जाणून घे तू स्वतःला...भाग 7
"सायली काय झालं? का अशी करतेस? श्वास वाढतोय तुझा, काय त्रास होतोय तुला?"
"फोनवर.. फोनवर ती.. ती बाई.. फोनवर."
"तू थांब मी पाणी आणतो."
अस म्हणून विक्रांत बाहेर गेला.
विक्रांतने तिला पाणी दिलं.
"तू इथेच बस मी बाहेर जातो,पाहुणे बसलेत ना."
"मी पण येते."
"नको तू थोडा वेळ इथेच बस."
विक्रांत बाहेर जाऊन बसला, सायली दारात उभी राहून त्या बाईचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत होती.
पुजाचा बघण्याचा कार्यक्रम झाला, मुलांकडच्या मंडळींना पूजा पसंत होती.
"आम्हाला मुलगी पसंत आहे, तुम्ही तुमचा निरोप कळवा, तस आम्ही आमच्या पंडितकडून चांगला मुहूर्त बघून तारीख ठरवतो."
ती मंडळी तिथून निघून गेली.
सायली बाहेर आली.
"विक्रांत..विक्रांत.."
"सायली आहे मी इथे, ये इथे सोफ्यावर बस."
ती त्याच्या बाजूला जाऊन बसली.
"तुला बर वाटतंय ना आता?"
"काय झालं वहिनीला?"
"अग काही नाही बरी आहे ती."
"विक्रांत मला तुम्हाला काही सांगायचं आहे. ती जी बाई फोन वर बोलत होती ती कोण होती."
"अग ती मध्यस्थी होती. लग्न जमेपर्यंत दोन्ही मंडळींकडून त्याच बोलणी करतात. पण तू वारंवार त्या बाई बद्दल का विचारतेस?"
"तो आवाज माझ्या आईचा होता."
"काय?"
"सायली तू काय बोलतेस? मला काहीच कळत नाही."
"विक्रांत ती माझी होती, तुम्ही हे लग्न थांबवा. काहीतरी अघटित घडणार आहे. विक्रांत तुम्ही फोन करा त्यांना. सांगा की आमच्याकडून नकार आहे, आम्ही हे लग्न करू शकत नाही."
"विक्रांत तुझी बायको काय बोलतेय?"
"आई, पूजा तुम्ही दोघी शांत व्हा. मी बघतो का करायचं ते."
"सायली तू आत चल."
"अहो माझं ऐका, मी खरं बोलतेय."
"सायली तू चल आत."
विक्रांतने तिचा हात पकडला आणि तिला आत घेऊन गेला.
खोलीत गेल्यानंतर विक्रांतने तिला बेडवर बसवलं आणि दाराची कडी लावली.
"काय झालं तुला का अशी बडबडतेस तू? हे बघ कितीतरी महिन्यानंतर पूजासाठी चांगलं स्थळ आलंय तू उगाच असं काहीतरी बोलून आईच मन खराब करू नकोस. त्या दोघी खूप आनंदात आहेत त्यांच्या आनंदात विरजण घालू नकोस."
"मला असं काही करायचं नाहीये. पूजा ताईचं लग्न जमेल तर मलाच जास्त आनंद होईल पण लग्न जुळण्यासाठी त्या परिवारातले लोक कसे आहेत त्याची माहिती काढायला नको का? त्यांनी होकार दिला पण आपण चौकशी करायला नको का? ठीक आहे तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायचा नाही आहे ना नका ठेऊ पण प्लिज एकदा पूर्ण चौकशी करा. मुलाच्या घरी जाऊन या, तो काय? करतो कुठे राहतो? त्याचा मित्रपरिवार, त्याची फॅमिली नातेवाईक सगळी माहिती काढा आणि ती जी कोणी मध्यस्थी बाई आहे तिचीही पण माहिती काढा."
"आपण बघू पण तू शांत हो."
विक्रांतने सायलीला शांत केलं, त्याच्या मांडीवर डोकं ठेवून ती झोपली. विक्रांत तिच्या केसावरून हात फिरवू लागला.
"सायली तू किती भोळी आहेस ग, किती साधी आहेस. तुझा हाच निरागसपणा मला आवडतो. नेहमी अशीच रहा पण हसत रहा. मला तुझ्या आजूबाजूला दुःखाची सावटही नकोय. पण सायली तू सांगितलंस त्याप्रमाणे तुझी आहे तर या जगात नसेल ना? मग तुझी आई जर या जगात नाही तर मग त्या बाईचा आवाज तुला तुझ्या आईसारखा का वाटला?"
"अहो ती वाचली असेल, मला वाटते ती वाचली असेल आणि त्या लोकांनी तिला तिथेच नेलं असेल. ती पुन्हा त्याच कामाला लागली असेल. मला पूर्ण खात्री आहे ती माझी आईच होती."
"तू झोपली नाही अजून, चल झोप बाळा." तो तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागला. तसे तिने डोळे लावले आणि काही वेळाने तिला झोप आली.
विक्रांत खोलीच्या बाहेर गेला.
हॉलमध्ये त्याची आई आणि पूजा बसलेली होती. विक्रांत त्यांच्या बाजूला जाऊन बसला.
"काय झालं सायलीला ती अशी का बडबडत होती?"
"काही नाही, तुम्ही काळजी करू नका."
"तिच्या बोलण्यावरून तर काहीतरी काळजीच कारण वाटत होतं, खरं खरं सांग काही प्रॉब्लेम आहे का?"
"आई तू खरच टेन्शन घेऊ नकोस, मी बघतो काय करायचं ते. आता मला काय करायचंय ते कळलं. तू काळजी करू नकोस. पूजाचं लग्न ज्या घरात होईल ना तेथील पूर्ण चौकशी मी करेल आधी, तिच्यासोबत मी काहीही वाईट घडू देणार नाही. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना?"
"विश्वास तर आहे रे पण मन घाबरते, तुला तर माहित आहे ना पुजाच्या लग्नात किती अडथळे आलेत. आता पुन्हा हे सगळं नको वाटतं."
"आई मला समजतंय ग, तुझी मनस्थिती मला कळतीये पण खरच तू काळजी करू नको मी बघतो काय करायचे ते."
दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रांत ऑफिसला जायला तयार झाला.
"सायली उठ ग, उठ मी निघतोय ऑफिसला. उठ ग तू उठली नाहीस तर मी जाणार कसा? मला उशीर होतोय चल उठ लवकर." विक्रांत तयारी करता करता तिला उठवत होता.
"सायली उठ ग." तो आवाज देत होता पण सायली उठतच नव्हती.
'ही उठत का नाहीये इतका आवाज दिल्यानंतरही."
तो विचारात पडला आणि तिच्या जवळ जाऊन बसला. तिचा तो निरागस चेहरा तो बघतच राहिला. हवेने तिचे केस तिच्या गालावर आले होते, अलगदपणे ते केस बाजूला करून त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तोच तिला तिचं डोकं तापलेलं वाटलं.
"सायली अग काय हे? तुला ताप आहे. सायली, सायली सायली उठ." त्याने तिच्या गालाला हात लावून हलवूनतिला उठवलं.
सायलीने डोळे उघडले,
"सायली तुला कधीपासून बर वाटत नाहीये, रात्री मला उठवलं का नाहीस? अग मी रात्री तुला मेडिसिन दिली असती आणि आता सकाळपर्यंत ताप उतरला असता."
सायली उठून बसली.
"अहो काही नाही, थोडा तर ताप आहे, होईल मी बरी. तुम्ही जा ऑफिसला."
"नाही नाही ऑफिसला वगैरे काही नाही, मी आता ऑफिसला जाणार नाहीये. मी तुझ्यासाठी आधी काहीतरी खायला आणतोय, तुझ्या अंगात त्राण दिसत नाहीये."
"मी आधी फ्रेश होते."
"अग उठता येणार नाही तुला."
ती उतरायला गेली आणि तिला गरगरल्यासारखं झालं की पुन्हा बेडवर बसली.
"बघ मी म्हणालो ना तुला उठता येणार नाही पण तुला माझं ऐकायचं नाहीये. आता इथेच बसून रहा, मी तुझ्यासाठी सूप बनवून आणतो, ते घे त्यानंतर गोळी घे आणि मग आराम कर. मी आज वर्क फ्रॉम होम करतो सरांशी बोलून बघतो बघूया काय होतंय." विक्रांत खोलीतून निघून गेला.
ती मागे डोकं टेकवून, डोळे बंद करून बसली.
विक्रांत लगबगीने किचनमध्ये गेला. काय काय वस्तू शोधायला लागला. पूजा तिथेच होती त्याला असं बघून तिने त्याला विचारलं.
"काय रे दादा काय शोधतोयस? काही हवंय का तुला?"
"अग मी टोमॅटो सूप बनवतोय, मला साहित्य शोधून देशील का प्लिज."
पूजा हसायला लागली,
"टोमॅटो सूप आणि तू बनवणार दादा कधी किचनमध्ये पाय तरी ठेवलायेस का रे?"
"पूजा प्लिज हसू नको. सायलीला बरं नाही, तिच्या अंगात ताप आहे, तिला काहीतरी खायला द्यायला हवं म्हणून तिच्यासाठी सूप बनवतोय."
"काय वहिनीला ताप आहे, अरे तू तू हो बाजूला मी सूप बनवते, तू जा तिच्या जवळ जाऊन बस."
विक्रांत खोलीत गेला, सायली डोळे मिटून टेकून बसलेली होती. तो तिच्या समोर बसला, तिचा हात हातात घेतला.
"का त्रास करून घेतेस ग? नको इतका त्रास करून घेऊ सगळं ठीक होईल. मला माहित आहे तू पूजाच्या लग्नाचं टेन्शन घेतलं पण तू काळजी करू नकोस आपल्या पूजा सोबत काहीही वाईट होणार नाहीये."
क्रमश:
