*जेनेटी ट्रेन*

रहस्यमयरीत्या गायब झालेली ट्रेन
*जेनेटी ट्रेन*

*रहस्यमयरीत्या गायब झालेली ट्रेन*

हे संपूर्ण जग अद्भुत, अनाकलनीय आणि आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले आहे. ह्या जगात अनेक रहस्यमय घटना घडत असतात. ज्यामुळे सामान्य जनतेच्या मनात संभ्रम, भीती व कुतूहल निर्माण होत असते.

सुमारे १०० वर्षांपूर्वी अशीच एक अजब गजब घटना घडली. जिचे पडसाद आजही उमटताना दिसतात. त्या घटनेमागील सत्यता लोक आजही पडताळून पाहत आहेत. पण त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही.

ही घटना १४ जून १९११ मध्ये इटलीमध्ये घडली होती. त्याकाळी जेनेटी रेल्वे कंपनीने आकर्षक अशी तीन डब्यांची एक ट्रेन बनवली होती. त्या ट्रेनच्या इंजिनपासुन तर डब्यांपर्यंत सर्व काही नविन होते. जेनेटी कंपनीने प्रयोग म्हणून या ट्रेनने प्रवाशांना मोफत प्रवास करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली. त्यासाठी त्याकाळी त्यांनी वर्तमानपत्रात जाहिराती देखील दिल्या होत्या. सर्व सुखसोयीयुक्त नव्याकोऱ्या ट्रेनने प्रवास करण्यासाठी शंभर प्रवाशांची निवड करण्यात आली. त्यासोबतच सहा रेल्वे कर्मचारी त्यांच्या दिमतीसाठी नेमण्यात आले. जय्यत तयारीनिशी इटलीच्या रोमन स्टेशनवरून एकशे सहा प्रवासी घेऊन ही ट्रेन निघाली. काही मिनिटांतच रेल्वेने वेग धरला. थोडेसे अंतर पार करून ही ट्रेन एका बोगद्यात शिरली, पण बराच वेळ झाला तरी बाहेर आली नाही. पुढील स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांसह काही प्रवासी ट्रेनची वाट पाहात होते, पण त्या ट्रेनचा कुठेच मागमूसही नव्हता. तिला बोगद्यात शिरताना बऱ्याच लोकांनी पाहिले होते. त्यामुळे ती आतच अडकून पडली असेल किंवा खराब झाली असेल असा प्रथमदर्शनी अंदाज लावण्यात आला. त्यासाठी बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी बोगद्यात शिरून पाहणी केली. पण ते सारे अचंबित झाले. संपूर्ण बोगदा पिंजून काढला तरी त्यांना आत काहीच सापडले नाही. प्रवाशांसह ट्रेन अचानक गायब कशी झाली म्हणून सर्वांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. बरीच शोधाशोध केल्यानंतर त्यांना काही अंतरावर त्या ट्रेनमधील दोन प्रवासी वेडसर अवस्थेत आढळले. झालेल्या घटनेबाबत ते दोघे बोलण्याचा मनस्थितीतच नव्हते. उपचारासाठी त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान एका प्रवाशाने या घटनेबद्दल काहीही कथन करण्यास नकार दिला. दुसऱ्या प्रवाशाने मात्र जे काही सांगितले त्यातून अजूनच गुंतागुंत वाढली. त्याने दिलेल्या माहितीनुसार ट्रेन बोगद्यात शिरताच अचानक तिथे पांढरा धूर निघायला लागला. त्या धुरात कुणीही कुणाला दिसत नव्हते. म्हणून घाबरून त्या दोघांनी त्या ट्रेन मधून बाहेर उडी टाकली. पण त्यानतंर ट्रेन कुठे गेली हे त्यांना देखील समजले नाही.

एकीकडे बोगद्यातून अख्खी ट्रेन गायब झाल्यामुळे प्रशासन हादरले होते. दुसरीकडे त्या प्रवाशांच्या नातेवाईकांनी सरकारला वेठीस धरण्यास सुरुवात केली होती. आपले नातलग सापडत नाहीये म्हणून लोकांनी खूप आक्रोश केला. संपूर्ण यंत्रणा कामाला लावूनही प्रशासनाच्या हाती काहीच लागत नव्हते.

तोपर्यंत सामान्य जनतेत बऱ्याच अफवा पसरल्या होत्या. जेनेटी ट्रेन टाईम ट्रॅव्हल करून दुसऱ्या जगात पोहोचली, असेही सांगितले जात होते. ती ट्रेन तेव्हाच्या वेळेपेक्षा ७१ वर्षे मागे भूतकाळात गेली, असेही काही लोकांचे म्हणणे होते.

त्या वेळच्या काही मीडिया रिपोर्टनुसार ही ट्रेन १८४० मध्ये मेक्सिकोमध्ये पोहोचली, असेही सांगण्यात आले होते. कारण मेक्सिकोच्या एका महिला डॉक्टरने दावा केला होता की, ती ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती. तिथे रहस्यमय पद्धतीने १०४ लोकांना भरती करण्यात आले होते. ते सारे वेडे झाले होते. मात्र, ते एका ट्रेनमधून इथे आल्याचे सांगत होते. थक्क करणारी गोष्ट म्हणजे, त्यावेळी कोणतीही अशी ट्रेन बनली नव्हती, जी रोमहून थेट मेक्सिकोला जाऊ शकेल. तसेच या लोकांची मेक्सिकोला येण्याची कोणतीही नोंद नव्हती.

काही वर्षानंतर या ट्रेनचे काही भाग रशिया, युक्रेन आणि जर्मनीमध्ये सापडल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र, याचा ठोस पुरावा सापडलेला नाही.

अनेक गोष्टी विविध पद्धतीने समोर आल्यावर लोकांनी जेनेटी ट्रेनला भूताची ट्रेन म्हणून संबोधण्यास सुरुवात केली.

जेनेटी ट्रेनसंबंधित अनेक तर्क वितर्क लावले जात असल्याने जनमानसात आजही घडलेल्या अनाकलनीय घटनेबाबत उत्सुकता आहे. ह्या घटनेची सत्यता आजतागायत शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांना शोधता आलेली नाही. ही गायब झालेली ट्रेन जणू एक रहस्यच बनले आहे.

तुम्हाला कशी वाटली ह्या रहस्यमय घटनेची गोष्ट ? मनोरंजक, आश्चर्यकारक की भीतीदायक वाटली ते कमेंट्स द्वारे नक्की कळवा.

माहिती संकलन व लेखन - ©अपर्णा परदेशी.