Login

जावे त्याच्या वंशा भाग ३ (अंतिम) सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे

जावे त्याच्या वंशा
जावे त्याच्या वंशा
भाग ३
(सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे)


निलू शरयूला घेऊन माहेरी आली आणि आल्या आल्या तिने आधी गायत्रीला कामाला लावले. “गायत्री आता मी इथे आहे तोपर्यंत काही म्हणजे काही करणार नाही. अंग मोडून आलंय माझे काम करून करून.” गायत्रीने शरयूला उचलून घेतले आणि “बरं” म्हणून चहा करायला गेली.
“आई अग दोन महिने सुचीताई आमच्याकडे होत्या. सारखी उठबसं करून करून मला अगदी वैताग आला होता.” निलू आईला सांगत होती, पण तिचा दादा मयुरेश पेपर वाचता वाचता ऐकत होता. “आणि सोहमची आई तर सारखे “सुचीला हे आवडत आज हे करू. उद्या ते करू मंदारला आवडते.” असेच करत होत्या.”
“अग, करणारच ना निलू. किती वर्षांनी त्या घरी आल्या आहेत. प्रत्येक आईलाच वाटते, आपल्या लेकीला तिच्या आवडीचे करून खायला घालावे असे.” निलूची आई म्हणाली.
“हो, त्यांना लाड करावे वाटते, पण दमछाक माझी होते त्याच काय?” निलू आईवरच चिडली.
“जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे” दादा पटकन म्हणाला. पण त्याचा अर्थ निलूला कळला नाही. आईच म्हणाली, “असू दे रे.”
“नाही, सांग दादा मला तुला काय म्हणायचे आहे?” निलू म्हणाली.
“हे बघ निलू मी स्पष्ट बोलतो. आज तुझी सुचीताई आल्यावर तुला दमछाक व्हायला लागली, तू वैतागलीस, पण हे चुकीचे नाही का? एकतर त्या इतक्या दिवसांनी माहेरी आल्या आहेत, आणि मला पक्के माहिती आहे तुझ्या सासूबाई सुद्धा तुझ्या एकटीवर कसलाच भार पडू देत नसणार. आपली आई सुद्धा कधीही एकट्या गायत्रीला कामाला लावत नाही. त्यात सुचीताई परदेशात राहिलेल्या आहेत, त्यांना स्वतःची कामे स्वतः करायची सवय आहे. मग तुला कसले इतके कष्ट पडले? तुम्ही येता तेव्हा गायत्री मात्र कधीही असे बोलली नाही. उलट तुझ्या आवडीचे सगळे तुला हौसेने करून घालते. तुला कोणतेही काम करू देत नाही. तुझी सगळी बडदास्त ठेवते. “ही दर रविवारी येते त्यामुळे आम्हाला बाहेर जाता येत नाही” म्हणालो तरी ती माझी समजूत काढते. ती स्वतः दोन दोन तीन तीन महिने माहेरी जात नाही. पण तू मात्र लग्नानंतर आत्ता कुठे तुझी नणंद भारतात आली तर तक्रार करायला सुरुवात पण केलीस? याला म्हणतात जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. पहिल्यापासूनच तुला स्वतःचे म्हणणे खरे करायची सवय आहे आणि हट्ट करायची पण. माहेरी हे सगळं चालले, सासू सासरे सोहम यांनी पण उचलून धरले. मग आता त्यांनी त्यांच्या मुलीचे लाड केले तर कुठे बिघडले?” दादा बोलला आणि निलूच्या डोळ्यातून गंगा यमुना वहायला लागल्या. पण आईनेही निलूला समजावले. मग कुठे सोहमशी भांडून आलेली निलू घरी परत जायला तयार झाली. संध्याकाळी सोहम तिला घ्यायला आल्यावर कळी एकदम खुलली.

समाप्त

©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे

🎭 Series Post

View all