Login

जित्याची खोड

मराठी कथा

"तुला सांगते घरी गेलो ना घरभर पसारा असेल बघ, सूनबाईने कशाला हात लावला नसेल...आणि स्वयंपाकाची तर बोंबच असेल गं.. मला घरी गेल्यावर सगळं पहावं लागणार.. वाटलं होतं सून आली आता मी कामातून मोकळी, पण कसलं काय..उलट कामं वाढली माझी.."

शोभाताई आपल्या बहिणीला सांगत होत्या. दोघीजणी चार दिवसांसाठी सोबतच गावी एका लग्नाला गेल्या होत्या. येताना बहिणीने आग्रह केला म्हणून त्याही सोबत आल्या. शोभाताईंनी आपल्या बहिणीकडे किमयाबद्दल इतके गाऱ्हाणे केले होते की न अनुभवताच बहिणीला किमयाबद्दल राग उत्पन्न झाला होता.

दोघीजणी घरी गेल्या, शोभाताईंच्या चेहऱ्यावर आधीच त्रासिक भाव उत्पन्न झाले होते. त्यांनी घराचं गेट उघडलं आणि पाहतो तर काय...

घराचं आंगण अगदी स्वच्छ झाडून दाराशी सुंदर रांगोळी काढलेली होती. तुळशीसमोर दिवा तेवत होता. घरातून धूप दिव्याचा सुंदर सुगंध येत होता. पाय आत ठेवताच एका पवित्र आणि मंगलमय वातावरणाची अनुभूती येत होती.

शोभाताई जाम तोंडावर आपटल्या. एक तर इतक्या खात्रीने बहिणीला सांगून ठेवलं होतं की किमयाने सगळं अस्ताव्यस्त केलं असेल आणि घरी झाल्यावर सगळं उलटंच पाहायला मिळालं.!

सगळं घर अगदी झाडून पुसून स्वच्छ दिसत होतं, फर्निचरवर एवढीशी धुळही नव्हती..पडदे, बेडशीट धुवून कडक उन्हात वाळवून पुन्हा लावलेले दिसले..एकंदरीत सुनेने भरपूर आवरलेलं दिसत होतं. संध्याकाळी तिने जेवायला वाढलं तेही सगळं साग्रसंगीत आणि चविष्ट.

पण शोभाताईंची मात्र आता पंचाईत झाली..त्यांनाच हे सगळं बघून धक्का बसला होता.

"हिच्यात काय भूत शिरलंय कुणास ठाऊक..आपण येणार म्हणून केलं असेल इतकं..नाहीतर एरवी नाही करत ती.."

शोभाताई बहिणीला सांगत स्वतःचीही समजूत घालत होत्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी दोघी बहिणी उठल्या.. बहीण सोफ्यावर बसून चहाची वाट बघत होती तोच किमयाने पटकन चहा आणून दिला. चहा पिऊन बहीण पेपर वाचत बसली, पण शोभाताई मात्र किचनमध्ये घुसल्या.

"अगं अगं तेल कमी वापर.. हे काय? गॅस पंधरा दिवसातच संपला? आमच्यावेळी तर बाई आम्ही दोन दोन महिने सिलेंडर वापरायचो. आता काय, सगळं आयतं मिळतं ना..अमच्यासारखं भांड्याला भांडं जोडत संसार थोडीच करावा लागतो आजकालच्या मुलांना..जाताना डबे चांगले घासून गेले होते, पण आता सगळ्या डब्यांना हात लावून सगळी डाग पाडून ठेवलेत. म्हणून कुठे बाहेर जायचं म्हटलं की माझ्या अंगावर काटा येतो.."

शोभाताईंची अखंड बडबड सुरू होती..दोन मिनिटं तोंडावर लगाम नव्हता..किमया काम करेपर्यंत ती बडबड सुरूच...बहीण हॉलमधून सगळं ऐकत होती. किमयाने दोघींना नाष्टा दिला..नाश्त्यात मीठ कमी होतं. शोभाताई म्हणाल्या,

"नुसतं अळणी लागतंय बघ.."

किमयाचा चेहरा उतरला..

तिने घरातलं एकेक काम करायला घेतलं, प्रत्येक कामात चुका होत होत्या.. दुपारीही गव्हाच्या खिरीत गुळाऐवजी साखर टाकली आणि तिला नंतर लक्षात आलं..

शोभाताई बहिणीला म्हणाल्या,

"म्हटलं होतं ना मी? म्हटलं होतं ना?? बघ...अशीच आहे ही.."

बहिणीने सगळं ऐकून घेतलं..तिला बाजूला नेलं आणि म्हणाल्या,

"हे बघ शोभे... यात तिची नाही तुझी चूक आहे.."

"माझी??"

"नाहीतर काय..तू नव्हतीस तेव्हा तिने सगळं काम चोख केलं होतं, बरोबर?"

"हो, पण ते कसकाय?"

"हे बघ शोभे... मी आत्ताच तुझी वटरवटर ऐकली..ती काम करत असताना अखंडपणे तुझी बडबड सुरू होती.. त्यात किमयाला अर्धे टोमणे..त्यांच्या संसाराला टोमणे..तू कसा संसार केला याचं पुराण... अगं किती बोलतेस? तोंड नाही दुखत का तुझं??"

"माझं घर आहे, बोलले तर काय होतं? तेवढंही ऐकून घेऊ शकत नाही का आजकालच्या मुली?"

"ती ऐकून घेतेच ना? आत्तापर्यंत एकदाही तुला उलट उत्तर दिलंय??"

हे ऐकून शोभाताई विचारात पडल्या.. आपण इतकी बडबड करतो पण किमयाने एकदाही उलट उत्तर दिलं नाही..

"हे बघ शोभा.. माणूस जेव्हा एखादी गोष्ट करत असतो तेव्हा आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम त्याच्या कामावर होत असतो. आजूबाजूला शांत, प्रसन्न वातावरण असेल तर कुठलंही काम उत्तम होतं.. मग ते घरकाम असो वा अभ्यास, वाचन असो वा देवपूजा.. पण मी आज ऐकली तुझी बडबड, मलाच अपराधी वाटत होतं कारण नसताना मग तिला तर काय वाटत असेल? हेच कारण होतं तू नसतांना तिच्याकडून काम उत्तम झाल्याचं.."

शोभाताई विचारात पडल्या, त्यांना बहिणीचं म्हणणं पटलं होतं. स्वतःमध्ये बदल करायचा निर्णय त्यांनी घेतला खरा पण आता तो कितपत यशस्वी होईल देव जाणे...कारण जित्याची खोड....म्हण तुम्हीच पूर्ण करा...
समाप्त


********

विचार करायला लावणारी कथा - मम्माचा ब्वॉय

नवीनच लग्न झालेली सुधा उत्साहाने आपल्या नवऱ्यासाठी गरमागरम चहा घेऊन हॉलमध्ये आली. तिने एक कप नवऱ्याच्या हातात दिला आणि दुसरा स्वतः घेऊन नवऱ्याशेजारी बसली. नवरा थोड्याच वेळात ऑफिसला निघणार होता, तिला खूप काही सांगायचं होतं, बोलायचं होतं.. ती सुरवात करणार तेवढ्यात नवरा उठला आणि आईच्या बेडरूममध्ये गेला.

सुधाला वाटलं काहीतरी काम असेल, येईल परत. बराच वेळ झाला तरी अमोल बाहेर आला नाही म्हणून तीच सासूबाईंच्या बेडरूममध्ये गेली आणि तिने पाहिलं..अमोल आईशेजारी बसून चहा घेत गप्पा मारत होता.

सुधाचा हिरमोड झाला खरा पण ती काही बोलली नाही. नवऱ्याचा डबा आणायला किचनमध्ये गेली तेवढ्यात नवरा बाहेर पडला आणि त्याच्या मागोमाग सासूबाई गेल्या..

"पाकीट घेतलं? रुमाल? सावकाश जा..आल्यावर तुझा शर्ट माझ्याकडे दे..मी हाताने धुवून इस्त्री करून ठेवते.."

सासूबाईंचं बोलणं सुरू असतानाच सुधा दारापाशी गेली, तिला नवऱ्याला निरोप द्यायचा होता पण सासूबाईंनी दारातच जागा अडवली होती. सुधा तिथे येताच त्यांनी तिच्याकडून डबा हिसकावून घेतला आणि त्याच्या हातात दिला.
पूर्ण कथा Ira Blogging app वर
लिंक खालीलप्रमाणे