Login

जरा विसावू या वळणावर .... भाग 1

Marathi Story
जरा विसावू या वळणावर .....भाग 1


"आई, येतो ग मी."

"अरे अभी थांब जरा मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे."
वनिताताई हॉलमध्ये येत आपल्या मुलाला म्हणाल्या.

"आता काय बोलायचं आहे संध्याकाळी आल्यावर बोलू."

"नाही आत्ताच बोलायचं आहे फक्त दहा मिनिट लागतील तू बस."
"हम बोल."

"सकाळी मामाचा फोन आला होता.त्याने एक चांगलं स्थळ सुचवलय.त्याला मुलगी पसंत आहे."

वनिता ताई असं म्हणाल्या बरोबर त्यांचं बोलणं मध्येच तोडत अभिजित चेष्टेने म्हणाला

" काय? मामा परत लग्न करतोय?"
" गप्प बस रे ..आघाव कुठला.उगाच विषय बदलतो." एवढं जरा वरच्या स्वरात बोलून त्या पुढे म्हणाल्या

"त्याने तुझ्यासाठी मुलगी पसंत केली आहे.मुलगी बघायचा कार्यक्रम कधी ठेवायचा हे तुला विचारून कळव असं सांगितलंय.
तू सांग आता कधी जायचं?"

यावर अभिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला
" नाही जायचं, असं मी म्हणणार नाही पण आई एवढी घाई का करतेस?"

"अरे घाई कुठे ? लग्नाचे वय झालंय तुझं. मुलगी चांगली आहे.बँकेत नोकरीला आहे. अजून काय पाहिजे.परत चांगले स्थळ मिळत नाही. वेळेवर सगळ्या गोष्टी झालेल्या बऱ्या रे. माझं काय ...आज आहे तर उद्या नाही.एकदा माझ्यासमोर तुझं लग्न झालं म्हणजे माझ्या जिवाला शांतता मिळेल."

"हो ....माझ्या जिवाला घोर लावून तुझ्या जीवाला शांतता मिळेल का?"
अभि मिश्किल पणे म्हणाला.

"तुझ्या जिवाला कसला आलय घोर."

"अरे मग तुम्हा दोघी सासू सुनेच्या भांडणात माझंच सँडविच होणार ना."

"काही काळजी करू नकोस अजिबात भांडणार नाही मी माझ्या सूनेशी."
वनिता ताईंनी ही हसून अभिला उत्तर दिले.

मामा सांगत होता, अतिशय शांत आणि सालस आहे मुलगी.तिचे नाव अनुराधा आहे.
अभिजित - अनुराधा जोडा अगदी शोभून दिसेल.
वनिता ताई मुलाच्या लग्ननाच्या स्वप्ननात रंगून गेल्या.

"हो ..हो ..दिसेल.. दिसेल ..आता मी जाऊ का?"
अभिजित आईला स्वप्नातून भानावर आणत म्हणाला.

"कधी जायचे मुलगी बघायला" वनिता ताईंनी भुवया वर करत विचारले.
"या रविवारी जाऊ."

"ठीक आहे मी दादा आणि वहिनीशी बोलून सगळे ठरवते."

अभिजित होकारार्थी मान हलवून ऑफिसला गेला.
वनिताताई त्यांच्या पुढच्या कामाला लागल्या.

अभिजीत वनिताताईंचा एकुलता एक मुलगा होता. घरी आई आणि मुलगा दोघेच होते. अभिजीत कॉलेजला असतानाच वडिलांचे छत्र हरवले. तेव्हापासून आईला सांभाळून स्वतःचे शिक्षण पूर्ण करून अभिजीत एका चांगल्या कंपनीत जॉबला लागला होता. परिस्थितीमुळे अभिजीतच्या स्वभावात सामंजसपणा आलेला होता. त्यामुळे आता आपल्या मुलाचे दोनाचे चार हात व्हावे ही वनिताताईंची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी त्यांच्या दादा वहिनीला कामालाही लावले होते आणि त्यांनीही त्यांचे काम चोख बजावले होते.

अनुराधा ही तिच्या परिवारासोबत अभिजीतच्या मामांच्या शेजारीच राहायला होती. मामींच्या नजरेतून तिचा सालसपणा सुटला नव्हता. अभिजीत साठी स्थळ बघण्याचा नणंद बाईंचा हुकूम आला की लगेच मामींच्या डोक्यात ट्यूब पेटली आणि अनुराधाच अभिजीत साठी योग्य आहे असे म्हणून त्यांनी अहो ना सांगून वनिता ताईंना स्थळाचा निरोप पाठवला होता.

तर रविवारी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम फिक्स झाला होता. बघूयात अभिजीतला अनुराधा पसंत पडते की नाही.......... वाचू पुढच्या भागात.....