सुमनच्या पत्रिकेत मंगळ होता अन् म्हणून तिच्यासाठी मंगळ असणाराच वर हवा होता.
सुमन जरी शिकलेली असली तरी तिच्या घरचे कर्मठ! तिला तिच्या घरच्यांच्या स्वभावाची पूर्ण कल्पना होती अन् म्हणूनच कॉलेजमध्ये आपल्याला एखादा मुलगा आवडतोय का ह्याचा विचारदेखील तिनं कधीच मनात आणला नाही.
तिला वीस वर्षं पूर्ण होताच तिच्या वडिलांनी तिची माहिती, फोटो अन् पत्रिका नातलग अन् परिचितांकडे पाठवली अन् एका ओळखीतून मधुकरचं स्थळ आलं.
मधुकर देखील शिकलेला शिवाय सरकारी नोकरीत! त्यामुळे सुमनचा होकार होता अन् त्याची अन् सुमनची पत्रिका तंतोतंत जुळली म्हणून घरचेही खुश होते.
त्या काळच्या पद्धतीप्रमाणे टिपिकल कांदेपोहे कार्यक्रम होऊन वधुवरांची पसंती झाली अन् विधिवत् विवाह पार पडला.
दोघांचेही स्वभाव भिन्न आणि आवडीनिवडी तर दोन टोकांच्या! त्यामुळे कधी कडू तर कधी गोड.. कधी खारट तर कधी आंबट अशा अनुभवांनी दोघांचा संसार समृद्ध होत गेला.
दोघांच्या संसार वेलीवर दोन फुलं उमलली..
********************
आज सुमन आणि मधुकरच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस! त्यांच्या मुलांनी अनोख्या पद्धतीने साजरा करायचा ठरवला.
दोघांच्या लग्नाची गोष्ट त्यातील बारकाव्यांसह त्यांनी त्यांच्या मामा अन् आत्याकडून जाणून घेतली. आजोबांच्या घरातलं जुनं अडगळीचं कपाट धुंडाळलं अन् त्यांना त्यात आईचा बायोडाटा, दाखवण्याचा फोटो अन् जन्मपत्रिका सापडली. मामांकडून त्यांनी दोघांच्या लग्नाची पत्रिका देखील मिळवली.
त्यांना आईबाबांच्या लग्न ठरण्याच्या प्रवासापासून सुरूवात करून आजपर्यंतचा प्रवास व्हिडिओद्वारे एलईडी स्क्रीनवर दाखवायचा होता.
समारंभाची वेळ झाली. दोघांच्या लग्नाला उपस्थित असलेल्या अन् आज हयात असलेल्या व्यक्तींना आवर्जून बोलावलं होतं.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्हिडिओ सुरू झाला अन् मधुकरचा बायोडाटा, जुन्या हिंदी चित्रपटाच्या नायकाची स्टाईल करून काढलेला कृष्णधवल फोटो अन् सोबत पत्रिका पुढे सरकू लागली.. पार्श्वभूमीवर त्या काळच्या संगीताची धून वाजत होती.
आता सुमनच्या बायोडाटावर क्लोज अप होता.. पुढे माला सिन्हा सारखी हेअर स्टाईल केलेली सुमन.. अन् तिची जन्मपत्रिका!!
जन्मपत्रिकेवरून कॅमेरा फिरताच सुमनची मोठी बहीण.. मुलांची सुनितामावशी मोठयाने ओरडली.. "अगं सुमे.. ही तुझी पत्रिका नाहीच!"
"काय म्हणतेस काय!" मुलांची मीनाआत्या जोरात किंचाळली.. "अगं हीच पत्रिका बघून पसंत केली ना आम्ही सुमनला! चांगले छत्तीस गुण जुळत होते म्हणून!"
"असं कसं म्हणता मीनाताई.." सुनीता मावशी पुढे सरसावली.. "मला पक्कं माहीत आहे.. सुमीच्या लग्नस्थानी गुरू अन् भाग्यात शुक्र आहे! अन् इथेतर काही वेगळंच दिसतंय!"
"थांबा, मला बघू द्या!" सुमनच्या थोरल्या बंधूंनी हस्तक्षेप केला. "बघा, पत्रिकेवर लिहिलेली जन्मतारीख अन् बायोडाटावर लिहिलेली जन्मतारीख वेगळी आहे पहा!"
"अग्गोबाई! म्हणजे चुकून सुमनच्या बायोडाटाला भलतीच जन्मपत्रिका लागली की काय!" मीना आत्या पुन्हा किंचाळली.
"मग, तुम्ही नीट बघून घ्यायला हवं होतं ना!" सुमनच्या थोरल्या बंधूंनी मीनाआत्यांना उद्देशून म्हटलं.
"आम्हाला वाटलं, तुम्ही जुळवली असेल पत्रिका!!" मीनाआत्याने देखील बॉल थोरल्या मामांकडे टोलावला.
"आमच्या अण्णांचा तुमच्यावर विश्वास होता.. म्हणून त्यांनी नसेल दाखवली परत एकदा पत्रिका!!" मामांनी आपल्या तीर्थरूपांची बाजू राखली.
"मग? आता काय करायचं??" मीना आत्या चिडल्या.
"काय करायचं म्हणजे?? पत्रिका जुळली नाही म्हणजे लग्न होणे नाही! अण्णांना मुळीच मंजूर झालं नसतं हे असं!" मामांनी ठामपणे सांगितलं.
"अहो, पण लग्न झालंय ना कधीचंच!" मुलांनी मोठ्यांदा ओरडून साऱ्यांना वर्तमानात आणलं.
सगळे शांत होऊन बघू लागले.. सुमन अन् मधुकर बागेतील बाकावर बसले होते.. दोघेच.. सुखदु:खांची उजळणी करत!!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा