जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-55.

मल्हार आणि निर्जरा ही पात्र आज आपल्या सर्वांचा निरोप घेत आहेत. नक्की वाचा.

जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-55.

(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे,तसेच ही कथा मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे, तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही.)


 

उतावळा महाबली हातात हार घेऊन निर्जराच्या पुढ्यात उभा राहिला आणि तो हार तिच्या गळ्यात घालण्यासाठी त्याने आपले हात तिच्या डोक्याच्या दिशेने नेले.

निर्जराने गच्च डोळे मिटून घेतले. 'आता सगळं संपलं,आपल्यापुढे मृत्यू स्वीकार केल्यावाचून दुसरा पर्याय नाही.'असा विचार करून ती महाबलीच्या कमरेची कट्यार घेऊन स्वतःच्या पोटात खुपसण्याच्या तयारीतच होती.  इतक्यात बिजलीच्या वेगाने एक भाला आला आणि महाबलीच्या हातातील हार तोडून पुढे निघून गेला.

आणि अचानक सगळीकडून एकाच वेळी सैनिकांनी आक्रमण केल्यामुळे अवघा हलकल्लोळ माजला आणि निर्जराच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली.

मल्हारने विराटनगरचं सैन्य घेऊन अचानक हल्ला केला होता. महाबली निर्जराशी विवाह होणार असल्यामुळे आपल्याच धुंदीत होता. एकदा हा विवाह संपन्न झाला असता तर मग त्याचं स्वप्नं पूर्ण होणार होतं. म्हणून त्याने बाकी गोष्टीकडे तूर्तास सपसेल दुर्लक्ष केलं होतं. गेले कित्येक दिवस कडक बंदोबस्त ठेऊन त्याच्या सैन्याला मरगळ आली होती. तेही आज निश्चिन्त होते.

याच संधीचा फायदा घेत मल्हार आणि सेनापती विराटनगरच्या प्रचंड सैन्यासह चालून आले होते.

बघता बघता सगळीकडे पळापळ सुरु झाली. अवघा हलकल्लोळ माजला. सगळीकडे रणकंदन सुरु झाले. मल्हार तर वाटेत आडवा येणाऱ्याला सपासप तोडत पुढे येत होता. हातातील हार तुटून पडल्यामुळे महाबली आधीच चिडला होता. इतक्यात निर्जराने त्याच्या कमरेची कट्यार काढून घेतली आणि त्याच्याच नरडीला लावली.

आणि रागाने म्हणाली,

"आमच्याशी विवाह करायचा होता ना? आता हिम्मत असेल तर करून दाखवा. नीच महाबली! आम्ही म्हणजे तुम्हाला वाटलो तरी कोण? आम्ही निर्जरा आहोत, मल्हारच्या निर्जरा. आम्ही मनापासून त्यांना आपले स्वामी मानले आहे. आम्ही कधीच इतर कोणाच्या होऊ शकत नाही. आम्ही विवाहाला तयार झालो कारण आम्हाला तुम्हाला गाफिल ठेवायचं होतं. आमचे मल्हार आम्हाला घेऊन जायला नक्की येणार याची आम्हाला खात्री होती. आता मरणाला तयार रहा महाबली. बघा! समोर बघा. तो तुमचा काळ बनून तुमच्या दिशेने येत आहे. आता तुम्हाला साक्षात यमसुद्धा वाचवू शकणार नाही."


 

कपटी महाबली रागाने लालबुंद झाला होता. त्याच्या श्वासाची गती वाढली होती. तो यातून सुटका होण्यासाठी काहीतरी विचार करत होता. इतक्यात निर्जराचं लक्ष विचलित करण्यासाठी तो हसत हसत म्हणाला,

"ते पहा तुमच्या बंधूना आमच्या सैन्याने घेरलं आहे. आम्ही तर मरूच पण त्यांनाही घेऊन मरू."

निर्जराला महाबलीचा कावा समजला नाही आणि ती नजर फिरवून इंद्रसेनला शोधू लागली.

इतक्यात महाबलीने तिचा हात मुरगळून कट्यार आपल्याकडे घेतली. मग आपला शेला निर्जराच्या अंगावर टाकला आणि तिला उचलून पळत सुटला. हे पाहून इंद्रसेन त्यांच्या पाठोपाठ धावू लागला. पण महाबलीचे सैनिक त्याला अडथळा आणू लागले.

तोपर्यंत महाबली निर्जरालाला तळघरात घेऊन गेला आणि त्याने भद्रकाली देवीच्या पाठीमागे तिला बांधून ठेवलं. तिच्या तोंडावर  शेला गुंडाळून घट्ट बांधला आणि पुन्हा वर निघून आला.

इतक्यात इंद्रसेन सैनिकांमधून वाट काढत पुढे आला होता. त्याने महाबलीला पाहिलं आणि तो त्वेषाने त्याच्यावर चाल करून गेला.

ते पाहून महाबली घाबरून दूर पळू लागला. महाबली पुढे आणि त्याच्यापाठोपाठ नंगी तलवार घेऊन इंद्रसेन असा थरारक पाठलाग चालू होता. बघता बघता महाबली एका बंदिस्त मैदानात जाऊन पोहोचला. चारी बाजूने उंचच उंच भिंती होत्या. एका बाजूला मोठा आणि एक छोटा दरवाजा होता. पण ते सद्या आतून बंदिस्त होते. त्याला अशाठिकाणी पाहून इंद्रसेन म्हणाला,

"आता कुठे पळणार महाबली? पळा, अजून पळा. आज तुम्हाला आमच्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. हाहाहाहाहाहा! असं खूप हसू येतं ना तुम्हाला? आता हसा. हसा महाबली. आता का गप्प आहात?"


 

इतक्यात मघापासून घाबरलेला महाबली अचानक जोरात हसू लागला.

"हाहाहाहाहाहाहाहाहा!"

मरणाच्या दाढेत असतानाही हसणाऱ्या महाबलीचं हसू पाहून इंद्रसेन कोड्यात पडला.

इतक्यात तेथील मोठा दरवाजा उघडण्यात आला आणि त्यातून एक मदमस्त हत्ती चित्कार करत बाहेर आला.

महाबली म्हणाला,

"मरणाला तयार रहा इंद्रसेन. हाहाहाहाहा! तुम्ही इथं आलेला नाही, तर तुम्हाला इथं मुद्दाम आणलं गेलंय. ते मागे पहा, जिथून आपण आत आलो होतो तो मार्गही आता बंदिस्त झाला आहे. आता आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो.कुठे पळणार इंद्रसेन? तो पहा तुमचा मृत्यू चालून येत आहे. आता कसा बचाव करणार? हाहाहाहाहाहा."

इतक्यात महाबली जिथं उभा होता तो लहान दरवाजा उघडला गेला आणि महाबली त्यातून आत गेला. तो दरवाजा पुन्हा बंद झाला.

इकडे त्या मदमस्त हत्तीशी सामना करता करता इंद्रसेन गतप्राण झाला.  ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सगळ्या विराटनगरच्या सैनिकांत खळबळ माजली. ते माघारी पळू लागले.

मल्हारला काय होतय आणि काय करावं हे कळत नव्हतं. 

मल्हार धावत राजवाड्याच्या महाद्वाराशी आला आणि त्याने तो दरवाजा बंद केला.

तो सगळ्या सैनिकांना उद्देशून म्हणाला,

"अरे पळताय का भेकडासारखे? लढून मरू असं तुम्हीच म्हणाला होता ना? मग आता काय झालं. कुठे पळताय? आणि कुठवर पळाल? हा नीच महाबली तुम्हाला सुखाने जगू देईन असं तुम्हाला वाटतं का? अशक्य आहे ते. कुत्र्यामांजरासारखं जगावं लागेल आणि किडा मुंगीसारखं मरावं लागेल. त्यापेक्षा मरूया किंवा मारूया. एकदा आरपारची लढाई होऊन जाऊदे. अरे तुमचा राजा तिथं मरून पडलाय किमान त्याचा मृतदेह तरी आपल्या राज्यात घेऊन जायला हवा ना? की कोल्ही कुत्री खाउदे त्यांना? तुमची राजकुमारी त्याच्या ताब्यात आहे. तिचे लचके तोडलेले तुम्हाला चालतील का? आज राजकुमारीवर जबरदस्ती केली जाईल तर उद्या तुमच्या बायकापोरीवर. चालेल का तुम्हाला? म्हणून मर्दानो माघारी फिरा. शेपूट घालून पळून जाण्यापेक्षा वाघासारखं लढूया चला. जय भद्रकाली."

सगळ्या सैनिकांच्या डोळ्यात आता अंगार फुलला होता. सगळे अक्षरशः समोरच्या शत्रूवर तुटून पडले.

सर्वत्र तलवारी लखलखू लागल्या, रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या,रक्ताचे पाट वाहू लागले.

सिंधुमतीच्या भूमीवर रणकंदन सुरु झाले. 

अशातच मल्हार महाबलीला शोधत होता. त्याची नजर चौफेर भिरभिरत होती.

इतक्यात महाबलीने तलवार घेऊन अचानक मल्हारच्या पुढ्यात उडी ठाकली आणि म्हणाला,

"मल्हार, हाहाहाहाहाहाहा! राजकुमार मल्हार. राज्य नसलेला राजकुमार. हाहाहाहाहा! कशासाठी लढताय मल्हार? निर्जराना काय देऊ शकता तुम्ही? काय बाकी आहे तुमच्याकडे? कोण उरलंय तुमचं? ना माता-पिता, ना बंधू-भगिनी. कशाला हवंय हे राज्य? त्यापेक्षा तुम्हालाही तिकडेच धाडलं तर बरं होईल, नाही का? मरण्यास तयार रहा मल्हार. समोर तुमचा काळ उभा आहे. इंद्रसेन तुमची वाट पाहत आहेत. हाहाहाहाहाहाहा! लवकरच तुम्हालाही तिकडे धाडतो."

दोघेही एकेमेकांवर धावून आले. तलवारीच्या प्रत्येक वारागणिक लालबुंद ठिणग्या उडू लागल्या. वारावर प्रतिवार होत होता, आघात प्रतिघात सुरु होता. सुमारे अर्धा तास झाला तरी कोणीही माघार घ्यायला तयार नव्हते. दोघेही घामाने आणि रक्ताने चिंब झाले होते.

जणू दोन देहांना लालभडक शेंदूर फासला होता.

इतक्यात मेघगर्जेनेसह जोरात पाऊस सुरु झाला. सगळीकडे रक्तामुळे लालरंगाचा चिखल झाला होता.

अचानक महाबलीचा तोल गेला आणि तो पाय घसरून पडला. त्यामुळे त्याच्या हातातली तलवार दूर जाऊन पडली. समोरून मल्हार चाल करून आला आहे, हे पाहून आता आपला शिरच्छेद होणार या कल्पनेने त्याने डोळे मिटले आणि होणाऱ्या वाराची वाट पाहू लागला.

पण अद्याप मल्हारने वार केला नाही हे पाहून त्याने मान वर काढली.

तेव्हा मल्हार म्हणाला,

"घाबरू नका महाबली. आम्ही क्षत्रिय आहोत, निशस्त्र असताना वार करणं आमच्या तत्वात बसत नाही. तसेच इतकाही सोपा मृत्यू देणार नाही तुम्हाला. तुमचा अंत भयंकर असेल. तेव्हा प्रत्यक्ष मृत्यूही थरथर कापेल हा आमचा शब्द आहे."

असे म्हणून मल्हारने स्वतःची तलवार दूर फेकली आणि महाबलीला मल्लयुद्धाचं आवाहन दिलं आणि तो त्याच्यावर चालून गेला.

तोपर्यंत महाबली उठून उभा राहिला. पुढे दोघांमध्ये चौदंडी सुरु झाली. दोघेही एकमेकाच्या ताकतीचा अंदाज घेऊ लागले तेव्हा मल्हारला कळून चुकलं की महाबली त्याच्यापेक्षा ताकतीने वरचढ आहे.  त्यामुळे त्याला शक्तीपेक्षा युक्तीने चीतपट करायला हवं. 

हा विचार करत असतानाच महाबलीने मल्हारला खाली खेचला आणि त्याच्यावर कब्जा मिळवला.

मल्हारच्या मानेवर पायाचा बोजा टाकत त्याच्या मानेतला जीव काढून टाकायचा प्रयत्न करु लागला. तोवर मल्हारने पूर्ण ताकतीने त्याचा पाय पकडला आणि वरती येऊन त्याच्यावर कब्जा घेतला.

 अशी ही कुस्ती सुमारे अर्धातास चालु होती आता पुन्हा समोरासमोर कुस्ती लागली आणि मल्हारने आपला हुकमी असणारा कुंडी हा डाव  टाकला आणि काय होतय हे कळायच्या आत महाबलीची पाठ जमिनीला लावून त्याला अस्मान दाखवलं. मल्लयुद्धात महाबली पराभूत झाला. पण हार मान्य करेल तो महाबली कसला? त्याने संधी साधून आपली तलवार हाती घेतली आणि निशस्त्र मल्हारवर वार केला. महाबलीच्या या भ्याड हल्ल्यामुळे मल्हार प्रचंड संतप्त झाला. त्यानेपण आपली तलवार हाती घेतली आणि तो अक्षरशः महाबलीवर तुटून पडला. आपले महाराजसाहेब, आईसाहेब, बंधू-भगिनी यांना डोळ्यासमोर घेऊन मल्हार महाबलीवर सपासप वार करू लागला. बलाढ्य महाबलीचा त्याच्यासमोर निभाव लागत नव्हता. त्याच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारली होती.  महाबलीला त्याच्या डोळ्यात आपला मृत्यू दिसू लागला. विराटनगरच्या सैन्याने महाबलीचे सैनिक तर कधीच कापून टाकले होते. उरलेले शस्त्र टाकून पळत सुटले होते. सगळीकडे मृतदेहांचा खच्च पडला होता. मल्हारचा एक घाव महाबलीच्या उजव्या दंडावर झाला आणि त्याच्या हातातील बळच निघून गेलं. त्याची तलवार गळून पडली. पण आता मल्हार थांबणार नव्हता. समोर आपला मृत्यू दिसू लागताच महाबली त्याला म्हणाला,

"आम्हाला मारण्यापेक्षा निर्जराना वाचवणं तुमच्यासाठी जास्त गरजेचं आहे मल्हार. आम्हाला काय तुम्ही नंतरही मारू शकता, पण तोपर्यंत निर्जरा आपल्या प्राणाला मुकतील."

मल्हार भानावर आला आणि त्याने महाबलीच्या डोक्याच्या केसांना पकडून त्याला विचारलं,

"कुठे आहेत निर्जरा? लवकर सांग महाबली. नाहीतर आम्ही तुझे शीर धडावेगळे करु."

महाबली अगतिकता दाखवत म्हणाला,

"त्या तळघरात आहेत. जा लवकर सोडवा त्यांना."

हे ऐकताच मल्हार त्याला तिथंच टाकून तळघराकडे पळाला.

त्याला पळताना पाहून महाबली छदमी हसू लागला आणि तो टेकडीच्या दिशेने निघाला. इकडे मल्हार तळघरात निर्जराला शोधू लागला. पण तळघरातून खूप सारे मार्ग वेगवेगळ्या दिशेला गेल्यामुळे निर्जराला नक्की कुठे शोधावं? हे त्याला समजत नव्हतं.

एव्हाना महाबली टेकडीवर पोहोचला होता. आता पावसाने बराच जोर धरला होता आणि त्यामुळे महाबलीने अडवलेल्या नदीचे पाणी झपाट्याने वाढत होते. ते पाहून महाबलीला आसुरी आनंद झाला.

त्याच्यातील क्रूरतेने कळस गाठला होता. त्याने ज्या हेतूने तो विशाल गोलाकार दगड तिथे आणून ठेवलेला त्यावर तो अंमल करणार होता. आपल्या पूर्वनियोजनावर खूष होऊन तो मोठमोठ्याने हसू लागला.

"हाहाहाहाहाहाहा!"

 त्याने त्या विशाल दगडाला ज्या लहान दगडाने अडवून ठेवला होता, तो दगड पूर्ण ताकतीनिशी बाजूला सारला. त्यामुळे तो विशाल दगड नियोजित मार्गाने गडगडत जाऊन जिथं पाणी अडवलं होतं त्या बांधावर प्रचंड वेगाने आदळला आणि अनर्थ झाला. बांध फुटून जलशयाचा प्रचंड साठा पूर्ण वेगाने सिंधुमतीमध्ये शिरला. बघता बघता ते पाणी घरामध्ये शिरलं. घरातील बायका, लहान मुलं आणि वयोवृद्ध लोक पाण्यातून वाहून जाऊ लागले. पाण्याने आता राजवाड्याला सुद्धा घेराव घातला होता. काही कळायच्या आतच सगळे वाहून जाऊ लागले. सर्वत्र हाहाकार उडाला आणि ते पाहून महाबलीला आसुरी आनंद होऊ लागला. तो हसत हसत म्हणाला,

"निर्जरा आमच्या नाही होऊ शकत, तर आम्ही त्यांना कोणाच्याच

होऊ देणार नाही. हाहाहाहाहाहा!"

एव्हाना मल्हार निर्जराला शोधत भद्रकालीदेवीजवळ गेला, तेवढी एकच जागा आता पाहायची बाकी होती. त्याने देवीला मनोभावे नमस्कार केला. इतक्यात त्याला देवीच्या मागे काहीतरी असल्याची चाहूल लागली. त्याने तिथं जाऊन पाहिले तर निर्जराला तिथं बांधून ठेवलं होतं आणि तिच्या चेहऱ्यावर शेला गुंडाळून बांधला होता.

तो तिला सोडवू लागला.

इतक्यात नदीचं खवळलेलं पाणी तळघरात दाखल झालं होतं. मल्हारला त्याची अजिबात कल्पना नव्हती. बघता बघता ते पाणी देवीच्या गाभाऱ्यात पोहोचलं. हे पाणी कुठून आणि कसं आलंय हे मल्हारला काहीच कळतं नव्हतं. पाण्याची पातळी वेगाने वाढत होती. पण निर्जराला सोडवण्याचे त्याचे प्रयत्न चालूच होते. हळूहळू पाणी कमरेपर्यंत पाणी आलं.

ते पाहून निर्जरा म्हणाली,

"मल्हार! आम्हाला आमच्या अवस्थेवर सोडा. तुम्ही स्वतःचा जीव वाचवा. आम्हाला सोडवण्यासाठी स्वतःचा जीव का धोक्यात घालत आहात? जा तुम्ही आमचं काहीही होउदे. तुम्हाला काही झालेलं आम्हाला आवडणार नाही. ऐका आमचं."

मल्हार आपले प्रयत्न सुरु ठेवत म्हणाला,

"निर्जरा! तुम्हीच म्हणाला होता की, जगू तर सोबत जगू आणि मरु तर सोबत मरू. मग आता का आम्हाला जायला सांगता? मरणाच्या भीतीने आम्ही तुम्हाला सोडून जाऊ असं आपणांस वाटलं तरी कसं?

आता जे काही होईल ते सोबतच होईल. मरण आलं तरी बेहत्तर."

एव्हाना पाणी गळ्यापर्यंत आलं होतं. शेवटी मल्हारने निर्जराला तिथून मोकळ केलंच. पण पाणी प्रचंड वेगाने वाढत होतं. त्यामुळे यातून सहिसलामत बाहेर पडण्याची शक्यता अगदीच धुसर होती. बघता बघता सगळं तळघर पूर्णपणे पाण्यात बुडालं. मल्हार आणि निर्जरा गटांगळ्या खाऊ लागले. मल्हारने निर्जराला आपल्या पाठीवर घेतले आणि तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. पण प्राणवायू न मिळाल्यामुळे दोघेही गुदमरून गेले. आता आपला शेवट जवळ आलाय हे ओळखून त्या पाण्यातच दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि एकमेकांच्या मिठीतच शेवटचा श्वास घेतला.

क्रमशः

©® सारंग शहाजीराव चव्हाण

पुनाळ.कोल्हापूर.9975288835.

 (वाचक मित्रहो, पुनर्जन्माची स्टोरीचा हा अंतिम भाग आहे. मल्हार आणि निर्जरा या पात्रांनी आज निरोप घेतला आहे. पण सध्याच्या जन्मात तेच विरेन आणि तन्वीच्या रूपाने आपल्यासमोर असतीलच. आशा आहे इथून पुढील स्टोरीसुद्धा आपणास नक्कीच आवडेल.  स्टोरी वाचून आपला बहुमोल अभिप्राय नक्की कळवा. लाईक करा आणि शेअर करा. तसेच माझ्या इतर कथा वाचण्यासाठी मला फॉलो करा. आपलाच लेखक मित्र- सारंग चव्हाण.)








 

🎭 Series Post

View all