जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-56.

विरेन आणि तन्वीला खजान्याचं रहस्य सापडेल का?

जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-56.

(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे,तसेच ही कथा मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे, तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही.)


 

"निर्जरा! तुम्हीच म्हणाला होता की, जगू तर सोबत जगू आणि मरु तर सोबत मरू. मग आता का आम्हाला जायला सांगता? मरणाच्या भीतीने आम्ही तुम्हाला सोडून जाऊ असं आपणांस वाटलं तरी कसं?

आता जे काही होईल ते सोबतच होईल. मरण आलं तरी बेहत्तर."

एव्हाना पाणी गळ्यापर्यंत आलं होतं. शेवटी मल्हारने निर्जराला तिथून मोकळ केलंच. पण पाणी प्रचंड वेगाने वाढत होतं. त्यामुळे यातून सहिसलामत बाहेर पडण्याची शक्यता अगदीच धुसर होती. बघता बघता सगळं तळघर पूर्णपणे पाण्यात बुडालं. मल्हार आणि निर्जरा गटांगळ्या खाऊ लागले. मल्हारने निर्जराला आपल्या पाठीवर घेतले आणि तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. पण प्राणवायू न मिळाल्यामुळे दोघेही गुदमरून गेले. आता आपला शेवट जवळ आलाय हे ओळखून त्या पाण्यातच दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि एकमेकांच्या मिठीतच शेवटचा श्वास घेतला.

दोन प्रेमी एकमेकांच्या सोबतीने जगू शकले नाहीत पण मरताना त्यांना कोणीही वेगळं करू शकलं नाही. ते गेले पण पुन्हा परत येण्यासाठीच. आपलं अपूर्ण काम ते याजन्मात नक्की पूर्ण करतील."

साधू रामानंद मल्हार आणि निर्जराची म्हणजेच विरेन आणि तन्वीची गोष्ट सांगत म्हणाले. सगळेजण तल्लीन होऊन ही गोष्ट ऐकत होते.

साधू रामानंद थांबल्यावर काही विद्यार्थी त्यांना म्हणाले,

"साधूजी, महाबलीचं पुढे काय झालं? आणि त्या शिवमंदिरातील गुहेत ती चित्र कोणी काढली होती?"

साधू रामानंद पुढे म्हणाले,

"मल्हार आणि निर्जराच्या मृत्यूनंतर महाबलीने सिंधुमती आणि विराटनगर ही दोन्ही राज्य आपल्या तमिराई राज्यात विलीन करून घेतली. त्या प्रचंड जलप्रलयात सिंधुमती आणि विराटनगरमधील अर्ध्याहून जास्त लोक बुडून मेले. सगळीकडे मृतदेह पाण्यावर तरंगत होते. काही कालावधीनंतर पाणी ओसरलं. त्यानंतर महाबलीने सिंधुमतीमधील घराघरातील किमती वस्तू लुटल्या. त्याचबरोबर विराटनगराचा सगळा खजानाही लुटून नेला. हा सगळा खजाना आजही तमिराईच्या एका गुप्त भुयारात अस्तित्वात आहे. त्या गुप्त भुयारात जाण्याचा एकमेव मार्ग होता. त्या भुयारात जाण्याचा एकमेव मार्ग एका कापडी नकाशावर रेखाटलेला होता. त्या नकाशाचं वैशिष्टय म्हणजे त्यावरील मार्ग दररोज बदलत होता. नकाशावर जसा मार्ग बनलेला असायचा तसाच मार्ग प्रत्यक्षात बनायचा. त्यामुळे तो नकाशा ज्याच्याकडे असेल तोच त्या खजान्यापर्यंत पोहोचू शकणार होता. महाबलीचा कोणावरच विश्वास नसल्यामुळे तो नकाशा नेहमी आपल्या सोबत घेऊन फिरत होता. त्या नकाशातील मार्गाप्रमाणे भुयारात जाऊन महाबली दररोजची कमाई स्वतः ठेऊन येत होता. काही वर्षे हा दिनक्रम सुरु होता.

पण एकेदिवशी महाबली आपल्या स्नानगृहात स्नान करत असताना त्याने तो कापडी नकाशा आपल्या अंगरख्याजवळ काढून ठेवला आणि तो स्नान करू लागला. इतक्यात 'तुफान' कबुतर तिथे आला आणि तो नकाशा घेऊन तिथून उडाला. महाबलीने ते पाहिलं आणि तो विनाअंगरखा घालताच त्याचा पाठलाग करत निघाला.

तुफान सिंधुमतीच्या दिशेने उडत होता आणि महाबली त्याच्याकडे बघत त्याचा पाठलाग करत होता. शेवटी तुफान सिंधुमतीच्या पडक्या राजवाड्यात पोहोचला आणि तिथून तळघरातील भद्रकालीच्या मूर्तीवर जाऊन बसला. त्याच्या पाठोपाठ महाबली तिथे आला. पाठोपाठ त्याचे काही सैनिकसुद्धा तिथे दाखल झाले. त्यांच्याकडील तीरकमान घेऊन महाबलीने तुफानवर निशाणा साधला आणि त्याने तीर सोडला. तुफान तिथून खाली पडून गतप्राण झाला. महाबली तिकडे धावला, पण त्याच्याकडे तो नकाशा सापडला नाही. म्हणून तो स्वतः भद्रकालीदेवीच्या मूर्तीवर चढून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला समोर फक्त आणि फक्त तो नकाशा दिसत होता. पण भद्रकालीची मूर्ती प्रचंड मोठी होती. शेवटी तो कसाबसा देवीच्या खांद्यावर पोहोचला. पण तिथून अचानक त्याचा तोल सुटू लागला. जणू देवी कोपून जोरजोरात उसासे टाकू लागल्यासारखं वाटू लागलं. महाबलीने देवीच्या अंगावर पाय ठेवून तिची विटंबना केली होती. त्यामुळे देवी प्रचंड क्रोधीत झाली आणि देवीचा आवाज गरजला,

"मूर्ख महाबली! तुझ्या पापाचा घडा आज भरला आहे. आजवर तू खूप पाप केलीस त्याचा दंड आज मी तुला देत आहे. पण याद राख तुझं हे पाप याजन्मी फिटणार नाही. तुला याची किंमत पुढच्या जन्मीसुद्धा चुकवावी लागेल. मल्हार आणि निर्जरा पुन्हा जन्म घेतील आणि तुझा खात्मा करतील."

अस म्हणल्याबरोबरच महाबलीचा तोल गेला आणि तो तिथून खाली पडून गतप्राण झाला."

अश्विन सोडून सर्वजण टाळ्या वाजवू लागले.

"पण ती गुहेतील चित्रं कोणी काढली?" काही मुलांनी विचारलं.

"ती चित्रं राजकुमार युद्धवीरने काढली आहेत. जेव्हा महाबलीच्या आदेशानुसार त्याला जखमी अवस्थेत जंगलात फेकण्यात आलं. तिथून तो कसाबसा वाचून तिथल्या शिवमंदिरात पोहोचला. त्याला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला होता. स्वतःच्या लालसेपोटी सगळं सिंधुमतीराज्य लयास गेलं ही अपराधीपणाची भावना त्याला मरूपण देत नव्हतं. आपल्या राज्याचा सगळा इतिहास त्याने चित्राद्वारे त्या भिंतीवर रेखाटला. ज्यात आजवरच्या सगळ्या घटनांचा समावेश होता. पण मल्हार आणि निर्जराचं चित्र रेखाटत असताना ते अर्धवट असतानाच त्याच्या जखमेतून तीव्र कळा सुटल्या आणि तो तिथल्या एका भिंतीजवळ जाऊन टेकून बसला. तिथंच त्याला मृत्यू आला. मल्हार आणि निर्जराचं चित्र अपूर्ण राहिल्याने त्याचा आत्मा त्या भिंतीतच अडकून राहिला. मल्हार आणि निर्जरा पुनर्जन्म घेऊन 

ते चित्र जेव्हा पूर्ण करतील तेव्हा युद्धवीरच्या आत्म्याला मोक्ष मिळेल."  साधू रामानंद म्हणाला.

सगळेजण ही गोष्ट ऐकून अवाक झाले आणि मल्हार निर्जराविषयी एकेमकांशी चर्चा करू लागले.

इतक्यात शिंदे सर म्हणाले,

"साधूजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जरी विरेन आणि तन्वीचा पुनर्जन्म असला आणि ते आपली काळजी घेण्यास सक्षम असले तरी आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडून परत जाऊ शकत नाही. कॅम्पला घेऊन येताना मी माझ्या जबाबदारीवर त्यांना घेऊन आलो होतो. त्यामुळे त्यांना इथून सुखरूप परत घेऊन जाणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मला त्यांच्या शोधात पुढे जावंच लागेल."

सबइन्स्पेक्टर भोसले म्हणाले,

"हो सर, आम्हालाही आमची ड्युटी करावीच लागेल. शिवाय माणुसकीच्या नात्यानेही आम्ही त्यांना असं संकटात टाकून निघून जाणं पटत नाही. म्हणून आम्ही आपल्या टीमसह पुढे जाणार आहोत."

त्यापाठोपाठ वनरक्षक चौधरी म्हणाले,

"हे जंगल सांभाळण्याची आमची खूप जास्त जबाबदारी आहे. त्यामुळे इथे घडणारी प्रत्येक घटना आमच्यासाठी महत्वाची आहे. इथे काही गैरप्रकार न होता त्यांना सहिसलामत परत घेऊन जाणं हे आमचंही कर्तव्य आहे. त्यामुळे आम्हाला तर पुढे जावंच लागेल."

शिंदे सरांनी सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि ते म्हणाले,

"ठीक आहे. आपल्याला आपली कर्तव्य पार पाडण्यासाठी पुढे जावंच लागेल, पण आपल्यासोबत जे विद्यार्थी आहेत त्यांना परत तंबूकडे पाठवावं लागेल. मी त्यांचा जीव आणखी धोक्यात घालू शकत नाही. त्यामुळे आपल्या टीममधील दोन व्यक्ती त्यांच्यासोबत जाऊदेत."

बाकीचे सगळे विद्यार्थी परत जायला तयार झाले, पण अश्विन सरांना म्हणाला,

"सर,मला तुमच्यासोबत यायचं आहे. मी तुम्हाला असं सोडून माघारी जाऊ शकत नाही. शिवाय मला तन्वीची जास्त काळजी वाटतं आहे. त्या विरेनने तिच्याशी काहीतरी चुकीचं वर्तन केलं तर अनर्थ होईल सर. मला तर हे पुनर्जन्म वगैरे सगळं थोतांड वाटतं आहे. तन्वी खूप मोठ्या अडचणीत सापडली आहे सर. प्लीज मला तुमच्या सोबत येऊद्या."

शिंदे सर म्हणाले,

"अश्विन, मी तुझी काळजी समजू शकतो. पण आतापर्यंतच्या सगळ्या घटना आणि साधूजींनी सांगितलेली गोष्ट लक्षात घेता, माझा अनुभव मला हे सांगत आहे की,'विरेनकडून तन्वीला कसलाही धोका नाही.' त्यामुळे तू निश्चिन्तपणे परत जावंसं अशी माझी तुला सूचना आहे."

अश्विन सरांना पुन्हा भरीस घालत म्हणाला,

"सर प्लीज! माझी काळजी समजून घ्या."

शिंदे सर त्याला नकार देत म्हणाले,

"अश्विन तुला फक्त तन्वीचीच नाही तर सगळ्या विध्यार्थ्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे मी काय सांगतोय ते नीट लक्ष:पूर्वक ऐक. तुम्ही आता परत तंबूकडे जा आणि तिथे पोहोचल्यावर तिथल्या प्रोफेसर्सना सगळ्या विध्यार्थ्यांना घेऊन परत कॉलेजकडे निघायला सांग. तसेच तन्वी आणि विरेन यांच्या घरी थोडीफार कल्पना देण्यात यावी. पण 'आम्ही त्यांना लवकरच शोधून काढू,' असा विश्वास त्यांना देण्यात यावा. पण कृपया ही बातमी कोणीही मीडियापर्यंत पोहोचू देऊ नका. ते विनाकारण आगीत तेल ओतण्याचं काम करतील. चला तुम्ही लवकरात लवकर निघा. काळजी घ्या. सगळे सोबत रहा."

मनात नसतानाही नाईलाजाने सगळ्यांबरोबर अश्विनलाही परत जावे लागले. सगळे विध्यार्थी परतीच्या मार्गांवर लागताच शिंदे सर, सबइन्स्पेक्टर भोसले आणि वनरक्षक चौधरी आपल्या टीमसहित विरेन आणि तन्वीच्या शोधात पुढे निघाले.

*********************************************

इकडे विरेन आणि तन्वी त्रिशूल घोड्यावर स्वार होऊन राजवाड्याच्या आवारात पोहोचले. तिथली हवा बाहेरच्या हवेच्या तुलनेत अतिशय थंड होती. सगळीकडे धुक्याचं साम्राज्य पसरलं होतं. त्यात राजवाडा अतिशय भयावह आणि आक्राळविक्राळ वाटत होता. आजूबाजूला वडाची वाढलेली झाडं अजस्त्र दिसत होती. त्यावरून जमिनीकडे झुकलेल्या पारंब्या जणू चेटकीणीच्या जठाच भासत होत्या. तर जमिनीवरून राजवाड्याच्या पडक्या भिंतीवर चढलेल्या वेली जणू अजगरासारख्या दिसत होत्या. अशातच वाहणाऱ्या वाऱ्यामुळे जमिनीवरचा सुकलेला पाला हवेत उडत होता आणि त्यामध्ये वेगवेगळ्या आकृत्या दिसत होत्या.

 विरेनच्या डोळ्यापुढून गतजन्मीच्या सगळ्या घटना वाहू लागल्या आणि विरेनला गहिवरून आलं. नकळत त्याचे डोळे ओले झाले. स्वतःच्या भावना आवरत विरेन आणि तन्वी जसजसे पुढे जातील तसतसे वाहणाऱ्या हवेचा वेग वाढू लागला होता. पण साधूंनी सांगितल्याप्रमाणे त्रिशूलवर स्वार असल्यावर त्यांना काही धोका नव्हता. त्यामुळे दोघांनी पुढे जाणं सुरूचं ठेवलं. इतक्यात त्यांना तळघरात जाणाऱ्या पायऱ्या दृष्टीस पडल्या. इथून पुढे घोडा नेणं अशक्य असल्यामुळे त्यांनी घोड्यावरून खाली उतरायचं ठरवलं.

विरेन म्हणाला,

"तनु! इथून खाली तळघर आहे. आपल्याला या पायऱ्यांवरून खाली जायला हवं."

तन्वी तिकडे पाहत म्हणाली,

"हो विरु!मलाही सगळं नीट आठवतंय. इथून खाली गेल्यावर भद्रकालीच मंदिर आहे."


 

विरेन म्हणाला,

"आता आपल्याला त्रिशूलला इथेच सोडून खाली जायला हवं. त्यामुळे आता आपल्यापुढे खरं आव्हान आहे."

तन्वी त्याला विश्वास दाखवत म्हणाली,

"विरु! आपल्याकडे ही दिव्य मशाल असताना घाबरण्याचं कारण नाही."

विरेन म्हणाला,

"तन्वी! प्रश्न घाबरण्याचा नाही. तर आपल्याला आपल्या कामात यश मिळण्याचा आहे. गतजन्मातही आपल्याला कोणाची भीती नव्हती. पण शेवटी आपल्या हातात हारच पडली ना! म्हणून मला थोडी चिंता सतावत आहे. आई भद्रकालीने यावेळी आपल्या पाठीशी राहिलं पाहिजे."

तन्वी त्याला आश्वस्त करत म्हणाली,

" तू काळजी करू नको. यावेळी सगळं नीट होईल. चल आता ती मशाल हाती घेऊन तळघरात जाऊ."

विरेनने मशाल आपल्या हाती घेऊन पेटवली आणि ते घोड्यावरून खाली उतरले. इतक्यात जोराचा पाऊस सुरु झाला. आता ते जसे त्रिशूलपासुन दूर जात होते, तसतसा पावसाचा जोर वाढत होता. पावसाबरोबरच त्याच्या मदतीला वादळी वारा आला होता. जणू काही शक्ती एकत्र येऊन ती मशाल विझवण्यासाठीच प्रयत्न करत होत्या. पण ती मशाल अशी विझणारी नव्हती. त्यामुळे त्या शक्ती वेगवेगळ्या युक्त्या वापरून त्यांना भद्रकालीकडे जाण्यापासून रोखू पाहत होत्या.

पण विरेन आणि तन्वीची त्यादिशेने वाटचाल सुरूच होती.

पण इतक्यात अचानक विरेनच्या पायात काहीतरी अडखळलं आणि तो तोल जाऊन त्या पायरीवरून गडगडत खाली गेला. या सगळ्यामध्ये त्याच्या हातातून ती मशाल दूर जाऊन पडली आणि त्याच क्षणी विरेन आणि त्या मशालीच्या मध्ये एक दगडी भिंत तयार झाली. विरेन दिशेनासा झाला. तन्वी ती मशाल आपल्या हाती घेण्यासाठी पुढे सरसावत असताना अचानक पावसाचं पाणी वाढल्यामुळे ती मशाल पुढे पुढे वाहत चालली होती. काही केल्या तन्वीच्या हाताला ती मशाल लागत नव्हती.

तन्वीला ती मशाल मिळवण्यात यश येईल का?

भिंतीच्या आड बंदिस्त झालेल्या विरेनची सुटका कशी होणार?

दोघे भद्रकालीजवळ पोहोचतील का?

पुढे नक्की काय घडेल हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा, "जिवलगा"


 

क्रमशः

©® सारंग शहाजीराव चव्हाण

पुनाळ.कोल्हापूर.9975288835.

🎭 Series Post

View all