जीव वेडावला भाग २

राजने तीच्या कपाळावर किस केला. आय लव यु म्हणत त्याने तिला अंगठी घातली.
पूर्वार्ध
गेल्या भागात आपण पाहिले की, वेदा राजच्या प्रेमात पडली होती. राजला त्याबाबतीत कल्पना नव्हती. आता पाहू पुढे.

वेदा आणि काव्या दुसऱ्यादिवशी वेदाच्या घरी निघाल्या. वेदाला पाहून तिची आई साधना खुश झाली.

मुंबईतल्या मुंबईत वेदा कामाला जरी होती तरी हल्ली येणं कमी झालं होतं.

वेदा आईला घट्ट बिलगली, तितक्यात तिची मोठी बहीण वैदेही आली.

"वेदा कशी आहेस?" वैदेही तिला मिठी मारत म्हणाली.

"ताई, मी मस्त गं. तू बोल, तू कशी आहेस?" वेदा.

"मी पण एकदम मस्त."

साधना आणि वैदेहीने काव्यालाही मिठी मारली.
काव्या अगदी त्यांच्याच घरातली एक होती.

सगळ्यांच्या गप्पा रंगल्या.

साधना म्हणाली, "वेदा, ह्यावेळी तुला खास कारणासाठी बोलावले आहे."

"खास कारण?" वेदा.

"अगं वैदेहीसाठी मी मुलगा पाहिला आहे. तोच तिला उद्या बघायला येणार आहे. म्हणून तुला बोलावलं."

"वा! मस्तच. चला तर उद्या येणाऱ्या मुलाची चांगली परीक्षा घेते. ते काय वधूपरिक्षा घेतात तसंच आता मी वरपरिक्षा घेईल." वेदा.

"त्याची काही गरज नाही." साधना हसतच म्हणाली.

"का बरं?" वेदा वैदेहीकडे पहात म्हणाली.

"त्याचे काय आहे की, मुलगा माझ्या खास मैत्रिणीच्या नंणदेचा मुलगा आहे. ती म्हणत होती असा मुलगा शोधूनही सापडणार नाही." साधना.

"आई, हे बघ माझ्या ताईच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मी तर त्याला चांगले प्रश्न उत्तर विचारणार." वेदा काव्याकडे डोळा मारत म्हणाली.

"बरं काय करायचे ते कर. फक्त गोंधळ नको घालूस." साधना.

साधना किचनमध्ये कामा करण्यास निघून गेली.

"काय ताई तू मला ह्या संदर्भात काहीच सांगितले नाही." वेदा लटक्या रागात म्हणाली.

"अगं तुला सरप्राईज द्यायचे होते म्हणून काहीच सांगितले नाही." वैदेही वेदाचे गाल ओढत म्हणाली.

"बरं ताई मला फोटो दाखव ना मुलाचा." वेदा.

वैदेहीने मोबाईल मधला फोटो दाखवला.

विक्रम नाव होते मुलाचे. दिसायलाही वैदेहीला शोभेल असाच होता.

वेदाने तो फोटो काव्याला दाखवला.

"हम्म दिसायला बरा आहे. शिक्षण छान आहे आणि चांगल्या कंपनीत कामाला आहे. फोटोत तर ठीकठाक दिसतो आहे आता उद्या प्रत्यक्षात समोर आला की, कसा दिसतो ते बघू." वेदा त्या फोटोचे निरीक्षण करतच म्हणाली.

"वेदा, लग्न ताईला करायचे आहे. ताईला मुलगा आवडला पाहिजे तुला नाही." काव्या.

"काव्या, बघ जीजू तर मीच पसंत करणार. मी हो बोलल्याशिवाय ताई काही हो म्हणायची नाही. फुल्ल कॉन्फिडन्स आहे मला." वेदा वैदेहीकडे पहात म्हणाली.

वैदेही दोघींचे बोलणे ऐकत होती.

"आणि ताई तुला मुलगा जर आवडला नाही तर सरळ नाही बोलून टाक काय?" वेदा.

"वेदा, हो गं माझी आजीबाई. तुला खूप कळायला लागलं आहे. मी विचार करते आहे माझ्याआधी तुझ्याच लग्नाचा बार उडवून द्यावा."

"ताई, मी आणि लग्न. नो वे." वेदा.

काव्याने तिला हलकासा चिमटा काढत विचारले. "सांगू का राज बद्दल ताईला?"

"काव्या, नाही हं. असं काही करणार नाही तू." वेदा हळू आवाजात म्हणाली.

दोघी इतक्या हळू आवाजात बोलत आहे हे पाहून वैदेही म्हणाली.

"काय गं तुम्ही दोघी इतकं काय सीक्रेट बोलत आहात? मला पण सांगा."

"काही नाही गं ताई. बरं उद्या तू साडी नेसणार आहेस की काय?" वेदा विषय बदलत म्हणाली.

"नाही गं. सिम्पल पंजाबी ड्रेस घालणार." वैदेही

"बरं, तुझं काम कसं चाललंय?" वैदेही.

"एकदम फर्स्ट क्लास." वेदा.

"बरं, चल मी आईला स्वयंपाकात मदत करते. तुम्ही दोघी गप्पा मारत बसा.

वैदेही जशी उठली तसा वेदाने काव्याच्या हाताला जोरात चिमटा काढला.

"आई गं! काय गं वेदा?" काव्या हात चोळत म्हणाली.

"तुला शिक्षा." वेदा.

"कशासाठी?" काव्या.

"ताईसमोर राजच नाव का घेतलं? ऐकलं असतं ना तिने." वेदा.

"त्यात काय ऐकू दे. असेही तो ह्या घरचा जावई होणार आहे." काव्या अजूनच तिला चिडवत म्हणाली.

"काव्या, असं केलं ना तर बघ मी तुझ्याशी बोलणार नाही हं." वेदा तोंड फुगवत म्हणाली.

"तू आणि माझ्याशी बोलणार नाही असं होणारच नाही." काव्या

"तुला सगळं माहीत आहे म्हणून अशी करते ना?" वेदा.

काव्या तिला गुदगुली करत म्हणाली,"हो मी अशीच करणार."

दोघीही जोरजोरात हसू लागल्या

**********************

संध्याकाळी जेवण आटोपल्यावर साधना एकटीच गॅलरीत बसून होती. काव्या आणि वैदेही रूममध्ये गप्पा मारत बसल्या होत्या. आईला एकदम शांत पाहून वेदा तिच्याकडे गेली. जवळ जाऊन पाहिले तर साधनाच्या डोळ्यात पाणी होते.

"आई, काय झालं?" साधनाने डोळे पूसले. "काही नाही गं, असंच आज तुझ्या बाबांची आठवण आली."

वेदाचे वडील काही वर्षांपूर्वी एका अपघातात देवाघरी गेले होते, तेव्हापासून साधनाच वेदा आणि वैदेहीची आई आणि बाबा झाली.

साधना आणि तिच्या नवऱ्याने जे स्वप्न पाहिलं होतं ते डोळ्यासमोर उभं राहिलं. मुलींची लग्न थाटामाटात करणार, त्यांच्या आनंदासाठी खूप काही करणार. किती काय काय स्वप्न रंगवली होती. ते स्वप्न पूर्ण करायला ते आज नव्हतेच.

उद्या किती महत्वाचा दिवस होता. अश्या क्षणाला आपल्या जवळच्या माणसांची आठवण येतेच.

साधना त्याच विचाराने व्याकुळ झाली होती. साधनाला मनात कुठेतरी वाटत होतं की, जो मुलगा उद्या बघायला येणार आहे नक्कीच तो वैदेहीला आवडेल आणि लग्नही ठरेल त्यामुळेच ती भाऊक झाली होती. कधी नव्हे ते आज तिला एकटं वाटत होतं.

ती देवाचे नेहमी आभार मानत की, इतक्या गुणी,हुशार,मायाळू मुली दिल्या आहेत; पण तरीही नवरा असा अचानक देवाघरी गेला त्यामुळे ती दुःखीही होत. त्याची कमतरता कोणीही भरून काढणार नव्हतं आणि अशा प्रसंगी तिला हमखास त्याची आठवण यायची.

आईचा मूड ठीक नव्हता ते पाहून वेदाला कसंतरीच झालं. तिने आईचे डोळे पुसले आणि म्हणाली,"आई बाबा नेहमीच आपल्या सोबत आहेत आणि त्यांना विश्वास आहे की तू आमचं चांगलच करशील."

वेदाने साधनाचे डोळे पुसले.

वेदा चल आपण आता झोपूया. उद्या पाहुणे येणार आहेत. लवकर उठावं लागेल." साधना.

वेदा राजच्या विचारात हरवली. ताईचं लग्न झालं की राजबद्दल आईला सांगेन असा विचार करून झोपी गेली.

राज पुन्हा स्वप्नात आला.

"वेदा, आय लव यु." असे म्हणत त्याने डायमंड रिंग तिच्या हातात घातली. तिच्या कपाळावर किस केला. ती केवळ लाजत होती.

"आय लव यु टू राज. ह्याच दिवसाची मी वाट पाहत होते. लव यू राज."

काव्याने तिला उठवले.
"वेदा, तुझ्या भावना राजपर्यंत पोहोचल्या."

वेदा डोळे चोळत उठली.

भानावर आली. स्वप्न होते.

"वेदा, फायनली राजने केलं ना प्रपोस?" काव्या.

"तुला कसं कळलं?" वेदा.

"अगं, किती जोरात बोलत होती तू. आय लव यू राज." काव्या.

"काय?" जीभ चावत वेदा म्हणाली.

"हो मॅडम तुमचं लव यू माझ्यापर्यंत पोहोचले." काव्या तिच्या हनुवटी अलगद पकडत म्हणाली.

वेदाला आता कसंतरीच झालं.

साधना आली. "पोरींनो चला पटकन आवरून घ्या. नाश्ता तयार आहे."

"हो आई लगेच येतो." वेदा.

साधना निघून गेली.

"काव्या, काय गं हा राज हल्ली माझ्या रोज स्वप्नात येऊ लागला आहे. खऱ्या आयुष्यात केव्हा येणार." वेदा.

"येईल गं तो. जरा धीर धर. ताईचे लग्न झालं की तुझा राज तुझ्या आयुष्यात आलाच म्हणून समज." काव्या.

"काव्या, असंच होईल ना? येईल ना राज माझ्या आयुष्यात." वेदा.

"हो गं वेदा, राज तुझाच होणार." काव्या.

क्रमशः

अश्विनी कुणाल ओगले.



🎭 Series Post

View all