Login

जन्मभूमी भाग-२

एका गोष्टीने झपाटलेल्या गावातील मुलाची वेगळी कथा !
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

शीर्षक:- जन्मभूमी भाग-२

जोराचा सोसाट्याचा वारा वाहत होता आणि त्यामुळे  झाडांची पाने सळसळ आवाज करत डोलत होती आणि आकाशातही ढग दाटून आलेले होते. त्यामुळे कधीही पाऊस पडण्याची लक्षणे दिसत होती.

मास्तरांनी अभ्यास जर केला नाही तर वेताच्या काठीने जोरात मारायचे आणि हात दुखल्यामुळे पुढचाही अभ्यास करायला जमत नव्हते. म्हणून पुन्हा फटके बसायचे. पवनची परिस्थिती जरी गरिबीची होती तरीसुद्धा त्याला शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे, हे खूप कमी वयामध्ये समजलेले होते. पाचवीत असणारा पवन सुभानच्या घराजवळ गेला.

तो म्हणाला," अरं सुभान्या,आज मास्तरांनी सांगितलेलं पुस्तकं मला देतोस का लगेच लिउनशानी मी तुला परत देतो."

"मला बी लिवायचं आहे गड्या. जरा दम धरं. मी लिवतो आणि मग तुला देतो काय." सुभान्या म्हणाला.

शाळा दुपारी सुटलेली होती आणि तसाच काही न खाता आणि घरी न जाता तो थेट पुस्तकासाठी आलेला. पोटामध्ये भुकेने कावळे ओरडत होते आणि पुस्तक तर त्याला हवे होते त्यामुळे तो त्याची वाट बघत बसला होता. हळूहळू वेळ सरत होती आपल्याला पुस्तकाची गरज आहे त्यामुळे आपण शांत रहायला हवं असं समजून पवन शांतपणे उभा राहिला होता.

आकाशात विजांचा कडकडाट व्हायला सुरुवात झाली आणि दाटून आलेले ढग कोसळायला जोमाने सुरुवात झाली. त्यातही शाळेच्या कपड्यांमध्ये असणारा पवन स्तब्ध उभा होता. एकच शाळेचा गणवेश तो वापरायचा. वारा वाहत होता आणि त्याबरोबरच पावसाचे मोठे मोठे थेंब जमिनीवर पडून पुढे जात होते. संध्याकाळ झाली तरी सुद्धा सुभानने काही त्याला पुस्तक दिले नव्हते.

सारखा कारण सांगून तो "थांब रे जरा. थांब रे जरा." असेच म्हणत होता.

अखेर रात्र झाली आणि आपल्याला पुस्तक काही  सुभान्या देणार नाही हे समजल्यावर जड अंत:करणाने आणि  पावसात भिजलेल्या अंगाने पवन तिथून निघून गेला.

सुभान्याच्या आईनेच सुभान्याला पुस्तक न देण्याबद्दल सांगितले होते. कारण सर्वांना माहीत होते की पवनची परिस्थिती गरिबीची होती. तरी तो एक हुशार विद्यार्थी होता आणि त्याला पुढे न जाऊन देण्यासाठी त्याला पुस्तक न देण्यासाठी त्याला मुद्दाम देतो, असे म्हणून वाट बघायला सांगितली होती.

आपली गरिबीची परिस्थिती पवनला चांगली माहीत होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याने जी काही शिक्षा मास्तरांनी दिलेली होती ती त्याने शांतपणे स्वीकारली.

सुभान्या मात्र सर्व वर्गमित्रांना रंगवून रंगवून सांगत होता की कसा पवन त्याच्या पाया पडत होता पण तरीसुद्धा त्याने पुस्तक दिले नाही. पवनच्या सवंगड्यांना रागही येत होता आणि त्यांच्या स्वतःच्या नाजूक स्थितीचे वाईटही वाटत होते पण पवन मात्र शांतच होता.

तिथून पुढे पवनची घरची परिस्थिती अजूनच बिकट झाल्यामुळे त्याला त्याच्या आजोळी सोडण्यात आले आणि तिथे घरच्यांपासून दूर राहण्याचे दुःख सहन करत त्याने आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला होता.

काही वर्षानंतर पवन एका खुर्चीवर बसलेला होता आणि समोर त्याची दोन मुले उभी होती. नुकतेच त्याच्या एका मुलाने दहावीची परीक्षा दिलेली होती आणि दुसऱ्या मुलाने बारावीची परीक्षा दिलेली होती.

पवन म्हणत होता, " मी तुम्हाला शिक्षणासाठी पैसे देईन पण त्याआधी माझ्या काही अटी आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील तरच तुमच्या शिक्षणाचा खर्च मी करेन."

त्याची दोन्ही मुले एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. पवनच्या बायकोला मात्र आपल्या या नवऱ्याच्या विचित्र मागणीने तिला रागच आलेला होता. आपल्या मुलांसाठी त्या मुलांचे आईवडील नेहमीच मदत करतात पण हे असे आपल्या नवऱ्याचे वागणे तिला बिल्कुल पटले नव्हते. मध्येच बोललेले पवनला आवडत नव्हते म्हणून ती शांत बसून ऐकत होती.

"बोला, तुम्हाला मान्य असतील अटी तरच आपण पुढे जावू." पवनने त्याच्या दोन्ही मुलांना विचारले.

" पप्पा काय अटी आहेत? तुम्ही आम्हाला सांगाल का?" त्याच्या एका मुलाने विचारले.

क्रमशः

काय अटी असतील?

© विद्या कुंभार

कथेचा भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगा.

(साहित्यचोरी करणे हा गुन्हा आहे. ह्या कथेचे अधिकार हे लेखिकेकडे आहेत.)

0

🎭 Series Post

View all