"मला डोळे तपासायला जायचं होतं रे..पण आता जाऊद्या तुम्हाला बाहेर जायचं आहे तर.."
"अगं आई आमचं काही अर्जंट नाही, आपण दवाखान्यात जाऊन येऊ मग आम्ही जाऊ वाटल्यास.."
"बरं मी आलेच तयारी करून"
अपूर्वा आणि सौरभ एका प्रदर्शनात जायच्या तयारीत असताना सासूबाईंनी मधेच हे काढलं आणि अपूर्वाचा हिरमोड झाला. एक तर ऑफिसमुळे दोघांना एकत्र बाहेर जायला वेळच मिळेना, आज कसाबसा वेळ त्यांना मिळाला. छोटी स्वरा तिच्या आजोळी आजी बाबांकडे होती आणि दोघांना सुट्टी असल्याने अपूर्वाने हा प्लॅन बनवला होता.
सौरभ आणि त्याची आई दवाखान्यात गेले पण तिथे खुप नंबर असल्याने त्यांना घरी यायला उशीर झाला, मग काय..आल्यावर जेवण केलं आणि झोपले. सौरभच्या डोक्यातही हे राहिलं नव्हतं की त्याला आणि अपूर्वाला बाहेर जायचं होतं म्हणून.
पुन्हा एकदा अपूर्वाच्या मैत्रिणीने तिच्या वास्तुशांतीसाठी दोघांना आमंत्रण दिलेलं, कसाबसा दोघांना जमेल असा वेळ काढून त्यांनी जायचं ठरवलं, संध्याकाळी स्वयंपाक करून अपूर्वा तयार होऊन आली आणि सौरभला पटापट आवरायला सांगितलं, सौरभचा मूड अचानक बदलला आणि तो म्हणाला,
"जायलाच हवं का?"
"अहो कालच तर तुम्ही म्हणत होतात ना की त्यांच्या घराचं इंटेरिअर बघता येईल, दोघेही जाऊन येऊ म्हणून?"
"हो गं पण आता मूड नाही.."
"हे बघा, आपल्याला जायचं म्हणून मी जीव काढून पटापट सगळं आवरलं, धावपळ करत लवकर आले आणि स्वयंपाक केला. आपल्या दोघांचा स्वयंपाक नाही केलेला मी. पटकन आवरा आणि चला..मी हॉलमध्ये आहे, आवरून या लवकर"
सौरभ टंगळमंगळ करत आवरू लागला, आवरून बाहेर आला तोच सासूबाई त्यांना थांबवण्याचं कारण शोधू लागल्या, कारण मिळतही नव्हतं..अपूर्वाने आधीच स्वयंपाक करून सगळं आवरून घेतल्याने त्यांच्याकडे बोलायला काहीच नव्हतं, पण सौरभकडे बघत त्या म्हणाल्या,
"काय रे बरं नाही का? चेहरा सुजलेला दिसतोय.."
काहीही झालेलं नसताना सौरभ उगाच हो ला हो करत म्हणाला
"हो गं, जरा कणकण वाटतेय.."
"किती धावपळ होते तुझी..कशाला एवढ्या थंडीचं बाहेर जातोस? आराम कर.."
सौरभने अपूर्वाकडे पाहिलं आणि म्हणाला,
"बघ, मला अजिबात बरं नाहीये...मी येत नाही"
"मी स्वयंपाक केलेला नाही आपला.." अपूर्वा रागाने म्हणाली
"मला जास्त भूक नाही, फक्त खिचडी टाक"
अपूर्वा पुन्हा खिचडीसाठी रागारागाने कामाला लागली आणि नवऱ्याला वाढून दिलं. जेवण झाल्यावर त्यांचा एक मित्र बाहेर गेटपाशी आला आणि आवाज दिला,
"सौरभ, येतोस का चक्कर मारायला?"
सौरभ निघणार तोच अपूर्वा म्हणाली,
"अहो तुम्हाला बरं नाही ना? नका जाऊ बाहेर.."
"जाऊदे गं त्याला, मित्राबरोबर चार गप्पा मारल्या तर बरं वाटेल.."
सौरभमध्ये अचानक उत्साह संचारला आणि तो निघून गेला.
घरी आल्यावर मात्र अपूर्वाने त्याला चांगलंच फैलावर घेतलं,
"माझ्यासोबत यायचं म्हटलं तर एक तर आईचं काहीतरी निघतं नाहीतर काही ना काही अडचण येतेच..माझ्यासोबत बाहेर फिरायला तुम्हाला नसेल आवडत तर सांगून द्या.."
"आई मुद्दाम करत नाही असं.."
"हो का? ठीक आहे.."
आता सौरभला पुराव्यासकट सगळं दाखवू म्हणत ती काही दिवस वाट बघू लागली.
एकदा अपूर्वाच्या मावसबहिणीच्या डोहाळजेवणाचं आमंत्रण आलं, यावेळी अपूर्वाने आधीच सावध होऊन खेळी खेळली.
"आई उद्या दुपारी मनिताच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम आहे, तुम्हालाही आमंत्रण आहे"
"मला तर नाही जमणार, गुडघे दुखतात माहितीये ना.."
"बरं आम्ही जाऊन येतो, असंही उद्या सुट्टी आहे, रविवारी.."
एवढं सांगून अपूर्वाने सौरभलाही कार्यक्रमाचं कळवलं..आणि वेळेत तयार राहायला सांगितलं..
अपूर्वाने सगळा स्वयंपाक करून ठेवला आणि अकरा वाजता ती हॉलमध्ये आली, सासूबाईंनी अंदाज घेतलाच की हे आता बाहेर जाणार तोच त्यांनी पाय पकडला,
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा