जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-61.

तन्वीवर जबरदस्तीचा प्रयत्न करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या अश्विनला शिक्षा होणार ?

जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-61.

(कथा पोस्ट करण्यासाठी विलंब झाल्याबद्दल क्षमस्व.)

"अहो काय बोलताय हे! परिस्थिती काय आहे आणि तुम्ही नको ते बोलून वाद घालत आहात. जरातरी परिस्थितीचं भान ठेवा. आजवर मी नेहमीच तुमच्या बंधनात जगत आलीये, तुमचा प्रत्येक शब्द प्रमाण मानून त्याप्रमाणे वागत आलीये. पण मुलांच्या बाबतीत मी तुमचं चुकीचं काहीही ऐकून घेणार नाही. माझा माझ्या मुलांवर आणि माझ्या संस्कारावर पूर्ण विश्वास आहे. ते कधीच वाया जाणार नाहीत."

आपल्याला कधीच उलटून न बोलणारी आपली बायको आपल्याला चक्क सुनावतेय हे पाहून प्रताप पाटील 'आ'वासून  पाहू लागले.

विरेन त्यांना पाहून म्हणाला,

"बाबा मी आता काही जास्त बोलणार नाही, पण एकदिवशी तुम्हाला माझा अभिमान वाटेल आणि तुमची छाती अभिमानाने भरून येईल. हा शब्द आहे माझा."

इकडे यांचं हे बोलणं सुरु असतानाच तिथं शिंदे सर आले आणि म्हणाले,

"विरेन, आता आपल्याला निघायला हवं. तन्वीला तिचे आईवडील घरी घेऊन गेले. तुही तुझ्या घरी जा. एक दोन दिवसांनी पोलीसस्टेशनला जाऊन उर्वरित फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घेऊ. आपली वार्षिक परीक्षाही तोंडावर आली आहे. पुन्हा लवकरात लवकर लेक्चर्स सुरु होतील. लवकरच भेटू. काळजी घे."

तन्वी आपल्याशी न बोलताच आपल्या घरी गेली. याच विरेनला मनोमन दुःख झालं. पण नाईलाजाने तो आपल्या आईवडिलांबरोबर आपल्या घरी जायला निघाला.

शिंदे सरांनी आणि उर्वरित लोकांनी तंबूच साहित्य गाडीत भरलं आणि गाडी शहराच्या दिशेने रवाना झाली.

------------------------------------------------

काही दिवसांनी पोलिसांनी विरेन आणि तन्वी या दोघांनाही कॉल करून पोलीसस्टेशनमध्ये येण्यास सांगितलं.

तन्वीने आपल्यासोबत नक्की काय घडलं ते अद्याप आपल्या घरी सांगितलं नव्हतं. पण आता त्यांना सगळं सांगण्याची गरज आहे हे ओळखून तन्वीने त्यांना सगळी आपबीती सांगितली.

अश्विन तन्वीशी जे वागला ते ऐकून तिचे वडील म्हणजेच मेजर शेखर देशमुखांच्या रागाचा पारा चढला. त्यांच्या नाकपुड्या फुलल्या, कानाच्या पाळ्या गरम झाल्या, मुठी आवळल्या गेल्या.

क्षणात त्यांनी भिंतीला अडकवलेली आपली बंदूक काढली आणि ते बाहेरच्या दिशेने धावू लागले. इतक्यात तन्वी आणि तिची आई त्यांच्या आडव्या गेल्या.

तन्वीची आई म्हणाली,

"अहो! काय करताय? बंदूक घेऊन कुठे चालला आहात?"

शेखर देशमुख तिच्या हाताला हिसडा मारत म्हणाले,

"सोडा मला. मेजर देशमुखांची मुलगी म्हणजे वाटली कोण त्या हरामखोराला? आज त्याला शिल्लक ठेवत नाही."

तन्वी त्यांच्या पायाला कवटाळत म्हणाली,

"बाबा, शांत व्हा. त्याला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा कायदा देईलच. तुम्ही स्वतःला सावरा. त्रास करून घेऊ नका."

शेखर देशमुख तन्वीपासून पाय सोडवत म्हणाले,

"तन्वी पाय सोड माझे. मला आज कोणीच रोखू शकत नाही.

अरे आम्हा सैनिकांची फॅमिली म्हणजे यांना काय आपली जहागीर वाटते की काय? आम्ही घरापासून दूर असतो म्हणून आमच्या फॅमिलीला कोणीही त्रास देईल तर आम्ही गप्प बसायचं का?

अरे शत्रूला घरात घुसून मारणारी जात आहे ही सैनिकांची. त्या नराधमाला आज घरात घुसून बंदुकीचा बार घालून यमसदनी पाठवला नाही तर नावाचा शेखर देशमुख नाही. सोड मला जाऊदे."

असं म्हणत ते पायाला हिसके देऊ लागले.

इतक्यात तन्वीच्या आईने दरवाजा लावून त्याला कडी लावली.

तन्वी तिच्या हाताची पकड आणखी घट्ट करत म्हणाली,

"बाबा माझं ऐकणार आहात की नाह? तुमचा राग स्वाभाविक आहे. पण तुम्ही स्वतः कायदा हातात घेऊन कायद्याचा भंग करू नका. इतकी वर्षे प्रामाणिकपणे देशसेवा केल्यानंतर शेवटी हा खुनाचा डाग आपल्या माथी लावून घेणार आहात का? तुम्हाला शिक्षा झाली तर आम्ही कोणाकडे पाहायचं. आज जरी तुम्ही आमच्यापासून दूर असला तरी आम्हाला तुमच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतो बाबा. आणि हाच अभिमान आम्हाला वाईट वृत्तीशी लढताना ताकत देतो.

बाबा तो अभिमान, ती ताकत आमच्यापासून हिरावून घेऊ नका. आम्हाला दुबळे बनवू नका. मेजर शेखर देशमुख हे नाव तोंडात घेतलं तरी आमच्यात असामान्य ऊर्जा निर्माण होते बाबा. त्यामुळे प्लीज रागाच्या भरात काही चुकीचं पाऊल उचलू नका. आणि राहिला प्रश्न त्या अश्विनचा! त्याला तर मी सोडत नसते. अहो बाबा! तुम्ही मला लाडाने 'भद्रकाली ताराराणी' म्हणता ना! मग ही भद्रकाली आपल्या शत्रूना कसं मोकळं सोडील! बाबा माझ्या अंगात तुमचंच रक्त आहे. असा कसा सोडीन मी त्याला. माझ्यावर विश्वास ठेवा,त्याला त्याच्या कर्माची फळं नक्की भोगायला लावणार. हा शब्द आहे तुमच्या लेकीचा."

तन्वीचं बोलणं शेखर देशमुखांना पटलं आणि त्यांनी बंदूक तन्वीच्या आईकडे सुपूर्द केली.

 ते म्हणाले,

"तन्वी! मी रागाच्या भरात नको ती गोष्ट करायला चाललो होतो.

तु मला अगदी योग्य शब्दात समजावून सांगितलंस. मला तुझ्या बुद्धीमत्तेचा सार्थ अभिमान वाटतो. खूप मोठी हो तन्वी. देशमुख घराण्याचं आणि आपल्या देशाचं नावं मोठं कर."

बाबांनी तिचं ऐकलं म्हणून तन्वीचा जीव भांड्यात पडला आणि तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

तन्वीची आईसुद्धा आता निश्चिन्त झाली.

सगळं वातावरण निवळल्यावर तन्वी म्हणाली,

"बाबा आपल्याला पोलीसस्टेशनला जाऊन आलं पाहिजे."

आणि त्यांनी पोलीसस्टेशनच्या दिशेने कूच केले.

-------------------------------------------

इकडे विरेनच्या घरीही प्रताप पाटील त्रागा करून घेत होते.

प्रताप पाटील म्हणाले,

"आता आपल्या चिरंजीवामुळे आम्हाला पोलीसस्टेशनची पायरीसुद्धा चढावी लागणार. काय दिवे लावून आलाय ते देव जाणे! पोलिसांनी फोन करून बोलावलंय म्हणजे ह्याने काहीतरी पराक्रम नक्कीच केला असणार. अरे या पाटीलवाड्याच्या नावाला कलंक लावलास की रे नालायका."

विरेन चिडून म्हणाला,

"बाबा! तुम्ही माझे वडील आहात म्हणून मी तुमचा मान राखतोय. पण याचा अर्थ मला काहीही बोलावं असा नाही. मला माहित आहे की पाटीलवाड्यातील एकही व्यक्ती कधी पोलीसस्टेशनला गेला नाही.

पण पोलीसस्टेशनला काय फक्त गुन्हा केल्यावरच जातात का? काही चांगलं काम केल्यावरही बोलावू शकतात.''         

      प्रताप पाटील उपहासाने हसून म्हणाले,

''चांगलं काम? काय चांगलं काम केलंस तू? आणि चांगलं काम केलं म्हणून कोणी पोलीसस्टेशनला बोलावत का? इतकं तर आम्हालाही समजतं. त्यामुळे उगाच आम्हाला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करू नको. समजलं!''

विरेनची आई प्रताप पाटलांना म्हणाली,

''अहो किती अविश्वास आपल्याच रक्तावर! आपल्याच संस्कारावर! थोडातरी विश्वास असुदे आपल्या मुलावर.''

प्रताप पाटील पुन्हा म्हणाले,

''तू गप्प बस्स. आजकालच्या मुलांची थेर तुला माहित नाहीत. जगात काय सुरु आहे हे ह्या चार भिंतीच्या आत राहून समजत नसतं. त्यासाठी बाहेरच्या जगात वावरावं लागतं, जगाचा अनुभव घ्यावा लागतो. आयुष्यभर चूल आणि मुल यात गुंतून गेलेली तू मला जगाची ओळख करून देणार का? जा चूल फुंकत बस,तेच तुला चांगलं जमेल. आली मोठी मला शिकवणारी.''

आपल्याच वडिलांकडून आपल्या जन्मदात्रीचा झालेला अपमान सहन न होऊन विरेन रागाने लालेलाल होऊन म्हणाला

"बाबा! खूप झालं. खूप बोललात माझ्या आईला. अहो चूल आणि मुल यावरून तिला नाव ठेवण्यापेक्षा स्वतःच्या हुकूमशाहीकडेही थोडं डोळसपणे पहा. तिने चूल आणि मुल ही जबाबदारी योग्यरीत्या निभावली म्हणूनच तुम्ही घराबाहेर निश्चिन्तपणे फिरू शकत होता. तुम्ही तिला बाहेरच्या जगात वावरू दिलं असतं तर ती तुमच्यापेक्षा काकणभर जास्तच माहिती मिळवू शकली असती. पण तुमचा पुरुषी अहंकार दुखावला जाईल या हेतूने तुम्ही तिला जाणीवपूर्वक चुलीसमोर व्यस्त करून ठेवलंत. आणखी बोलण्यासारखं खूप आहे, बोलू नये पण तुम्ही बाहेरच्या जगात वावरून काय ज्ञान मिळवलंय? बाहेरच्या जगात आंधळेपणाने वावरण्यापेक्षा डोळसपणे चारभिंतीच्या आत वावरणारी माझी आईच मला समजू शकली. आणि तुमच्या पाटीलवाड्यात यापूर्वी पोलिसांनी कौतुक करावं अशी गोष्ट कोणी केलीच नसेल. पाटीलवाड्याने आपली शानशौकत जपण्यापलीकडे वेगळं काही केलंच नाही. कधीतरी स्वतःपेक्षा इतरांसाठी जीवाची बाजी लावून पहा म्हणजे कळेल.'' 

विरेनचं हे रूप पाहून प्रताप पाटील हैराण होऊन त्याच्या तोंडाकडे बघतच राहिलेत.

विरेन त्यांच्याकडे बघत म्हणाला,

''असे तोंडाकडे बघत काय बसलात! सोबत येणार आहात की नाही? म्हणजे नंतर आणखी तुमच्या मनात वेगळी शंका यायला नको.''

प्रताप पाटील म्हणाले,

''कशाला येऊ तुझ्याबरोबर? मघापासून काय कमी पाणउतारा केलास का? जा तुझा तू,मला मळ्यात जायच आहे. खूप काम पडलीत.''

असं म्हणून ते घरातून बाहेर पडले आणि जीप घेऊन मळ्याच्या दिशेने गेले.

प्रताप पाटील गेल्यावर पाठीमागे विरेनची आई हसत हसत कौतुकाने त्याला म्हणाली,

"विरु! बाळा आज तुझ्यात एवढी हिंम्मत कुठून आली रे? एरव्ही त्यांचं सगळं बोलणं मुकाट्याने ऐकतोस ना! मग आज हा चमत्कार घडला तरी कसा?"

विरेन आईच्या खांद्यावर समोरून दोन्ही हात ठेवून आईकडे पाहत म्हणाला,

"कोणी माझ्या आईवर पोकळ आणि चुकीचे आरोप करत असेल तर मी कसा खपवून घेऊ शकतो!  'चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणताना घाबरायचे नाही.' ही तुझीच तर शिकवण आहे ना आई! उद्या आपल्या बाबांनाही असंच कोणी काही बोललं तरी तेही मला खपणार नाही. पण आज बाबा खूप चुकीचं बोलले ग् आई. घरकाम करणारी गृहिणी बिनकामाची आणि बेअक्कल असते ही समजूतच साफ चुकीची आहे. गृहिणीच्या हाताखाली एकदिवस काम केलं तर यांना समजेल तिची किती त्रेधातिरपीट उडते."

आई त्याचे गाल आपल्या हातानी ओढत म्हणाली,

"माझं बाळ किती मोठं झालं आहे. अशाच चांगल्या विचारांची कास धरून चालतं रहा. एकदिवस या पाटीलवाड्याला तुझ्यामुळे नवीन ओळख मिळेल. याचं नावं सातसमूद्रापार पोहोचवशील."

असं म्हणून तिने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि आपल्या मुठी आवळत कडकडा बोट मोडलीत.

विरेन स्मितहास्य करत म्हणाला,

"नक्कीच आई. मी सर्वोत्तम प्रयत्न करीन. पण तूर्तास मला पोलीसस्टेशनला जावं लागेल. चल मी जाऊन येतो. आल्यावर सांगीन तुला काय झालं ते."

आई म्हणाली,

"नीट सांभाळून जा रे."

विरेनने आपली बाईक काढली आणि त्यावर बसून तो पोलीसस्टेशनला निघाला.

काय होईल पोलीसस्टेशनमध्ये?

अश्विनवर गुन्हा दाखल होणार का?

आणि झाला तरी तो सिद्ध होईल का?

पुढे नक्की काय घडेल?हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा, "जिवलगा"


 

क्रमशः

©® सारंग शहाजीराव चव्हाण

पुनाळ.कोल्हापूर.9975288835.


 

(कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, तसेच माझ्या इतर कथा वाचण्यासाठी मला फॉलो करा.)

||साहित्यचोरी हा गुन्हा आहे||



















 

🎭 Series Post

View all