जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-58.

झुडपाच्या आड काय दिसलं असेल? नक्की वाचा.

जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-58.

(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे,तसेच ही कथा मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे, तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही.)


 

विरेन म्हणाला,

"तनु, काय असेल गं याच्या आतमध्ये? खोलून पाहूया कि नको?"

तन्वी विचार करत म्हणाली,

"त्यामध्ये काही शापित वस्तू किंवा आपली अडचण वाढवणारी गोष्ट नसेल ना?"

विरेनने एक मोठा श्वास घेतला आणि तो म्हणाला,

"आता जे असेल ते असेल. ही पेटी उघडून बघावीच लागणार आहे. जो होगा देखा जायेगा."

असं म्हणून त्याने ती पेटी उघडली आणि त्याचबरोबर त्याच्या हाताला एक जोराचा झटका बसला. त्याच्या हातातून ती पेटी थोडी दूर जाऊन पडली.

ते पाहून तन्वी आणि विरेन दोघांनाही धक्काच बसला. ते दोघेही लक्ष:पूर्वक त्या पेटीकडे बघू लागले. त्यातून एक प्रखर प्रकाश बाहेर पडत होता. पण हळूहळू तो प्रकाश मंद होत गेला.

आता त्यातली वस्तू नजरेस पडू लागली, म्हणून विरेन आणि तन्वी तिकडे निरखून पाहू लागले.

विरेन तन्वीकडे पाहून म्हणाला,

"तनु आपण त्यात काय आहे ते पहावं का?"

तन्वी थोडा विचार करून म्हणाली,

"नको! पाहिलंस ना त्याला हात लावल्यावर कसा जोराचा झटका बसला! मग पुन्हा तसंच काहीसं झालं तर?"

विरेन तिला विश्वास दाखवत म्हणाला,

"तनु त्या वस्तूचं तेज आता पूर्णपणे कमी झालं आहे. त्यामुळे मला वाटतं कि, आता त्याला हात लावल्यावर काही होणार नाही."

तन्वी काळजीने म्हणाली,

"हो. पण मला काळजी वाटते विरु. तुला काही झालं तर?"

विरेन म्हणाला,

"काळजी करू नको. सगळं ठीक होईल."

मग हळूहळू पुढे जाऊन विरेनने अत्यंत धाडसाने ती वस्तू आपल्या हातात घेतली आणि पाहिलं तर ते एक मुलायम उंची वस्त्र होतं.

ते पाहतं तो म्हणाला,

"अगं तनु, हे तर एक वस्त्र आहे. पण एक वस्त्र इतक्या सुरक्षितपणे जपून का ठेवलं असेल. अशी वस्त्र तर हल्ली सहज मिळू शकतात."

तन्वी म्हणाली,

" विरु, हे वस्त्र वाटतं तितकं साधं नसावं. यामागे काहीतरी रहस्य नक्की असणार आहे. त्याशिवाय आपल्याला इतका जोराचा झटका का बसेल?"

विरेन तिला दुजोरा देत म्हणाला,

"हो तन्वी,तसंच असावं. आपण हे उघडून पाहूया म्हणजे कळेल."

विरेनने अलगदपणे ते वस्त्र उघडायला सुरवात केली, म्हणून तन्वीही उत्सुकतेने तिकडे पाहू लागली.

पूर्ण वस्त्र उघडल्यावर त्यावर काहीतरी डिझाईन दिसून येत होतं म्हणून विरेन तन्वीला म्हणाला,

"तनु, हे पाहिलंस का? हे कशाचं डिझाईन असेल?"

तन्वी म्हणाली,

"नक्की सांगता येणार नाही, पण मला वाटतं यात काहीतरी संदेश असावा किंवा हा सिंधुमतीचा ध्वज असावा."

विरेन म्हणाला,

"नाही! सिंधुमतीचा ध्वज वेगळा होता. मला तर हा कशाचातरी नकाशा असावा असं वाटतंय."

तन्वी म्हणाली,

"हो का! पण हा कशाचा नकाशा असेल? आणि आपल्याच हाती हा नकाशा का लागला असेल?"

विरेन म्हणाला,

"तनु, एक मिनिट. तुझ्या लक्षात येतंय का? आपल्याला साधू रामानंदानी 'भद्रकालीच्या मंदिरात नक्की जा' म्हणून सांगितलं होतं. कदाचित त्याचं कारण हा नकाशा तर नसेल ना?"

तन्वी म्हणाली,

"हो मलाही तसंच वाटतं आहे."

विरेन म्हणाला,

"पण हा नकाशा कशाचा आहे? आणि याचा आपल्याला कसा उपयोग होणार? हे आपल्याला काहीच माहित नाही."

तन्वी म्हणाली,

"हे बघ विरु. आपल्याला नियती इथंवर घेऊन आली आहे म्हणल्यावर इथून पुढेही तिच घेऊन जाईल. त्यामुळे आपण फक्त ती घेऊन जाईल तिकडे जायचं. बस्स! तू आता जास्त विचार करू नको."

विरेनला तन्वीचं बोलणं पटलं आणि त्याने तो नकाशा आपल्याजवळ जपून ठेवला.

थोड्या वेळानंतर तो तिला म्हणाला,

"तनु,माझ्या मनात एक गोष्ट आली आहे. बोलू का?"

तन्वी म्हणाली,

"अरे! विचारायचं काय त्यात! बोल जे बोलायचं ते."

विरेन म्हणाला,

"तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? काय करू शकतेस माझ्यासाठी?"

तन्वी म्हणाली,

"खूप प्रेम आहे. अगदी जीवापाड! मी तुझ्यासाठी जीव देऊही शकते आणि घेऊही शकते."

विरेन म्हणाला,

"आणखी काय करू शकतेस? मी जे मागीन ते देऊ शकतेस का?"

तन्वी विचार करत म्हणाली,

"जीवापेक्षा मोठं काय असतं? अय हॅलो तुला नक्की काय म्हणायचं आहे? काय मागणार आहेस माझ्याकडे? हे बघ इथे आपण दोघेच आहोत म्हणून तू माझ्याबाबतीत काही वेगळा विचार करत असशील तर सांगून ठेवते हा! अजिबात तसा विचारही मनात आणू नको. प्रेम आहे म्हणून काहीही करणाऱ्यातली मी नाही. समजलं!"

विरेन वैतागून म्हणाला,

"अगं ये! गप्प बस. देवाने तोंड दिलंय म्हणून काहीही बोलत सुटशील का? माझ्या मनात बाकी कोणताही विचार नाही. आणि जरी तुझ्या मनात तसा काही विचार आला तरीही मी तसा वागू शकत नाही. त्यामुळे माझं म्हणणं आधी ऐकून घे आणि मग स्वतःच डोकं चालव."

तन्वी कपाळावर आठ्या आणत म्हणाली,

"अय हिरो! तुला काय म्हणायचं आहे, माझ्या मनात तसले विचार आहेत."

विरेन म्हणाला,

"हो! तुझ्याच सुपीक डोक्यात ते विचार आलेत ना? मी तर काहीतरी वेगळंच सांगणार होतो. पण जाऊदे, तुझ्यापर्यंत माझ्या भावना कधीच पोहोचणार नाहीत."

तन्वी म्हणाली,

"तुला काय म्हणायचं आहे मला डोकं नाही का?"

विरेन म्हणाला,

"डोकं आहे, पण त्यापेक्षाही तोंड जास्त आहे. किती ती वायफळ बडबड करतेस! समोरच्याच ऐकून घेत जा ना कधीतरी."

तन्वीला प्रचंड राग आला आणि ती रागाने तिथून निघून जाऊ लागली,

"मी जातेच इथून. मला नाही तुझ्याबरोबर कुठे जायचं. मी एकटी समर्थ आहे."

इतक्यात विरेनने पाठीमागून तिचा हात पकडला आणि तिला मागे खेचत तो म्हणाला,

"तनु, मी तुझ्याकडे हेच मागणार होतो."

आणि तो तिच्या हाताकडे पाहू लागला.

"मला तुझा हात आयुष्यभरासाठी माझ्या हातात हवा आहे. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. करशील माझ्याशी लग्न?"

विरेन तिच्या डोळ्यात बघत म्हणाला.

तन्वीला क्षणभर काहीच सुचत नव्हतं. नकळत तिच्या गालावरून दोन अश्रू ओरंगाळत येऊन खाली पडणार इतक्यात विरेनने ते अलगद झेलले आणि तो म्हणाला,

"हे अश्रू कोणत्याही मोत्याहून कमी नाहीत. यांना असे वाया नको घालवू. अनमोल आहेत ते!"

तन्वी म्हणाली,

"विरु, किती कमी वेळात आपण किती जवळ आलो आहोत! कॅम्पला येण्यापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती किती वेगळी आहे!"

विरेन म्हणाला,

"हो ना तनु! या कॅम्पने आपल्या आयुष्याला एक वेगळच वळण मिळालं आहे. नियती आपल्याला कुठून कुठे घेऊन आली आहे! हे सगळं खूपच चमत्कारिक आहे. आपला गतजन्म आणि मग आपला पुनर्जन्म सगळं कसं स्वप्नवत भासत आहे. पण हे स्वप्नं नसून वास्तव आहे. आपण जन्मोजन्मी एकमेकांचे होतो, आताही आहोत आणि भविष्यातही असू. म्हणूनच मला असं वाटतं आहे कि,आपण इथेच या भद्रकालीसमोर आता लग्न करावं आणि गतजन्मीची आपली झालेली ताटातूट कायमची भूतकाळात जमा करावी. या जन्मात आपलं मिलन होणं हे तर विधिलिखित आहे. मग आता आणखी उशीर नको."

तन्वी त्याचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेऊन म्हणाली,

"विरु, मला मान्य आहे कि,तुझं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे. तसच माझंही तुझ्यावर प्रेम आहे. गतजन्मी आपण एक होऊ शकलो नाही. म्हणून या जन्मी आपली अधुरी इच्छा, आपली अधुरी कहाणी पूर्ण करावी. आपण भद्रकालीदेवीसमोर लग्न करावं. पण मला सध्याचा काळ आणि वेळ त्यासाठी योग्य वाटत नाही. अजून आपलं करियर झालं नाहीये. आपल्याला आपलं शिक्षण पूर्ण करावं लागेल आणि सगळ्यात इम्पॉर्टन्ट गोष्ट ही आहे कि, दोघांच्याही घरातून आपल्या लग्नाला राजीख़ुशीने होकार मिळाला पाहिजे. आपली फॅमिली आपल्यासोबत हवी. मी कितीही स्ट्रेटफॉरवर्ड असले तरी आयुष्यातील एवढा मोठा निर्णय मी परस्पर घेऊ शकत नाही. त्यामुळे मी सध्या या लग्नासाठी तयार नाही. मला माफ कर."

विरेन म्हणाला,

"अगं वेडी आहेस का? माफी कसली मागतेस! अगं तुझ्या या विचारसरणीमुळे माझ्या मनात तुझं स्थान अजूनच उंच झालं. मला तुझ्यासारखीच लाईफ पार्टनर नाही तर तूच हवी आहेस."


 

तन्वी त्याच्या डोक्यावर टपली मारत म्हणाली,

"पागल."

विरेन म्हणाला,

"तनु, आता आपल्याला परत गेलं पाहिजे. कॅम्पवर सर्वांनी काय गोंधळ घातला असेल कोणास ठाऊक? सगळेजण आपल्याला शोधत असतील. आपल्या घरी समजलं असेल तर ते लोकही आपल्या काळजीने व्याकुळ झाले असतील. आपल्याला आपण गतजन्मीचे प्रेमी आहोत हे समजलं आहे. कदाचित नियती ही गोष्ट इथंवरच थांबवणार असेल. गतजन्मीची आपली अधुरी कहाणी आपलं लग्न झाल्यावर पूर्ण होईल आणि या पुनर्जन्मावर पडदा पडेल."

तन्वी थोडासा विचार करून म्हणाली,

"हो, पण त्या नकाशाचं काय करायचं?"

विरेन म्हणाला,

"तूच म्हणालीस ना! कि नियती आपल्याला घेऊन जाईल. मग सोडू सगळं नियतीवरच."

तन्वी म्हणाली,

"हो. बरोबर आहे. चल आधी इथून बाहेर पडू."

दोघांनीही भद्रकाली देवीला मनःपूर्वक नमस्कार केला आणि तिचा निरोप घेऊन ते तिथून बाहेर पडले.

बाहेर त्रिशूल घोडा तैनातच होता.

दोघे त्यावर स्वार होऊन परतीच्या मार्गाने निघाले. पण अचानक त्रिशूल भलत्याच दिशेला धावू लागला. विरेन आणि तन्वी त्याला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते, पण त्याची घोडदौड सुरूच होती. 

त्रिशूलने एव्हाना बरेच अंतर कापले होते. इतक्यात एकेठिकाणी जाऊन तो अचानक थांबला.

तन्वी आणि विरेन एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते, इतक्यात त्यांना थोड्या अंतरावर काहीतरी असल्याची चाहूल लागली. ते दोघंही घोड्यावरून खाली उतरले आणि त्यांनी थोडं पुढे चालत जाऊन झुडपाआडून डोकावलं तर त्यांना जे दृश्य दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते तिथं मटकन खाली बसले. समोरील दृश्य अत्यंत भयानक होतं.



 

विरेन आणि तन्वी यांनी काय पाहिलं असेल?

अशी कोणती धक्कादायक गोष्ट समोर आली असेल?

पुढे नक्की काय घडेल?हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा, "जिवलगा"


 

क्रमशः

©® सारंग शहाजीराव चव्हाण

पुनाळ.कोल्हापूर.9975288835.


 

(कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, तसेच माझ्या इतर कथा वाचण्यासाठी मला फॉलो करा.)

||साहित्यचोरी हा गुन्हा आहे||

🎭 Series Post

View all