Login

जाणून घे तू स्वतःला...भाग 11

Olakh Swatala
जाणून घे तू स्वतःला...भाग 11


"अहो सॉरी, आता मी मध्ये बोलणार नाही. मला तुम्हाला राग येईल असं काही करायचं नाही आहे, मी सहज बोलले उत्सुकता म्हणून."

तो शांतपणे बसला.

"अहो आहात की गेलात?"

"काय बोलतेस तू सायली? मी आहे अजून."

ती जोरजोरात हसायला लागली.

"आता हसणार असशील तर मी निघालो.

ती गप्प झाली, त्याचा हात हातात घेतला.

"आता तोंडाला कुलूप, मी अजिबात काही बोलणार नाही."

"हम्म गुड गर्ल..तर मी काय म्हणत होतो. एकदा का प्रपोजल झालं आणि एकदा का तिकडून ग्रीन सिग्नल मिळालं की तो आणि ती एकमेकाला असं काही जपायचे की बस,
अब सब कुछ तेरे लिए
मेरी जान सिर्फ तेरे लिये...

हम बने तुम बने
एक दुजे के लिये..

हे फक्त त्या वेळेपर्यंत हं.

बापाच्या दोन चपाट्या गालावर पडल्या की कुठंच प्रेम नी कुठंच काय?"


विक्रांत जोरजोरात हसायला लागला.

"मग काय लपून भेटायचे, इकडे एक सांगायचं, तिकडे एक सांगायचं. दोन्ही बाजू सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरतचं."

"कुणीतरी प्रेमात आहे हे कसं ओळखायचं?"


"ज्यांनी आयुष्यात कधीतरी प्रेम केलेलं असेल ना म्हणजे कुठेतरी, कुणीतरी मनात भरलं असेल तर अशी व्यक्ती ओळखणं फार अवघड नसतं. त्यांच्या डोळ्यातच ते प्रेम दिसतं.


पहिला पाऊस पडण्याआधी गार वारा सुटला की घर, ऑफिस, हॉटेल, प्रवासात कुठेही असले तरी ही मंडळी खिडकीत जाऊन अगदी शून्य नजरेने त्या वाऱ्याचा आस्वाद घेतात.

मग जसजसा पाऊस बरसतो तसतसे हे त्या दिवसांत रमतात, आजूबाजूला कुणी नसलं तर ओठांवर एखादी कव‌तिा, गाण्याची ओळ, चारोळी अगदी सहज येते. एवढंच कशाला जेव्हा जेव्हा पानगळ होते तेव्हा तेव्हा हे भर उन्हात त्या पिवळ्या पानांकडे मोठ्या आसुसलेल्या नजरेनं पाहतात.

मग हळूच त्याच्या किंवा तिच्या आठवणींचा कप्पा उघडला जातो, त्यात आणखी भर टाकण्यासाठी लता, रफीचं दर्दभरे गीत ट्यून केलं जातं, ते जपून ठेवलेलं पत्र, धूसर झालेल्या कागदात दुमडून ठेवलेला तो पासपोर्ट साइजचा फोटो...

असं सगळं जसजसा पावसाचा जोर वाढतो तसतसं बाहेर येतं. तिची आणि त्याची ती पहिली भेट, सोबत घेतलेला तो पहिला चहा, तो बसप्रवास, अभ्यासाच्या वहीत जाळी होईपर्यंत जपून ठेवलेलं ते प‌िंपळाचं पान, हे सगळं आठवतं." तो बोलत होता आणि ती त्याच्या आवाजाकडे कान करून मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती.


"खरंच असं होतं का?"

"कदाचित हो.."
"तुम्हाला यातला किती अनुभव आहे."

"फारसा नाही, आणि बरंच आहे तो अनुभव माझ्या गाठीशी नाही. नाहीतर मलाही त्या त्रासातून जावं लागलं असतं."

"आताही जाताय की त्याच त्रासातून."

"हम्म काही बोललीस का तू?"

"नाही काही नाही. तुम्ही बोला."


"पहिलं प्रेम प्रत्येकालाच आयुष्यभरासाठी मिळेलं असं नसतं. कधी ‘तो’ समाजाच्या रुढी परंपरांमध्ये अडकतो तर कधी ‘ती’ चुकीचं पाऊल टाकायचं नाही अशी खूणगाठ बांधून त्याचा निरोप घेते. कधी एकमेकांचं वय आडवं येतं, तर कधी जात आडवी येते.

मात्र तरीही ‘तो’ आणि ‘ती’ जेथेही असतील तेथे कधीतरी कातरवेळी एकमेकांना साद घालत असतील. तर काहींचं पहिलं प्रेम पत्नी, पती म्हणून सोबतच असल्याने त्यांच्या आठवणींचा हिंदोळा तर बहरत असेल.
असो आता आपलं आयुष्य मला प्रेमाने बहरू द्यायचंय. आता आपल्या आयुष्यात फक्त आनंद आणि आनंदच येईल खात्री आहे मला.

हळूहळू दिवस सरत गेले.


काही दिवसांनी त्या पाहुणे मंडळीचा फोन आला. आम्हाला मुलगी पसंत आहे तुम्ही तुमचा निर्णय अजून कळवलेला नाहीये.

सायलीने घरी ठामपणे सांगितलं हे लग्न मी होऊ देणार नाही.

सगळ्यांना वाईट वाटलं.
पण सायलीने सगळ्यांना विश्वास दिला की आधी सगळी चौकशी करू, त्यानंतरच हे लग्न होईल. तिने सगळ्यांना तसं वचन दिलेलं होतं.

"अहो मला त्या बाईकडे घेऊन चला."

"अगं कसं शक्य आहे? आपण त्यांना ओळखतही नाही. त्यांच घर बघितलेलं नाही आणि तुला कसं नेणार तिथे."


"ते काही माहिती नाही, तुम्ही मुलाकडच्यांना फोन करा तिथून माहिती मिळवा आणि मला त्या बाईच्या घरी घेऊन चला. मी जरी बघू शकले नाही ना तरी आवाजावरून ओळखेन मी तिला."


बरेच प्रयत्न केल्यानंतर विक्रांतला त्या बाईचा पत्ता मिळाला. विक्रांत सायलीला तिथे घेऊन गेला.

त्या बाईने दार उघडला,

दारात विक्रांतला बघून

"तुम्ही?"

त्या बाईने विक्रांतला ओळखलं.


"या ना, या." विक्रांत आत गेला आणि मागे सायली होती.
तिला सायली दिसली.

सायलीकडे बघून ती बाई दचकली.
"सुकू.."


तिच्या तोंडून सुकू ऐकून सायली रडायला लागली.

"आई.."

"विक्रांत मी बोलले होते ना तुम्हाला ही माझी आई आहे, माझी आई आहे. मी बोलले होते ना त्या बाईकडे मला घेऊन चला तो आवाज मला ओळखीचा वाटतो ही आई आहे माझी विक्रांत."


तिच्या आईने तिला कवेत घेतलं.

"सुकू माझी सुकू कशी आहेस ग?"

"मी ठीक आहे तू कशी आहेस."

"मी पण ठीक आहे."


"आई त्या दिवसानंतर मला असं वाटलं की तू या जगात नाही, तू मला सोडून गेलीस."


"लग्न केलेस बाळा."


"हो हेच ते ज्यांनी मला जीवनदान दिल, माझा जीव वाचवला आणि त्यानंतर मला काही त्रास नको म्हणून माझ्याशी लग्न केलं. हे माझ्यासाठी देव माणूस आहेत. पण आई तू त्याच देवमाणसाला त्रास द्यायला निघाली होतीस?"


"म्हणजे?"


"तू काय करतेस मला नाही माहित पण मला असं वाटतंय की जे काही घडणार आहे ते चुकीचं घडणार आहे. आई तू ज्यांना घेऊन मुलीकडच्या घरी गेली होतीस ना ते घर माझ आहे, माझ्या नणंदेला बघायला आली होतीस तू. पण आई मी हे लग्न होऊ देणार नाही. तुझा डाव मला कळला नाहीये पण तो मुलगा शिकलेला आहे तरी माझ्या नणंदेला मागणी घालतोय इच्छा व्यक्त करतो याचा अर्थ काय आहे. तू माझ्या नणंदला विकून तुझ्या व्यवसायात लावणार होतीस?"


"नाही, नाही तू चुकीचा अर्थ काढते आहेस."


"मी काढत नाहीये खरच खरच तसा अर्थ निघतोय आणि ते जर खरच असं केलंस तर मी सरळ पोलिसात जाईल."



तुझ्या आईला पोलिसा टाकणार आहेस?"


"हो मी माझ्या देवमाणसासाठी काहीही करू शकते.
त्यांची फॅमिली माझी फॅमिली आहे. आज मी बघत नाही मला दिसत नाही माझ्यासाठी विक्रांत किती काय काय करतात. तुला याची कल्पना नाही आहे. मी त्यांच्यासाठी एवढं करू शकतेस. आताच्या आता मुलाकडच्याला फोन करून सांग की आम्ही लग्नाला तयार नाही आहोत. जा सांग त्यांना. आई तुला माझी शपथ आहे तू जर फोन केला नाहीस तर यानंतर मी कधीही तुझ्यासमोर दिसणार नाही."


सायली तिथून निघून गेली, विक्रांतही तिच्या मागे मागे गेला.


"सायली थांब, शांत हो जरा."

"काय शांत हो, माझी आई कस वागायला निघाली आहे."

"अरे हो पण त्यांना थोडी माहीत होत की ते ज्या मुलीला बघायला गेले ती तुझी नणंद आहे."


"प्रश्न तो नाहीये विक्रांत, माझी नणंद असो किंवा कोणतीही मुलगी, चुकीचं घडणार होतच ना? मग ती मुलगी कुठली असो, कुणासोबतही असं घडू नये.
मी फक्त चोवीस तास वाट बघणार आहे विक्रांत, चोवीस तासात जर फोन आला नाही तर मी सरळ पोलिसात जाईल. आणि आईने पळून जाण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी पोलीस शोधतीलच.
चला घरी."


पुढल्या दोन तासात त्यांच्या घरी फोन आला की आम्हाला हे लग्न करायचं नाहीये एवढे बोलून समोरच्याने फोन ठेवून दिला.

पूजाला आणि तिच्या आईला धक्का बसला,
पण या मागचं कारण त्यांना माहिती नव्हतं.