१६ जानेवारी : स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीचा इतिहास घडवणारा राज्याभिषेक.. लेखन: सुनिल जाधव, पुणे
आजचा दिवस म्हणजे १६ जानेवारी, हा मराठा इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा, संघर्षांनी भरलेला आणि प्रेरणादायी दिवस आहे. आजपासून तब्बल ३४४ वर्षांपूर्वी, १६ जानेवारी १६८१ रोजी, स्वराज्याची राजधानी रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेकाने केवळ एका राजाची सत्ता स्थापली नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याच्या संकल्पनेला नवी दिशा, नवे बळ आणि नवा लढाऊ आत्मा दिला.
३ एप्रिल १६८० रोजी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले आणि स्वराज्य एका मोठ्या संकटाच्या वळणावर उभे राहिले. त्या वेळी संभाजीराजे पन्हाळगडावर होते. शिवरायांच्या निधनानंतर स्वराज्यात दुःखासोबतच राजकीय अस्थिरता, सत्ता-संघर्ष आणि अंतर्गत कटकारस्थानांचे वातावरण निर्माण झाले.
या संधीचा फायदा घेत सोयराबाई आणि काही स्वार्थी, भ्रष्ट दरबारी यांनी शिवरायांचे लहान पुत्र राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा कट रचला. हा कट केवळ सत्तेसाठी नव्हता, तर स्वराज्याच्या मूळ विचारसरणीला, शिवरायांच्या धोरणांना आणि भविष्याला धोका निर्माण करणारा होता. संभाजीराजे जिवंत असताना त्यांना डावलून दुसऱ्याला छत्रपती बनवण्याचा प्रयत्न म्हणजे स्वराज्यावरच घाला होता.
कटाची माहिती मिळताच संभाजीराजांनी विलक्षण धैर्य, राजकीय चातुर्य आणि वेग दाखवत रायगडाकडे कूच केले. अनेक अडथळे, विरोधक आणि संकटे पार करत ते रायगडावर पोहोचले. तेथे पोहोचताच त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले, कट उघडकीस आणला आणि स्वराज्याच्या योग्य वारसाचा हक्क सिद्ध केला.
अखेरीस १६ जानेवारी १६८१ रोजी रायगडावर विधीपूर्वक संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. स्वराज्याला दुसरा छत्रपती मिळाला. हा राज्याभिषेक म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, त्यांच्या परंपरेचा आणि त्यांच्या स्वप्नांचा वारसा पुढे नेण्याचा ऐतिहासिक क्षण होता.
छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द १६८१ ते १६८९ अशी केवळ आठ वर्षांची असली, तरी ती मराठा इतिहासातील सर्वात संघर्षपूर्ण, युद्धांनी भरलेली आणि पराक्रमाने उजळलेली कारकीर्द ठरली. या अल्प काळात त्यांनी मुघल साम्राज्य, आदिलशाही, कुतुबशाही, पोर्तुगीज आणि इंग्रज अशा त्या काळातील बलाढ्य शक्तींशी सातत्याने संघर्ष केला.
इतिहासकारांच्या नोंदींनुसार संभाजी महाराजांनी सुमारे १२१ युद्धे जिंकली. हा आकडा केवळ युद्धांचा नाही, तर त्यांच्या नेतृत्वगुणांचा, रणनीतीचा आणि धैर्याचा पुरावा आहे. ते केवळ तलवारीचे धनी नव्हते, तर कुशल सेनानी, मुत्सद्दी आणि दूरदृष्टी असलेले राजे होते.
संभाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी छावा. त्यांनी वडिलांच्या शिकवणीचा प्रत्येक श्वासात अवलंब केला. तसेच ते राजमाता जिजाऊ साहेबांचे लाडके शंभूबाळ होते. जिजाऊंनी दिलेली संस्कारांची शिदोरी, धर्मनिष्ठा आणि स्वाभिमान त्यांच्या संपूर्ण जीवनात दिसून येतो.
संभाजी महाराज हे केवळ योद्धा नव्हते; ते उच्च शिक्षित, संस्कृत, मराठी आणि फारसी भाषेचे अभ्यासक होते. त्यांनी ‘बुधभूषण’, ‘नखशिखांतनिरूपण’ यांसारखे ग्रंथ लिहिले. त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे शौर्य आणि विद्वत्ता यांचा अद्भुत संगम होता.
स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही. मुघल सम्राट औरंगजेबाने अनेकदा त्यांना धर्मांतर, सत्ता आणि वैभवाचे आमिष दाखवले, पण संभाजी महाराजांनी स्वधर्म, स्वराज्य आणि स्वाभिमान यापुढे कधीही माघार घेतली नाही. अखेरीस त्यांनी अमानुष यातना सहन केल्या, पण झुकले नाहीत. हेच त्यांचे खरे महानत्व आहे.
११ मार्च १६८९ रोजी छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान झाले, पण त्यांच्या बलिदानाने स्वराज्याची ज्योत विझली नाही; उलट ती अधिक प्रखर झाली. त्यांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांनी मुघल साम्राज्याला सळो की पळो करून सोडले, हेच त्यांच्या त्यागाचे फळ होते.
आज, इतक्या वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे केवळ इतिहासातील व्यक्ती नाहीत, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे आणि लढाऊ वृत्तीचे प्रतीक आहेत. त्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांचा त्याग आजच्या पिढीलाही प्रेरणा देतो.
१६ जानेवारी हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की स्वराज्य सहज मिळाले नाही; ते रक्त, संघर्ष आणि बलिदानातून उभे राहिले. त्या स्वराज्याचा दुसरा छत्रपती म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी इतिहास घडवला.
मानाचा मुजरा स्वराज्यरक्षक, धर्मरक्षक, पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांना.
जय शिवराय!
जय संभाजीराजे!
जय संभाजीराजे!
शिवरायांच्या इतिहास व पुस्तकातून संदर्भ घेऊन माझ्या शब्दात
सुनिल जाधव पुणेTM
9359850065
9359850065
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा