जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-60.

तन्वीच्या आयुष्यात येणार नवं वादळ.........

जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-60.

सबइन्स्पेक्टर भोसले म्हणाले,

"आता तुम्ही जे काही सांगितलं, तोच जबाब पोलीसस्टेशनमध्ये गेल्यावर द्या. नक्कीच अश्विनवर कठोर कारवाई केली जाईल."

वनरक्षक चौधरी म्हणाले,

"आम्हालाही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. पण सद्या आपण इथून बाहेर पडणं जास्त इम्पॉर्टन्ट आहे. चला लवकरात लवकर आपण इथून बाहेर पडूया."

शिंदे सर म्हणाले,

"तन्वी आणि विरेन, आम्ही तुमच्या घरच्यांना थोडीफार कल्पना दिली असल्यामुळे ते लोक कॅम्पच्या ठिकाणी पोहोचले असतील. आपण आता कॅम्पकडे निघूया."


 

विरेन म्हणाला,

"हो सर! पण तत्पूर्वी आम्हाला साधू रामानंदांच्या आश्रमात जायचं आहे. जाताजाता त्यांना भेटून जावं असं आम्हाला वाटतं आहे. शिवाय हा घोडा त्यांना परत करायचा आहे."

शिंदे सर म्हणाले,

"ठीक आहे. पण तिथं जास्तवेळ थांबता येणार नाही."

विरेन म्हणाला,

"हो सर."

आणि सगळेजण परतीच्या मार्गांला लागले.


 

थोड्याच अंतरावर साधू रामानंदाचा आश्रम लागला. बाकीचे सगळे बाहेरच थांबले फक्त विरेन आणि तन्वी दोघेच आश्रमात गेले.

साधू रामानंद त्यांचीच वाट बघत बसले होते. विरेन आणि तन्वीला आलेलं पाहून ते म्हणाले,

"या! तुम्ही तुमच्या ध्येयाचा पहिला टप्पा उत्तमरित्या पार पाडला आहात. पुढील टप्पा तुमच्या लक्षात आलाच असेल. त्यासाठी आवश्यक वेळ आल्यावर तुमच्याकडून ते ध्येयही यशस्वीपणे पार पाडाल, हा माझा विश्वास आहे."

विरेन आणि तन्वी एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. 'साधू रामानंदना सगळ्या गोष्टी कशा समजतात?' असा प्रश्न त्यांच्या मनाला पडला.

न राहवून तन्वीने विचारलं,

"साधूजी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा समजतात? आणि तुम्हाला सगळं समजतच तर तुम्ही त्याबद्दल पोलीस किंवा आर्मीची मदत का घेतली नाही? त्यासाठी आमचीच निवड का केली तुम्ही?"

साधू रामानंद गालात हसले आणि प्रसन्न मुद्रेने म्हणाले,

"मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलं आहे, तरीही पुन्हा एकदा सांगतो. प्रत्येक कामासाठी विधात्याने काही विशिष्ट लोकांची निवड केलेली असते. त्या लोकांच्या हातून ते कार्य करवून घेतलं जातं. या जगात जे जे काही घडतं ते सगळं विधिलिखित असतं. गतजन्मी तुम्ही मल्हार आणि निर्जरा म्हणून जन्म घेतला पण तुम्हाला अपेक्षित कार्यसिद्धी प्राप्त करता आली नाही. महाबलीनामक खलपुरुषाने आपल्या आसुरी ताकतीच्या बळावर तुम्हाला अकाली मृत्यू दिला. म्हणून तुमचं उर्वरित कार्यसिद्धीस नेता यावं म्हणूनच तुमचा पुनर्जन्म झाला आहे."

विरेन म्हणाला,

"ठीक आहे साधूजी. पण यावेळी जसे तुम्ही आम्हाला काही सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे इथून पुढील वाटचालीत तुमची काही मदत होईल का?"

साधू रामानंद म्हणाले,

"प्रत्येक ताकतीची एक मर्यादा असते,तशाच मलाही काही मर्यादा आहेत. मी या जंगलाबाहेर तुम्हाला मदत करू शकत नाही. पण काही गोष्टी सांगून तुमचं मार्गदर्शन करू शकतो."

तन्वी म्हणाली,

"हो, तुम्ही जे सांगाल ते आम्ही नक्की आचरणात आणू."

साधू रामानंद म्हणाले,

"येणारा काळ तुमची कसोटी घेणारा आहे. या दरम्यान तुम्हाला बळ, बुद्धी आणि कल्पकतेचा वापर करावा लागेल. या मोहिमेत फितूरीमुळे तुमची वाट बिकट होणार आहे, प्रसंगी तुमची काही नातीही दुरावणार आहेत. तसेच काही भावनिक क्षणही येतील. या अशा अनेक अडचणीवर तुम्हाला मात करून याजन्मीच्या महाबलीला शोधायचं आहे. या जन्मी त्याचं नाव काय असेल? तो कसा दिसतो? तो कुठे भेटेल? तो काय काम करतो? याविषयी तुम्हाला वेळेनुसार समजत जाईल. यावेळचा महाबली त्या महाबलीपेक्षाही जास्त ताकतवान आणि क्रूर आहे. पण जर तुम्ही योग्य योजना राबवून वाटचाल केली तर यावेळी तुमचा विजय निश्चित आहे."

विरेन म्हणाला,

"तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात ठेवू."

इतक्यात शिंदे सरांनी व्हिसल वाजवून विरेन आणि तन्वीला निघण्याचा इशारा केला.

ते ऐकून तन्वी म्हणाली,

"साधूजी, आता आम्हाला निघालं पाहिजे. तुम्ही आम्हाला याठिकाणी जी मदत केलीत ती आम्ही कधीच विसरणार नाही. तुमची खूप आठवण येईल."

विरेन म्हणाला,

"हो साधूजी, तुमच्यामुळे आमची वाटचाल सोपी झाली. आमच्याच गतजन्माची आम्हाला ओळख झाली."

साधू रामानंद फक्त प्रसन्न मुद्रेने स्मित करत होते.

विरेन त्रिशूलच्या अंगावरून हात फिरवत म्हणाला,

"तुझे उपकार कसे फेडू मित्रा? तु आमच्यासाठी जे काही केलं आहेस त्याची उतराई आम्ही कधीच करू शकत नाही. तु वेळोवेळी आमचा जीव वाचवलास. इच्छा असूनही तुला सद्या सोबत घेऊन जावू शकत नाही. पण कधीतरी तुझ्यासाठी काही करता आलं तर नक्की करेन. पण सद्या आम्हाला गेलं पाहिजे. काळजी घे स्वतःची, नियतीने ठरवलं तर पुन्हा नक्की भेटू."

तन्वीही त्याला थोपटत म्हणाली,

"काळजी घे त्रिशूल. तुझी खूप आठवण येईल आम्हाला."

त्या दोघांपासून वियोग होणार याच्या जाणीवेने नकळत त्रिशूलच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि ते पाहून विरेनने त्याला घट्ट मिठी मारली. त्याचेही डोळे झरू लागले. इतक्यात शिंदेसरांनी पुन्हा व्हिसल वाजवली. त्यामुळे जड अंतःकरणाने ते दोघे त्रिशूलचा निरोप घेऊन निघाले.

आपल्याजवळ येताच शिंदेसरांनी त्यांना विचारलं,

"विरेन आणि तन्वी आम्हाला साधू रामानंदानी तुमच्या पुनर्जन्माबद्दल सांगितलं आहे, तसेच त्यांनी गतजन्मीची सगळी कथाही आम्हाला सांगितली आहे. खरंच असं काही घडलं असेल तर तुमच्यावर गतजन्मी खूप मोठा अन्याय झाला आहे. पण या जन्मात तुमच्याकडून  नियतीच्या काय अपेक्षा आहेत, याबाबत तुम्ही काही सांगू शकता का?  म्हणजे साधू रामानंदानी तुम्हाला काही संकेत दिले आहेत का? तसेच दरीत पडल्यापासून पुढे काय काय घडलं आणि तुम्ही पुन्हा इथंवर सुखरूप कसे आलात? याबाबत आम्हाला ऐकायचं आहे."

विरेन म्हणाला,

"हो सर! पुनर्जन्माची गोष्ट खरी आहे. गतजन्मी महाबली नामक हैवानाने आमच्यावर खूप अत्याचार केलेत, ज्यात आमचा बळी गेला. गतजन्मी मल्हार आणि निर्जरा एक होऊ शकले नाहीत पण याजन्मी त्यांनी एक व्हावं हिचं नियतीची इच्छा आहे. म्हणजे मी आणि तन्वीने एक व्हावं."

सबइन्स्पेक्टर भोसले म्हणाले,

"अच्छा! पण आम्हाला सगळा घटनाक्रम सांगू शकाल का?"

तन्वी म्हणाली,

"हो सर! सांगू शकतो. आजही अगदी जसंच्या तसं डोळ्यासमोर दिसत आहे माझ्या."

ती पुढे सांगणार इतक्यात विरेन तिला थांबवत स्वतः बोलू लागला.

तो म्हणाला,

"तन्वी तु तर सुरवातीला बराचवेळ बेशुद्ध होतीस, त्यामुळे तुला बऱ्याच गोष्टी माहित नाहीत. म्हणून सगळा घटनाक्रम मी सांगतो त्यांना."

इन्स्पेक्टर भोसले म्हणाले,

"ठीक आहे. तु सांग काय घडलं होतं?"

विरेनने ते दोघे दरीतील पाण्यात पडल्यापासूनचा सगळा घटनाक्रम सांगितला. पण त्यांनी शेवटी जी गोष्ट पाहिली ती गोष्ट सगळ्यांना सांगणं चतुराईने टाळलं.

आपल्याला विरेनने बोलण्यापासुन परावृत का केलं ती गोष्ट आता तन्वीच्याही लक्षात आली.

ती गालातल्या गालात हसून मनोमन विरेनच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करू लागली.

बघता बघता सगळे त्या दरीच्या पायथ्याशी पोहोचले. तिथं गेल्यावर टीमने त्यांना दोरखंडाच्या शिडीवरून सुखरूपपणे वरती आणलं.

तिथं एक डॉक्टरांची टीम हजर होती. त्यांनी वर आल्याआल्या विरेन आणि तन्वीची मेडिकल तपासणी केली. त्यांचा रक्तदाब वगैरे सगळं नॉर्मल असल्याची खात्री केली आणि पिण्यासाठी एनर्जी ड्रिंक दिलं.

त्यानंतर ते सगळे जिथं तंबू मारले होते तिथं पोहोचले.

तिथं सद्या फक्त दोनच तंबू बाकी होते. बाकीचे सगळे विद्यार्थी परत कॉलेजवर गेले होते.

विरेन आणि तन्वीला एका तंबूत विश्रांती घेण्यासाठी बसवलं होतं.

थोड्याच वेळात विरेनचे आणि तन्वीचे पालक तिथे पोहोचले.

तन्वीची आई धावतच तन्वीजवळ पोहोचली.

तन्वी बिछाण्यावर पहुडली होती. आईला पाहताच ती उठून बसली, इतक्यात तिचे बाबाही तिथं आले.

आई तन्वीला म्हणाली,

"तनु बाळा! कशी आहेस तु? कुठे हरवली होतीस तु? तु ठीक आहेस ना?"

तन्वी फक्त तिच्याकडे बघतच राहिली.

तन्वीचे बाबा म्हणाले,

"अगं तिला श्वास तरी घेऊदेत. किती प्रश्नांचा भडीमार करतेस तिच्यावर!"

भरल्या डोळयांनी तन्वीची आई तन्वीला मिठीत घेत म्हणाली,

"तुम्हाला नाही कळणार आईची माया काय असते? आपल्या पिल्लासाठी आईचा जीव किती तुटतो!"

तन्वीचे बाबा म्हणाले,

"अगं काळजी करण्याची काही गरज नाही. मेजर शेखर देशमुखांची एकुलती एक आणि धाडसी मुलगी आहे ती. कोणत्याही परिस्थितीशी दोनहात करण्याची क्षमता आहे तिच्याकडे."

तन्वीची आई रागाने बघत म्हणाली,

"पुरे करा तुमचा मोठेपणा. ही तुमची फौज नाहीये. इथं माझ्या काळजाच्या तुकड्याचा प्रश्न आहे. एकतर स्वतः महिनोमहीने आमच्यापासून दूर बॉर्डरवर असता आणि म्हणे दोनहात करण्याची क्षमता आहे तन्वीकडे. एक काम करा, आम्हालाही बंदूका घेऊन द्या. आमच्या सुरक्षेचं आमचं आम्ही बघून घेऊ."

मेजर शेखर म्हणाले,

"अगं असं काय करतेस? तन्वी कॅम्पला गेल्यावर रस्ता भटकली आहे हे तु मला कळवताच इमर्जन्सी सुट्टी घेऊन फ्लाईट पकडून मी लगेच इथं आलो ना! मलाही माझी कर्तव्य कळतात गं. मी बाप आहे तिचा, कोणी तिऱ्हाईत नाही."

तन्वी म्हणाली,

"आई बाबा! मी ठीक आहे. तुम्ही वाद थांबवा."

तन्वीची आई म्हणाली,

"तन्वी, चल आपण ताबडतोब घरी निघतोय."

आणि तिने तन्वीची साहित्याची बॅग मेजर शेखर यांच्याकडे दिली.

जाताना त्यांनी शिंदे सरांना तशी कल्पना दिली आणि ते तन्वीला घेऊन निघून गेले.

तन्वीला एकदा विरेनला भेटायचं होतं, त्याच्याशी काहीतरी इम्पॉर्टन्ट बोलायचं होतं. पण तिच्या घरच्यांनी तिला तेवढा वेळच दिला नाही.


 

इकडे विरेनची आई भानुप्रिया आणि वडील प्रताप पाटील विरेनच्या तंबूत पोहोचले. विरेनच्या आईने आल्याआल्या विरेनला घट्ट मिठी मारली आणि मग त्याला कुठे काही इजा झालीये का? ते तपासून पाहू लागली.

"बाळा विरु! काय झालं? तु बरा आहेस ना?असाकसा रस्ता भटकलास? आजवर कितीदा जंगल कॅम्प केलेस पण असं कधीच घडलं नव्हतं, मग यावेळी असं कसं घडलं?"

विरेन म्हणाला,

"काही नाही आई. मी ठीक आहे."

प्रताप पाटील त्याच्याकडे रागाने बघत म्हणाले,

"गेला असेल कोणालातरी मदत करायला. जगाची मदत करण्याचा मक्ताच घेतलाय ना आपल्या पाटीलवाड्याने! हा तरी काय वेगळं करणार आहे. आजोबांसारखेच स्वतःला सगळ्यांचा तारणहार समजत असावेत महाशय. अरे जरा तुझ्या मोठ्या भावाचा आदर्श घे. दिवसरात्र अभ्यास करून अमेरिकेत त्याने आपल्या पाटीलवाड्याचं नाव पोहोचवलं. आणि तु या जंगलात स्वतःच नावं धुळीस मिळवत आहेस. तुझ्याबरोबर कोणी एक मुलगी होती म्हणे! तुम्ही दोघेच कसेकाय रस्ता चुकलात? कि मुद्दाम रस्ता चुकवून नको तसले धंदे करत होता?"

विरेन त्यांच्याकडे हैराण होऊन बघतच राहिला.

विरेनची आई त्यांच्याकडे रागाने बघत म्हणाली,

"अहो काय बोलताय हे! परिस्थिती काय आहे आणि तुम्ही नको ते बोलून वाद घालत आहात. जरातरी परिस्थितीचं भान ठेवा. आजवर मी नेहमीच तुमच्या बंधनात जगत आलीये, तुमचा प्रत्येक शब्द प्रमाण मानून त्याप्रमाणे वागत आलीये. पण मुलांच्या बाबतीत मी तुमचं चुकीचं काहीही ऐकून घेणार नाही. माझा माझ्या मुलांवर आणि माझ्या संस्कारावर पूर्ण विश्वास आहे. ते कधीच वाया जाणार नाहीत."

आपल्याला कधीच उलटून न बोलणारी आपली बायको आपल्याला चक्क सुनावतेय हे पाहून प्रताप पाटील 'आ'वासून  पाहू लागले.

विरेन त्यांना पाहून म्हणाला,

"बाबा मी आता काही जास्त बोलणार नाही, पण एकदिवशी तुम्हाला माझा अभिमान वाटेल आणि तुमची छाती अभिमानाने भरून येईल. हा शब्द आहे माझा."

इकडे यांचं हे बोलणं सुरु असतानाच तिथं शिंदे सर आले आणि म्हणाले,

"विरेन, आता आपल्याला निघायला हवं. तन्वीला तिचे आईवडील घरी घेऊन गेले. तुही तुझ्या घरी जा. एक दोन दिवसांनी पोलीसस्टेशनला जाऊन उर्वरित फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घेऊ. आपली वार्षिक परीक्षाही तोंडावर आली आहे. पुन्हा लवकरात लवकर लेक्चर्स सुरु होतील. लवकरच भेटू. काळजी घे."

तन्वी आपल्याशी न बोलताच आपल्या घरी गेली. याच विरेनला मनोमन दुःख झालं. पण नाईलाजाने तो आपल्या आईवडिलांबरोबर आपल्या घरी जायला निघाला.

शिंदे सरांनी आणि उर्वरित लोकांनी तंबूच साहित्य गाडीत भरलं आणि गाडी शहराच्या दिशेने रवाना झाली.


 

लवकरच तन्वीच्या आयुष्यात एक वादळ येणार आहे. हे वादळ आपल्यासोबत कोणाकोणाला घेऊन जाईल?


 

पुढे नक्की काय घडेल?हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा, "जिवलगा"


 

क्रमशः

©® सारंग शहाजीराव चव्हाण

पुनाळ.कोल्हापूर.9975288835.


 

(कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, तसेच माझ्या इतर कथा वाचण्यासाठी मला फॉलो करा.)

||साहित्यचोरी हा गुन्हा आहे||






 

🎭 Series Post

View all