जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-64

कोर्ट अश्विनला कोणती शिक्षा ठोठावणार? की तन्वी त्याला माफ करणार?

जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची-भाग-64

(सदर कथा काही कारणास्तव थांबली होती. ती पुन्हा सुरु करत आहे. कथेचा भाग पोस्ट करण्यासाठी खूपच विलंब झाला त्याबद्दल मी दिलगीर आहे. इथून पुढचे भाग वेळेवर येतील अशी मी आपणांस ग्वाही देतो आणि तुम्ही इथून मागे जसा भरभरून प्रतिसाद दिलात तसाच आताही द्याल ही अपेक्षा करतो. कथा पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून प्रोफाइलवर जाऊन वाचू शकता.)

कॉन्स्टेबल कुंभार इन्स्पेक्टर पूजाना म्हणाले,

"मॅडम हा यशवंत मोहिते एवढं बोलतोय म्हणजे तो एकदम चांगला वकील नेमणार बघा या नालायकाला सोडवण्यासाठी."

त्यावर इन्स्पेक्टर पूजा हसून म्हणाल्या,

"कुंभार. त्यांनी कितीही मोठा वकील नेमला तरी ते याला सोडवू शकणार नाहीत. कारण आजवर स्त्रियांवर अत्याचार करणारा एकही अपराधी मोकळा न सोडण्याचं जसं माझं रेकॉर्ड आहे. अगदी तसंच रेकॉर्ड ऍडव्होकेट मयुरेश यांचही आहे. या केससाठी वकील म्हणून त्यांची नेमणूक व्हावी यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या नराधमाचे निर्दोष सुटणे अशक्य आहे."

कॉन्स्टेबल कुंभार हसत म्हणाला,

"मॅडम खरंच तुम्ही ग्रेट आहात. कोणत्या आरोपीला कसा सापळा रचायचा हे तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला कळतं नाही बघा."

इन्स्पेक्टर पूजा हसत हसत म्हणाल्या,

"हो ना. मग आता जरा जेवून घेऊया. खूप भूक लागली आहे. नंतर याचा समाचारही घ्यायचा आहे. एकदा पोलीसी खाक्या पाहिल्यानंतर पोपटासारखा बोलायला लागेल हा."

त्यांनतर इन्स्पेक्टर पूजा तिथून कॅन्टीनकडे निघून गेल्या.


 

इकडे यशवंत मोहितेनी आपल्या एकुलत्या एका मुलाला म्हणजे अश्विनला सोडवण्यासाठी चांगल्यातला चांगला वकील नेमण्यासाठी धावपळ सुरु केली होती.

नालायक असला तरी शेवटी तो मोहित्यांचा पुढील वंश होता. त्यामुळे त्याला यातून वाचवण्यासाठी त्यांनी साम,दाम,दंड,भेद सगळं वापरायचं ठरवलं. 

 त्यासाठी त्यांनी सुप्रसिद्ध ऍडव्होकेट निशा यांचं ऑफिस गाठलं. तिथे बरेच पक्षकार आपली केस त्यांनी घ्यावी म्हणून त्यांना भेटायला आले होते.  तासभराच्या प्रतीक्षेनंतर यशवंत मोहितेना आत बोलावण्यात आलं.

ऍडव्होकेट निशा त्यांना हातानेच बसण्याचा इशारा करत म्हणाल्या,

"बोला, काय समस्या आहे तुमची?"

यावर यशवंत मोहिते हात जोडत काळजीग्रस्त चेहऱ्याने म्हणाले,

"मॅडम नमस्कार, मी यशवंत मोहिते. माझा मुलगा अश्विन मोहिते याला पोलिसांनी पकडून ठेवलं आहे. त्याच्यावर 350 आणि 307 कलम लावलं आहे. कृपया तुम्ही ही केस तुमच्याकडे घ्या. तुम्हीच माझ्या मुलाला यातून सोडवू शकता."

ऍडव्होकेट निशा त्यांना म्हणाल्या,

"मला सगळी घटना सविस्तर सांगाल का? नक्की काय झालं होतं. हो आणखी एक म्हणजे डॉक्टर आणि वकील यांच्यापासून अजिबात काही लपवायचं नसतं. तसं केल्यास नुकसान तुमचंच होणार असतं. त्यामुळे सत्य जे असेल ते बिनदिक्कत मला सांगा."

यावर यशवंत मोहिते म्हणाले,

"मॅडम सगळी सविस्तर घटना मला माहित नाही, पण माझ्या मुलाने असं काहीच केलेलं नसणार आहे. तो टिंगलटवाळ्या, दंगामस्ती करेल पण अशी कोणावर जबरदस्ती किंवा घातपात करणार नाही."

ऍडव्होकेट निशा मनात काहीतरी विचार करून म्हणाल्या,

"हे पहा मिस्टर मोहिते, एक बाप म्हणून तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल विश्वास वाटणं साहजिक आहे. पण कोर्ट भावनिकतेवर चालत नाही. कोर्ट योग्य युक्तिवाद, साक्षीदार आणि पुरावे यांच्या आधारावर चालतं. त्यामुळे नक्की काय घडलं होतं हे मला कळल्याशिवाय मी तुमची केस घेऊ शकत नाही."

यशवंत मोहिते काळजीत पडले आणि म्हणाले,

"मॅडम खरं काय घडलं ते फक्त अश्विनच सांगू शकेल. त्यामुळे आपणांस त्याला भेटायला जावं लागेल."

ऍडव्होकेट निशा म्हणाल्या,

"ठीक आहे, मी त्या संदर्भात कोर्टाकडून रीतसर परवानगी घेते. उद्याच आपण अश्विनला भेटण्यासाठी पोलीसस्टेशनला जाऊ."

यशवंत मोहिते त्यांना 'धन्यवाद' म्हणून निघून गेले.

इकडे इन्स्पेक्टर पूजा यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ऍडव्होकेट मयुरेश यांनी ही केस स्वतःकडे घेतली.

ठरल्याप्रमाणे दुसऱ्यादिवशी ऍडव्होकेट निशा आणि यशवंत मोहिते अश्विनला भेटण्यासाठी पोलीसस्टेशनमध्ये गेले.

तिथे ऍडव्होकेट निशा यांनी अश्विनकडून सगळी घटना ऐकून घेतली आणि त्यानंतर त्या काहीही न बोलता तडक उठून निघून गेल्या.

त्यांच्या अशा अचानक निघून जाण्याने अश्विन आणि यशवंत मोहिते दोघेही विचारात पडले.

यशवंतराव त्यांच्या पाठोपाठ धावतच बाहेर आले.

ऍडव्होकेट निशा आपल्या कारमध्ये बसून निघणारच होत्या इतक्यात यशवंत मोहिते त्यांच्या कारच्या आडवे जाऊन उभे राहिले.

ऍडव्होकेट निशा यांनी कार बंद केली.

यशवंत मोहिते त्याच्या कारच्या खिडकीजवळ जाऊन म्हणाले,

"अहो मॅडम! तुम्ही अशा तडकाफडकी तिथून निघून का आलात? आमचं काही चुकलं का?"

ऍडव्होकेट निशा म्हणाल्या,

"मिस्टर मोहिते, आय आम सॉरी. मी तुमची केस घेऊ शकत नाही. तुम्ही दुसरे वकील शोधा."

यशवंत मोहिते एकदम अवाक होऊन म्हणाले,

"काय! पण झालं तरी काय अचानक? तुम्ही तर ही केस घ्यायला तयार होता. मग आता काय अडचण आहे?"

ऍडव्होकेट निशा म्हणाल्या,

"मी आधी हो म्हणाले होते,पण आता माझं मत बदललं आहे आणि मी माझ्या मनाविरुद्ध कोणतेही काम करत नाही. सो आय एम व्हेरी सॉरी."

यशवंत मोहिते म्हणाले,

"मॅडम काही पैशाचा इश्यू असेल तर आपण त्यावर चर्चा करू. मी पैसे वाढवून द्यायला तयार आहे. पण प्लीज तुम्ही ही केस नाकारू नका. समोरील पक्षाकडून ऍडव्होकेट मयुरेश काम पाहणार आहेत, त्यांना टक्कर देईल अशा तुम्ही एकमेव वकील आहात. म्हणून मी तुमच्याकडे मोठ्या आशेने आलो होतो. आता माझी निराशा करू नका."

ऍडव्होकेट निशा निश्चयाने म्हणाल्या,

"मिस्टर मोहिते विषय पैशाचा नाही मूल्यांचा आहे,तत्वाचा आहे. एका मुलीवर अत्याचार करणाऱ्या आणि तिला दरीत फेकून देणाऱ्या नालायक आरोपीचा मी बचाव करावा हे माझ्या बुद्धीला पटत नाही. जिथे स्त्रियांवर अत्याचार झालेला असतो तिला एक स्त्री म्हणून न्याय मिळवून देणं हे माझं आद्यकर्तव्य आहे. मी तुमची केस घेणार नाहीच आहे, पण तुमच्या मुलाच्या विरोधातल्या वकिलांना त्यांच्या कामात मदतही करीन. सगळ्या गोष्टी पैश्याने विकत घेता येत नाहीत मिस्टर मोहिते. आणि तसं जर कुठे विकत घेता आले तर मुलाला देण्यासाठी थोडे संस्कार विकत घ्या. भविष्यात त्याला उपयोगी पडतील. चला वाटेतून बाजूला व्हा."

असं म्हणत त्यांनी कार स्टार्ट केली आणि वाऱ्याच्या वेगाने कार तिथून निघून गेली.

ऍडव्होकेट निशा आपली केस नाकारून गेल्याबद्दल यशवंत मोहितेंना धक्का बसला होताच पण त्या ऍडव्होकेट मयुरेश यांना मदत करणार या विचारानेच त्यांना धडकी भरली.

पराभव त्यांना समोर दिसत होता, पण तरीही कोणीतरी वकील देणं गरजेचं असल्यामुळे ते मिळेल तो वकील देण्याचा निश्चय मनाशी करून तिथून निघाले.

काही दिवसात केस कोर्टात उभी राहिली. ऍडव्होकेट मयुरेश यांनी युक्तिवाद सुरु केला.

त्याला आव्हान म्हणून आरोपीच्या वकिलाने युक्तिवाद सुरु केला.

बराच युक्तिवाद झाल्यानंतरही 

अश्विनविरुद्ध सबळ पुरावा सापडत नसल्याने त्याला जामीन मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. या गोष्टीची चाहूल लागल्यावर अश्विन आणि यशवंत मोहिते यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

सबळ पुरावा नसल्याने उभ्या करियरमधील पहिली केस हातून जाते की काय? असा सवाल ऍडव्होकेट मयुरेश यांना पडला होता.

इतक्यात ऍडव्होकेट निशा कोर्टात हजर झाल्या आणि म्हणाल्या,

"मिलॉर्ड, मी ऍडव्होकेट निशा. आरोपी अश्विनच्या विरोधात माझ्याकडे सबळ पुरावा आहे. तो मी कोर्टापुढे सादर करू इच्छिते."

त्याक्षणी कोर्टातील सगळे उपस्थित लोक उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहू लागले.

त्यांनी पुढे जाऊन तो कनिष्ठ न्यायालय सहाय्यकाच्या हातात दिला त्याने तो पुरावा न्यायाधीश साहेबांच्या पुढे नेऊन ठेवला.

न्यायाधीश साहेब म्हणाले,

"निशा मॅडम हे काय आहे? "

त्यावर ऍडव्होकेट निशा म्हणाल्या,

"मिलॉर्ड या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ आहे, ज्यात आरोपीने स्वतः गुन्ह्याची कबुली दिली आहे."

अश्विन, यशवंत मोहिते आणि त्यांचे वकील अवाकपणे निशामॅडमकडे पाहू लागले.

इकडे ऍडव्होकेट मयुरेश यांच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद दिसू लागला.

विरोधी वकील यशवंत मोहितेंच्या जवळ जात म्हणाले,

"मिस्टर मोहिते, असा अचानक हा पुरावा कुठून आला? तुम्ही मला याबाबत काहीच कल्पना कशी दिली नाही?"

यशवंत मोहितेंच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता.

ते वकिलांना म्हणाले,

"अहो कल्पना द्यायला मलाच आता समजलं आहे याविषयी. हा व्हिडीओ कुठून आणि कसा बनवला आहे अश्विनलाच माहित."

त्यांच्या वकिलांनी अश्विनला इशाऱ्यानेच व्हिडीओबद्दल विचारलं,

तर अश्विननेही इशाऱ्यात आपल्याला काहीच कल्पना नाही असं सांगितलं.

ऍडव्होकेट निशा यांनी अचानक समोर आणलेल्या पुराव्यामुळे अश्विनच्या अडचणीत वाढ़ झाली होती.

आता लवकरच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागणार होता.

कथानक पुढे कोणतं वळण पकडतंय हे पाहण्यासाठी वाचत रहा.

'जिवलगा.'  

क्रमशः

©® सारंग शहाजीराव चव्हाण

पुनाळ.कोल्हापूर.9975288835.


 

||साहित्यचोरी हा गुन्हा आहे||

🎭 Series Post

View all