जिथे मान मिळतो-1

मराठी कथा
"दोन दिवस उशिरा गेलीस तर काही फरक पडणार आहे का? की मुद्दाम करतेय माझे नातेवाईक येणार म्हणून?"

सुधा किचनमध्ये पोळ्या लाटत होती, हे वाक्य ऐकताच रागारागात बाहेर आली आणि ओरडली,

"मुद्दाम कशाला करेन मी? मी महिनाभर आधीच सांगितलं होतं की माझ्या चुलतभावाच्या लग्नासाठी आठ दिवस आधी जाणार आहे मी..तुमच्या आत्याचं येणं नंतर ठरलं हो."

"ते काहीही असो, तुला दोन दिवस उशिराने गेल्याने फरक पडणार आहे का?"

"हो, खूप मोठा फरक पडणार आहे. माझ्या काका काकूंनी माझ्या लग्नाचं सगळं बघितलं होतं. एक तर त्यांना मुलगी नाही, सगळी मदार माझ्यावर आहे. त्याने अर्धी खरेदी बाकी ठेवलीये माझ्या भरवश्यावर"

हे ऐकून सागरने नाक मुरडलं. आता तो काही दिवसभर तिच्याशी बोलणार नाही हे तिला समजलं होतं.

वादही तसाच होता. सागरची आत्या, तिचं दर महिन्याला घरी येणं व्हायचं. कारण त्याच्या घराजवळच तिचा दवाखाना होता आणि त्या निमित्ताने दरमहा आत्या त्यांच्या शहरात यायची. आली की 2 दिवस मुक्काम, जेवण, आराम ठरलेला असायचा.

तसं पाहिलं तर सागरचे आई वडीलही जवळच राहायचे पण आत्या सागरकडेच असायची. सुधा आत्याची चांगली ठेप ठेवत असे. याउलट स्वतःच्या भावाकडे त्यांची आबळ व्हायची. या महिन्यातही आत्याचं येणं ठरलं होतं आणि यावेळी तर उलट आत्याचे मिस्टर आणि सुनबाई सुदधा येणार होते. म्हणूनच सागरला वाटायचं की सुधाने घरी थांबावं.

सुधा मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती. काका काकूंनी लग्नात केलेली धावपळ याची तिला जाणीव असल्याने चुलतभावाच्या लग्नात तिला कसलीही कसर सोडायची नव्हती.

त्या दिवशी पूर्ण दिवस सागरने तिच्याशी अबोला धरला. त्याच दिवशी संध्याकाळी काका काकू रीतसर आमंत्रण द्यायला आले.

"आमच्या सुधाला थोडं लवकर पाठवा जावईबापू, लग्नाची बरीच तयारी बाकी आहे, तिची मदत होईल आम्हाला.."

"मी नाही म्हटलं तरी ती ऐकणार आहे का.."

सागर तुसडेपणाने म्हटला..

क्रमशः

🎭 Series Post

View all