Login

जाणून घे तू स्वतःला...भाग 5

Janun ghe tu swatala
जाणून घे तू स्वतःला...भाग 5


"आई आता आपल्याकडे पैसे आले म्हणून जुने कपडे घालायचे नाही का आपण? तू का जाळलेस ते कपडे." सुकूने प्रश्नार्थक चिन्हाने तिला विचारलं.


"काही नाही बाळा ही सुरुवात आहे. सुरुवातीला त्रास होईल, ते अंगावरचे कपडे नकोसे वाटतील पण हळूहळू सवय होईल.  तू लक्ष देऊ नकोस, चल बाळा तुला भूक लागली असेल ना काहीतरी बनवते मी तुझ्यासाठी. दोन घास खा आणि झोपून जा." असं म्हणतच तिची आई किचन कडे गेली.

तिने जेवण बनवलं, सुकूला जेवण भरवलं आणि ती स्वतः जेवली.

दुसऱ्या दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली.

सुकूने दार उघडला.

"कोण आहे? कोण हवंय तुम्हाला?" सुकूने विचारलं.

"सुकन्या बाळा मी तुझा काका आहे, तुझ्या बाबाचा मित्र. तुझी आई आहे का बाळा?" त्याने तिच्या गालावरून हात फिरवला.

तो स्पर्श तिला नकोसा वाटला, तिने लगेच दोन पावलं मागे टाकली.

"आई आहे तुम्ही बसा,  मी आईला बोलावते."

सुकू पावले मोजत किचनमध्ये गेली, तिची आई किचनमध्येच काम करत होती.

"आई बाबांचे कुणीतरी मित्र म्हणजे काका आलेत, तुला विचारतायेत."

तिच्या आईला कोण आलंय ते समजलं.

"बाळा तू खोलीत जा, मी बघते कोण आहे."

सुकू पावलं मोजत तिच्या खोलीत गेली.


आता ते काका रोज यायला लागले.

दिवस, महिने गेले

रोशनच ऑपरेशन झालं पण तो कोमात गेला.
बरीच वर्षे तो कोमात होता.
आणि एक दिवस तो हे जग सोडून गेला.

बरीच वर्षे उलटून गेली, आई तिच्या कामात व्यस्त असायची, मला आत ठेऊन बाहेरून दाराला कुलूप लावून जायची. तिच्या माघारी घरी कुणी येऊ नये एवढाच काय तो तिचा हेतू असावा.

एका रात्री मी वाट बघत बसले होते, आई खूप उशिरा आली.

आई खूप रडत होती, मी विचारलं पण काहीच बोलत नव्हती.
थोड्या वेळाने उठली आणि मला म्हणाली.


"सुकू आपण आजीच्या गावाला राहायला जाऊया, इथे तसे आपण दोघीच आहोत. इथले लोक आपल्याला जगू देणार नाहीत."

आई आणि मी आजीच्या गावाला जायला निघालो होतो, वाटेत आम्हाला कुणीतरी अडवलं.

आईचं आणि त्यांचं काहीतरी बोलणं झालं, जोरजोरात बोलण्याचा आवाज येत होता, त्यानंतर भांडण झालं, आईच्या किंचाळन्याचा आवाज आला. तीन चार लोकांचे बोलण्याचं आवाज आले.

"अरे पकडा तिच्या मुलीला, आई नाहीतर तर ती सही."

असा आवाज ऐकताच मी धावायला लागले, मी खुप धावले, पळाले आणि तुम्हाला येऊन धकडले, माझ्या आईचं काय झालं मलाही माहीत नाही, ती जिवंत आहे की मेली तेही माहीत नाही.

माझी आई काहीतरी चुकीचं काम करते एवढं मला कळत होतं पण काय ते माहीत नव्हतं. तुम्ही मला देवासारखे भेटलात म्हणून आज मी वाचले नाहीतर त्या नराधमांनी माझं काय केलं असतं कुणास ठाऊक."

विक्रांतने तिला बेडवर बसवलं.
"सायली शांत हो, मी तुझ्यासोबत आहे. आपण तुझ्या डोळ्यांचं ऑपरेशन करून घेऊया, बेस्ट ट्रीटमेंट करूया. मी उद्याच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतो. सायली स्वतःला एकट समजू नको, मी तुझ्यासोबत आहे."

..................................

दुसऱ्या दिवशी विक्रांत त्याच्या ओळखीच्या आय स्पेशालिस्ट कडे गेला. त्याने सायलीच्या डोळ्यांबद्दल सगळी माहिती दिली, डॉक्टर बोलले आपण तपासूया आणि बघूया काय करता येईल ते.
डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन विक्रांत घरी आला.


विक्रांत घरी आल्या आल्या त्याच्या आईने त्याला सांगितलं,

"विक्रांत उद्या पूजाला( विक्रांतची बहीण) बघायला मुलाकडची मंडळी येत तर तू उद्या घरीच थांब."

"आई ते किती वाजता येणार आहेत?"

"दुपारी येतील."

"आई मला सकाळी सायलीला घेऊन बाहेर जायचं आहे, मुलाकडची मंडळी येईपर्यंत मी परत येईल."

"अरे पण तू इथे असणं गरजेचं आहे, घरी काय हवं नको ते बघायला नको का? आम्ही दोघी दोघींनीच किती करायचं?"


"आई मी असणार आहे ग."


"पण असं काय महत्त्वाचं काम आहे तुला उद्याच बाहेर जायचंय, तू नंतर बाहेर जाऊ शकत नाही का?"


"आई मी उद्या सायलीसाठी आय स्पेशालिस्टची अपॉइंटमेंट घेतली आहे तिला दवाखान्यात नेणे गरजेचे आहे."

"हे काम तू नंतर करू शकतोस ना? उद्याच का?"

"आई मला माहित असतं की उद्या पाहुणे येणार आहे तर मी नसतो गेलो पण मी अपॉइंटमेंट घेऊन आलोय सो प्लिज... होईल सगळं ऍडजेस्ट उगाच विचार करू नकोस."


"त्या मुलीसाठी तुला आपल्या बहिणीची ही काळजी नाही, कोण ते कुठची पोर घरात आणून ठेवली आहे."

विक्रांतची आई सायलीला खूप बोलली. तिच्या आईचं बोलणं तिच्या कानावर जात होतं, तिला खूप त्रास होत होता पण स्वतःलाच सावरत होती.

विक्रांत खोलीत गेला अजूनही त्याच्या आईचा आवाज खोलीपर्यंत येत होता.

"सायली काळजी करू नकोस सगळं नीट होईल. उद्याची मी डॉक्टरांची अपॉयमेंट घेतली आहे, आपण उद्या दवाखान्यात जातोय."


"अहो पण घरी पूजा ताईला बघायला पाहुणे येणार आहेत ना?"


"अग हो, होईल सगळं मॅनेज तू काळजी करू नकोस."

"अहो पण मला घरी असणं गरजेचं आहे."


"तू असून काय करणार आहेस? तुझी काही मदत होईल का त्यांना? ते उगाच तुझ्यावर चिडतील, तुला बोलतील. काही गरज नाहीये मी सगळं मॅनेज करतो. तुला काही करायची गरज नाहीये." असं म्हणून तो पलंगावर जाऊन बसला.


"तुम्ही रागावला माझ्यावर?"

"नाही ग, मी तुझ्यावर का रागवेन."

"मला माहित आहे माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतो, माझ्यामुळे तुमच्या आणि तुमच्या आईमध्ये वाद होत आहेत. माझ्यामुळे तुमच्या मध्ये भांडण होत आहेत. माझं चुकलं त्या रात्री त्या माणसाच्या हाती लागले असते, जे व्हायचं ते झालं असतं."

असं बोलताच विक्रांतने तिच्या ओठावर बोट ठेवले.

"वेडी आहेस का तू? यानंतर असं काही बोलायचं नाही. तू माझ्यासाठी स्पेशल आहेस. या लोकांना तुझा आंधळेपणा दिसतोय पण तुझ्यात जे गुण आहेत ते दिसत नाहीयेत.
तुझ्या आत जी शक्ति आहे ना ती त्यांना दिसत नाहीये. ती मला दिसते. त्यामुळेच मला जगण्याला बळ येतंय. त्या लोकांना नाही कळणार. तू काळजी करू नको सगळं नीट होईल.


दुसऱ्या दिवशी सायली आणि विक्रांत तयार झाले आणि दोघेही जायला निघाले.


"दादा अरे थांब ना आज तरी घरी, माहित आहे ना तुला पाहुणे येणार आहेत."


"हो माहितीये मी येणार आहे ग, तू चिंता करू नकोस आणि हो पुष्पाला सगळं सांगितलंय मी तू काळजी करू नकोस. तू फक्त रेडी रहा."


"दादा असं काय ते करतोस आज तरी घरी असायला हवंस."

"पूजा मी म्हटले ना मी येणार आहे सगळं व्यवस्थित होईल."

"तुझ्या आयुष्यात ही आली ना तू आम्हाला विसरलास.
तुला ही इम्पॉर्टंट आहे का? आम्ही इम्पॉर्टंट नाही आहोत का? ही तुझ्या लाईफ मध्ये आली आणि तू आमच्याशी भांडायला लागलास."


"पूजा तोंडाला आवर, ही काय म्हणतेस ग नाव आहे तिचं सायली आणि ती वहिनी आहे तुझी विसरू नकोस."


"रागाव, आज माझ्यासाठी स्पेशल दिवस आहे तरी तू मला रागाव."

"सॉरी ग पण तू तयार हो मी लगेच येतो."

"ओके."

पुष्पाने नाश्त्या साठी दोन-तीन पदार्थ बनवून ठेवलेले होते, काही स्वीट डिश बनवले होते. ज्यूस बनवून ठेवलेलं होतं. पूजाची तयारी झालेली होती, सगळं रेडी होतं. आता त्या दोघी विक्रांतची वाट बघत बसलेल्या होत्या. विक्रांत हॉस्पिटलमधुन जाऊन आला.

डॉक्टरांचं बोलणं त्याच्या कानात वारंवार गुंजत होतं. तो त्याच्याच विचारत होता. पूजा त्याच्याजवळ आली तरी त्याचं लक्ष नव्हतं.