Login

जाऊबाईंचा थाट. भाग - १

जाऊबाई ही दुसरी बहीणच असते.
जाऊबाईंचा थाट. भाग - १

"आई sss ऐकलंत का हो... आपल्या दिपाला दिवस गेलेत वाटतं, तिला उलट्या होताय!" भारती लगबगीने बाहेर आली आणि तिच्या सासूला सांगू लागली. ते ऐकून यमुनाबाईंच्या चेहऱ्यावर हसू फुललं.

"अगं खरंच की काय!" त्यांनी आनंदाने विचारलं.

यमुनाबाईंना दोन मुलं होती. मोठा शरद आणि धाकटा सतिष. शरदच्या बायकोचं नाव भारती होतं आणि त्यांना दोन लहान मुलं होती. धाकटा मुलगा सतिष, त्याची बायको दिपाली, जिला घरात सगळे दिपा म्हणायचे. शरद-भारतीला दोन मुले होती, पण दिपा-सतिषला अजून अपत्य नव्हते. आता भारतीचं बोलणं ऐकून यमुना बाईंच्या मनात आनंदाच्या लाटा उसळल्या.

"अगं, मग तिला दवाखान्यात न्यायला हवं गं, म्हणजे नक्की काय आहे याची खात्री होईल." यमुना बाई म्हणाल्या.

"हो, पण आता हे दोघंही भाऊ घरी नाहीत. पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना! मीच दिपाला घेऊन दवाखान्यात जाते. आणि येताना गोड बातमीच घेऊनच येते बघाच तुम्ही!" भारतीने अगदी आत्मविश्वासाने सांगितलं.

थोड्या वेळातच भारती दिपाला घेऊन दवाखान्यात गेली. तपासणीनंतर डॉक्टरांनी हसतच सांगितलं,
"हो, दिपालीबाई... तुम्हाला दिवस गेले आहेत. काळजी करू नका, सर्व काही व्यवस्थित आहे."

हे ऐकताच दिपाच्या चेहऱ्यावर हसू फुटलं तर भारतीचा आनंद ओसंडून वाहू लागला.

"डॉक्टर, ही बातमी ऐकवायची मजाच काही और आहे!" असं म्हणत ती उभीच राहिली. त्यानंतर त्या दोघी घरी परत आल्या. घरी यमुनाबाई आतुरतेने त्या दोघींची वाट बघत होत्या. भारती आणि दिपालीला बघून त्या लगबगीने पुढे आल्या आणि विचारू लागल्या.

"काय झालं? काय म्हणाले डॉक्टर?" यमुना बाईंनी उत्सुकतेने विचारलं.

"आई, आधी गोड खायला द्या, मगच मी तुम्हाला गोड बातमी सांगणार!" भारती खुश होऊन म्हणाली तसं यमुना बाईंना लगेच समजलं. त्यांनी सतिषला फोन केला आणि पेढे आणायला सांगितले.

शरद आणि सतिष घरी आल्यावर भारती लगेच आनंदाने त्या दोघांना सांगू लागली.

"अहो sss ऐकलंत का... आपली दिपा आता आई होणार आहे!" भारती म्हणाली आणि क्षणातच घरभर आनंद पसरला. शरद आणि सतिषला बातमी ऐकून खूप आनंद झाला. आणि पेढे कशासाठी आणायला सांगितले आहे ते ही समजलं. शरदची मुलं तर उड्या मारू लागली आणि "आता आपल्याला खेळायला बाळ मिळणार!" असं बोलू लागली.

त्या सगळ्यांना आनंदात बघून दिपा लाजून गालातल्या गालात हसत होती आणि भारती जणू काही या सगळ्या आनंदाची सूत्रधार मीच आहे, असा थाट मिरवत होती.

"हे सगळं मीच आधी ओळखलं बरं का!" भारती पुन्हा पुन्हा तित्या नवऱ्याला सांगत होती. त्यालाही तिचा तो अति आनंद बघून हसू येत होते.

आज घरात फक्त दिपाच्या गोड बातमीचा नाही, तर भारतीच्या थाटाचा सुद्धा जोरदार उत्सव झाला! आणि यमुना बाईंनी स्वतः घरात छान गोडाधोडाचं जेवण बनवलं.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all