचा वाढदिवस होता.
मालतीने केक कट केला. किशोरने मालतीला केक भरवला आणि तिच्या हातात भेटवस्तू ठेवली.

मालतीने गिफ्ट ओपन केलं, पाहिले तर त्यात सोन्याची अंगठी होती.

मालतीचे डोळे पाणावले.

सुमन हे सारं बघत होती.

आतापर्यंत तिच्या लक्षात आलं होतं की, किशोरचा मालतीवर खूप जीव आहे.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मालती भाजी आणायला गेली होती. किशोर लवकरच कामावरून आला होता. त्याच्याकडे चावी होती त्यानेच दार उघडून आला होता.

सुमन फोनवर नयनसोबत गप्पा मारत होती. मालतीचा वाढदिवस कसा साजरा केला ही सगळी खबर देत होती.

"किशोर पैशाचा खूप अपव्यय करतो. त्या पोराला अजिबात कळत नाही, कुठे पैसा खर्च करायचा."

नेमकं किशोरने ते ऐकलं.


तो खोलीत गेला.


"आजी, मी कुठे पैसा वाया घालवला? काय सांगते आहेस काकीला?" किशोर जरा रागातच म्हणाला.

"नयन, मी नंतर बोलते."


"बरोबर तर बोलली. मालतीकडे अंगठी नव्हती का? सोनं किती महागलं आहे."

"माझी आई माझ्यासाठी खूप मौलव्यान आहे. तिच्यासमोर सोनं काहीच नाही."

आता सुमनला राग आला.

"उगाच काहीही बडबड करू नको. तुझ्या चांगल्यासाठी बोलतेय."


"आजी, मुळात तुला हे खटकलं की मी आईसाठी वस्तू घेतली. बरोबर ना?"

आज तो शांत बसणार नव्हता.

"मला कशाला खटकणार?"

तितक्यात बेल वाजली, मालती आली होती.


ज्या पद्धतीने किशोर तिच्याशी बोलला हे तिला आवडलं नाही.

सुमनने निलेशला फोन केला आणि म्हणाली,
"किशोर उद्धटपणे वागतो, मला इथे राहायचे नाही. घेऊन जा."


मालतीला काय झालं होतं ह्याची जराही कल्पना नव्हती.

किशोरने सगळं काही मालतीला सांगितलं.

"किशोर, कशाला तू बोलायला गेला." मालती.

"आई, बोलणं गरजेचं होतं. मुलगा म्हणून जर तुझ्यासाठी काही घेतलं तर तो पैसा वाया गेला का? सॉरी आई मला खरंच आवडलं नाही."

"तुला माहीत आहे ना स्वभाव."

"आई, लहानपणापासून तूच मला सांगत आली ना कोणी अन्याय केला तर गप्प बसायचं नाही आणि आता तूच मला शांत बसवत आहेस. सतत टोचून बोलण्याला काय अर्थ आहे? त्रास होतोय मला. बाबांना हे जे सगळं होतंय ते दिसत नाही का? मला माहित आहे आताही ते मलाच बोलणार."


निलशने लगेच श्रीकांतला फोन केला.


किशोर आईला उलटं बोलला हेच त्याच्या डोक्यात होतं.

तो तणतण करत घरी आला.

"किशोर, तुला सांगितलं होतं आईला काही बोलू नको." श्रीकांत त्याच्या मुलाला जरा रागातच म्हणाला.

"बाबा, आजी चुकतेय हे तुम्हाला दिसत नाही का? प्रत्येकवेळी तुम्ही आम्हालाच शांत बसायला सांगता." असं बोलून किशोर रागात निघून गेला.

मालती तिथेच उभी होती. तिलाही माहीत होतं किशोरची काहीच चूक नव्हती.

"मालती, तुला माहीत आहे ना आईचा स्वभाव? तू किशोरला का नाही गप्प केलं?"

"मी बाजारात गेले होते, मला काहीच कल्पना नव्हती."


तो सुमनशी बोलायला गेला.

"आई, मी समजावले आहे किशोरला. तू आता जायचं बोलू नको."


"त्याच्याच भल्याचं बोलत होती. मलाच राग राग करायला लागला. त्याला किती जीव लावला आहे आणि आता माझ्याशी असा वागतो." ती पदराने डोळे पुसत म्हणाली.

आईला रडताना बघून त्याला खूप वाईट वाटलं.

मालती मनाशीच विचार करून रुममध्ये गेली.

क्रमशः
अश्विनी ओगले.

सदर कथेचे लिखाण सुरु आहे. कथेचे भाग पेजवर येत जातील, पेजला जरूर फॉलो करा.
कथेचा वापर यु ट्यूब किंवा इतर ठिकाणी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.

अष्टपैलु स्पर्धा २०२५
दीर्घकथा लेखन