जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-65

ऍडव्होकेट निशा यांनी आणलेला जबरदस्त ट्विस्ट नक्की वाचा.

जिवलगा- गोष्ट पुनर्जन्माची- भाग-65


 

"मिस्टर मोहिते, असा अचानक हा पुरावा कुठून आला? तुम्ही मला याबाबत काहीच कल्पना कशी दिली नाही?"

यशवंत मोहितेंच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता.

ते वकिलांना म्हणाले,

"अहो कल्पना द्यायला मलाच आता समजलं आहे याविषयी. हा व्हिडीओ कुठून आणि कसा बनवला आहे अश्विनलाच माहित."

त्यांच्या वकिलांनी अश्विनला इशाऱ्यानेच व्हिडीओबद्दल विचारलं,

तर अश्विननेही इशाऱ्यात आपल्याला काहीच कल्पना नाही असं सांगितलं.

ऍडव्होकेट निशा यांनी अचानक समोर आणलेल्या पुराव्यामुळे अश्विनच्या अडचणीत वाढ़ झाली होती.

सक्षम पुराव्याअभावी तो जामीनावर सुटेल अशी त्यांच्या मनात आशा निर्माण झाली असतानाच ऍडव्होकेट निशा यांनी अचानक या केसला वेगळ्या आणि निर्णायक वळणावर आणून सोडलं होतं.

न्यायाधीशांनी तो व्हिडीओ लक्षपूर्वक पाहिला आणि त्यानंतर त्यांनी तो व्हिडीओ अश्विनच्या वकिलांना दाखवण्यासाठी दिला. तो व्हिडीओ पाहून त्यांची बोलतीच बंद झाली. आता आपण केस हरलो आहोत याची त्यांना पुरेपूर कल्पना आली. ते घाम पुसत डोक्याला हात लावून खाली बसले.

कोर्टात सर्वत्र चर्चेला उधाण आलं. प्रत्येकजण तर्कवितर्क लावू लागले. 

गोंगाट झालेला पाहून न्यायाधीश हातोडा आपटत म्हणाले,

"ऑर्डर, ऑर्डर. कृपया सर्वांनी शांतता पाळून कोर्टाच्या नियमांचं पालन करावं."

त्यानंतर ऍडव्होकेट मयुरेश म्हणाले,

"मिलॉर्ड, सदरचा पुरावा आरोपी अश्विन याला शिक्षा सुनावण्यास पुरेसा आहे असं मला वाटतं, त्यामुळे या केसचा निकाल आजच लावावा ही आपणांस विनंती आहे. एका मुलीवर बलात्काराचा प्रयत्न आणि त्यानंतर तिला जीवे मारण्याच्या हेतूने उंचावरून दरीत फेकून देण्याचा अत्यंत विकृत प्रकार लक्षात घेता आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व्हावी, अशी मी आपणांकडे मागणी करत आहे. दॅट्स ऑल मिलॉर्ड."

सदरचा युक्तिवाद ऐकून कोर्टात पुन्हा कुजबुज सुरु झाली. इकडे अश्विन आणि त्याचे वडील बेचैन झाले होते, तर त्यांचे वकील हतबलपणे बसून होते

यशवंत मोहिते यांनी त्यांच्या वकिलाजवळ जाऊन त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं आणि ते जागेवर जाऊन बसले.

त्यानंतर अश्विनचे वकील म्हणाले,

"मिलॉर्ड, माझे अशील कुमार अश्विन मोहिते यांचं वय बघता आणि त्यांची शैक्षणिक कारकीर्द लक्षात घेता आपण त्यांचा सहानुभूतीने विचार करावा अशी मी आपणांस विनंती करत आहे."

न्यायाधीश पुन्हा हातोडा आपटत म्हणाले,

"ऑर्डर,ऑर्डर. सदर प्रकरणातील सर्व साक्षीदार, हाती आलेले सबळ पुरावे आणि वकिलांचा युक्तिवाद लक्षात घेता हे कोर्ट या निष्कर्षावर आलं आहे की, आरोपी अश्विन मोहिते याने त्याची वर्गमैत्रीण तन्वी हिच्यावर बलात्काराचा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून याप्रकरणात तो दोषी आढळून आला आहे. तरी कोर्ट त्याला दहा वर्षे सश्रम कारावास आणि पंचवीस हजार रुपये दंड तसेच दंड न भरलेस एक वर्ष साधी कैद अशी शिक्षा सुनावत आहे. तसेच त्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कारागृहातून परीक्षा देण्यासाठी कोर्ट त्याला मुभा देत आहे. याबरोबरच हा खटला निकाली लागून संपला असं कोर्ट जाहीर करत आहे. धन्यवाद."

निकाल ऐकताच तन्वी आणि तिचे कुटुंबीय खूष होऊन एकमेकांशी हस्तांदोलन करू लागले. तर अश्विन आणि यशवंत मोहिते यांचा रागाने तीळपापड होऊ लागला. पोलिसांनी अश्विनला आपल्या ताब्यात घेतलं.

ज्यांनी या केसमध्ये निर्णायक पुरावा सादर केला त्या ऍडव्होकेट निशा यांच्या समोर येऊन यशवंत मोहिते म्हणाले,

"आज तुझ्यामुळं माझ्या मुलाला शिक्षा झाली आहे. गरज नसताना तू या प्रकरणात लुडबुड केली आहेस. ही लुडबुड तुला खूप महागात पडणार आहे, लक्षात ठेव मला यशवंत मोहिते म्हणतात. सोडणार नाही तुला."

यावर ऍडव्होकेट निशा म्हणाल्या,

"मिस्टर मोहिते, तुमच्या मुलाला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे. मी मात्र एक निमित्त आहे. मी जे काही केलं ते एक सुजाण नागरिक म्हणून माझं कर्तव्य होतं. पण खेद याचा वाटतो की तुम्ही इतकं सगळं होऊनही स्वतःच्या मुलाच्या वाईट गुणांना पाठीशी घालत आहात. सर्वस्वी दोष तुमच्या मुलाचा नसून तुमच्यासारख्या मूर्ख पालकांचाही आहे, जे मुलांच्या चुकांवर पांघरून घालतात आणि मग पुढे जाऊन हीच मुलं गुन्हेगार बनतात."

यावर यशवंत मोहिते संतापून म्हणाले,

"ये बास कर तुझं भाषण, मला अक्कल नको शिकवू. तुला कशी अद्दल घडवतो बघशीलच तू."

यावर ऍडव्होकेट निशा हसत हसत म्हणाल्या,

"अशा धमक्याना मी भीक घालत नाही, आम्हाला सवय असते अशा गोष्टींची. आणि म्हणून मी तयारच असते. मिस्टर मोहिते तुम्ही मघापासून जे काही विधान केलं आहे ते या बटण कॅमेऱ्यात कैद झालं आहे आणि ते जर का मी पोलिसांसमोर सादर केलं तर मुलाबरोबर तुम्हीही आतमध्ये खडी फोडायला जाल. आता लक्षात आलंच असेल की तुमचा नालायक मुलगा कसा व्हिडीओमध्ये अडकला. तेव्हा आमच्या नादाला लागतांना दहावेळा विचार करायचा मिस्टर यशवंत मोहिते. आजकालच्या मुली नेभळट आणि कमजोर अजिबात नाहीत. तेव्हा वाट मोकळी करायची आणि सरळ घरी जायचं. ही माझ्याकडून तुम्हाला धमकीच समजा. चला निघा इथून."

ऍडव्होकेट निशा यांचं हे रौद्ररूप पाहून यशवंत मोहितेनी तिथून काढता पाय घेतला. आपण कुठे फसलो हे त्यांच्या लक्षात आलं होतं. तसेच ऍडव्होकेट निशा यांची पूर्वतयारी पाहून त्यांना धक्काच बसला होता. त्यांनी तडक घर गाठलं होतं.

इकडे ऍडव्होकेट मयुरेश यांचं केस जिंकल्याबद्दल सगळेजण अभिनंदन करत होते.  त्यावर मयुरेश म्हणाले,

"केस जरी मी जिंकलो असलो तरी त्याचं सारं श्रेय ऍडव्होकेट निशा मॅडम यांना जातं. कारण त्या योग्यवेळी तो व्हिडीओ घेऊन आल्या नसत्या तर अश्विनला जामीन मिळाला असता आणि केसला फाटे फुटले असते. निशा मॅडममुळे आपली बाजू भक्कम झाली आणि या केसला गती मिळाली."

यावर ऍडव्होकेट निशा म्हणाल्या,

"मी एक वकील आणि त्याच्याही आधी एक स्त्री म्हणून या केसमध्ये तुमची साथ दिली. मला जेव्हा माहित झालं की तन्वीची बाजू सत्याची आहे तेव्हाच मी ठरवलं की या केसमध्ये माझ्याकडून शक्य तितकी मदत करायची."

हे ऐकल्यानंतर तन्वीने उत्सुकतेपोटी विचारलं,

"निशा मॅडम तुम्हाला तो व्हिडीओ कसा मिळाला?"

यावर ऍडव्होकेट निशा गालात हसत म्हणाल्या,

"तन्वी तू मघाशी माझं आणि मोहितेंच संभाषण ऐकलं नाहीस का? अगं माझ्या कोटमध्ये बटण कॅमेरा बसवलेला असतो. जो आवश्यक वाटेल तेव्हा मी लगेच ऑन करू शकते. या अश्विनची केस घ्या म्हणून मिस्टर मोहिते माझ्याकडे आले होते. मग मी अश्विनला भेटायला गेले तेव्हा वकील म्हणून मी त्याला सगळी सत्यघटना सांगायला लावली. जी कॅमेऱ्यात रेकॉर्ड होतं होती. मी कॅमेरा यासाठी वापरते की अशिलाने दिलेली माहिती मला पुन्हा पुन्हा ऐकून आणि त्याची देहबोली पाहून केसवर सखोल अभ्यास करता यावा. तर या अश्विनच्या जबाबातून जेव्हा माझ्या लक्षात आलं की तो दोषी आहे. तेव्हा मी त्याला आपल्याला हवे तसें सगळे प्रश्न विचारून खडानखडा माहिती काढून घेतली आणि जेव्हा मला वाटलं की आता आपल्याकडे पुरेशी माहिती जमा झाली आहे. तेव्हा मी तिथून तडक निघून आले आणि त्याची केस घेण्यास नकार दिला. आणि तोच व्हिडीओ मी ऐनवेळी कोर्टासमोर सादर केला."

हे सगळं ऐकून तन्वीसह विरेन आणि उपस्थित सर्व अवाक झाले. एका वकीलाच्या अंगी किती हुशारी आणि समयसूचकता असू शकते याचं जातिवंत उदाहरण त्यांच्यासमोर ऍडव्होकेट निशा यांच्या रूपात हजर होतं.

अश्विनला त्याच्या कृत्याची शिक्षा तर झाली, पण त्याच्यामुळे तन्वी आणि विरेनला जो त्रास सहन करावा लागला, जे सोसावं लागलं त्याची भरपाई होणार नव्हती. पण सगळा नियतीचा खेळ मानून त्यांनी ते सगळं मागे टाकलं आणि आपल्या घराकडे ते परत निघाले.


 

अश्विन प्रकरण तर निकाली लागलं पण आता परीक्षा तोंडावर आल्या होत्या. जंगल कॅम्पला गेल्यापासून विरेन आणि तन्वीच्या आयुष्यात खूप काही उलथापालथ झाली होती. त्यातून सावरून अभ्यास करून परीक्षा देण्याचं दिव्य त्यांना पार पाडायचं होतं. ते दोघेही जातिवंत हुशार असल्यामुळे त्यांना ते नक्कीच जमण्यासारखं होतं. पण आणखी एक गोष्ट विरेनच्या डोक्यात घोळत होती. ती म्हणजे जंगलात त्यांनी जे काही पाहिलं त्या गोष्टीचा छडा लावणे. पण त्यासाठी खूप मोठं नियोजन आवश्यक होतं. तूर्तास ती गोष्ट फक्त विरेन आणि तन्वी यांच्या मनात दडपून ठेवलेलं गुपित होतं. पण लवकरच ते जगासमोर आणणंही गरजेचं होतं. पण तूर्तास फक्त परीक्षेवर लक्ष केंद्रित करणं हेच एक ध्येय त्यांच्यासमोर होतं.

परीक्षा दिल्यानंतर विरेन जंगलात पाहिलेली ती धक्कादायक गोष्ट समोर आणू शकेल का? हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा.

'जिवलगा.'  

क्रमशः

©® सारंग शहाजीराव चव्हाण

पुनाळ.कोल्हापूर.9975288835.


 

||साहित्यचोरी हा गुन्हा आहे||



 

🎭 Series Post

View all