शीर्षक - जावे त्यांच्या वंशा भाग २
जलदलेखन विषय - अचानक
जलदलेखन विषय - अचानक
©® सौ.हेमा पाटील.
पेशंट असलेली रश्मी आ वासून डाॅक्टरांच्या लढ्याकडे पाहत होती. वासलेला आ मिटवता पण येत नव्हता, अन् बराचवेळ आ वासलेला असल्याने जबडा दुखू लागला होता, ते सहनही होत नव्हते.
पेशंट असणाऱ्या रश्मीने आगावू माहिती दिली होती की, माझी दाढ सहजासहजी निघत नाही. त्यामुळे डॉ. सोनल यांनी हे आव्हान पेलण्यासाठी सुरुवातच दणक्यात केली होती. त्यांनी हत्याऱ्यांच्या सहाय्याने हिरडीच्या चहुबाजूंनी दाढ मोकळी करत आणली होती. आता फक्त दाढ चिमट्यात पकडायची, अन् वर ओढायची हे काम बाकी राहिले होते.
डॉक्टरांनी पक्कड हातात घेतली. एव्हाना भूलीचा अंमल कमी झाला होता. दुखण्याची जाणीव पेशंटला होऊ लागली होती. पक्कडने दात सर्वशक्तीनिशी उपटण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पेशंट जीव खाऊन ओरडली. डाॅक्टरांची झटापट थांबली.
"काय झाले? दुखतेय का?" त्यांनी रश्मीला विचारले.
" नाही. नको. माझी दाढच काढायची नाही." असे म्हणत रश्मी त्या खुर्चीवरुन उतरू लागली.
"अहो, असे कसे?बाकी सगळे झाले आहे, फक्त दाढ वर ओढायची बाकी आहे."
डाॅक्टरांना पुढे बोलू न देता रश्मी म्हणाली,
"अहो, किती दुखले मला. दाढ ओढायची म्हणताय, ती माझी दाढ आहे, क्रेनने माल उचलतात तशी जोर लावून काय उपटताय? मस्तकात कळ गेली. "
" अहो, सगळे क्लीन करुन घेतले आहे, आता फक्त थोडावेळ सहकार्य करा. दोन मिनिटात दाढ निघेल. मी पुन्हा एकदा भूलीचे इंजेक्शन देते तिथे. बसा."
" एका दाढेसाठी इतकी भूल? एवढी तर मला पोटाच्या ऑपरेशनच्या वेळी पण दिली नव्हती. "
" अहो, ती भूल फक्त तेवढ्या जागेपुरती दिली जाते. तुम्हाला वेदना होत आहेत, म्हणून परत भूल देते म्हणाले."
" नको . माझी दाढच काढायची नाही."
हे ऐकून डॉ. सोनल म्हणाल्या,
हे ऐकून डॉ. सोनल म्हणाल्या,
" तुमच्यासोबत कोण आले आहे?"
"माझ्या सासुबाई आल्या आहेत."
डॉ. सोनलनी रश्मीच्या सासुबाईंना आत बोलावले.
"बघा, एक पाच मिनिटांत दाढ काढून होईल. तुमच्या सुनबाई आता म्हणतायत, माझी दाढ काढायची नाही. मी कडेने मोकळी केली आहे, आता फक्त चिमट्याने ओढायची आहे. त्या दुखते म्हणाल्या, म्हणून अजून थोडे भूलीचे इंजेक्शन देते होते, तर त्या इंजेक्शन घ्यायला तयार नाहीत. तुम्ही सांगा ना जरा समजावून. असे अर्धवट कसे ठेवायचे दाढ काढणे? "
हे ऐकून रश्मीच्या सासुबाई म्हणाल्या,
"अशीच आहे ती. काय सांगू तुम्हाला. तुम्ही द्या बिनधास्त इंजेक्शन, अन् काढून टाका दाढ. बावळट आहे, तिला समजतेय का, ती काय बोलतेय ते. "
दाढ दुखत असतानाही रश्मी तावातावाने खुर्चीवरुन उठली व सासुबाईंना म्हणाली,
"तुमचे काय जातेय हो काढा दाढ म्हणायला. मला सोसायचेय. स्वतःला साधे इंजेक्शन घेताना पोटात गोळा येतो, अन् मला भूलीचे इंजेक्शन द्या म्हणून सांगताय? थांबा, घरी गेल्यावर यांना सांगतेच."
"जा, जा सांग जा. मी नाही भीत कुणाला. मी योग्य तेच सांगितले होते. बरोबर की नाही हो डॉक्टर? " सासुबाई म्हणाल्या. यावर डॉक्टरांनी होकारार्थी मान हलवली. ते पाहून डॉक्टरांकडे वळून रश्मी म्हणाली,
"तुम्हाला काय कळते? तुम्ही गप्प बसा हो. तुम्ही ओळखत नाही यांना. मी म्हणून टिकलेय हो त्या घरात." हे ऐकून डॉक्टर बुचकळ्यात पडल्या. भूल देऊन दाढ काढणे योग्य की अयोग्य हे डॉक्टरनाच कळत नाही? तरीही त्या आपल्या गप्प बसल्या.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
सासू- सूनेचा वाद चांगलाच रंगला होता. अर्थातच एकदा वाद सुरू झाला की, त्यांना आपण कुठे आहोत याचे भान उरत नाही. आता हा वाद कधी थांबतोय ते पुढच्या भागात पाहू.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा