Login

जाणून घे तू स्वतःला...भाग 3

Janun ghe tu swatala
जाणून घे तू स्वतःला...भाग 3

ती त्याच्या मागे लपून होती, तिने त्याच्या बाहुला घट्ट धरून ठेवलेलं होतं.

काही सेकंदात पुन्हा शांतता पसरली.

त्याने तिला त्याच्या पुढ्यात उभं केलं.

"कोण होती ती माणसे.?"

त्याच्या प्रश्नाने तिला रडू आवरलं नाही आणि
ती रडायला लागली.

"अग रडू नकोस, तुला आता नाही सांगायचं ना नको सांगूस पण प्लिज रडणं बंद कर "

ती शांत झाली, तो तिला त्याच्यासोबत त्याच्या घरी घेऊन आला.

रात्र झालेली होती, सगळे झोपले होते म्हणून तो कुणाला काहीही न सांगता तिला त्याच्या खोलीत घेऊन गेला.

ती त्याच्या खोलीत बेडवर झोपली आणि विक्रांत सोफ्यावर झोपला.


दुसऱ्या दिवशी सकाळी पुष्पा त्याच्या खोलीत चहा घेऊन गेली आणि तिला बेडवर बघून पुष्पा किंचाळली तसा विक्रांत झोपेतून जागा झाला.


"पुष्पा का ओरडतेस?"

"साहेब ही मुलगी कोण आहे?" पुष्पा तिच्याकडे बोट दाखवत बोलली.

"पुष्पा शांत हो, उगाच ओरडशील ना तर घरचे सगळे घाबरतील. मी सगळ्यांना सगळं नंतर सांगणार आहे. तुझ्या आवाजाने ते उठतील, तू जा आता आणि हो तिकडे जाऊन कोणाला काही बोलू नकोस. जे काय सांगायचंय ते मी सांगेल."

काही वेळाने त्याने घरच्यांना घडलेली संपूर्ण घटना सांगितली.

"अरे पण तू तिला आपल्या घरात का घेऊन आलास? तिकडेच कुठेतरी सोडून द्यायचं होतंस ना." त्याची आई त्याच्यावर चिडली.

"आई तुला कळतंय का तू काय बोलतेस? अग तिची अवस्था काय आहे बघितलंस का. सध्या तरी मी तिला कुठेही सोडणार नाही. ती आपल्याच घरात राहील आपल्या सोबत.


"तुला वेड लागले, कोणत्या नात्याने तू तिला इथे ठेवणार आहेस? पोलिसांना कळलं ना तर तुला जेलमध्ये बंद करतील."


"त्याची काळजी तू करू नकोस, मला काय करायचं ते मी बघतो." अस म्हणून विक्रांत त्याच्या खोलीत गेला.


तिला जाग आली, ती उठून बसली.

विक्रांतचं तिच्याकडे लक्ष गेलं,

"झाली का झोप? कसं वाटतंय आता? बरी आहेस ना? काल तुला नाव विचारायचं राहिलं.

"मी सायली."

"हाय मी विक्रांत."

"सायली तू आता माझ्या घरात असल्यामुळे तू सेफ आहेस उगाच काळजी करत बसायची नाही. मी आता ऑफिसला चाललोय तुला काहीही लागलं तर घरात पुष्पा आमची कामवाली आहे ती तुला मदत करेल."


"अहो आज नाही गेलं तर नाही का चालणार म्हणजे मी घरात अशी एकटी आणि माझी अवस्था तर तुम्हाला माहिती आहे मी कसं मॅनेज करेल नाहीतर तुम्ही एक काम करा, मला सोडून द्या तुम्ही माझ्या घरी, मी तिथे राहील."


"वेडी झालीस का तू? मी तुला तुझ्या घरी काय कुठेही सोडणार नाही. मी बघतो मला सुट्टी मिळते का? सुट्टी मिळाली तर वर्क फ्रॉम होम करतो."

विक्रांतने तिला मदत केली, तिचं सगळं करत होता म्हणून त्याची आई दिवसभर बडबड करत होती.

"तुला आमचं ऐकूनच घ्यायचं नाही आहे, मला सांग ही मुलगी इथे का म्हणून राहील? काय नात आहे तुझं आणि तिचं?"

"नात्याचं काय घेऊन बसलीस ग, काही नातं नसलं तरी माणुसकी तर आहे ना? माणुसकीच्या नात्याने हे सगळं करतोय मी आणि तरीही तुला काही प्रॉब्लेम असेल तर थांब तिथेच मी आलोच."

असं म्हणून विक्रांत आत गेला, सायलीचा हात धरून तिला हॉलमध्ये घेऊन आला.

देवघरात गेला, तिथून कुंकवाचं करंडा घेऊन आला आणि तिच्या भांगात कुंकू भरलं.

"आई आजपासून ही माझी बायको आहे, आता आमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं आहे. आता तर कुणालाही बोट ठेवायला जागा राहणार नाही ना."

त्याच्या आईने त्याच्या हातातून करंडा फेकला.

"वेडा झालास का तू? वेड लागले का तुला? कोण कुठली मुलगी, तिचं घरदार पण आपल्याला माहीत नाही तिला बायको करून घेतलंस तू."


"आजपासून ही माझी बायको आहे, रीतसर लग्न करेन मी तिच्यासोबत."

हे सगळं ऐकून सायलीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले.


सायली खोलीत जायला निघाली आणि धडपडून खाली पडली तसं त्याने तिला उचललं आणि सगळ्यांच्या लक्षात आलं की सायलीला दिसत नाही ती आंधळी आहे.

सायलीच्या आईने तर डोक्यावर हातच ठेवला.

"या मुलाने कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवली नाही." नको नको ते बोलू लागली.

विक्रांत सायलीला खोली घेऊन गेला.

"का केलं तुम्ही असं? तुम्ही माझ्यासाठी तुमच्या घरच्यांशी का भांडलात? तुम्ही त्यांचं मन मोडू नका. मला सोडून द्या माझ्या घरी."


"नाही आता हे शक्य नाही, तू माझी बायको आहे आणि उद्या आपण मंदिरात रीतसर लग्न करतोय.


"पण तुम्हाला तर माझ्याविषयी काहीच माहित नाही तरी तुम्ही माझ्याशी लग्न केले."


"मला जाणून घेण्याची गरज नाहीये आणि तरीही तुला जर सांगावसं वाटलं तर तू मला सांगू शकतेस. मी तुझ्यावर कुठलाही दबाव आणणार नाही."

दुसऱ्या दिवशी विक्रांतने सायलीसाठी नवीन साडी आणि मेकअपचे सामान आणलं. तिला छान तयार करून मंदिरात घेऊन गेला. दोघांनीही मंदिरात जाऊन लग्न केलं. घरी येऊन सर्वांना नमस्कार केला पण कुणीच आशीर्वाद दिला नाही. देवाला नमस्कार केला.


सायली आणि विक्रांतच्या नवा आयुष्याला सुरुवात झाली. विक्रांत सायली सोबत खुश होता. हळूहळू सायली मध्ये बदल व्हायला लागला. तिचं राहणीमान, बोलण्याची पद्धत सगळं हळूहळू बदलायला लागलं. तिला त्या घराची सवय झाली. प्रत्येक जागा पावलांनी मोजून ठेवायची. आता सगळ्या जागेची तिला सवय झालेली होती. सगळं सराईत पणे करायला लागली.

पण सायलीचा भूतकाळ सायलीला स्वस्थ बसू देत नव्हता.

"यांना मला खरं खरं सांगावं लागेल, मी न सांगून चूक करते आहे, मला सगळं सांगावं लागेल. यांनी माझ्यासारख्या मुलीवर विश्वास ठेवला, माझ्याशी लग्न केलं. संपूर्ण आयुष्य माझी जबाबदारी घेण्याचं वचन दिल आणि मी काय करत आहे त्यांच्यापासून माझा भूतकाळ लपवत आहे. नाही आज ऑफिसमधून आले की मी यांना सगळं सांगेल." ती स्वतःशीच बोलत होती


विक्रांत ऑफिसला गेला की त्याच्या घरचे तिला त्रास देण्यासाठी निमित्त बघायचे.

सायली घरातले जास्त काम करत नसे म्हणुन तिला टोमणे खावे लागायचे. पुष्पाच्या मदतीने थोडेफार काम करून घ्यायची पण तिला सगळे काम करायला जमत नव्हते म्हणून ती जास्तीत जास्त खोलीतच बसून राहायची. खोलीतल्या खोलीतच काहीतरी करायची. हळूहळू घरच्यांना सवय व्हायला लागली. ते तिच्याशी बोलायचे नाही, सगळे तुला इग्नोर करायचे.


विक्रांत ऑफिस मधून आला.

"सायली मी आलोय ग."

"मला तुमच्याशी म्हत्वाचं बोलायच आहे."

"बोल ना."

"तुम्ही आधी फ्रेश व्हा, मी पुष्पाला चहा सांगते."

सायलीने पुष्पाला चहा सांगितला, विक्रांत फ्रेश झाला. पुष्पा चहा घेऊन आली.

दोघांनी चहा घेतला.

"बोल काय बोलायचं तुला."

"विक्रांत मला तुम्हाला माझ्याबद्दल काही सांगायचं आहे."

"तुझ्याबद्दल काय सांगायचं? मी ओळखतो तुला."


"नाही माझ्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाहीये, मी
कुठे राहते? माझं घर कुठे आहे? माझा परिवार आहे की नाही माझ्या फॅमिली मध्ये कोण आहे? तुम्हाला काहीच माहिती नाहीये."


"मला इतकंच माहीत आहे की तू माझी बायको आहेस आणि तू मला काहीही सांगितलंस म्हणून माझं तुझ्याविषयी मत बदलेल असं काही नाहीये."

"तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबर आहात, तो तुमच्या मनाचा मोठेपणा झाला पण माझं मन मला खातंय. मी तुमच्यापासून काहीतरी लपवतीये, तुमच्याशी खोटं बोलतेय असं सारखं सारखं माझं मन मला सांगते की तू विक्रांतला फसवतेस. मला तुम्हाला फसवायचं नाही आहे, असं खरंच नाहीये."

"सायली तू का इतक मनाला लावून घेतेस?"

"माझ्या भूतकाळाविषयी मी जे सांगेल ते तुम्ही ऐकू शकाल की नाही हे मला माहिती नाही. पण आज मी तुम्हाला सगळं सांगणार आहे."