Login

जाणून घे तू स्वतःला...भाग 1

Janun ghe tu swatala
जाणून घे तू स्वतःला...भाग 1

"सायली तयार झालीस का? निघायचं आहे आपल्याला उशीर होतोय ग." विक्रांत तयार होऊन हॉलमध्ये बसलेला होता.

सायली तयार होऊन आली.

"कशी दिसतेय मी?"
त्याने तिच्या माथ्याचं चुंबन घेतलं.

"खूप छान, तू नेहमी छानच दिसतेस."

"थँक यू."

"आता हे काय?" तिचे पाणावलेले डोळे बघून त्याने तिला छातीशी कवटाळले.


"फक्त तुम्हीच मला छान म्हणता, बाकीचे तर मला." तिचा कंठ दाटला आणि ती स्तब्ध झाली.

"सायली चेहऱ्यावर स्माईल आण बघू, चल हस बघू."

त्याने तिच्या गालाला ओढलं तशी तिने स्माईल दिली.

विक्रांतच्या रिलेशनमध्ये बर्थडे पार्टी होती.
घरचे सगळे आधीच गेले होते. विक्रांत सायलीसाठी थांबलेला होता.

दोघेही पार्टीला गेले, केक कटिंग झाले. सगळे पार्टी एन्जॉय करत होते.

सायली विक्रांतजवळ बसलेली होती,
तिथे त्याची दूरची मावशी त्याच्याशी बोलायला आली.

"काय मग विक्रांत काय म्हणते तुझी बायको? जुळतंय का सगळं. अश्या लोकांना जुळवायला वेळ लागत नाही, तू असो की अजून कुणीही असो."


विक्रांत काहीही न बोलता तिथून उठला, त्याने तिचा हात पकडला.

"सत्य परिस्थितीपासून किती दिवस पळ काढणार आहेस? आज फक्त आम्हाला माहीत आहे, समाजात माहीत होईल तेव्हा लोक काय बोलतील?"

"मला काहीही फरक पडत नाही आणि मी माझं बघून घेईल तुम्ही तुमचं बघा." तो समोर काही बोलणार होता तोच सायलीने त्याला अडवलं.

दोघेही तिथून बाहेर पडले.

"तू का अडवलंस मला, अग बोलू द्यायचं होतंस."

तिने त्याचा हात हातात घेतला.

"अश्या लोकांसमोर बोलून काहीच उपयोग होत नाही, शेणावर दगड मारला की शेण आपल्याचं अंगावर उडत. त्यांना फक्त आपल्याला त्रास द्यायचा होता, अजून काही नाही आणि प्लिज तुम्ही चिडत जाऊ नका, तुम्ही चिडायला हवं म्हणून ते बोलतात. तुम्ही चिडून काहीतरी करावं म्हणजे त्यांना चर्चेला एक विषय मिळेल, असाच त्यांचा हेतू असतो.
खरच तुम्ही चिडत जाऊ नका."

त्याने दुसरा हात तिच्या हातावर ठेवला.

"तू किती निरागस आहे ग. पण या लोकांना ते दिसत नाही."

ते दोघेही घरी गेले.

विक्रांत हॉलमध्ये टीव्ही बघत बसलेला होता.

सायली फ्रेश होऊन झोपायला गेली.

काही वेळाने विक्रांतच्या घरचे पार्टीवरून आलेत.

"लोक आपल्या तोंडात शेण घालतायेत आणि हा इथे आरामात बसून टीव्ही बघतोय." विक्रांतची आई सुलोचना दारात पाऊल ठेवताच विक्रांतकडे बघून ओरडायला लागली.

"आई त्याला बोलून काय उपयोग? त्याचं डोकं बधिर झालंय तिला बघितल्यापासून. उगाच त्याला बोलत जाऊ नकोस, ताटाखालचं मांजर आहे बिचारा." बहीण अदितीने त्याला टोमणा मारला.

सुलोचना पुन्हा बोलायला लागल्या.

"अरे सगळे आपल्यावर थू थू करतात. लोक हसतायेत आपल्यावर, नको नको ते बोलत होते पार्टी मध्ये. ऐकणं मुश्किल झालं आणि आम्ही तिथून निघालो. अरे अशी बायको करण्यापेक्षा बिन लग्नाचा असतास तर बरं झालं असतं."

त्यांचा आवाज ऐकून सायली बाहेर आली,

"आई तुमच्या सगळ्यांचा काय प्रॉब्लेम आहे? का तुम्ही सगळे तिच्या मागे लागलात? अग ती किती साधी आणि सरळ, भोळी आहे पण तरी तुम्ही सगळे का बोलता तिला?"
सायलीला बघून विक्रांत उठला आणि त्याच्या आईला बोलायला लागला.

सगळ्यांनी सायलीकडे बघितलं आणि आपल्या खोलीत निघून गेले.

काही क्षण निरव शांतता पसरली.

सायली विक्रांत जवळ आली,

"अहो काय झालं?"

तो शांत उभा होता.

"अहो विक्रांत काहीतरी बोला ना. काय झालं मी तुमच्याशी बोलतेय."


त्याने तिला सोफ्यावर बसवलं.

"तू काळजी करू नको, सगळं ठीक होईल."

"अहो तुम्हाला माझ्यामुळे किती काय काय ऐकून घ्यावं लागतंय. का करताय तुम्ही असं? नका करू सोडून द्या हे सगळं. तुम्ही माझ्यासाठी तुमच्या घरच्या लोकांना दुखावताय. माझ्यामुळे त्यांना त्रास होतोय. मला तुम्ही परत तिथेच सोडून द्या जिथून घेऊन आलात. तुम्ही तुमच्या आईच्या मताप्रमाणे वागा, त्यांना आवडेल त्या मुलीशी लग्न करा आणि सुखाने संसार करा. मी तुम्हाला ते सुख देऊ शकेल की नाही मलाही माहित नाही. तुम्ही तर सगळे जाणता माझ्याबद्दल तरी का असे करता?"

सायली रडायला लागली.

त्याने तिचे डोळे पुसले.

"नाही सायली यापुढे मला तुझ्या डोळ्यात अश्रू नकोयेत. तुझ्या डोळ्यात मला आनंद बघायचंय फक्त आनंद." त्याने तिचं डोकं त्याच्या खांद्यावर टेकवला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

काही वेळाने तो तिला खोलीत घेऊन गेला, तिला बेडवर लेटवलं तिच्या अंगावर पांघरून घालून दिलं आणि तो तिच्या बाजूला बसला. तिच्या माथ्यावरून हात फिरवू लागला. काही वेळाने सायली झोपली.


सायली झोपल्यानंतर विक्रांत त्याच्या आई-बाबांच्या खोलीत गेला.

"आई आत येऊ का? मला बोलायचंय तुझ्याशी."


"आता इतक्या रात्री काय बोलायचं तुला? उद्या बोलशील आम्हाला झोपायचं आहे."


"नाही  मला आत्ताच बोलायचं."

"बोल काय बोलायचं तुला."

"आई तू अशी का वागतेस?"

"तू मलाच विचारायला आला आहेस. मी काय चुकीचं वागले सांग. तू जे केलेस ना ते चुकीचं होतं."


"हो मान्य आहे मला, असेल ते चुकीचे पण त्यावेळी  परिस्थितीच तशी होती. त्या परिस्थितीत मला अजून काय करायला हवं होतं."

"अरे कुठेतरी सोडून यायला हवं होतं. इथे आणण्याची काय गरज होती?"


"आई तुम्ही कुणीच का समजून घेत नाही आहात. त्या वेळी काय परिस्थिती होती? तिची मनस्थिती काय होती? तिची अवस्था काय होती? सगळ सांगितलेलं होतं मी तुला. तरीही एक स्त्री असूनही तू का समजून घेत नाहीस तिच्या मनाची अवस्था.

आई तू एक स्त्री असूनही दुसऱ्या स्त्रीचे दुःख का समजू शकत नाहीस, देव न करो तिच्या जागी तुझी मुलगी असती तर?"


"विक्रांत." सुलोचना जोरात किंचाळली आणि त्याच्या कानशीलात मारली.


"तू काय बोलतोस तुला तरी कळत आहे का?"


"सॉरी आई मला तसं म्हणायचं नव्हतं पण एकदा तिच्या बाजूने विचार करावा असं मला वाटतं. तुम्ही सगळे फक्त एकाच बाजूने विचार करत आहात. आई नाण्याला दोन बाजू असतात ग दोन्हीचा विचार केला ना की आपल्याला कळतं कोण बरोबर कोण चूक आणि कधी कधी काय होतं ना परिस्थिती अशी असते की काय चूक काय बरोबर याचा विचार न करता आपल्याला वागावं लागतं. परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं. मी जुडवलं तुम्ही जुळवण्याचा प्रयत्न केला ना तर या घरात आनंद राहील.

विक्रांत बोलला आणि त्याच्या खोलीत गेला, सायलीच्या उशाशी जाऊन बसला. सायली झोपलेली होती पण तरीही तिचे पानावलेले डोळे त्याला दिसत होते.

त्याने तिच्या माथ्याचं चुंबन घेतलं.


"सायली तू काळजी करू नकोस मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. आयुष्यभर तुझा हात हातात धरूनच मी माझ्या आयुष्याची वाटचाल करेल. वचन देतो मी तुला. पूर्ण जग जरी माझ्या विरोधात झालं ना तरी मी लढेल पण तुझी साथ सोडणार नाही."

काही वेळाने विक्रांतला झोप लागली.

प्रसन्न पहाट उगवली, सूर्याचे किरणे सायलीच्या चेहऱ्यावर पडू लागले. सूर्याच्या किरणांनी तिच्या त्या सावळ्या चेहऱ्यावर आणखी तेच दिसत होतं. सूर्याच्या तिरीपमुळे तिला जाग आली.

डोळे उघडून तिने चहूकडे नजर फिरवली, उठून बसली. हात जोडून देवाला नमस्कार केला.

उठली आणि फ्रेश व्हायला वॉशरूमकडे जायला निघाली, मध्येच टेबलला तिचा पाय लटकला आणि ती खाली पडली. तिच्या आवाजाने विक्रांतला जाग आली. त्याला सायली खाली पडलेली दिसली तसा तो ताडकन उठला आणि तिच्याजवळ गेला.


"अगं सायली आरामात चालायचं ना, मला आवाज का दिला नाहीस मी उठलो होतो."


"तुम्ही गाठ झोपेत होतात."

"चल उठ बस इथे."

त्याच्या डोळ्यातली काळजी तिच्या हृदयाचा ठाव घेत होती.