जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-62.

इन्स्पेक्टर पूजा तन्वीला न्याय मिळवून देतील का?

जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची-भाग-62.

(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे,तसेच ही कथा मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे, तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही.)


 

विरेन आईच्या खांद्यावर समोरून दोन्ही हात ठेवून आईकडे पाहत म्हणाला,

"कोणी माझ्या आईवर पोकळ आणि चुकीचे आरोप करत असेल तर मी कसा खपवून घेऊ शकतो!  'चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणताना घाबरायचे नाही.' ही तुझीच तर शिकवण आहे ना आई! उद्या आपल्या बाबांनाही असंच कोणी काही बोललं तरी तेही मला खपणार नाही. पण आज बाबा खूप चुकीचं बोलले ग् आई. घरकाम करणारी गृहिणी बिनकामाची आणि बेअक्कल असते ही समजूतच साफ चुकीची आहे. गृहिणीच्या हाताखाली एकदिवस काम केलं तर यांना समजेल तिची किती त्रेधातिरपीट उडते."

आई त्याचे गाल आपल्या हातानी ओढत म्हणाली,

"माझं बाळ किती मोठं झालं आहे. अशाच चांगल्या विचारांची कास धरून चालतं रहा. एकदिवस या पाटीलवाड्याला तुझ्यामुळे नवीन ओळख मिळेल. याचं नावं सातसमूद्रापार पोहोचवशील."

असं म्हणून तिने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि आपल्या मुठी आवळत कडकडा बोट मोडलीत.

विरेन स्मितहास्य करत म्हणाला,

"नक्कीच आई. मी सर्वोत्तम प्रयत्न करीन. पण तूर्तास मला पोलीसस्टेशनला जावं लागेल. चल मी जाऊन येतो. आल्यावर सांगीन तुला काय झालं ते."

आई म्हणाली,

"नीट सांभाळून जा रे."

विरेनने आपली बाईक काढली आणि त्यावर बसून तो पोलीसस्टेशनला निघाला.

थोड्याच वेळात तन्वी आणि तिचे वडील पोलीसस्टेशनला पोहोचले,त्यांच्या पाठोपाठ विरेनही तिथे पोहोचला. तिथे गेल्यावर तन्वी आपल्या वडिलांना विरेनची ओळख करून देत म्हणाली,

''बाबा हा विरेन. यानेच माझा जीव वाचवला आणि मला खूप मदत केली. आज मी आपल्यापुढे उभी आहे ते फक्त आणि फक्त यांच्यामुळेच. हा नसता तर................''

तिच्या बाबानी तिच्या पाठीवर हात ठेऊन तिला आधार दिला आणि ते म्हणाले,

''तन्वी शांत हो. मला कल्पना आली तुला काय म्हणायचं आहे त्याची.''

त्यानंतर त्यांनी विरेनकडे वळून पाहिलं आणि ते म्हणाले,

''तुझे कोणत्या शब्दात आभार मानू हेच मला कळेना झालं आहे. आज तुझ्यामुळे माझी तनु सुरक्षित आहे. तुझ्यासारखे तरुण युवक असतील तर आपल्या देशाचं भविष्य उज्वल आहे. पुन्हा एकदा मी तुझा मनापासून आभारी आहे.''

त्यांचे बोलून झाल्यावर विरेन त्यांना म्हणाला,

''माफ करा! तुमचं बोलणं सुरु असताना तुम्हाला मध्येच थांबवून तुमचा अपमान करायचा नव्हता म्हणून मी गप्प बसलो होतो. पण तुम्ही माझे आभार मानण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण मी जे केलं ते माझं कर्तव्य होतं. कोणतीही व्यक्ती अडचणीत असेल तर तिला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मी तेच केलं. त्यामुळे माझे आभार मानून मला लाजवू नका. इतर कोणीही असतं तरी त्यानेही हेच केलं असतं. त्यामुळे माझे आभार नकोतच. आभार तर आम्ही तुमचे मानायला हवेत.''

शेखर देशमूख हैराण होऊन म्हणाले,

''माझे आभार! कशासाठी? आभार मानण्यासारखं मी काय केलं आहे?''

विरेन त्यांच्याकडे बघून स्मितहास्य करत म्हणाला,

''अहो आम्ही मोकळा श्वास घेऊन बिनघोर जगू शकतो ते फक्त तुमच्यासारख्या सैनिकांमुळेच. तुम्ही आपला जीव धोक्यात घालून सीमारेषेवर तिथे पहारा देता म्हणून तर आम्ही सुरक्षित आहोत. नाहींतर आमचं काय झालं असतं देव जाणे. म्हणून मीच तुमचे मनापासून आभार मानतो."

असं म्हणून त्याने त्यांना वाकून नमस्कार केला.

मग शेखर देशमुखांनी विरेनची पाठ थोपटली आणि ते म्हणाले,

"शाब्बास! खूप चांगले संस्कार आहेत तुझ्यावर. खूप मोठा होशील. स्वतःच्या आईवडिलांचं नाव मोठं करशील. तुला माझे खूप खूप आशीर्वाद."

विरेनने त्यांच्याकडे बघून स्मितहास्य केलं.

इतक्यात शिपायाने त्यांना हाक दिली.

 "तन्वी देशमुख आणि विरेन पाटील कोण आहेत?"

त्याचा आवाज ऐकताच तन्वी म्हणाली,

"आम्हीच आहोत. बोला."

शिपाई म्हणाला,

"तुम्हाला आत केबिनमध्ये बोलावलं आहे."

विरेन आणि तन्वी त्याच्या पाठोपाठ केबिनमध्ये निघाले.

विरेनने केबिन बाहेरून विचारलं,

"मे आय कम इन सर?"

समोर महिला अधिकाऱ्यांना बघून विरेन थोडा गोंधळून गेला आणि म्हणाला,

"आय मीन, मे आय कम इन मॅम?"

त्या म्हणाल्या,

"येस कम इन."

आत गेल्या गेल्या तन्वीने मनातल्या मनात नेमप्लेट वाचली,

'इन्स्पेक्टर पूजा आडेप.'

आणि तिने वर त्यांच्याकडे पाहिलं.

गोरा वर्ण, करारी नजर, भेदक डोळे,चेहऱ्यावर विलक्षण तेज आणि आत्मविश्वास ठासून भरलेली देहबोली.

तन्वी त्यांना निरखून पाहत होती. इतक्यात त्या म्हणाल्या,

"तर मिस तन्वी आणि मिस्टर विरेन. मी इन्स्पेक्टर पूजा आडेप.

तुमच्याबरोबर घडलेल्या घटनेबद्दल मला भोसलेंकडून समजलं. पण मला तुमच्याकडून सगळा घटनाक्रम ऐकायचा आहे. त्यामुळे जे जे घडलं ते ते सगळं मला सांगा. काहीही लपवण्याची गरज नाही. जे सत्य असेल ते बोलायला संकोच करू नका."

विरेन आणि तन्वीने एकमेकांकडे पाहिलं आणि विश्वासदर्शक हावभाव करून एकमेकांना संमती दिली.

विरेन म्हणाला,

"मॅडम आम्ही आमच्या कॉलेजच्या जंगलकॅम्पसाठी त्या जंगलात गेलो होतो. तिथं गेल्यापासून आमच्याबरोबर चित्रविचित्र घटना घडत होत्या. एकदिवस आम्ही महादेव मंदिरात गेलो असता, तिथल्या एका गुहेमध्ये शिंदे सरांना आमचं अर्धवट अवस्थेत रेखाटलेलं चित्र दिसलं आणि काहीतरी विलक्षण गोष्ट त्यांच्या नजरेस पडली होती. म्हणून आम्ही त्या रात्री त्या मंदिरातील चित्राच्या शोधात बाहेर पडलो होतो. आम्ही ते चित्र शोधून काढलं आणि तिथून बाहेर पडणार तोपर्यंत अचानक तन्वी गायब झाली होती. मी तिला आजूबाजूला सगळीकडे खूप शोधलं, पण ती सापडली नाही. मग मी माझ्या चौकस बुद्धीचा वापर करून तिच्या मागावर निघालो असता मला काही अंतरावर अंधुकशी लाईट दिसली आणि तिथं काहीतरी हालचाल जाणवली. म्हणून मी पुढे गेलो असता तिथं अश्विन तन्वीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. तर त्याचे साथीदार माझ्यावर लक्ष ठेऊन होते. मी त्यांच्यावर अचानक हल्लाबोल केला. मी बेभान बेफामपणे त्यांच्यावर तुटून पडलो. मी त्यांना वरचढ ठरत होतो, त्यामुळे ते घाबरून गेले होते. तन्वी आता आपल्या हाताला लागत नाही ही गोष्ट अश्विनला समजली आणि त्याने तन्वीला दरीच्या दिशेने फरफटत नेलं. मी त्याच्यावर चालून जाणार तोच त्याने तन्वीला दरीमध्ये फेकून दिलं. तिच्यापाठोपाठ मीही उडी घेतली. सुदैवाने खाली दीड दोनशे फूट अंतरावर पाणी होतं, त्यामुळे आम्ही त्या पाण्यात पडल्यामुळे बचावलो. नंतर आम्ही रस्ता चुकल्यामुळे काही दिवस जंगलात भटकत होतो. मग एकेदिवशी आमच्या शोधात आलेल्या शिंदे सर आणि बचावपथकाची आणि आमची भेट झाली. ते आम्हाला सुरक्षित आपल्यासोबत घेऊन आले."

इन्स्पेक्टर पूजा यांनी सगळी घटना लक्षपूर्वक ऐकून घेतली. तेव्हाच शेजारी बसलेल्या लेखनिकाने सगळा जबाब लिहून घेतला.

इन्स्पेक्टर पूजा म्हणाल्या,

"आय सी. एकंदरीत हा कलम 350 आणि 307 चा प्रकार दिसतोय. अब्रू घेण्याचा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न."

तन्वी त्यांना म्हणाली,

"मॅडम जे योग्य कलम असेल ते तुम्ही लावा. तो नराधम असा मोकळा सुटता कामा नये. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही लवकरात लवकर त्याला ताब्यात घ्या."

इन्स्पेक्टर पूजा म्हणाल्या,

"माझ्या कामाची पद्धत थोडी वेगळी आहे, म्हणूनच या विभागातील महिलांवरील अत्याचाराच्या सगळ्या केसेस माझ्याकडे दिल्या आहेत. तुम्ही सांगत आहात त्याप्रमाणे जर अश्विनने तसा प्रकार केला असेल तर त्याला त्याची शिक्षा नक्की मिळेल. यामध्ये तुमच्याबरोबर असणारे शिक्षक आणि काही विध्यार्थ्यांचेही आम्ही जबाब नोंदवून घेऊ."

विरेन म्हणाला,

"मॅडम आम्हाला खात्री आहे तुम्ही नक्की न्याय मिळवून द्याल."

तन्वीही त्याला दुजोरा देत पुढे म्हणाली,

"हो कारण एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच खरं दुःख समजू शकते."

यावर इन्स्पेक्टर पूजा म्हणाल्या,

"सॉरी टू से. पण तुम्ही एक स्त्री आहात म्हणून मी तपासावेळी तुम्हाला झुकत माप देईन असं वाटतं असेल तर तुम्ही गल्लत करताय. स्त्री असो की पुरुष मी दोघांचाही समान विचार करते. कोणावरही अन्याय होता कामा नये, हाच माझा मानस असतो. त्यामुळेच आजवर माझ्या हातून कोणी गुन्हेगार सुटला नाही किंवा कोणी निर्दोष असणारा बळी गेला नाही. पुन्हा गरजेचे वाटेल तेव्हा मी आपणांस बोलावून घेईनच. तूर्तास तुम्ही येऊ शकता."

तन्वी आणि विरेन दोघेही "धन्यवाद मॅडम" म्हणून तिथून बाहेर पडले.

बाहेर आल्यावर तन्वीच्या बाबांनी म्हणजेच शेखर देशमुखांनी विचारलं,

"काय झालं? साहेब काय म्हणालेत?"

त्यावर तन्वी हसत म्हणाली,

"बाबा साहेब नाही मॅडम म्हणा."

शेखर देशमुख म्हणाले,

"अच्छा म्हणजे महिला अधिकारी आहेत तर. चला हे बर झालं. आता तपासात कसूर होणार नाही. कारण बाईमाणसालाच बाईमाणसाचं दुखणं कळतं."

यावर तन्वी आणि विरेन दोघेही हसू लागले.

शेखर देशमुखांना हे दोघे का हसत आहेत हे काही कळेना.

ते प्रश्नार्थक चेहरा करून म्हणाले,

"अरे का हसताय? काय झालं हसण्यासारखं?"

त्यावर तन्वी म्हणाली,

"अहो बाबा तुम्ही जे वाक्य बोलला, अगदी तेच वाक्य आम्हीही आत मॅडमना बोललो. तर त्यांनी आम्हाला चांगलंच सुनावलं. स्त्री आहात म्हणून सहानुभूती मिळणार नाही आणि खरा गुन्हेगार कोणीही असो त्याला त्या सोडणार नाही असं म्हणाल्या."

शेखर देशमुख आनंदून म्हणाले,

"भले शाब्बास! नक्कीच त्या मॅडम एक इमानदार आणि देशप्रेमी ऑफिसर असणार. आता तर मी आणखीनच निश्चिन्त झालो."

विरेन म्हणाला,

"तुमचं खरं आहे मेजर. नक्कीच आपल्याला न्याय मिळेल."

त्यानंतर त्यांनी एका रेस्टोरंटमध्ये चहापाणी घेतलं आणि ते आपापल्या घराकडे निघून गेले.

---------------------------------------------------

इकडे बाकी लोकांचे जबाब घेऊन इन्स्पेक्टर पूजा आडेप थेट अश्विनच्या दारात पोहोचल्या.

सोबत असणाऱ्या कॉन्स्टेबलने त्याच्या घराची बेल वाजवली.

काही वेळातच दरवाजा उघडला गेला.

समोर पोलीस पाहून त्याच्या घरच्यांची बोबडीच वळली.

 अश्विनचे वडील म्हणाले,

"पप्पप पोलीस!"

त्यावर इन्स्पेक्टर पूजा म्हणाल्या,

"अश्विन तुमचा मुलगा आहे?"

समोरून उत्तर आलं,

"ह्ह्ह हो हो. कक्क काय झालं मॅडम?"

इन्स्पेक्टर पूजा म्हणाल्या,

"तो घरी आहे का? आमच्याकडे त्याचं अटक वॉरंट आहे. बोलवा त्याला बाहेर."

अश्विनच्या वडिलांना खूप मोठा धक्का बसला.

"काय! अटक वॉरंट!"


 

अश्विन पोलिसांना सापडेल का?

इन्स्पेक्टर पूजा आपलं रेकॉर्ड पुढेही कायम ठेवू शकतील का?

तन्वीला न्याय मिळणार का?

पुढे नक्की काय घडेल हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा, "जिवलगा"


 

क्रमशः

©® सारंग शहाजीराव चव्हाण

पुनाळ.कोल्हापूर.9975288835.

🎭 Series Post

View all