भाग ३
“तुम्हाला हा असा बघण्याचा कार्यक्रम आवडत नाही का? आपण आधी बाहेर पण भेटू शकलो असतो, मग फॅमिली भेटली असती.” ती काही बोलत नाहीये बघून त्यानेच बोलायला सुरुवात केली.
“नाही, ठीक आहे.”
“मग तुम्ही उदास दिसत आहात? मी तुम्हाला आवडलो नाही का?” तो सहज तिला हसविण्यासाठी महणाला.
त्यावर ती थोडीशी हसली.
“असे काही नाही. मला माहिती तुमचा नकारच येणार आहे.”
“का? तुमचं प्रोफाइल चांगले तर आहे. दिसायला पण छानच आहात..”
तो बोलतच होता की तिने त्याच्या पुढे तिचा मोबाईल धरला. आता मात्र बोलायचे थांबून तो एकटक व्हिडिओ बघत होता. त्या व्हिडिओमध्ये काही मुली होत्या. त्या मुली शुद्धीत नव्हत्या. त्यातील दोघींचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण तिसरी मुलगी कनिष्का होती. अठरा एकोणीस वर्षाची असावी. एक पुरुष त्यांचा व्हिडिओ बनवत होता. तो सांगत होता की त्या मुलींनी बहुतेक ड्रग्स घेतले आहे आणि इथे गडावर एकट्या आहेत. शुद्धीत नाहीत. कोणीही त्यांचा गैरफायदा घेऊ शकतो. तो आणि त्याचे काही मित्र त्यांची मदत करून त्यांना सुरक्षित जागी घेऊन जात आहेत.
ते बघून त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्याकडे बघत होता.
“आतापर्यंत १७-१८ मुलांकडून नकार आले आहेत. काही जणांनी तर नाव ऐकून नकार दिला आहे.”
ते ऐकून तो अवाक् झाला होता.
“ काही वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे, तेव्हा मी आर्किटेक्चरच्या पहिल्या वर्षाला शिकत होते. या व्हिडिओ नंतर माझे आयुष्य पूर्णच बदलले. तो व्हिडिओ पुर्ण देशात, देशाबाहेर सगळीकडे खूप व्हायरल झाला. अजूनही खूप जणांना माहिती आहे. सगळीकडे मी खूप वाईट, निर्लज्ज मुलगी म्हणून प्रसिद्ध झाले. कॉलेज मधून मला रस्टिकेट करण्यात आले. मला सुधार गृहात ठेवण्यात आले. योग्य संस्कार देता नाही आले म्हणून माझ्या आईवडिलांना सुद्धा खुप वाईट ठरवण्यात आले. सुधारगृहातून आलेली मुलगी, म्हणून कोणी माझ्यासोबत मैत्री केली नाही. कॉलेज, शिक्षण सुटले. कसेबसे बाबांच्या ओळखीने बी.कॉम साठी ऍडमिशन मिळाली. फक्त परीक्षा द्यायला कॉलेजमध्ये जात होते. नंतर डीस्टन्स लर्निग एम बी ए केले. आता एका छोट्याशा बँकमध्ये जॉब करतेय.”
तो काहीच बोलला नाही, खिडकीतून बाहेर पडणारा पाऊस बघत होता आणि ती त्याच्याकडे बघत होती.
“चला, जाऊयात..” त्याला चूपचाप बसलेले बघून ती म्हणाली. त्याने सुद्धा होकारार्थी मान हलवली आणि जायला पुढे निघाला. ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला बघत होती. परत तेच तेच घडतेय म्हणून तिचे मन कळवळले. तिच्या त्या एका चुकीची तिला एवढी मोठी शिक्षा मिळेल, तेव्हा तिला जाणवलेच नव्हते. पण ‘जैसे कर्म, तैसे भोग’ हे मात्र तिला आता चांगलेच समजले होते. तिच्या चेहऱ्यावर एक उदासीन हसू पसरले होते तर डोळे जरासे पाणावले होते. तिने हलकेच एका डोळ्याचा कोपरा पुसला. त्याने डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिच्याकडे बघितले आणि खाली निघून आला.
सर्वांचा निरोप घेऊन श्रेयसचा परिवार घराच्या बाहेर पडला. त्यांच्या पाठोपाठ कनिष्काचे आईवडीलही त्यांना मुख्य दरवाजापर्यंत सोडायला आलेत.
जाता जाता तो जागीच थांबला आणि त्याने मागे वळून बघितले तर कनिष्का आतमध्ये दारात उभी सर्वांना बघत होती. तो परत तिच्याजवळ आला. ती काही न समजून त्याच्याकडे बघत होती. त्याचे असे अचानक परत आलेले बघून ती थोडी बावरली.
“मोबाईल?” तिच्या पुढे हात धरत तो म्हणाला.
“त्या व्हिडिओ काढणाऱ्या दादांनी आम्हाला मदतच केली. आपल्या तरुण पिढीला, पालकांना चांगला संदेशच ते देत होते; पण जर त्यात माझा चेहरा त्यांनी ब्लर केला असता तर मला त्यानंतरच्या आयुष्यात थोडा कमी संघर्ष करावा लागला असता. त्या व्हिडिओत माझ्या सोबत ज्या दोन मुली होत्या, त्यांचा त्यात चेहरा दिसत नसल्यामुळे त्यांना माझ्या एवढा त्रास झाला नाही.” ती म्हणाली. तिच्या मनाला उगीच त्याला स्पष्टीकरण द्यावेसे वाटले.
“तुम्हाला मी आवडलो?” ती बोलत होतीच की त्याने मध्येच विचारले.
“तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की मी कुप्रसिद्ध झाले. मला कोणीच मैत्रीण करून घ्यायला तयार नाही. नोकरीच्या ठिकाणी पण कोणी माझ्यासोबत जास्त बोलत नाही.” ती तिच्याच तालात बोलत होती. त्याने तिला काय विचारले, त्याकडे सुद्धा तिचे लक्ष नव्हते.
“तुम्ही बघायला आलेल्या प्रत्येकाला हे सांगता?” त्याने विचारले.
“एवढे बोलण्याची कधी गरज पडलीच नाही. व्हिडिओ बघूनच सगळे निघून गेलेत. तुम्ही व्हिडिओ बघूनही थांबलात म्हणून सांगितले.” ती म्हणाली.
“जे होते ते चांगल्यासाठीच..” तो म्हणाला.
ते ऐकून तिला थोडे वाईट वाटले.
ते ऐकून तिला थोडे वाईट वाटले.
“मला माहिती आहे मी चुकले होतेच म्हणजे चुकले आहे.”
“मोबाईल?” त्याने परत आपला हात तिच्या पुढ्यात धरला. तिने तिचा मोबाईल त्याच्या हातात दिला.
“तुम्ही चुकलात, तुम्ही मान्य केले. त्याची शिक्षा खरेतर एवढी मोठी नव्हती, पण असो. झालेल्या गोष्टी परत सुधारता येत नाही. खरेतर सर्वात जास्त चूक त्या व्यक्तीची म्हणजे तुम्ही म्हणाल्या प्रमाणे त्या दादांची होती. कुणाचाही व्हिडिओ/फोटो त्याच्या परवानगी शिवाय काढणे, तो सोशल मीडियावर पोस्ट करणे, हा सर्वात मोठा गुन्हा आहे. हे असे गुन्हेगार आपल्याकडे खूप आहेत, ज्यांना कळत सुद्धा नाही की त्यांच्या अशा छोट्याश्या चुकांमुळे कोणाचे आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकते.” म्हणत त्याने तिच्या मोबाईल मधील तो व्हिडिओ डिलीट केला. ती अवाक् होत त्याच्याकडे बघत होती.
“तुम्हीच म्हणालात, हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तर ज्यांना गरज वाटेल, त्यांना सोशल मीडियावर बघता येईल. आता मोबाईलमध्ये नवीन आणि चांगल्या मेमोरीजसाठी जागा झाली. आपली चूक मान्य करणे, यासाठीही खुप धाडस आणि मन निर्मळ लागते. मी म्हणालो होतो ना, जे होते ते चांगल्यासाठीच होते; त्या मुलांनी नकार दिला म्हणून मला तुमच्यापर्यंत पोहचता आले. मला ही धाडसी मुलगी खुप आवडली. तुम्हाला मी आवडलो की नाही, कळवा. निर्णय तुमचा असेल.” तो थोडे हसत म्हणाला. ती फक्त त्याच्याकडे बघत होती.
“तुम्हाला माहिती मला इथला पाऊस अजिबात आवडत नव्हता, पण आजकाल आवडायला लागला आहे. तुम्ही जर मला होकार दिला तर मी त्याचे कारण नक्की सांगेन.” तो गालात हसत म्हणाला आणि परत निघून गेला.
हसतांना त्याच्या डोळ्यात एक गोड चमक होती आणि त्याचे गाल लाल झाले होते. त्याचे ते गोड हास्य बघून शेवटी तिच्या ओठांवर हसू उमलले.
*******
समाप्त
©️®️ मेघा अमोल
*आपण बरेचदा (जरी कदाचित आपला हेतू चांगला असला तरी)लपून/चोरून कुणाचे फोटो/व्हिडिओ काढतो आणि सोशल मीडियावर टाकतो. कळत नकळत, कधी कधी त्याचे त्या व्यक्तीवर बरेच दुष्परिणाम होत असतात. त्यामुळे जपून…..