Login

जाऊबाई जोरात भाग १

Family Drama

जाऊबाई जोरात भाग १

©® सौ.हेमा पाटील.


"ए, तो डबा इथंच ठेवायचा. कुठं घेऊन निघालीस वर तोंड करून?" वैशाली म्हणाली.

"का? मला पाहिजे तो डबा. सगळंच तुझ्या मढ्यावर घालायचं का? हा पेढेघाटी डबा मला द्यायचा असं आत्या म्हणाल्या होत्या." रुपाली म्हणाली .

"हो का? कधी स्वप्नात म्हणाल्या हुत्या का? मला तर काय सांगितलं नव्हतं तसं त्यांनी. त्यामुळं मुकाट्यानं इथंच ठेवायचा डबा." वैशाली म्हणाली.

"न्हाय ठेवणार जा. काय करशील? सगळं तुलाच खामटायचं आहे. आम्ही पण वारसदार आहोत हे विसरू नकोस आक्के." रुपाली म्हणाली.

वैशाली आणि रुपाली दोघी सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा झाल्या होत्या. वैशाली थोरली बहीण अन् रुपाली धाकटी. वैशालीच्या लग्नातच तिच्या दीरासोबत रुपालीचे गुफ्तगू सुरू झाले होते. विकास पुण्यात नोकरीला होता. दोघी बहीणी एकाच घरात गेल्या तर एकमेकींची सोबत होईल व एकमेकींना जीव लावतील असे त्यांच्या आईवडिलांना वाटत होते. त्यामुळे या दुसऱ्या लग्नाला त्यांनी आनंदाने परवानगी दिली.

वैशाली गावी सासु- सासऱ्यांसोबत राहत होती, अन् रुपाली शहरात. दोघी बहिणी एका जीवाने राहत होत्या. गावी शेतीत जे काही पिकत असे, त्यातील काही धान्य सासुबाई रुपालीला देत असत. गावी येताना रुपालीही सर्वांसाठी काही ना काही आणत असे. दोघींच्या मुलांनाही एकमेकांचा लळा लागला होता. सासरे वारले आणि चार वर्षांनी सासुबाई वारल्या. त्यानंतर हळू हळू दोघींमधील संबंध बिघडत गेले. ते इतके बिघडले की आज वाटणी पर्यंत येऊन पोहोचले.

एका पेढे घाटी डब्यावरुन दोघींमध्ये वाद सुरू होता हे पाहून वाटणी करायला आलेल्या पंचांनी डोक्याला हात लावला.

"नव्हं वहिनी, तुम्ही दोघी सख्ख्या भनी हायसा ना? मंग अशा का भांडतायसा वैऱ्यावानी? ताटात सांडलं काय अन् वाटीत सांडलं काय, एकच की. जाऊद्या की, घेऊ द्या तो पेढंघाटी डबा धाकल्या वयनीस्नी." एक पंच अशोकराव म्हणाले.

"तर तर, तुमास्नी काय जातंय हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवायला. सासु-सासऱ्याला मी आयुष्यभर सांभाळलंय. ही राहिली तिकडं शेरात. चार दिवस नाचत यायची अन् जायची. सासरा आजारी पडल्यावर बोलवलं तर तवा यायला हिला वेळ नव्हता‌, अन् आज सकाळपासून हे मला पायजे अन् ते मला पायजे चाललयां." पंचावरच जाळ निघाला म्हटल्यावर दुसऱ्या कुणीच मध्ये तोंड घातले नाही. वैशालीचे हे बोलणे ऐकून रुपाली थोडीच शांत बसणार होती?

"तर तर, आली मोठी सेवा करणारी. आत्याबाई सारख्या ओरडायच्या, माझा नवरा हातरुणाला खिळलाय तर कुनी तेच्याकडं लक्ष देत नाही म्हणून. कितीतरी वेळा मी तिकडून आल्यावर मामंजींना आंघोळ घालायचे. स्पंजिंग करायचे. आता वाटणी घेताना मात्र तूच सगळ्यात पुढं." रुपाली असे म्हणताच जो काही भडका उडाला म्हणता... जाळ आणि धूर संगटच.

"तर तर, तोंड बघा आंघोळ घालणारणीचं. कवा एकुंद्या वक्ताला घातली असंल आंघुळ, तर त्याचं किती कवतिक. इथं मी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या त्याचं काहीच मोल न्हाय." वैशाली म्हणाली.

हा सगळा वाटणीचा फार्स बघत शेजारी उभे असलेल्या गावकऱ्यांना व शेजारच्या आयाबायांना फुकटात तमाशा बघायला मिळाला. त्या बघ्यांची आपापसात हळू आवाजात चर्चा सुरू होती.

"लेका, एका डब्यावरनं भनी भनी इतकं बाचतेती, मंग सासुच्या सोन्यावरनं तर आकाशपाताळ एक करतीला दोगी."

"तर काय! आता इथनं हलू नगंस. लै मजा येनार हाय."


क्रमशः

काय होते पुढे? सगळी वाटणी दोघींच्या मनासारखी होते का? पंच पुढे काय निर्णय घेतात? ते जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचावा.