Login

जाऊबाईंचा थाट. भाग - ४

जाऊबाई दुसरी बहिणच असते
जाऊबाईंचा थाट. भाग - ४

"दिपा, चल आपण आता दवाखान्यात जातोय काही काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल." भारती म्हणाली आणि तिने दिपाला आधार देत बाहेर आणलं. पण बाहेर आल्यावर दिपाला तिथे काहीच दिसलं नाही. म्हणून ती अजूनच काळजीत पडली.

"ताई, आपण दवाखान्यात कसं जायचं? मला तर इथे काहीच साधन दिसत नाही." दिपाने विचारलं.

"आता तू कसलाही विचार करू नको, तू आणि बाळ सुखरूप असणं ही माझी जबाबदारी आहे." भारती म्हणाली आणि तिने हळूच दिपाला बैलगाडीत बसवलं. लागणारं सामान बरोबर घेतलं आणि स्वतः ती बैलगाडी ओढत ओढत दिपाला दवाखान्यात घेऊन जाऊ लागली.

दिपाला आता तिच्या वेदनेपेक्षा भारतीचीच जास्त काळजी वाटू लागली. भारतीचे हाल तिला बघवत नव्हते. गाडी ओढत असताना भारती पुर्ण घामाघूम झाली होती.

पुढे दवाखान्यात जाणाऱ्या रस्त्यावर जेव्हा ती आली तेव्हाही तिने दोन गाड्यांना हात केला पण कोणीच थांबायला तयार नव्हते. शेवटी ती तशीच गाडी ओढत पुढे आली.

शेवटी, घामाने भिजलेली, थकलेली भारती दिपाला घेऊन दवाखान्यात पोहोचली. डॉक्टरांनी लगेच दिपाला आत घेतलं. भारती दारात उभी राहून रडू आवरत देवाला हात जोडून प्रार्थना करू लागली.

"हे दैवा, माझ्या दिपाला सुखरूप ठेव. तिचं बाळ हसत या जगात येऊ दे. तिच्या आयुष्यातील हा क्षण तिच्या चेहऱ्यावर हसू आणणारा असू दे." भारती बराच वेळ देवाचा धावा करत होती.

नंतर भारती थकून बाकावर बसली होती, पण डोळे दारावरच खिळलेले होते. कधी डॉक्टर बाहेर येताय आणि आनंदाची बातमी सांगताय याकडेच तिचे लक्ष होते.

भारती बाकावर बसून भिंतीला टेकून बसली आणि अचानक बाळाच्या रडण्याचा आवाज तिच्या कानावर आला. आणि तिने दाराकडे पाहिलं तर नर्स हसत बाहेर आली आणि म्हणाली.

"अभिनंदन! दिपाला गोड मुलगी झाली आहे. आई आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत." नर्स म्हणाली आणि भारतीने सुटकेचा निःश्वास टाकला. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तिने हात जोडत आकाशाकडे पाहिलं आणि देवाचे आभार मानले.

यमुनाबाई, शरद, सतिष हे तिघेही ही बातमी ऐकून धावत आले. दिपाला हसतमुखाने बाळाला कुशीत घेतलेलं पाहून सगळ्यांचे डोळे पाणावले.

"भारती, आज तू नसतीस तर काय झालं असतं कोण जाणे! तुझ्या धाडसचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, आज तुझ्यामुळेच दिपा आणि बाळ सुखरूप आहे." यमुना बाई म्हणाल्या.

आज सगळ्यांनाच भारतीचा खुप अभिमान वाटत होता. तिचा थाट फक्त बोलण्यात नाही, तर त्यागात, कष्टात आणि त्या नात्यातील खरी ताकद दाखवण्यात आहे. हे सगळ्यांनाच दिसत होते.

समाप्त...

सौ - रोहिणी किसन बांगर.
0

🎭 Series Post

View all