जाणून घे तू स्वतःला...भाग 6
पुष्पाने नाश्त्या साठी दोन-तीन पदार्थ बनवून ठेवलेले होते, काही स्वीट डिश बनवले होते. ज्यूस बनवून ठेवलेलं होतं. पूजाची तयारी झालेली होती, सगळं रेडी होतं. आता त्या दोघी विक्रांतची वाट बघत बसलेल्या होत्या. विक्रांत हॉस्पिटलमधुन जाऊन आला.
डॉक्टरांचं बोलणं त्याच्या कानात वारंवार गुंजत होतं. तो त्याच्याच विचारत होता. पूजा त्याच्याजवळ आली तरी त्याचं लक्ष नव्हतं.
"दादा काय म्हणाले डॉक्टर."
विक्रांत काहीच बोलत नव्हता.
विक्रांत काहीच बोलत नव्हता.
तिने सायलीला विचारलं.
"काय ग काय झालं दादा बोलत का नाही आहे.?"
"माहीत नाही."
"काय म्हणाले डॉक्टर?"
"हेच बोलले, मला माहित नाही. मी बाहेर बसले होते."
विक्रांत काहीही न बोलता खोलीत गेला.
सायलीही त्याच्या मागे गेली.
"विक्रांत अहो काय झालं? तुम्ही काही बोलत का नाही आहात? काहीतर बोला. काय म्हणाले डॉक्टर, होतील का माझे डोळे बरे. मी हे सुंदर जग मी पुन्हा बघू शकेन का? अहो काहीतरी बोला ना."
"आपण नंतर बोलूया तू फ्रेश हो आणि तयार होऊन बाहेर ये, पाहुणे येतीलच आता मी बघतोय काही हवं नको ते."
विक्रांत खोलीतून बाहेर गेला.
सायली मात्र विचारात पडली.
'काय झालं असेल? काय बोलले असतील डॉक्टर? हे काहीच बोलत नाहीयेत. कदाचित माझं ऑपरेशन होणार नसेल आणि माझे डोळे बरे होणार नसतील म्हणून हे मला काही सांगत नसतील. मला त्रास होऊ नये मला दुःख वाटू नये म्हणून हे गप्प असतील. आता तर मला हेच वाटतं.'
सायली काही वेळ स्तब्ध बसून होती.
"सायली तयार झाली का?"
विक्रांतच्या आवाजाने ती तंद्रीतून बाहेर आली.
"हो हो आलेच."
सायली तयार झाली आणि बाहेर आली.
"आई काही राहिलंय का?"
"सगळं झालं आणि पाहुणे येण्याची वाट आहे. तू रेडी का नाही झालास?"
"अग होतोय, आलोच मी."
विक्रांत त्याच्या खोलीत गेला.
सायली तिथेच उभी होती.
विक्रांतच्या आईने सायलीला हळूच विचारलं,
"काय ग काय म्हणाले डॉक्टर? ऑपरेशन होणार आहे ना तुझ्या डोळ्याचं?"
"माहीत नाही आई, हे काही सांगत नाहीयेत."
"काय रे देवा भगवंता एकदाच तुझ्या डोळ्याची दृष्टी येवो म्हणजे माझी चिंता मिटली. कसा आहे ना मलाही थोडीशी तुझी कामात मदत होईल. बरं तू जा पूजाच्या खोलीत बस तिच्याजवळ."
सायली पूजाच्या खोलीत गेली.
"पूजा ताई आता येऊ?"
"ये वहिनी."
सायली आत जात होती की टेबलला तिचा पाय लटकला आणि ती अळखडून पडणार तोच पूजाने तिचा हात पकडला.
"अग वहिनी सांभाळून."
पूजाने सायलीला सावरलं आणि टेबलवर बसवलं.
"बरी आहेस ना तू?"
"हो मी बरी आहे, थँक्यू पूजा ताई तुम्ही मला सावरलं. नाही तर आज मला लागलंच असतं."
"लागलं नाही ना हे महत्वाचं. अरे हे काय." पूजा तिच्या साडी कडे बघत म्हणाली.
"काय झालं ताई?"
"साडी खेचल्या गेली म्हणून फाटली."
"अरे देवा. आता तुम्हाला दुसरी नेसावी लागेल, वेळ कमी आहे आणि मी तुम्हाला काही मदतही करू शकत नाही. सॉरी ताई."
"नाही ग वहिनी तू सॉरी म्हणू नकोस, मी मॅनेज करते."
ती साडी आवाराताना पुन्हा बोलायला लागली.
"खरं तर सॉरी मला तुला बोलायला हवं. मी तुझी अवस्था नाही समजून घेतली. पण आज तुला प्रत्यक्षात बघितलं ना तेव्हा कळले की तुझं आयुष्य कसं असेल. मला माफ कर ग वहिनी. तू ज्या दिवशी घरात आलीस त्या दिवसापासून मी तुझ्याशी नीट वागले नाहीये, नीट बोलले देखील नाहीये. तुला कधी वहिनी म्हणून हाक दिली नाही, खरंच मला माफ कर. आज मला दादाचा खूप अभिमान वाटतो आणि कौतुकही वाटतंय. कसा मॅनेज करतो तो? तुला किती सांभाळून घेतो. खरंच आज दादाचा अभिमान वाटतो."
"रेडी झालात का तुम्ही?"
"अग वहिनी झालेय."
सायली उठली, पूजाला काजळचा टिक लावला.
"दृष्ट नको लागायला माझ्या परीसारख्या लहान बहिणीला."
"तुला मी दिसले?"
"हं नाही ग, तुझ्या सारख्या सुंदर मनाची मुलगी दिसायलाही सुंदरच असणार."
"झालं असेल तर या दोघीही बाहेर."
विक्रांतच्या आईने आवाज दिला.
पूजाने सायलीचा हात धरला.
"चल वहिनी आपण हॉलमध्ये बसू."
दोघीही हॉलमध्ये गेल्या.
पूजाने सायलीचा हात पकडलेला विक्रांतच्या आईला दिसलं. तसं तिला आश्चर्य वाटलं.
दोघी येत असताना विक्रांतने पण बघितलं त्याला खूप बरं वाटलं. दोघी एकमेकीकडे बघून हसल्या. त्या दोघींना असं बघून विक्रांतच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं.
"आई सगळं रेडी आहे ना?" विक्रांत
"हो झालंय सगळं."
"अग पण पाहुणे अजून आले का नाहीत?"
"काय माहीत रे."
"अग त्या मध्यस्थीचा मोबाईल नंबर असेल ना तुझ्याकडे फोन लावून बघ ना."
"हो डायरीत नंबर लिहिला आहे, लावून बघते."
विक्रांच्या आईने मध्यस्थीच्या मोबाईलवर फोन केला, बोलणं झालं आणि माहिती मिळाली की ते लोक निघालेत अर्धा तासात पोहोचतील.
"विक्रांत अरे ते पोहोचतील अर्धा तासात, निघालेत. आपण आपलं तयारीत असूया. उगाच आल्यानंतर घाई घाई नको.
काही वेळाने पाहुणे मंडळी आले.
"नमस्कार या या, बसा."
पाहुणे आत येऊन सोफ्यावर बसले.
ते सगळे विक्रांतच्या घरावर नजर फिरवू लागले.
विक्रांत आणि त्याची आई पण समोरच्या सोफ्यावर बसले.
पुष्पा पाणी घेऊन आली तीने ट्रे टिपायवर ठेवला आणि आत गेली.
सगळ्यांनी पाणी घेतलं.
"कसा झाला प्रवास काही अडचण आली नाही ना घर शोधायला?"
"नाही नाही, प्रवास सुखकर झाला आणि घरही मिळालं, आपल्या मध्यस्थी होत्या ना, त्यांच्यामुळे काही अडचण आलेली नाही." वडिलांच्या मुलाने हसून उत्तर दिलं.
वडिलांच्या मुलांनी सगळ्यांची ओळख करून दिली.
इकडे विक्रांतने पण स्वतःची आणि त्याच्या आईची ओळख करून दिली. पूजा आणि सायली आत होत्या. सगळे एकमेकांविषयी विचारू लागले, बोलू लागले गप्पा झाल्या.
"मुलीला बोलवा आता, आम्हाला जरा लवकर निघायचं."
"हो हो.."
विक्रांतच्या आईने त्याला इशारा केला तसा तो उठला आणि आत गेला. सायली आणि पूजा किचनमध्ये होत्या. पुष्पाने नाश्त्याच्या प्लेट्स तयार केल्या. पूजा त्या प्लेट घेऊन समोर गेली. प्लेट्स टिफाय वर ठेवून तिने सगळ्यांना नमस्कार केला. पूजाकडे बघून पाहुणे मंडळी एकमेकांकडे बघून कुजबुजत होते. त्यांच्या चेहऱ्याच्या हावभावावरून असं वाटत होते की त्यांना मुलगी पसंत आहे.
"तुम्ही नाश्ता घ्या ना."
"हो हो."
सगळ्यांनी नाश्ता केला, जूस पिताना मध्यस्थीच्या कपड्यावर ज्यूस सांडला आणि म्हणून त्या आत कपडे साफ करायला गेल्या.
पूजा उभी होती, त्यांनी तिला बसायला सांगितलं. तिला नाव, शिक्षण सगळी माहिती विचारली.
"तुमच्या मुलाचं लग्न झालेलं नाहीये का?"
"हो झालंय ना, त्याचं लग्न झालंय.".
"नाही तुमची सून दिसत नाहीये म्हणून विचारलं."
"आहे ना सून आत आहे."
विक्रांतच्या आईने पुन्हा विक्रांतला इशारा केला, तसा विक्रांत गेला आतून सायलीला घेऊन आला.
"सायली समोर पाहुणे बसलेत नमस्कार करून घे." त्याने हळूच तिच्या कानात सांगितलं. तसं सायलीने हात जोडून सगळ्यांना नमस्कार केला.
काही वेळाने फोन वाजला, फोन त्या मध्यस्थीचा होता तिने लगेच रुमालाला हात पुसला आणि फोन रिसीव करून बोलत बोलत बाहेर हॉलमध्ये येऊन एका कोपऱ्यात उभी राहिली. ती खूप जोरात बोलत होती तिचा आवाज ऐकून सायलीची धडधड व्हायला लागली.
ती जोरात श्वास घ्यायला लागली, विक्रांतच्या लक्षात आलं त्याने लगेच तिचा हात धरला.
"काय झालं सायली तुला बरं वाटत नाहीये का?"
"एक मिनिट आम्ही आलोच." सगळ्यांना सांगून तो।सायलीला आत घेऊन गेला.
"सायली काय झालं? का अशी करतेस? श्वास वाढतोय तुझा, काय त्रास होतोय तुला?"
"फोनवर.. फोनवर ती.. ती बाई.. फोनवर."
"तू थांब मी पाणी आणतो."
अस म्हणून विक्रांत बाहेर गेला.
क्रमश:
