जाऊ नको दूर. भाग -३

कथा बापलेकीच्या निर्मळ नात्याची.


जाऊ नको दूर.
भाग -तीन.

तीन चारदा असे झाले की पाचव्यांदा हा काही न बोलताच डोळे पुसत निघून जायचा. डोळे मिटून असलेल्या तिला बाबा गेलाय हे गावीही नसायचे.


एक महिना दवाखाना आणि नंतर एक महिना आईच्या माहेरी राहिल्यावर ईशी पहिल्यांदा घरी आली तेव्हा फुलांच्या पाकळ्यांनी याने तिचे स्वागत केले.


त्याचं लाडाचं इवलूसं पिल्लू मोठं नाटकूलं होतं. अंगावरचं दूध पुरेना म्हणून डॉक्टरांनी वरचे दूध सुरू करायला लावले. ही मुजोर ते दूध तोंडात घ्यायलाही तयार नसायची. तेव्हा हा तिच्यापुढे झुनझूने वाजवत नाचून दाखवायचा. तीन चार महिन्याची चिमूरडी, बापाचा नाच सुरू असला की तेवढे दूध कसेबसे प्यायची. तो नाचायचा थांबला की हिचे भोकाड पसरणे सुरू!


झोपताना आईच्या मांडीपेक्षा बाबाची मांडी जास्त प्रिय. मांडीवरून खाली ठेवायला जरा जरी हलला तरी हिचे डोळे पुन्हा सुरू व्हायचे. पाळण्यात झोपवतांlना दोरी हलवायला हाच हवा. तोही उभा. पाय दुखले म्हणून बसायची सोय नाही. हिच्या रडण्याचा आवाज सुरू झालाच म्हणून समजायचा. त्याचं 'और इस दिल मे..' दहा वेळा गाऊन झाल्यावर त्याच्याकडे बघतच ती झोपणार. अर्धा एक तास हात दुखेपर्यंत त्याला राबवून घेणार अशी ही त्याची लाडकी ईशी.

नावही तर त्यानेच शोधून ठेवलं. 'ईशी' म्हणजे साक्षात देवी! मुळात देवाला न मानणारा तो, कोणत्याही शुभ कामाला जाताना मात्र हिच्या पायावर डोके ठेऊन जाणार. ती ह्याच्यासाठी शुभ आहे हा त्याचा गोड समज! त्याला जॉब पक्का झाला तेव्हाही तो लेकीचाच पायगुण आहे असे म्हणायचा.

असा हा ईशूवेडा बाप. तिच्यासाठी नाचला काय, गळा कोरडा पडेपर्यंत गायचा काय!
थोडी मोठी झाली तशी ती गोष्टीसाठी रुसून बसायची.

"किती गोष्टी सांगू गं?" तो विचारायचा.

"दहा!" तिचे ठरलेले उत्तर असायचे. झोपताना एका गोष्टीने कधीच मन भरत नव्हते.


त्याच्या प्रेमाच्या बदल्यात तीही त्याला भरभरून प्रेम द्यायची. तो ऑफिसमधून परतला की दुडूदुडू धावत जाऊन त्याची बॅग घेऊन यायची. त्याला ग्लासमध्ये सांडत लवंडत का होईना, पाणी आणून द्यायची.


हीच ईशी आता जराशी मोठी झालीय. त्याने तिचे बालपणीचे आवडते गाणे गायला घेतले की तिला ते आता ओल्ड वाटते.

'स्मुथ लाईक बटर,
लाईक अ क्रिमिनल अंडर कव्हर.
गॉन पॉप लाईक ट्रबल,
ब्रेक इट इन यूअर हार्ट लाईक द्याट..'

असे त्याच्या कानावर कधी न पडलेले शब्द ती त्याला स्वतःच्या आवाजात ऐकवायला लागलीय. अर्थात गायनाचे बीज त्याच्याकडूनच हिच्यात आलेत बरं का.

तीन चार महिन्याची असताना त्याचा न कळणारा डान्स टक लावून आनंद लुटणारी ती आता, "तुला डान्स मधलं काहीच कसं कळत नाही रे? " म्हणून स्वतःसोबत नाचवायला लागली.


"लेक मोठी होतेय, तशी माझ्यापासून दूर जातेय का गं?"
एकदा हळवे होत बायकोला त्याने विचारलेच.

"काहीही रे तुझं. असं कधी असते का? मुलीचा पहिला हिरो तर तिचा बाबा असतो. ती का तुझ्यापासून दूर जाईल?" हसून रीमा उत्तरली.


"तसं नाही गं. पण तुझ्याशी जेवढे मोकळेपणाने ती बोलते तेवढे हल्ली माझ्याशी नाही बोलत ती. काही हवे असेल तर तेवढे फक्त मागते, बाकी इतर कुठे काय सांगते? आणि हिरो म्हणशील तर ते कोरियन बीटीएस गँग चे चिकणे मुलं हिरो आहेत तिचे. काय तर म्हणे 'स्मुथ लाईक बटर..' मोबाईल बघतोस ना माझा? वॉलपेपर देखील त्यांचाच." तो काहीसा खट्टू होत म्हणाला.


"कधी कधी ना अगदी लहान बाळासारखा करतोस हं तू." त्याच्या जवळ येत रीमा म्हणाली.

:
क्रमश :
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

बापलेकीचे नाते होईल ना ठीक? वाचा पुढील अंतिम भागात.

🎭 Series Post

View all