जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-63.

अश्विनला जामीन मिळणार कि पोलिसांसमोर तो गुन्हा कबूल करेल?

जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-63.

(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे,तसेच ही कथा मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे, तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही.)

इकडे बाकी लोकांचे जबाब घेऊन इन्स्पेक्टर पूजा आडेप थेट अश्विनच्या दारात पोहोचल्या.

सोबत असणाऱ्या कॉन्स्टेबलने त्याच्या घराची बेल वाजवली.

काही वेळातच दरवाजा उघडला गेला.

समोर पोलीस पाहून त्याच्या घरच्यांची बोबडीच वळली.

 अश्विनचे वडील म्हणाले,

"पप्पप पोलीस!"

त्यावर इन्स्पेक्टर पूजा म्हणाल्या,

"अश्विन तुमचा मुलगा आहे?"

समोरून उत्तर आलं,

"ह्ह्ह हो हो. कक्क काय झालं मॅडम?"

इन्स्पेक्टर पूजा म्हणाल्या,

"तो घरी आहे का? आमच्याकडे त्याचं अटक वॉरंट आहे. बोलवा त्याला बाहेर."

अश्विनच्या वडिलांना खूप मोठा धक्का बसला.

"काय! अटक वॉरंट!"

त्यांनी आत असणाऱ्या आपल्या बायकोकडे पाहिलं आणि आत जाऊन डोक्याला हात लावून सोफ्यावर बसले.

इन्स्पेक्टर पूजा आणि सहकारीसुद्धा आत गेले.

आत गेल्यागेल्या इन्स्पेक्टर पूजा यांनी विचारलं,

"अश्विन घरी आहे का? असेल तर त्याला बाहेर बोलवा."

अश्विनची आई समोर येत काळजीने म्हणाली,

"मॅडम काय केलय ओ माझ्या अश्विनने? तो खूप चांगला मुलगा आहे. तरीपण त्याच्याकडून काही चूक झाली असेल तर मी माफी मागते तुमची. हवंतर पाया पडते."

असं म्हणत त्या त्यांच्या पाया पडू लागल्या. इतक्यात इन्स्पेक्टर पूजा यांनी त्यांच्या हाताला पकडून वर उठवलं आणि त्या म्हणाल्या,

"मी तुमची अवस्था समजू शकते, पण असं पाया पडायची खरच गरज नाहीये. आणि पाया पडलात म्हणून तुमचा मुलगा निर्दोष सिद्ध होतं नाही. त्याने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी आणि ती मी मिळवून देईनच."

इतक्यात मघापासून शांत बसलेले अश्विनचे वडील सोफ्यावरून उठत म्हणाले,

"गुन्हा! कसला गुन्हा? इन्स्पेक्टर उगाच काहीही आरोप करू नका. आमचा अश्विन देवगुणाचा मुलगा आहे. तो असला काही गुन्हा बिन्हा करूच शकत नाही."

इन्स्पेक्टर पूजा हसत आणि टाळ्या वाजवत म्हणाल्या,

"वाह रे टिपिकल वडील! अगदी फिल्ममधील वडिलांसारखाच डायलॉग फेकून मारला तुम्ही. पण माझंही नावं इन्स्पेक्टर पूजा आडेप आहे. अशा डायलॉग्सना टाळ्या वाजवायला मी काही प्रेक्षक नाही."

त्यानंतर अश्विनच्या आई म्हणाल्या,

"मॅडम माझ्या अश्विनने केलंय तरी काय? ते तरी सांगा."

इन्स्पेक्टर पूजा म्हणाल्या,

"त्याने काय केलंय हे मी नंतर सांगीनच. तत्पूर्वी मला एक सांगा कि,

तुम्हाला मुलगी आहे का?"

त्यांच्या मध्येच बोलत अश्विनचे वडील म्हणाले,

"आता इथे आमच्या मुलीचा काय संबंध? तुम्ही का आमच्या मुलांच्या जीवावर उठलाय इन्स्पेक्टर?"

इन्स्पेक्टर पूजा कडाडून म्हणाल्या,

"माईंड युअर लँग्वेज मिस्टर. जीवावर आम्ही नाही उठलो, जीवावर तुमचा मुलगा उठला होता."

अश्विनचे आईवडील अवाकपणे पाहू लागले.

इन्स्पेक्टर पूजा पुढे म्हणाल्या,

"तर मॅडम मला सांगा तुम्हाला मुलगी आहे का?"

अश्विनची आई म्हणाली,

"हो.आहे. तिचं नाव सायली आहे आणि तिचं लग्न झालं आहे. ती सासरी असते. पण तिचा इथे काय संबंध?"

इन्स्पेक्टर पूजा म्हणाल्या,

"समजा तुमची सायली कॉलेजच्या जंगलकॅम्पसाठी घरापासून दूर गेली आहे आणि तिथं तिला एकटीला गाठून काही नराधमांनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न केला आणि खोल दरीत फेकून दिलं तर अशा नराधमांचं काय करायला हवं."

अश्विनची आई काही बोलणार इतक्यात त्याचे वडील रागाने लालबुंद होत म्हणाले,

"अशा नराधमांना दिसताक्षणी गोळ्या घातल्या पाहिजेत. ना…….करून धिंड काढली पाहिजे. भर चौकात फाशी द्यायला पाहिजे."

इन्स्पेक्टर पूजा म्हणाल्या,

"मॅडम तुमचं काय मत आहे? काय करायला हवं त्या गुन्हेगारांचं?"

अश्विनच्या आई म्हणाल्या,

"एक तर अशी वाईट वेळ कोणत्याही मुलीवर येऊ नये. आणि जर अशी दुर्देवी वेळ कोणावर आलीच तर ज्यांनी ते दुष्यकृत्य केलं त्यांना त्यांच्या आईवडिलांनी स्वतः पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. आणि कठोरात कठोर शिक्षा करावी अशी स्वतः विनंती करायला हवी. म्हणजे अशा वृतीच्या लोकांच्या मनात असे विचार येणार नाहीत."


 

इन्स्पेक्टर पूजा म्हणाल्या,

"मग तुमच्या अश्विनला स्वतःहून ताब्यात देणार कि आम्ही स्वतः त्याला ताब्यात घेऊ?"

अश्विनच्या आई म्हणाल्या,

"म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? अश्विनने असं काही कृत्य केलं आहे का?"

इन्स्पेक्टर पूजा यांनी अरेस्ट वॉरंट त्याच्या हातात दिलं आणि म्हणाल्या,

"तुमच्या मुलाचा पराक्रम वाचा. आपल्याच कॉलेजमधील वर्गमैत्रिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून तिला दरीत ढकलून दिलं आहे तुमच्या सो कॉल्ड सुसंस्कारी मुलाने. तिचं नशीब बलवत्तर म्हणून ती वाचली. विरेन नावाच्या एका मुलाने तिचा जीव वाचवला. तुमच्या मुलाच्या तावडीतूनही त्यानेच तिला वाचवलं होतं. पण याने तिला दरीत ढकलून देऊन क्रूरतेचा कळस गाठला. आता बोला त्याला गोळ्या घालायच्या कि भर चौकात ना……. करून धिंड काढायची? काय करायचं?"

अश्विनच्या आई म्हणाल्या,

"नाही….. खोटं आहे हे. माझा अश्विन असा वागू शकत नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे इन्स्पेक्टर मॅडम. प्लीज तुम्ही पुन्हा नीट खात्री करून घ्या. आता जर असं तुम्ही अश्विनला घेऊन गेलात तर समाजात आमची काय किंमत राहिलं ओ. त्यामुळे प्लीज तुम्ही नीट माहिती घेऊन मग या."

अश्विनचे वडील दुजोरा देत म्हणाले,

"हो हो. नक्कीच यांचा काहीतरी गैरसमज झाला असणार. अहो आपला अश्विन असं वागणं शक्य तरी आहे का!"

इन्स्पेक्टर पूजा थोड्या कडक सुरात म्हणाल्या,

"तुम्ही त्याला बाहेर बोलवा. कोणत्या बिळात लपून बसलाय तो? घरात इतकी चर्चा सुरु आहे तरी आवाज ऐकू गेला नसेल का त्याला? ताबडतोब त्याला समोर घेऊन या. नाहीतर आम्हाला घराची झडती घेऊन त्याला शोधावं लागेल."

इतक्यात बाहेर काहीतरी कोसळल्याचा आवाज झाला.

 ते ऐकून इन्स्पेक्टर पूजा म्हणाल्या,

"कुंभार बाहेर पहा कसला आवाज झाला."

त्याचक्षणी कुंभार बाहेर बघायला गेला आणि लगेचच तो धावत आत आला आणि म्हणाला,

"मॅडम! मॅडम! तो तो पळाला."

इन्स्पेक्टर पूजा हैराण होऊन म्हणाल्या,

"कोण आणि कुठून पळाला?"

कुंभार म्हणाला,

"मॅडम तो गच्चीवरून उडी मारून पळाला."

तो अश्विनच असणार याची खात्री झाल्यामुळे ते ताबडतोब तिथून त्याचा पाठलाग करू लागले.

थोड्याच अंतरावर पळणाऱ्या अश्विनला त्यांनी पकडलं आणि सरळ जीपमध्ये टाकून पोलीसस्टेशनला घेऊन गेले.

पोलीसस्टेशनमध्ये आल्याआल्या मघापासून मोठ्या मुश्किलेने संयम बाळगलेल्या इन्स्पेक्टर पूजा यांनी अश्विनला सणकन दोन मुस्काटात मारल्या आणि त्याची कॉलर पकडत त्या म्हणाल्या,

"कुठे पळशील? अरे पाताळात जरी लपला असतास ना तिथून तुला फरफटत घेऊन आली असते मी.

माझं नाव आहे पूजा, गुन्हेगारांचा वाजविते मी बाजा.

मुकाट्याने गुन्हा कबूल कर नाहीतर आज तुझा बरोबर बाजा वाजवतेच बघ."

अश्विन गयावया करत म्हणाला,

"मॅडम मी काही नाही केलं नाही. मला विनाकारण यामध्ये गोवलं जात आहे किंवा तुमचा काहीतरी गैरसमज होतं आहे. मी तन्वीला काहीही केलं नाहीये."

इन्स्पेक्टर पूजा हसत हसत म्हणाल्या,

"हाहाहाहाहा शाब्बास! अरे बाळा आम्ही तन्वीचं नावही घेतलं नव्हतं. 

तु स्वतःच्या तोंडानेच तिचं नावं घेतलंस. त्याचं कसं आहे अश्विन जेव्हा एखाद्याने गुन्हा केला असेल तेव्हा तो नक्कीच चुकीची पाऊलं टाकत जातो. जसा तु गॅलरीमधुन उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केलास आणि आता आम्ही कोणाचा उल्लेख न करता तु तन्वीचं नावं घेतलंस."

इतक्यात अश्विनचे आईवडील तिथं दाखल झाले.

त्याचे वडील म्हणाले,

"अहो मॅडम आमच्या मुलाला असं जनावरासारखं खेचून का आणलं आहे इथे? त्याने काहीही केलेलं नाही. त्यामुळे तुम्ही आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका."

इन्स्पेक्टर पूजा संतापून म्हणाल्या,

"कुंभार! याला लॉकअपमध्ये टाका लवकर. आता बघतेच मी हा कसा गुन्हा कबूल करत नाही. कितीही भोळेपणाचा आव आणला तरी कायद्याच्या कचाट्यातून कोणताही गुन्हेगार सुटू शकत नाही."

कॉन्स्टेबल कुंभारने अश्विनला लॉकअपमध्ये घातलं.

त्यानंतर इन्स्पेक्टर पूजा म्हणाल्या,

"तुम्ही आता निघू शकता. आता सोमवारी तुमचा वकील घेऊन मगच भेटायला या. तोपर्यंत मी याच्याकडून खरं काय आहे ते बरोबर बाहेर काढते."

अश्विनचे वडील नाक फुगवत म्हणाले,

"हो नक्की येऊ. चांगल्यातला चांगला वकील घेऊन येऊ. आमच्या मुलाने काही केलंच नाही तर त्याला का शिक्षा होईल! तुम्ही कोणाच्यातरी सांगण्यावरून मुद्दाम त्याला यात अडकवत आहात. तुम्ही मुद्दाम त्याला आज शनिवारी अटक केली आहे, कारण सोमवार शिवाय त्याला जामीन मिळवता येणार नाही. तोपर्यंत तुमच्या ताब्यात ठेवून त्याच्याकडून न केलेला गुन्हा वदवून घेणार. पण याद राखा मी तुम्हालाही सोडणार नाही. यशवंत मोहिते म्हणतात मला. मी काय चीज आहे ते आता तुम्हाला सगळयांना दाखवतो."

त्यांच्या बोलण्यात कमालीचा अहंकार दिसत होता.

इन्स्पेक्टर पूजा रागाने पुढे सरसावत म्हणाल्या,

"ओह मिस्टर यशवंत मोहिते. तुम्ही पोलीसस्टेशनमध्ये उभे आहात याचं भान असुद्या. नाहीतर पोलिसांना पोलीसस्टेशनमध्ये घुसून धमकी दिल्याच्या गुन्ह्यात अटक करू शकतो. नाही म्हणजे मुलाचा जामीन मिळवायला तुम्ही बाहेर हवेत ना! नाहीतर तुमच्याही जमिनाची व्यवस्था तुमच्या पत्नीला करावी लागेल. तेव्हा आता गप्पगुमान निघायचं. चला निघा."

अश्विनच्या आईने परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आपल्या पतीदेवांना घेऊन तिथून काढता पाय घेतला.

इकडे कॉन्स्टेबल कुंभार इन्स्पेक्टर पूजाना म्हणाले,

"मॅडम हा यशवंत मोहिते एवढं बोलतोय म्हणजे तो एकदम चांगला वकील नेमणार बघा या नालायकाला सोडवण्यासाठी."

त्यावर इन्स्पेक्टर पूजा हसून म्हणाल्या,

"कुंभार. त्यांनी कितीही मोठा वकील नेमला तरी ते याला सोडवू शकणार नाहीत. कारण आजवर स्त्रियांवर अत्याचार करणारा एकही अपराधी मोकळा न सोडण्याचं जसं माझं रेकॉर्ड आहे. अगदी तसंच रेकॉर्ड सरकारी वकील ऍडव्होकेट मयुरेश तांबे यांचही आहे. आणि या केससाठी सरकारी वकील म्हणून त्यांची नेमणूक व्हावी यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या नराधमाचे निर्दोष सुटणे अशक्य आहे."

कॉन्स्टेबल कुंभार हसत म्हणाला,

"मॅडम खरंच तुम्ही ग्रेट आहात. कोणत्या आरोपीला कसा सापळा रचायचा हे तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला कळतं नाही बघा."

इन्स्पेक्टर पूजा हसत हसत म्हणाल्या,

"हो ना. मग आता जरा जेवून घेऊया. खूप भूक लागली आहे. नंतर याचा समाचारही घ्यायचा आहे. एकदा पोलीसी खाक्या पाहिल्यानंतर पोपटासारखा बोलायला लागेल हा."

त्यांनतर इन्स्पेक्टर पूजा तिथून कॅन्टीनकडे निघून गेल्या.


 

यशवंत मोहिते अश्विनला सोडवण्यासाठी काय योजना आखतील?

सरकारी वकील म्हणून ऍडव्होकेट मयुरेश तांबे यांची नेमणूक होणार का?

पुढे नक्की काय घडेल हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा, "जिवलगा"


 

क्रमशः

©® सारंग शहाजीराव चव्हाण

पुनाळ.कोल्हापूर.9975288835.


 

||साहित्यचोरी हा गुन्हा आहे||

🎭 Series Post

View all