Login

जरा विसावू या वळणावर..... भाग 4.

Marathi Story
जरा विसावू या वळणावर..... भाग 4.

मागच्या भागात आपण वाचले वनिताताई आपली जबाबदारी अनुराधा वर सोपवून निश्चिंत होतात आता पुढे..


"अनु झाले का ? मला उशीर होतोय."...... अभि मनगडातील घड्याळावर नजर टाकत म्हणाला.

"हो.... आलेच. आई येतो आम्ही"
असे म्हणत अनुही निघाली.

"हो या ...सावकाश जा."... वनिताताई दरवाजा बंद करत म्हणाल्या.

थोड्याच दिवसात अनुराधा आपल्या सासरी एवढी रुळली की तिला आपल्या माहेरचाही विसर पडला होता.
सकाळी ऑफिसला जाताना अभिजीत सोडवायचा आणि घ्यायलाही यायचा. त्यामुळे दिवसभर असलेल्या कामाच्या तानातून एकमेकांशी गप्पा मारून दोघेही रिलॅक्स व्हायचे. आल्यावर वनिता ताईंशी गप्पा मारत अनुचा स्वयंपाक व्हायचा.
वनिताताई आपल्या सुनेवर खुश होत्या.

बघता बघता दिवस सरले अभी आणि अनुच्या लग्नाला एक वर्ष झाले.
वनिता ताई मी लग्नाच्या वाढदिवसाला सुनेला छान साडी घेतली होती. अनुच्या दादा वहिनींनीही लग्नाच्या वाढदिवसाची मोठी पार्टी दिली होती. त्यादिवशी अभी आणि अनु खूप खुश होते.

"अभी किती छान दिवस होता ना आजचा."
अनु आपल्या हातातील बांगड्या काढत म्हणाली.

"हो ग बघता बघता वर्ष उलटले. पण असे वाटते की आत्ताच तू माझ्या आयुष्यात आली आहेस. अनु तुझ्यामुळे माझी आयुष्य आनंदाने भरून गेले आहे खरंच यासाठी ना मामांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच."

"हो का आणि मी लग्नाला नाही म्हणाले असते तर..."
"जे घडले नाही त्याविषयी बोलायचे नाही.नेहमी चांगले
विचार करावे."अभी हसत म्हणाला.

तो पुढे म्हणाला...
"बरं ते जाऊदे तुझ्या लक्षात आहे ना मागच्या वर्षी केलेले प्रॉमिस..."

"कोणते प्रॉमिस.?"...

"असं कसं विसरु शकतेस तू. मावळणाऱ्या सूर्याला बघून केलेले प्रॉमिस .आता तरी आठवले का?"

"अरे हो ते तर विसरलेच होते मी."

"मी बरा विसरु देईल"... अभी अनुला आपल्या मिठीत ओढत म्हणाला.

कानावर आलेले तिचे केस हळूच बाजूला करत, तो म्हणाला
"दोघांनीही आठ दिवसाची सुट्टी काढू आणि पुढच्या मे महिन्यात दोन-तीन दिवस मनालीला जाऊन येऊ."

"वाव ... मनाली.... चालेल... अभी तू किती चांगला आहेस रे"...
त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत अनु म्हणाली.

"हो तर मी चांगला आहेच आणि तू ही...अस म्हणत अभिने अनु भवतीची मिठी अजूनच घट्ट केली."

******
मे महिना सुरू झाला आणि अभिजीतला मनालीचे वेध लागले.
आज ऑफिस मधून येतानाच त्याने ठरवले होते एकदा 'आईशी बोलायचे आणि मनालीचं बुकिंग करून टाकायचं.'

अभी आणि अनु घरी पोहोचले. वनिताताई फोनवर कोणाशी तरी बोलत होत्या. त्यांनी फोन ठेवला आणि त्या म्हणाल्या

"अग अनु आनंदाची बातमी आहे. मामाच्या रोहन च लग्न जमलयं."

"अय्या हो का? छानच."

"काय करते मुलगी? रोहननेस बघितली असेल."
अनुने मोठ्या उत्साहाने विचारले.

हे बघून अभि म्हणाला

"अरे हो किती तो आनंद तुम्हा बायकांना साड्या घालून मिळवायला पाहिजे असतं नुसतं. लग्न म्हटले की किती तो उत्साह मग ते कोणाचेही असो."

"कोणाचे काय? अभि तुझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे.
मामानं तुझ्या लग्नात सगळं व्यवस्थित पापार पाडलं हो आता आपली वेळ आहे."

"हो आलं लक्षात कधी आहे लग्न?"अभिने लॅपटॉपची बॅग खाली ठेवत विचारलं.

"वीस मे तारीख धरली आहे."

"काय? आता पंधरा दिवसात."
"हो ना घाई होईल खूप म्हणूनच म्हणते तू सगळी मदत कर आता मामांना."

"अगं पण एवढं घाईत का? "असे विचारेपर्यंत वनिताताई किचनमध्ये गेल्या. आणि अभि शब्द त्याच्या तोंडातच
पुटपुटला.

अनुने अभीकडे बघितले
"काय झालं?'

"काय झाले काय ?आपल्याला या महिन्यात फिरायला जायचे होते ना. परत विसरलीस."

"ठीक आहे ना..... नंतर जाऊ."

अभी तन - तन करतच त्याच्या रूम मध्ये निघून गेला.
अनु ही त्याला समजावण्याच्या उद्देशाने त्याच्या मागे गेली.

"हे बघ अभी आता ना मला गाडीची जास्त गरज आहे. प्रत्येक कामासाठी नाही तर तुझ्यावर अवलंबून राहावं लागतं. आपण असं करू माझ्यासाठी गाडी घेऊ आणि रोहनचं लग्न एन्जॉय करू. फिरायला पुढच्या वर्षी जाऊ."

यावर आता काय बोलायचं म्हणून अभिने नुसती मान डोलावली.

रोहन च लग्न छान पार पडलं. अभि ने अनुसाठी गाडीही घेतली. आता नेक्स्ट टाईम काहीही झालं तरी ट्रीप कॅन्सल करायची नाही हे अभिने मनोमन ठरवले होते. पण म्हणतात ना प्रत्येक गोष्ट आपण ठरवू तशी होईलच असे नाही.

दुसऱ्या वर्षी जायचं तर अनुच्या आई-वडिल चार धाम च्या यात्रेला निघाले तेव्हा त्यांनी वनिताताईंनाही बरोबर येण्याचा आग्रह केला. आईला एवढ्या दिवसांनी कुठेतरी बाहेर फिरायला मिळेल या विचारानेच अभिला आनंद झाला आणि आपण परत नंतर जाऊ यावेळेस आईला जाऊ दे असं मनातल्या मनात सांगून मोकळा झाला.

काही ना काही निमित्ताने अभी अनुचे बाहेर फिरायला जाणे टाळत होते. ते आता पूर्णपणे कामात गुरफटून गेले होते.

एक दिवस अचानक अनुला एका नवीन जीवाची चाहूल लागली.या बातमीने तर घरामध्ये आनंदाचे वातावरण पसरले. वनिता ताईंना तर अनुला कुठे ठेवून कुठे नको असे झाले होते.
अभिजीतही नवीन येणाऱ्या पाहुण्याच्या बातमीने आनंदून गेला होता. तो अनु ची सर्व प्रकारे काळजी घेत होता.

"अभी आता आपली ब जबाबदारी वाढली ह".एक दिवस गप्पा मारताना अनु म्हणाली.

"वाढू दे ना जबाबदारीचे ओझं वाटून घेतलं नाही ना म्हणजे मग सगळं कसं व्यवस्थित होतं."
अभी तिला उत्तर देत म्हणाला.

"ते आहेच पण मला हे म्हणायचे होते की आता जरा वायफळ खर्चावर नियंत्रण ठेव."

"मी कुठे वायफळ खर्च करतो.आठवते का तुला आपण दरवर्षी सुट्टी काढून फिरायला जायचे ठरवले होते .गेलो का सांग? आणि आता तर काय शक्यच नाही."

"ठीक आहे.फिरायला आपलं बाळ मोठे झाले की त्याला घेऊनच जाऊ."
अनु अभिषेक खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली.

अभिनेही तिच्या डोक्यावर हात फिरवत
"जो हुकूम बायको".
असे म्हणत तिला आपल्या कुशीत घेतले.

********

दिवसा मागे दिवस उलटले अनुने छान गोंडस मुलाला जन्म दिला. अभी अनुने आपल्या लाडक्या चिरंजीवाचे नाव अमित ठेवले. आता तर बाळ आणि ऑफिस हे सांभाळताना अनुची तारेवरची कसरत चालू झाली होती.अमित तीन वर्षाचा असताना दुसऱ्या किलकारीने अभि-अनुच्या आयुष्यात प्रवेश केला. अभि ने आपल्या छोट्या परीचे नाव मयुरी ठेवले.

त्यामुळे कुठे फिरायला जायचे लांबच पण अनु आणि अभीला एकत्र बसून बोलायलाही वेळ मिळेनासा झाला.
त्यातच कधी मुलांचे दुखणे तर कधी वनिता ताईंचे डोळ्याचे ऑपरेशन तर कधी नातेवाईकांचे येणारे प्रोग्राम.
दिवस सरत होते.मुलं मोठे होत होते. आणि अभी आणि अनु जबाबदारीच्या विळख्यात पूर्णपणे अडकून गेले होते.

एक दिवस अभिजीत हॉलमध्ये पुस्तक वाचत बसला होता.
अनु त्याच्यासाठी चहाचा कप घेऊन आली.तिच्या हातातला कप घेत अभि म्हणाला..

"अनु बस ना इथे थोडा वेळ गप्पा मारू."

"अरे ही काय गप्पा मारायची वेळ आहे का.नको रे बाबा तुझी लाडकी लेक येईल आत्ता क्लास वरून की लगेच काहीतरी खायला दे म्हणेल."
असे म्हणत अनु किचनमध्ये निघून गेली.

अभिने मोठा सुस्कारा सोडला.
थोड्यावळाने दोन्ही मुलांच्या चिवचिवाटाणे घर गजबजून गेले.

तसे बघितले तर सगळे छान आणि व्यवस्थित आयुष्य चालू होते तरी पण अभिला मनातून कुठेतरी आपण बंदिस्त होऊन जगतो आहे असे वाटत होते. यातच त्याला त्याच्या कंपनीकडून ऑफिसच्या कामासाठी विदेशात जाण्याची ऑफर आली. या बातमीवर खुश व्हावं की नाराज हे अभीला समजत नव्हत. या ऑफरमुळे त्याला बाहेरगावी जाता येणार होत, नवीन गोष्टी शिकता येणार होत्या पण अनुला आणि मुलांना सोडून जाणं त्याला पटत नव्हतं.

क्रमशः

यावर अभी काय निर्णय घेईल आणि अनूची काय रिअँक्शन असेल यावर वाचू पुढील भागात ....