जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-59.

अश्विनला शिक्षा होईल कि नाही?

जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग- 59.

(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे,तसेच ही कथा मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे, तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही.)


 

बाहेर त्रिशूल घोडा तैनातच होता.

दोघे त्यावर स्वार होऊन परतीच्या मार्गाने निघाले. पण अचानक त्रिशूल भलत्याच दिशेला धावू लागला. विरेन आणि तन्वी त्याला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते, पण त्याची घोडदौड सुरूच होती. 

त्रिशूलने एव्हाना बरेच अंतर कापले होते. इतक्यात एकेठिकाणी जाऊन तो अचानक थांबला.

तन्वी आणि विरेन एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले, इतक्यात त्यांना थोड्या अंतरावर काहीतरी असल्याची चाहूल लागली. ते दोघंही घोड्यावरून खाली उतरले आणि त्यांनी थोडं पुढे चालत जाऊन झुडपाआडून डोकावलं तर त्यांना जे दृश्य दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते तिथं मटकन खाली बसले. समोरील दृश्य अत्यंत भयानक होतं.

ते पाहून तन्वीच्या तोंडून काहीतरी निघणार इतक्यात विरेनने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि आपल्या ओठांवर बोट ठेवून तिला शांत राहण्याची खुण केली. तशी तन्वी गप्प झाली. विरेनने आजूबाजूच्या परिसराचं बारकाईने निरीक्षण केलं. तर त्याच्या लक्षात आलं कि इथे जास्तवेळ थांबण्यात धोका आहे, म्हणून त्याने तन्वीला तिथून निघण्याचा इशारा केला. त्याचबरोबर दोघेही त्रिशूल घोड्यावर स्वार झाले आणि तिथून हळूच बाहेर पडले. थोड्याच वेळात एका सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यावर तन्वी विरेनला म्हणाली,

"विरु! आपण पाहिला तो नक्की काय प्रकार आहे? माझा तर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही."

विरेन गंभीर मुद्रेने म्हणाला,

"तनु! आपण जे काही पाहिलं त्यावरून एकच गोष्ट लक्षात येते कि आपलं याठिकाणचं काम अजून इतक्यातच संपलेलं नाही. नियतीच्या मनात काहीतरी वेगळं आहे."

तन्वी त्याला म्हणाली,

"पण मग आपण तिथून परत का निघालो आहोत? आपण तिथं थांबून काहीतरी करायला हवं होतं ना?"

विरेन म्हणाला,

"तनु आपल्याला नक्कीच काहीतरी करायला हवंय. पण सध्याची वेळ त्यासाठी योग्य नाही. शिवाय आपल्याकडे कोणतंही असं साधन नाही जेणेकरून आपण त्याद्वारे काहीतरी करू शकू. म्हणून सद्या इथून निघून जाणंच योग्य आहे."

तन्वी आश्चर्याने म्हणाली,

"विरु हे तू बोलतो आहेस? माझा तर विश्वासच बसत नाहीये. अरे मी आजवर तुला समोर आलेल्या परिस्थितीशी दोनहात करताना बघत आली आहे. मग आज हे तुझं असं वागणं तुझ्या स्वभावाशी विसंगत वाटतं आहे. तू तोच विरेन आहेस ना ज्याने आजवर कधीच माघार घेतली नव्हती?"

विरेन त्रिशूलचा लगाम खेचून त्याला थांबवत म्हणाला,

"तनु, मी तोच विरेन आहे. माझ्यात तीळमात्रही बदल झाला नाही. पण सद्याची परिस्थिती वेगळी आहे. यावेळी आपल्याला बाकी बऱ्याच गोष्टींची आवश्यकता भासणार आहे. त्याविना आपल्याला काहीच करता येण्यासारखं नाही. प्रसंग बांका आहे म्हणून संयम राखून, निश्चित योजना आखून मगच या प्रकरणात आपण काहीतरी हालचाल करू शकतो."

तन्वी विचार करत म्हणाली,

"म्हणजे आता आपण काय करायचं?"

विरेन तिला समजावत म्हणाला,

"तनु, सगळ्यात आधी आपल्याला परत कॅम्पवर जावं लागेल. तिथं काय गोंधळ झाला असेल काय माहित! आपल्या अशा अचानक गायब होण्यामुळे सगळ्यांनाच खुप सारे प्रश्न पडले असतील. घरच्यांची तर अवस्था काय झाली असेल याचा विचारही करवत नाही."

तन्वी म्हणाली,

"हो रे विरु. या सगळ्या घडामोडीत आपल्याला आपल्या पाठीमागील लोकांचा विचार करायलाही फुरसत मिळाली नाही. सगळ्या घटना इतक्या फास्ट आणि विचित्र घडत गेल्या कि बाकी कशाचंच भान उरलं नाही. आईबाबांचं तर खूप वाईट हाल झालं असेल. आपण लवकरात लवकर कॅम्पवर जाऊन घरी परतलं पाहिजे."

विरेनही काळजीने म्हणाला,

"मलाही माझ्या घरच्यांची खूप चिंता वाटतं आहे. त्यांना हे कोणत्या प्रकारे समजलं असेल? आणि त्यांनी काय समजूत करून घेतली असेल ते देव जाणे."

तन्वीला काहीतरी आठवलं आणि ती एकदमच चिडून म्हणाली,

"मला त्या अश्विनलाही चांगलीच अद्दल घडवायची आहे. त्याने माझ्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्याने मला दरीत ढकलून दिलं. याची त्याला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. सोडणार नाही मी त्याला. मुलींची अब्रू काय उघड्यावर पडली आहे का? कोणीही लुटायचा प्रयत्न करायला."

विरेन म्हणाला,

"हो तनु. त्याच्या कृत्याची शिक्षा त्याला नक्कीच मिळेल."

तन्वी म्हणाली,

"हो विरु!  पण आज जे काही पाहिलं त्याबद्दल आपण कॅम्पवर गेल्यागेल्या शिंदे सरांना सांगू आणि पोलीस तसेच फ़ॉरेस्ट डिपार्टमेंटचं सहाय्य घेऊन तिकडे परत जाऊ आणि त्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावू."

विरेन म्हणाला,

"नाही नाही. तनु याबाबत अद्याप कोणालाच काही सांगून चालणार नाही. त्याचं कारण मी तुला नंतर सांगेन. पण हा विषय तूर्तास फक्त आपल्या दोघांपूरताच मर्यादित असूदेत. माझ्या डोक्यात एक योजना आहे. त्यानुसार आपल्याला अंमल करावा लागेल. तो मी तुला नंतर सांगेनच. पण तोपर्यंत आपण कुठेही त्याची वाच्यता करून चालणार नाही. अगदी आपल्या घरीही नको."


 

तन्वी म्हणाली,

"ठिक आहे विरु. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे,तू म्हणशील तसंच करू."


 

विरेनने आता घोड्याला टाच मारली आणि घोडा साधू रामानंदांच्या आश्रमाच्या दिशेने निघाला.

*************************************

इकडे सगळ्या विद्यार्थ्यांना कॅम्पकडे माघारी पाठवून शिंदे सर, सब इन्स्पेक्टर भोसले आणि वनरक्षक चौधरी आपल्या पथकासह पुढे मार्गक्रमण करत होते. तर विरेन आणि तन्वी त्याच दिशेने परत येत होते.

आणि एकेठिकाणी आल्यावर विरेन आणि तन्वी यांना कोणाचीतरी चाहूल लागली. मग त्यांनी अत्यंत सावधपणे एका झुडपाआड त्रिशूलला उभा करून तिथून बारकाईने निरीक्षण करू लागले.

सुरवातीला फ़ॉरेस्ट डिपार्टमेंट आणि पोलिस पथक पाहून विरेन म्हणाला,

"तनु, ते बघ. फ़ॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर पोलीस पथक काहीतरी शोधत आहे. आपण त्यांच्या नजरेस पडायला नको,नाहीतर ते काहीतरी वेगळा समज करून घेतील. त्यापेक्षा ते पुढे निघून गेल्यावर आपण इथून पुढे जाऊ."


 

तन्वी म्हणाली,

"पण हे कशाच्या शोधात आहेत? कदाचित हे आपल्याला तर शोधत नसतील ना?"


 

विरेन म्हणाला,

"आपण दरीत पडून इकडे आलोय हे त्यांना कसं समजेल? त्यामुळे मला ती शक्यता वाटत नाही."


 

तन्वी म्हणाली,

"अरे पण आपण या पोलिसांची मदत घेऊन इथून बाहेर पडू शकतो. ते लवकरात लवकर आपल्याला कॅम्पपर्यंत पोहोचवतील. असं मला वाटतं."

विरेन म्हणाला,

"अजिबात नाही. आपल्याला एवढ्या घनदाट जंगलात दोघांनाच बघून ते हजार प्रश्न विचारतील. त्यांच्या मनात आपल्याबद्दल शंका निर्माण होईल. त्यापेक्षा आपण त्यांच्या परस्परच कॅम्पपर्यंत जाऊ. माझा कोणावरच विश्वास नाही उरला तन्वी. अश्विनसारखा मित्र तुझ्याशी असं वागू शकतो, मग बाकी जगाकडून आपण चांगुलपणाची अपेक्षा कशी करू शकतो!"

तन्वी त्याचं म्हणणं मान्य करत म्हणाली,

"ठिक आहे विरु. तू म्हणशील तसं करू."

इतक्यात तन्वीला शिंदे सर दिसलें आणि ती अत्यानंदाने म्हणाली,

"विरेन! ते बघ त्यांच्यासोबत आपल्या शिंदे सरांसारखं कोणीतरी आहे."

विरेन बारकाईने पाहू लागला आणि म्हणाला,

"तनु, बहुतेक ते आपले शिंदे सरच आहेत. तू म्हणते ते बहुतेक बरोबर आहे. ते आपल्याच शोधात इकडे आले असावेत."

तन्वीच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आणि ती म्हणाली,

"विरु, चल आता आपण त्यांच्यासमोर जाऊया. ते पुढे निघून गेले तर आपली चुकामुक होऊ शकते."

विरेन म्हणाला,

"हो तनु, चल आपण त्यांच्याकडे जाऊया."

असं म्हणून ते घोड्यावरून तिकडे सरांना हाका मारत जाऊ लागले,

"शिंदे सर ssssss, शिंदे सर sssssss, ओ सर sssssss, शिंदे सर ssssss."

शिंदे सरांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर त्यांना तन्वी आणि विरेन त्यांना हाका मारत तिकडे येताना दिसलें आणि त्यांना सुखद धक्काच बसला.

 ते आनंदाने तिकडे धावतच सुटले. आता ते एकमेकांच्या अगदी जवळ पोहोचले होते. सरांच्या जवळ जाताच विरेन आणि तन्वी घोड्यावरून खाली उतरले आणि शिंदे सरांच्या जवळ जाऊन त्यांना वाकून नमस्कार केला. शिंदे सरांनी दोघांना दंडाला धरून वर उठवलं आणि दोघेही सुरक्षित असल्याची खात्री केली. ते म्हणाले,

"तन्वी आणि विरेन, तुम्ही दोघे ठीक आहात ना? तुम्हाला काही इजा तर झाली नाही ना? इतके दिवस कुठे होता?"

सरांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यावर तन्वी म्हणाली,

"सर आम्ही सध्या ठीक आहोत. पण आम्ही इकडे आहोत हे तुम्हाला कसं समजलं? कोणी सांगितलं तुम्हाला?"

इतक्यात भोसले आणि चौधरीसह सगळी टीम तिथं पोहोचली.

शिंदे सरांनी घडलेला सगळा वृतांत तन्वी आणि विरेनला सांगितला.

ते ऐकून तन्वी म्हणाली,

"काय! अश्विनने तुम्हाला असं सांगितलं? हा नीचपणाचा कळस आहे. विरेन माझ्याशी काहीच चुकीचं वागला नाही. उलट अश्विननेच माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, इतक्यात विरेन मला वाचवण्यासाठी तिथे आल्यावर अश्विनने मला दरीत फेकून दिलं. मग विरेननेच जीवाची बाजी लावून मला वाचवलं."

सबइन्स्पेक्टर भोसले म्हणाले,

"ओह आय सी! असं आहे तर!"

विरेन म्हणाला,

"हो सर, तन्वी म्हणाली ते अगदी बरोबर आहे. आमच्यावर जी काही परिस्थिती ओढवली, त्यासाठी अश्विनच जबाबदार आहे."

तन्वी म्हणाली,

"हो! आणि त्याबद्दल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे."

सबइन्स्पेक्टर भोसले म्हणाले,

"आता तुम्ही जे काही सांगितलं, तोच जबाब पोलीसस्टेशनमध्ये गेल्यावर द्या. नक्कीच अश्विनवर कठोर कारवाई केली जाईल."

वनरक्षक चौधरी म्हणाले,

"आम्हालाही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. पण सद्या आपण इथून बाहेर पडणं जास्त इम्पॉर्टन्ट आहे. चला लवकरात लवकर आपण इथून बाहेर पडूया."

शिंदे सर म्हणाले,

"तन्वी आणि विरेन, आम्ही तुमच्या घरच्यांना थोडीफार कल्पना दिली असल्यामुळे ते लोक कॅम्पच्या ठिकाणी पोहोचले असतील. आपण आता कॅम्पकडे निघूया."


 

विरेन म्हणाला,

"हो सर! पण तत्पूर्वी आम्हाला साधू रामानंदांच्या आश्रमात जायचं आहे. जाताजाता त्यांना भेटून जावं असं आम्हाला वाटतं आहे. शिवाय हा घोडा त्यांना परत करायचा आहे."

शिंदे सर म्हणाले,

"ठीक आहे. पण तिथं जास्तवेळ थांबता येणार नाही."

विरेन म्हणाला,

"हो सर."

आणि सगळेजण परतीच्या मार्गांला लागले.


 

पुढे नक्की काय घडेल?हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा, "जिवलगा"


 

क्रमशः

©® सारंग शहाजीराव चव्हाण

पुनाळ.कोल्हापूर.9975288835.


 

(कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, तसेच माझ्या इतर कथा वाचण्यासाठी मला फॉलो करा.)

||साहित्यचोरी हा गुन्हा आहे||


 

🎭 Series Post

View all