शीर्षक - जावे त्यांच्या वंशा भाग ३
जलदलेखन विषय - अचानक
जलदलेखन विषय - अचानक
©® सौ.हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, सासू- सूनेचा वाद डॉक्टरांच्या केबीनमध्ये रंगला होता. दोघीही डॉक्टरांकडे लक्ष न देता आपणच कसे बरोबर हे सांगत होत्या. ते ऐकून डॉक्टरांनी डोक्याला हात लावला. तरीही दोघींचे एकमेकींवर तीर सोडणे सुरुच होते.
"काय म्हणालीस? माझ्यासारखी सासू मिळाली हे भाग्य समज तुझे. "
"हो, हो. खूपच मोठे भाग्य आहे. दिसतेय ना, सून वेदनेने तळमळतेय अन् या डॉक्टरांना सांगतायत, द्या द्या भूलीचे इंजेक्शन."हे ऐकून सासुबाईंचा पारा चढला. त्या म्हणाल्या,
"दाढ काढण्यासाठी मला सोबत म्हणून घेऊन आलीस, अन् मग ज्या कामासाठी आलो आहे ते करायला नको? बघा डाॅक्टरसाहेब, तुम्हीच सांगा मी काय चुकीचे बोललेय का?"
हे ऐकून डॉ. सोनल म्हणाल्या,
"बरोबरच बोलताय तुम्ही." हे ऐकून रश्मी अधिकच चवताळून म्हणाली,
"आता तर मी तुमच्याकडून दाढ काढून घेतच नसतेय. माझे चूक आहे असे म्हणताय!"
ही पेशंट जर दाढ काढून न घेता परत गेली, तर त्याचा आपल्या प्रोफेशनवर वाईट परिणाम होईल हे डॉ. सोनल यांना समजले. आपल्या क्लिनिक बाबत वाईट माऊथ पब्लिसिटी झाली तर कुणी फिरकणार पण नाही. त्या सासवा सुनांना काय गोंधळ घालायचा तो घालू दे. आपण पेशंटची बाजू चूक असो की बरोबर, पण उचलून धरली पाहिजे. हे विचार मनात घोळत असतानाच डॉ. सोनल रश्मीला म्हणाली,
"मॅडम, तुमचे बरोबरच आहे, दाढ काढायला आलो म्हणजे दाढ काढलीच पाहिजे असे नसते ना! नाही काढू वाटली, तर नाही काढायची." हे ऐकल्यावर सासुबाईंच्या रागाचा पारा चढला.
"होय गं डाक्टरने, बरी दिसतेयस की, दुई दलावरची. मगाशी म्हणालीस, तुमचे बरोबर आहे, अन् आता तिचे बरोबर आहे असे वाटते तुला? थांब, आता सगळ्या एरियात तुझ्याबद्दल सांगते, की इथे दाढ काढायला जाऊ नका. दाढ नाही, कुठलीच ट्रीटमेंट करायला जाऊ नका. डॉक्टरीण एकदम भंगार हाय." हे ऐकल्यावर तर डॉ.सोनलला काय करायचे ते सुचेना. सुनेला चांगले म्हणावे, तर सासूला राग येतो, अन् सासूची बाजू घेतली तर सून खवळते. या आकस्मिक आलेल्या संकटामुळे डॉ. सोनल बावरल्या.
"आई, तुम्ही बाहेर बसा." असे म्हणत डॉ. सोनलने केबीनचे दार उघडले व त्यांना हाताला धरुन बाहेर काढले. त्या स्वतः सुध्दा बाहेर आल्या.
"कसे तुम्ही रोज सहन करता हो? बापरे! काय नमुना आहे ! मानले पाहिजे तुम्हाला." डॉ. सोनल सासुबाईंना बाहेर आल्यावर म्हणाल्या. हे बोलताना त्यांनी केबीनचे दार बंद आहे ना, याची पुन्हा एकदा खात्री करुन घेतली होती.
"बघा. असे आहे. तुम्ही डोळ्याने बघितले ना? अशी कजाग बाई मी आयुष्यात बघितली नाही, पण लेकाला सांगितले तर पटत नाही हे. तो म्हणतो, तिच्या नादाला लागू नकोस. माझे मरण होते." असे म्हणत सासुबाईंनी डोळ्याला पदर लावला.
"रडू नका मावशी. शांत व्हा. मी आता आत जाते आणि तिची दाढ काढते."
डॉ. सोनल म्हणाल्या.
डॉ. सोनल म्हणाल्या.
केबीनचे दार आतून लाॅक करत डॉ.सोनल रश्मीला म्हणाल्या,
"अवघड काम आहे हो. तुम्हाला मानले पाहिजे. यांच्या हाताखाली नांदणे सोपे नाही." हे ऐकून खुश झालेली रश्मी म्हणाली,
"तुम्ही डोळ्याने पाहिले म्हणून तुमचा विश्वास बसला, नवऱ्यापुढे कितीही कथा वाचली, तरी त्याला फरक पडत नाही. त्याचा विश्वास बसतच नाही."
"बरं, आपण याविषयी नंतर गप्पा मारुयात का? दाढ काढणे गरजेचे आहे हो. नाही तर अर्धवट काम केले आहे तो भाग सुजेल. तिथे इन्फेक्शन होऊ शकते. दाढ काढायची की नाही हा निर्णय या सीटवर बसण्याआधी घ्यायचा असतो, नंतर नाही. आता प्लीज मला माझे काम पूर्ण करू द्या."
हे डॉ. सोनलचे शब्द ऐकून रश्मी मुकाट्याने आ वासून बसली. डाॅक्टरांनी खटपट करून एकदाची दाढ काढली आणि निःश्वास सोडला. एका दाढेने त्यांना ब्रह्मांड आठवले होते. आता दोघींपैकी कुणीही परत पेशंट म्हणून येणार असतील तर त्यांना अपाॅईंटमेंट द्यायचीच नाही असा डॉ. सोनल यांनी मनाशी निश्चय केला. आकस्मिक आलेल्या संकटाचा आपण सामना केला, म्हणून डॉ. सोनल यांनी स्वतःचीच पाठ थोपटली.
समाप्त. ©® सौ.हेमा पाटील.
समाप्त. ©® सौ.हेमा पाटील.
कथा आवडली तर नक्की लाईक कमेंट करा ही विनंती.