भाग २
“रश्मी वहिनी, तुम्हाला मुलीचा बायोडेटा आणि फोटो व्हॉटसॲप केला आहे. मुलीने एम. बी. ए. डिस्टांस लर्निग केले आहे आणि एका प्रायव्हेट बँकेत जॉब करते.” चारुलता आपल्या नणंदेला माहिती पुरवत होती.
“अच्छा. पत्रिका बघितली काय?” रश्मीने विचारले.
“हो हो, पत्रिका अगदी छान जुळली. आपल्याला पत्रिका जुळणारीच मुलगी हवी, असे मी गुरुजींना स्पष्टच सांगितले होते. तशी मुलगी फोटोवरून छान वाटतेय. श्रेयसला सुद्धा तिचा फोटो आणि बायोडाटा पाठवला आहे.” चारुलता म्हणाली.
“ श्रेयसला कडक मंगळ आहे म्हणून मंगळाचीच हवी होती. त्याला आपल्या आवडीची शोध म्हणाले, पण तो काही मनावर घेत नाही. सतत टाळाटाळ करतोय. लग्नाला उशीर झाला तर मग पुढे सगळ्याच गोष्टींना उशीर व्हायचा.” रश्मी म्हणाली.
“हो ना वहिनी, तिकडे अमेरिकेत होता तर तिथेच आपल्या कंपनीत एखादी छानशी मुलगी शोधायची होती ना, राजाची राणी. “ चारुलता हसत म्हणाली.
“हो ना, पण आता आपल्या पारंपरिक पद्धतीनेच जायचे ठरवले तर आणि मंगळाला मंगळाचीच बरी ना, कशाला उगीच रिस्क? मग उगाच मनात राहून जाते.” रश्मी म्हणाली.
“हो बरोबर.” चारुलता म्हणाली.
“बरं, मुलीची माहिती काढलीस का? काय नाव म्हणालीस? जरा फेसबुक, इंस्टावर शोधते. आजकाल तिथूनच खरी माहिती कळते.” रश्मी हसत म्हणाली.
“अहो पण आजकालची मुलं खूप हुशार, त्यांना माहिती नातेवाईक त्यांच्या प्रोफाईलवर नजर ठेऊन असतात तर ते सोशल मीडियावर दुसऱ्याच नावाने वावरतात.” चारुलता हसत हसत बोलत होती.
इकडे दोघींच्या गप्पा सुरू होत्या तर तिकडे श्रेयसच्या मोबाईलमधील डेटा डाऊनलोड होत नव्हता. त्याने वैतागून मोबाईल बंद केला आणि बाहेर आला.
“अरे काय हे? तुम्हाला कशाची एवढी घाई आहे? होईल ना जेव्हा व्हायचे तेव्हा.” तो त्याच्या आईला म्हणाला.
“अरे सोन्या, सगळं वेळेत नको का व्हायला? लग्न लांबले की मग पुढे मुलंबाळ, सगळंच लांबत जाते. तसेही आजकाल म्हातारपण लवकर येत आहे.” आईच्या हातात असलेल्या फोनमधुन चारुलता श्रेयसला म्हणाली.
“म्हातारपण?” तो कसल्याश्या नजरेने आई आणि चारुलताकडे बघत होता.
“अरे म्हणजे मुल उशिरा झाले की त्यांना वाढवण्यात, खेळवण्यात एनर्जी पुरत नाही, असे म्हणायचे होते.” चारुलता आपले हसू दाबत म्हणाली. त्याने वैतागून डोळे फिरवले.
“तुम्हीच म्हणालात ना योग असला की लगेच जुळते. मग योग येऊ द्या ना, उगीच त्यांना पण का त्रास द्यायचा?” श्रेयस म्हणाला.
ते ऐकून दोघींनी डोक्यावर हात मारला.
“हे बघ बाळा..”
“पहिले तुम्ही ते बाळा म्हणने बंद करा. इकडे म्हणता लग्नाचा झालोय, तिकडे बाळा म्हणत आहात; किती ऑकवर्ड वाटते ते?” श्रेयस चारूआत्यचे बोलणे पूर्ण व्हायच्या आतच चिडून म्हणाला. त्यावर दोघीही हसल्या.
“बरं बाबा! बरं ऐक, येत्या रविवारी आपण कनिष्काच्या घरी..”
“ कोण कनिष्का?” चारुआत्या सांगतच होती की त्याने परत मध्येच विचारले.
“मुलीचे नाव आहे. तर आपण त्यांच्या घरी त्यांना भेटायला जातोय, असे कळवले आहे. आता नकार देणे म्हणजे त्यांना जास्त त्रास होईल. भेटून घेऊ, मग पुढचे पुढे ठरवू.” चारुआत्याने समजावले.
“ओके, डू व्हाटेवर यू वॉन्ट.” या ऐकणाऱ्यातल्या नाहीत, त्याला माहिती होते म्हणून तो ऑफिससाठी निघून गेला.
******
रविवारी कनिष्काच्या घरी कांद्यापोह्याचा कार्यक्रम ठरला होता. घरात पाहुण्यांची स्वागताची सगळी तयारी झाली होती.
“किहू, साडी नेसतेस?” तिने साधासा सलवार घातलेला बघून आईने सांगून बघितले.
“बरं.”
तिची फार इच्छा नव्हती. तिला माहिती होते नकारच येणार आहे तरीही आईवडिलांची इच्छा नको मोडायला म्हणून तिने होकार दिला. त्यांच्या एवढया लहान लहान गोष्टी तर ती नक्कीच पूर्ण करणार होती. तिला पण त्या दोघांना आनंदी बघायचे होते.
तिची फार इच्छा नव्हती. तिला माहिती होते नकारच येणार आहे तरीही आईवडिलांची इच्छा नको मोडायला म्हणून तिने होकार दिला. त्यांच्या एवढया लहान लहान गोष्टी तर ती नक्कीच पूर्ण करणार होती. तिला पण त्या दोघांना आनंदी बघायचे होते.
“ पाहुणे आलेत ग.” कनिष्काचे बाबा आतमध्ये आईला आवाज देत म्हणाले आणि पाहुण्यांचे स्वागत करायला बाहेर गेले. त्यांना बसायला सांगून त्याचा हालहवाल विचारला. श्रेयस तर अगदी नकार देईल, असे त्याच्या चेहऱ्यावर भाव दिसत होते. अधूनमधून चारूआत्या त्याला हस म्हणून खुणावत होत्या.
गरम वाफाळलेला चहा पीत सगळे इकडच्या तिकडच्या गप्पा करत होते. आजही आता अचानक बाहेर पाऊस सुरू झाला होता. त्या बाहेर पडणाऱ्या अवकाळी पावसाने श्रेयसला परत त्या मुलीची आठवण करून दिली होती आणि आपसुकच त्याच्या ओठांवर हसू उमलले.
“ताई, कनिष्काचे आवरले असेल तर तिला बोलवा.” चारूआत्या कनिष्काच्या आईला म्हणाली. तसे त्या कनिष्काला बोलवायला आतमध्ये गेल्या. अगदी काही क्षणात दोघीही बाहेर आल्या.
“छान आहे ना?” चारूआत्याने रश्मीला खुणावले.
“हो. श्रेयस काय म्हणतोय बघू.” श्रेयसचे कनिष्काकडे लक्ष नाहीये बघून रश्मीने चारूआत्याला खुणावले.
“पिंक साडीत छान दिसतेय हो; नाहीतर आजकाल मुली असे साडी वगैरे कुठे नेसतात.” चारुआत्या शेजारी बसलेल्या श्रेयसला, कुणाच्या लक्षात येणार नाही असे कोपऱ्याने ठोसे मारत, त्याला खुणावत समोर सर्वांकडे हसत बघत बोलत होत्या.
त्याने खिडकीतून बाहेर असणारे त्याचे डोळे इकडे समोर फिरवले आणि समोर उभ्या असलेल्या मुलीला डोळे फाडून बघत होता. त्याला असे बघतांना पाहून, तो नकारच देणार, तिला पक्के झाले.
त्याला असे डोळे फाडून बघतांना पाहून आत्याने परत त्याला ठोसे दिलेत, तसा तो भानावर आला.
“ही कोण?” आत्याला त्याने हळूच विचारले.
“कनिष्का, ज्या मुलीला आपण बघायला आलोय.” आत्याने सांगितले. तसे त्याचे गाल लाल गुलाबी होऊ लागले. आता पावसात जिचा त्याला भास होत होता, ती प्रत्यक्षात त्याच्या पुढे उभी होती.
साधीशीच तयार झालेली ती सिल्कच्या त्या फिक्कट गुलाबी साडीत त्याला ती अगदी अप्सरा भासत होती. सगळ्यांशी नजर चोरत तो परत परत तिलाच बघत होता. ती सर्वांशी बोलत तर होती, पण त्याला तिच्या चेहऱ्यावर उदासीनता जाणवत होती.
सगळ्यांच्या औपचारिक गप्पा झाल्यानंतर त्या दोघांना एकट्यात बोलायला तिच्या खोलीत पाठवले.
“तुम्हाला हा असा बघण्याचा कार्यक्रम आवडत नाही का? आपण आधी बाहेर पण भेटू शकलो असतो, मग फॅमिली भेटली असती.” ती काही बोलत नाहीये बघून त्यानेच बोलायला सुरुवात केली.
“नाही, ठीक आहे.”
“मग तुम्ही उदास दिसत आहात? तुम्हाला मी आवडलो नाही का?” तो सहज तिला हसविण्यासाठी महणाला.
त्यावर ती थोडीशी हसली.
“असे काही नाही. मला माहिती तुमचा नकारच येणार आहे.”
“का? तुमचे प्रोफाइल चांगले तर आहे. दिसायला पण छानच आहात..”
तो बोलतच होता की तिने त्याच्या पुढे तिचा मोबाईल धरला. आता मात्र बोलायचे थांबून तो एकटक व्हिडिओ बघत होता.
*****
काय असेल त्या व्हिडिओमध्ये?
क्रमशः
©️®️ मेघा अमोल
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा