Login

जाऊबाईंचा थाट भाग - ३

जाऊबाई ही दुसरी बहिणच असते.
जाऊबाईंचा थाट. भाग - ३

दिपाला आता नववा महिना लागला होता. भारती तिच्यासाठी नारळपाणी घेऊन आली आणि तिच्या हातात दिलं.

"दिपा, आता खाण्यापिण्याकडे चांगलं लक्ष दे... आता तुझे दिवस भरत आले आहे." भारती.

"ताई, तुम्ही असताना मला लक्ष द्यायची काहीच गरज नाही. मला भुक लागायच्या आधीच तुम्ही मला सगळं आणून देतात." दिपा हसून म्हणाली.

"हो ना, ते माझं कामच आहे पण आता तू आराम कर. मी घरातली कामं बघते. आज घरी कोणीच नाहीये. आई गेल्यात लग्नाला आणि हे दोघेही भाऊ तालुक्याला गेले आहे. माझं काम होईपर्यंत आराम कर. माझी कामं झाली की मग आपण छान गप्पा मारू." भारती म्हणाली आणि तिची कामं करायला गेली. दिपा खाली झोपायला लागली तेवढ्यात तिच्या पोटात एक वेदनेची कळ आली आणि तिने भारतीला आवाज दिला.

"ताई, माझ्या पोटात दुखतंय लवकर या!" दिपाची हाक ऐकून भारती धावतच तिच्याकडे गेली.

"काय झालं दिपा? तुला काही त्रास होतोय का?" भारतीने काळजीने विचारलं.

"ताई… मला वाटतं डिलीव्हरीची वेळ झालीये…" दिपा थरथरत्या आवाजात म्हणाली. ते ऐकून भारतीच्या छातीत धडधड सुरू झाली.

"देवा, आता काय करायचं?" तिच्या मनात विचार आला. घरात कोणी नव्हतं. गाडी नव्हती. फोन करायला गेली तर नेटवर्कच नव्हतं. ती घाबरली पण पुढच्या क्षणी तिने स्वतःला सावरलं.

"दिपा, घाबरू नकोस गं! मी आहे ना तुझ्यासोबत. काही होणार नाही." असे बोलून ती पटकन बाहेर पळाली आणि शेजारी पाजारी कोणी आहे का ते बघू लागली पण दुपारची वेळ असल्याने कोणीच घरी नव्हते कोणी शेतावर, तर कोणी कुठे बाहेर गेले होते. भारतीने भरपूर प्रयत्न केले पण कोणाचीच मदत भेटली नाही. आता तिच्या डोळ्यासमोर फक्त दिपा आणि तिचं बाळ एवढंच दिसत होते. काय करावं काहीच सुचत नव्हते.

भारती सारखं सारखं शरद आणि सतिषला फोन करत होती पण दोघांचाही फोन लागत नव्हता. शेजारी असलेल्या एकाचा फोन नंबर तिच्याकडे होता तिने तो ही लावून पाहिला पण तो ही फोन लागेना. नंतर तिला गावात एक सुईन होती ते आठवलं तसं ती धावतच तिला बघायला तिच्या घरी गेली. पण आता तीही नव्हती. आता तर भारती रडकुंडीला आली होती. ती तशीच निराश होऊन घरी आली.

भारती निराश होऊन घरी परत आली त्याचवेळी तिची नजर शेजारच्यांच्या अंगणात उभ्या असलेल्या बैलगाडीकडे गेली. बैलगाडी तर होती पण बैल काही तिला कुठे दिसत नव्हते पण आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाही असा विचार करून ती आत गेली.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all