Login

जश्यास तसे

जश्यास तसे वागायला हवं
जश्यास तसे

©️®️शिल्पा सुतार

संध्याकाळचे सात वाजले. प्रिया घाईने आवरत होती. सतीश ऑफिसहून यायची वेळ झाली. त्याआधी सगळे कामं झाले तर बर होईल. तिने भराभर पसारा आवरला. वाळलेले कपडे घड्या घालून ठेवले.

"आई कोणती भाजी करू?" तिने रमाताईंना विचारलं. त्यांनी तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं.

"सोहम तुझे खेळ भर." तिने आवाज दिला. तो मोबाईल मधे खेळत होता. तिने त्याच्या हातातून फोन घेतला.

"लहान मुलांनी जास्त फोन वापरु नये." ती ओरडली. तो बालवाडीत होता. तो ऐकत नव्हता. त्याला एक धपाटा घातला.

"हा अजिबात ऐकत नाही. तुझे बाबा आले की मलाच बोलतील. सारखे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. नकोच ते. हे झाल नाही. ते झाल नाही. नुसता कंटाळा आला आहे." तिने कणीक भिजवली.

" आई मी भेंडी करते आहे. तुम्ही पटकन काय करायच ते सांगत नाही. परत जेवतांना बोलू नका." प्रिया परत म्हणाली.

" कोरड होईल. मला कढी कर." रमाताई म्हणाल्या.

तिने पटकन स्वयंपाक केला. चला बर्‍यापैकी आवरलं. तिला बर वाटलं. सतीशचा खुप धाक होता. घरात मोकळ वाटत नाही. तिने केलेली कोणतीच गोष्ट त्याला आणि त्याच्या आईला पटत नव्हती. उगीच वाद नको म्हणून ती काही बोलत नव्हती.

दुसर्‍याला बोलायला, दोष द्यायला किती सोप असत ना. स्वतः काम करून बघा, आवरून बघा मग समजेल. एक दिवस मुलाला सांभाळायला सांगितल की यांना जमत नाही. कुठलही काम जमत नाही. दुसर्‍याला आपण गृहीत धरतो. समोरच्याकडे एक बोट दाखवतांना चार बोट स्वतःकडे असतात. प्रिया विचार करत होती.

तिच्या आणि सतीशच्या लग्नाला पाच वर्षे झाले होते. घरी सासुबाई रमाताई, सतीश, प्रिया, सोहम एवढे लोक होते.

सतीशचे वडील बरेच वर्ष झाले वारले होते. सासुबाई रमाताईंनी नोकरी करून एकटीने त्याला वाढवलं. सगळं ठीक आहे. खरच कठिण परिस्थिती असेल. त्यामुळे सतीश त्यांना काही बोलत नसे. आईने मला कस वाढवलं कष्ट केले हेच तेच तो नेहमी सांगत असे. आता त्या गोष्टीचा अति उदोउदो होत होता. इतके वर्ष तेच तेच ऐकून प्रिया कंटाळली होती.

आमच्या ही आई वडलांनी आम्हाला कष्ट करून वाढवलं. त्यांची ही परिस्थिती साधारण होती. आम्ही नाही एवढं सांगत. आमच्याही शिक्षणाला खर्च आला. हे लोक अति करतात. आम्ही काही असेच मोठे झालो.

सुरुवातीला सगळं ठीक चाललं होतं. पण हळूहळू सतीशच वागण विचित्र झालं. तो प्रियाला आणि तिच्या घरच्यांना कमी लेखत होता. त्यांना अपमानास्पद वागणूक देत होता. नेहमी रुसून बसणं. कोणत्याही प्रोग्राम मधे त्याला वेगळा मान हवा होता. प्रिया त्याच्या वागण्यामुळे हतबल झाली होती. पण घरच्यांचा सन्मान राखून ती गप्प रहायची. सगळं सहन करत होती.

रमाताई ही सतीशला सपोर्ट करत होत्या. हे अस वागणं चांगल नाही त्या सांगत नव्हत्या. प्रियाला त्रास झाला की त्यांना बर वाटतं होतं.

तिने सोहमच ताट केलं. तो रुसला होता.

"राग सोड बेटा. चल जेवायला. " ती हाक मारत होती.

"मग तू माझ्याशी खेळशील का?"

"हो." ती त्याला खावू घालत होती. तो खूप प्रश्न विचारत होता. ती त्याच्याशी बोलत होती.

सतीश आला. मोटरसायकल जागेवर लावून तो घरात आला. रमाताई टीव्ही बघत होत्या. सतीश त्यांच्या जवळ बसला. प्रेमाने सौम्य आवाजात चौकशी झाली.

माझ्याशी आणि माझ्या घरच्यांशी बोलतांना हा आवाज कुठे असतो काय माहिती? प्रिया मनातल्या मनात म्हणाली.

"प्रिया, सोहमच जेवण झाल का?" त्याने आवाज दिला.

"हो पाच मिनिट."

"आमचे ताट कर."

"हो, मी पण जेवायची बाकी आहे." ती म्हणाली. तसे ते दोघे तिच्याकडे बघत होते.

हे मला त्यांच्यात धरत नाही. प्रिया विचार करत होती.

"आई तू काय म्हणाली होती माझ्या सोबत खेळणार." सोहम हट्ट करत होता.

"हो बेटा माझ काम तर होवू दे. तू झोप बर. सकाळी शाळा आहे."

"आई आपल्याला आजोबांकडे जायचं ना? " तो आनंदात होता.

" हो जावू. " प्रिया म्हणाली.

" काय झालं? कसल बोलतो आहे हा?" सतीशने रमाताईं कडे बघत विचारलं.

" माझ्या बाबांचा फोन आला होता. " प्रिया म्हणाली.

" मग हे केव्हा सांगणार? " सतीश चिडला.

" ती अशीच करते. सगळं त्यांच त्यांच्यात ठेवते." रमाताई म्हणाल्या.

" मी थोड्या वेळाने बोलणार होती. तुम्ही आत्ता तर आले. "

" मी घरात होती ना? " रमाताईंनी आग लावली.

" प्रिया काय आहे हे? "

" आई मी तुमच्या समोर बोलत होती ना अस काय करताय. " तिने सांगायचा प्रयत्न केला.

" हे अस वागलेलं चालणार नाही प्रिया." सतीश म्हणाला.

" नाही हो. ऐका तरी. रोहितला मुलगी बघायला जायचं आहे. बाबांचा फोन आला होता. "

" त्यांनी मला मला फोन केला नाही."

" ते तुम्हालाच करणार होते. तुम्ही ऑफिस मधे असल्यावर बोलत नाही ना. म्हणुन रात्री फोन करणार आहेत." प्रियाने सांगितलं.

" चांगला बहाणा आहे." रमाताई म्हणाल्या.

" त्या प्रोग्राम साठी अजिबात जायच नाही प्रिया सांगून ठेवतो." संतोष चिडून म्हणाला.

"अहो काय अस करताय? पंधरा दिवसांपूर्वी तुमचा चुलत भाऊ सचिन भाऊजींसाठी मुलगी बघायला गेलो होतो. तेव्हा कुठे त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलं होत. तिथे आपण सगळा मानपान बाजूला ठेवून गेलो ना. तुम्ही ही, मी पण किती काम केलं. त्यांच्या पेक्षा माझा भाऊ जवळचा आहे. असा राग धरू नका. " प्रिया म्हणाली.

" तुला जायच तर जा मी येणार नाही. " सतीश म्हणाला तस रमाताईंच्या चेहर्‍यावर वेगळच हसू होतं.

रात्री तिच्या बाबांचा फोन आला. संतोष नीट बोलला नाही. फोन प्रियाकडे देवून दिला.

" प्रिया जावई बापू चिडले का?" बाबा काळजीत होते.

" जावू द्या बाबा. मी उद्या येते." तिने फोन ठेवला.

" आई तुम्ही यांना समजवून सांगा ना. अस वागलं तर कस होईल? " प्रिया म्हणाली.

" काय सांगणार तुझ्या घरचे काही नीट आहेत का? आधी जावयाला विचारायच तर ते त्याला शेवटी सांगतात. तो कश्याला येईल. " रमाताई विचित्र वागत होत्या.

रात्री तिने संतोषशी बोलायचा प्रयत्न केला. तो विशेष बोलला नाही.

दुसर्‍या दिवशी सोहम शाळेत गेला. तिने पटापट आवरलं संध्याकाळचा ही स्वयंपाक केला. सतीशला फोन करून निघतो आहोत ते सांगितल.

" तुम्ही येणार का? "

"नाही."

"ठीक आहे. आई तुम्ही? "

"नाही ग बाई तिकडे काही सोय होत नाही. काही नाही." रमाताई म्हणाल्या.

अरे काय हे बोलणं. माझ्या सासरचे आले की आई, बाबा किती करतात. तरी याची रडगाथा काही संपत नाही. जावू दे वैताग आला आहे.

चार वाजता ती निघाली. स्टँडवर आली. अर्धा तासात बस मिळाली. दोन तासाने ती स्टँड वर उतरली. रोहित घ्यायला आला होता. ती घरी आली.

" सतीश राव उद्या येणार का?" बाबांनी विचारलं.

" नाही, ते येणार नाहीत. " प्रिया म्हणाली.

" काय झालं? " आईने विचारलं.

" आजच आहे का? आमचं नेहमीच रडगाणं आहे. त्यांना राग आला आहे." प्रिया सांगत होती.

"अहो तुम्ही फोन करून बघा ना."

" आई, बाबा सोडा आता हे मागे मागे करणं. तुम्ही काही त्यांच कमी करत नाही. लग्नाला आता पाच वर्ष झाले ना. ते अजूनही तुम्हाला समजून घेत नाही म्हणजे काय. मी बर त्यांच सगळं गणगोत सांभाळते. मानपान बाजूला ठेवते. अजिबात जास्त भाव द्यायचा नाही." प्रिया काहीतरी ठरवून आली होती.

" अस करुन कस चालेल बेटा. " आई म्हणाली.

" अस केल तरच ते नीट होतील." प्रिया म्हणाली.

" बघ बाई शेवटी तुला तिकडे रहायचं आहे." आई काळजीत होती.

सतीशला अपेक्षा होती सासुरवाडीहून फोन येईल. मनधरणी करतील. कोणीच विचारल नाही. तो दुसर्‍या दिवशी रागाने ऑफिसला निघून गेला.

प्रियाने ठरवलं की आता गप्प बसायचं नाही. तिने घरच्यांना सांगितल यांना भाव देवू नका. ती पण माहेरी मस्त राहिली. ते मुलीकडे जावून आले. पसंती झाली. सुपारी फुटली.

ती सासरी परत आली. सतीशने काही विचारल नाही. तिने काही सांगितलं नाही. वेळोवेळी माहेरून फोन येत होता. लग्नाच सगळं ठरवत होते. सतीश, रमाताई लांबून बघत होते.

प्रिया सोहमला शाळेतून घेवून आली. रमाताई फोनवर बोलत होत्या. सचिनचा साखरपुडा होता. जावेकडे जाव लागेल. त्या काय बोलत होत्या प्रिया ऐकत होती. रात्री सतीश घरी आला. ते जेवायला बसले.

"आपल्याला रविवारी मालूताईंकडे जायचं आहे." रमाताई सांगत होत्या. ते उत्साहाने सगळं ठरवत होते.

"मला त्यांच्याकडे यायला जमणार नाही." प्रियाने सांगितल.

"का नाही जमणार?" सतीशने विचारलं.

" यापुढे तुमच्या कोणत्याच नातेवाईकांकडे मी येणार नाही." प्रिया म्हणाली.

" काय हे वागणं? " सतीश विचारत होता.

" तुमच्या कडून शिकले. " प्रिया म्हणाली.

" आई बघ कशी उलट उत्तर देते." सतीश चिडला होता.

" ती नेहमीच अस करते. मी बोललो की माझं तोंड दिसत." रमाताई म्हणाल्या.

"तुम्ही काहीही म्हटलं ना तरी मला फरक पडत नाही. माझ ठरलं आहे ." प्रिया म्हणाली.

रात्री सतीश, प्रियाच भांडण झालं. तिने माघार घेतली नाही.

सचिन भाऊजींचा फोन आला. "प्रिया वहिनी काय झालं? माझ काही चुकलं का? "

ती सगळं सांगत होती.

" तुमच बरोबर आहे वहिनी."

" मला थोडा वेळ द्या. मला हे नीट करायच आहे."

"ठीक आहे."

रविवारी ती आरामशीर आवरत होती. रमाताई, सतीश तयार होते.

" चल प्रिया."

"नाही. मी नेहमीच तुम्ही म्हणाल ते करते. तुम्ही माझं ऐकतं नाही. तुम्हाला कस वाटत तुमच्या कडच्या लोकांकडे मी येत नाही तर. मला नेहमी असच वाटत. सगळे विचारतात तुम्ही येत नाही. यापुढे मी ऐकणार नाही." प्रिया म्हणाली.

"जास्त झालं का. माहेरी जायच का?" सतीश म्हणाला.

" हो चालेल ना. सोहमला नेवू का की त्याला तुम्ही सांभाळणार. तुम्ही काहीही म्हणा मी घाबरत नाही." प्रिया म्हणाली.

थोडा वेळ गेला. रमा ताई ही बडबड करत होत्या. तिच्यावर परिणाम झाला नाही.

"प्रिया इकडे ये." सतीश आवाज देत होता. ती रूम मधे गेली.

"चल तयारी कर. यापुढे अस होणार नाही. मी पण तुझ्या कडच्या कार्यक्रमाला येईल. " सतीशने माघार घेतली.

" मला खर वाटत नाही. " प्रियाला त्याचा स्वभाव माहिती होता.

" हो येईल. म्हणालो ना."

" तुम्ही नेहमी रुसून बसतात. " ती म्हणाली.

" अस होणार नाही. सांगितल ना. "

तिला बर वाटलं. तिने जास्त ताणलं नाही. साखरपुडा चांगला झाला. थोड्या दिवसांनी रोहीतच लग्न होत. सतीश दोन दिवस आधी आला. जस आहे तस राहिला. प्रियाला बर वाटलं. चला हे म्हणाले तस वागले. रमाताईंनी बरच मोडता घालण्याच्या प्रयत्न केला. पण सतीशने ऐकलं नाही.

थोड्या दिवसांनी सचिनच लग्न होत. प्रिया आधी पासून मदतीला गेली होती. ती आता खुश होती. दोघांनी एकमेकांना सांभाळून घेतलं.

जेव्हा अन्याय होतो त्याविरोधात उभं राहणं गरजेचं असतं. हुशारीने आणि आत्मविश्वासाने परिस्थिती बदलता येते.