Login

जावे त्याच्या वंशा भाग १ (सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे)

जावे त्याच्या वंशा
जावे त्याच्या वंशा
भाग १
(सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे)

निलू आणि गायत्री अगदी बालवाडी पासून मैत्रिणी होत्या. दोघी शाळेत एकाच बाकावर बसायच्या. दोघींना मार्गही एखादा टक्क्याने पुढे मागे असायचे. गायत्री शांत होती, समजूतदार होती. याउलट निलू होती. कमालीची हट्टी. पण गायत्री निलूचे सगळे ऐकायची म्हणूनच त्यांची मैत्री छान टिकून होती. पुढे मोठे झाल्यावर दोघी एकाच काॅलेजमध्ये गेल्या. दोघींनी काॅमर्सला एडमिशन घेतली होती. तिथे खूप त्यांचा छान गृप झाला होता. त्यातही सोहम कायम निलू आणि गायत्री बरोबर असे. त्यामुळे सोहम आणि निलू यांच्यात नैसर्गिक आकर्षण निर्माण झाले आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. काॅलेज बरोबर सोहम काॅम्प्यूटर शिकला होता व बॅंकेच्या परीक्षा देत होता. त्याला लगेच नोकरी मिळाली. निलू आणि गायत्री सुद्धा पार्ट टाईम नोकरी करत होत्या. सोहम बॅंकेत पर्मनंट झाल्यावर निलूने लग्नाची घाई केली. त्यांची मध्यस्ती करायला ही गायत्रीच होती आणि त्यांच्या लग्नात पुढाकार घ्यायला ही तिच होती. निघून हट्टाने लग्नात आपल्या मनासारखे सगळे करून घेतले होते. निलूच्या लग्नाच्यावेळी गायत्री निलूचे सगळ्या बाबतीत मदत करत होतीच, पण निलूच्या आईला सुद्धा तिची खूप मदत झाली होती. तिच्या आदबशीर वागण्या वरून तिच्यावर चे संस्कार कळत होते. लग्नाच्यावेळी गायत्रीला नीट पाहिल्यावर, तिचे वागणे अनुभवल्या नंतर निलूच्या वडीलांना सून म्हणून ती पसंत पडली. त्यांनी आपल्या मुलाला मयुरेशला त्याबद्दल विचारले आणि निलूच्या आईचे ही मत घेतले. लगेचच गायत्रीला मागणी घातली. गायत्रीच्या घरच्यांना सुद्धा स्थळ आवडले त्यामुळे दोन महिन्यात लग्न ही झाले.

लग्नानंतर निलू एक दोन दिवसाआड नव-याबरोबर माहेरी येत असे आणि नेहमी तिला खायला काहीतरी वेगळे हवे असे. गायत्री सुद्धा आपल्या नणंद कम मैत्रिणीचे सगळे लाड पुरवत होती. दोन वर्षांनी निलू बाळंतपणासाठी आली. तिने आई आणि गायत्रीकडून सगळे लाड पुरवून घेतले. आणि त्यांनी बिन तक्रार सगळे लाड पुरवले देखील. लहान शनायाचे सगळे गायत्री हौसेने करत होतीच, पण निलूचे पण सगळे व्यवस्थित करत होती. बाळंतपणानंतर निलू आता शनाया आणि सोनमला घेऊन दर रविवारी येत होती. काहीवेळा गायत्रीचा नवरा तक्रार करत होता. “ही आली की आपल्याला बाहेर पण जाता येत नाही.” पण गायत्री त्याची समजूत काढत असे. नंतर गायत्री ला देखील मुलगा झाला. तरीही गायत्री घरचे सगळे, येणाऱ्या पाहुण्यांचे सगळे अगदी व्यवस्थित करत असे. कधीही तिच्या चेहर्यावर कंटाळा, वैताग कुणालाही दिसला नाही. कायम ती हसतमूख असायची. आणि त्यामुळे ती सगळ्यांच्या कौतुकाला पात्र ठरली होती.

क्रमशः

©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे


🎭 Series Post

View all