Login

मोगरा.. भाग..02

Mogra (Jasmine) a flower of soft white petals and an intoxicating fragrance that comes alive at night.Its scent carries the essence of love, longing, and memories.For many, mogra is not just a flower it’s a feeling…

भाग..02 .....मोगरा.....


रात्र शांत होती. आकाशात चांदण्या हलक्या दुलईसारख्या पसरल्या होत्या. वाऱ्याच्या मंद झुळुकीत मोगऱ्याचा सुगंध हवेत दरवळत होता. त्याच वेळी ती आली शुभ्र साडी नेसून, डाव्या गालावर खाली, नजरेत एक चमक.. केसांत गुंफलेली मोगऱ्याचा गजरा.. जणू रात्रीच्या अंधारात उजळणारी चांदणीच होती. अगदी मनाला मोहून टाकणारी मनमोहक मोहिनी..

तिला पाहताच मी थबकलो.. तिच्या सौंदर्यात.. तिच्या चालण्याच्या लयीत..मोगऱ्याच्या त्या सुगंधात, त्या शांततेत, तिच्या डोळ्यांत मला माझं विश्व दिसलं. क्षणभर जग थांबलं होतं, फक्त ती आणि मी दोघेच आणि मोगऱ्याचा गंध.

“खूप दिवस झाले ना भेटलो?” ती हलक्या पण कोमल आवाजात म्हणाली.
मी फक्त हसलो. शब्द सापडत नव्हते. कारण त्या क्षणी शब्दांची गरज नव्हती. तिच्या डोळ्यांनी जे सांगितलं ते कोणत्याही भाषेच्या पलीकडचं होतं.

मोगऱ्याच्या त्या फुलांनी साक्ष दिली प्रत्येक फुलात तिच्या हास्याचा एक तुकडा, तिच्या श्वासांचा एक गंध.
ती माझ्या जवळ आली, इतकी की तिच्या केसांतला सुगंध माझ्या श्वासात मिसळला.
त्या क्षणी मला जाणवलं प्रेम हे स्पर्शात नसतं, ते दरवळत असतं... जसं हा मोगरा.

नकळत तिच्या नाजूक बोटांचा माझ्या हातात हलकेच स्पर्श झाला. Bवाऱ्याने एक हलकी झुळूक दिली आणि काही पाकळ्या खाली पडल्या, जणू सृष्टीच आमचं प्रेम साजरं करत होती. त्या क्षणी वेळ थांबावी अशी इच्छा होती... पण वेळ थांबत नाही. ती फक्त थांबलेल्या नजरेत क्षणभर विसावते.

ती म्हणाली,
“हा मोगरा माझा आवडता आहे... कारण याचा सुगंध मला नेहमी तुझी आठवण करून देतो.”
मी काहीच बोललो नाही. फक्त तिच्या केसांतील एक फुल हलकं हातात घेतलं आणि ओठांजवळ आणलं.
ते क्षणभर माझ्या श्वासात विलीन झालं आणि मनात एक न सांगता येणारी नशा उतरली.

ती हसली, थोडीशी लाजली आणि म्हणाली,
“आता निघते… रात्री उशीर होईल.”
मोगऱ्याचा गंध जणू तिच्या पावलांबरोबर दूर जात होता पण तो माझ्या मनात रेंगाळून राहिला.
त्या भेटीचं काही ठसा नव्हता जगात पण माझ्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात तिचा सुगंध भरून राहिला होता. त्या वेळी माझ्या ही नकळत मी माझा राहिलो नव्हतो. आज ती नाही तिची आठवण आहे आणि त्या मोगऱ्याचा सुंगंध आहे मनात भरलेला. तो मोगरा आणि मोगऱ्या सारखी ती नेहमी स्मृतीत राहिल अगदी शेवटपर्यंत.


.. ✍️ जगदीश लक्ष्मण वानखडे.
©® All Rights Reserved.
0

🎭 Series Post

View all