Login

जन्मभूमी भाग-१

एका गोष्टीने झपाटलेल्या गावातील मुलाची वेगळी कथा !
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ,प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

विषय:- झपाटलेला
शीर्षक:- जन्मभूमी भाग-१

"सर्व मुलांनी उद्या येताना ह्या पुस्तकातील धडा वहीत लिहून आणायचा आहे." असे मास्तर म्हणाले आणि घंटा वाजवून शाळा सुटली असल्याचे सांगितले.

तिथेच एक मुलगा खूप वेळ विचार करत बसला होता की, आता पुस्तकातील धडा आपण कसा काय वहीमध्ये लिहायचा. कारण त्याच्याकडे तर पुस्तकचं नव्हते. कसेबसे त्याच्या वडिलांनी शाळेमध्ये लागणाऱ्या वस्तू विकत घेतल्या होत्या.

पवन राजे ज्याला सर्वजण 'पवन्या' म्हणून बोलायचे. कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावामधला हा मुलगा होता. गावामध्ये अजूनही म्हणाव्या तश्या बाजाररहाट, दळणवळणाची साधने आणि महाविद्यालये अशा सुविधा उपलब्ध झाल्या नव्हत्या.

शाळा सुटल्यावर तो घरी गेला नव्हता कारण त्याच्या डोक्यात गृहपाठाबद्दल विचार येत होते. तसेच त्याच्या घरातील सगळेजण शेतावर काम करायला गेलेले असणार हे त्याला माहीत होते.

शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. तसेच वंशपरंपरागत चालू असलेले कुंभार काम सुद्धा पवनचे कुटुंब करायचे.

पवनचे वडील थोरले असल्यामुळे त्यांच्या खांद्यावरती सर्व भावंडांच्या जबाबदाऱ्या होत्या. पवनच्या आजी-आजोबा यांचे निधन झालेले होते त्यामुळे स्वतःच्या संसाराची आणि आपल्या भावंडांची पूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आलेली होती.

मोठ्या भावाचे कर्तव्य म्हणून पवनचे अण्णा यांनी भावंडांना शिक्षण देऊन स्वतः मात्र कमी शिकून शेतीमध्ये काम करून सर्वांना जगवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत ते करत होते.

पुढे गेल्यावरती आपली भावंडं आपल्या मुलांसाठी सुद्धा न सांगता हातभार लावतील असे त्यांना वाटले होते पण जसे पाखराला पंख फुटतात आणि ते उडायला लागतात तेव्हा ते पुन्हा स्वतःच स्वतंत्र घर शोधायला मोकळे होतात असेच काहीसे पवनच्या चुलत्यांनी केले.

अभ्यास तर मास्तरांनी सांगितलेला होता त्यामुळे आता तो करणे तर गरजेचे होते म्हणून त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या सुभान नावाच्या मुलाकडे जाण्याचे पवनने ठरवले.

पावसाचे दिवस असल्याने काही शेतीची कामे जी होती ती थोडीफार करून प्रत्येकजण आपल्या घरामध्ये लवकर येण्याचा प्रयत्न करत असायचे. तसेच इतर दुसरी कामे सुद्धा गावकरी तालुक्याला जाऊन करायचे पण गावामध्ये एसटी येत नसल्यामुळे त्यांना पायपीट करावी लागायची.  दुसऱ्या गावाच्या वेशीपर्यंत चालत जाऊन तिथून एसटी पकडावी लागायची. मग त्यासाठीही एकदा एसटी गेल्यावर ती दुसरी लवकर येत नाही हे माहीत असल्याने सर्वजण ती एसटी पकडण्याची घाई करायचे. आपल्या बहिणीला आणायला जाण्यासाठी पवनचे अण्णा लवकरच एसटी पकडण्यासाठी चालत गेलेले होते.

क्रमशः

पवनला त्याचा गृहपाठ पूर्ण करता येईल का?

© विद्या कुंभार

कथेचा भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगा.

फोटो सौजन्य: साभार गुगल

(साहित्यचोरी करणे हा गुन्हा आहे. ह्या कथेचे अधिकार हे लेखिकेकडे आहेत.)
0

🎭 Series Post

View all